चित्रकाव्य
दोन काव्ये – (१) रामलल्ला… (२) विजय सत्याचा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक आणि श्री आशिष बिवलकर ☆
श्री प्रमोद वामन वर्तक
– रामलल्ला… – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
( १ )
संपता वनवास श्रीरामांचा
नयनात आसवे दाटली,
स्वागतकरण्या रघुनंदनाचे
आज अयोध्या सजली !
*
केले अंगणी सडासंमार्जन
गुढ्या तोरणे बांधली दारी,
होता आगमन रघुरायाचे
आनंद मावेना घरी दारी !
*
लावून मंगल दीप दारात
चला करू दिवाळी साजरी,
गोड धोड करून पक्वान्न
भेटू रामरायांना उरा उरी !
*
झाली वसुंधरा राममय
बघावे तिकडे भगवा रंग,
भान हरपूनी सारे भक्त
भजन कीर्तनात होती दंग !
*
पूजा करुनी शोडषोपचारे
मूर्ती सुंदर मंदिरी स्थापूया,
दर्शन घेण्या रामलल्लाचे
चला अयोध्येला जाऊया !
चला अयोध्येला जाऊया !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
☆☆☆☆☆
श्री आशिष बिवलकर
– विजय सत्याचा… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆
( २ )
पाचशे वर्षांचा | संपे वनवास |
अयोध्येला आस | श्रीरामाची ||१||
*
परकीय सारी | आक्रमण झाली |
कोणी नाही वाली | रक्षणासी ||२||
*
मुघलशाहीत | पाडले मंदिर |
वेदना बधीर | करुनिया ||३||
*
बाबरी मशीद | तेथेच बांधली |
अस्मिता दाबली | सनातनी ||४||
*
पाच शतकांचा | जन्मभूमी लढा |
सुटेचीना तिढा | रीतसर ||५||
*
सहा डिसेंबर | बाबरी पतन |
अस्मिता जतन | धर्मासाठी ||६||
*
विजय सत्याचा | धर्मा प्रती न्याय |
आयोध्येत पाय | श्रीरामाचे ||७||
*
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈