मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 200 ☆ कैवल्याचे निजधाम ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 200 – विजय साहित्य ?

कैवल्याचे निजधाम ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

संजीवन समाधीचा

अनुपम्य हा‌ सोहळा

माउलींच्या भेटीसाठी

सजलासे भक्त मळा. १

 

बाबा हैबत पायरी

आद्य पूजनाचा‌ मान

महा नैवेद्य प्रसाद

पुण्य‌ संचिताची खाण. २

 

पंच उपचार पूजा

पुष्पवृष्टी रथोत्सव

चल पादुकांची पूजा

संजीवक महोत्सव. ३

 

पवमान अभिषेक

महापूजा दुधारती

दिंडी, काकडा भजन

घंटानाद धुपारती. ४

 

नित्य पालखी छबिना

होई माऊलींचा भास

प्रवचन कीर्तनाला

साथ भारुडाची खास. ५

 

विठू‌ येई भेटायला

भक्तराज ज्ञानियासी

गहिवरे इंद्रायणी

शब्द नाही वर्णायासी. ६

 

छाया अजान वृक्षाची

संजीवन‌ समाधीला

साक्ष सुवर्ण पिंपळ

बीज प्रसार घडीला. ७

 

ज्ञानवृक्ष देववृक्ष

येई भक्तांचिया काजा

करी सेवा संवर्धन

ज्ञानियांचा ज्ञानराजा .८

 

कार्तिकाची एकादशी 

होई आळंदीची वारी

संजीवन समाधीचा

महोत्सव मनोहारी.९

 

संजीवन सोहळ्यात

टाळ लागती टाळाला

संकीर्तंनी भजनात

नाद भिडे आभाळाला. १०

 

आळंदीत कार्तिकात

सप्त‌ शतकांची चाल

आला विठ्ठल भेटीला

त्रयोदशी पुण्यकाल. ११

 

माउलींचा साक्षात्कार

काया‌ वाचा जपनाम

माउलींचा जयघोष

कैवल्याचे निजधाम.१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नर्तकी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ नर्तकी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

कोण नर्तकी गिरक्या घेत

फिरत राहते युगानुयुगे

तिच्या वरती लुब्ध होऊनी

कितीक लागले तिच्या मागे॥

भान नाही तिजला स्वत:चे

दिनरात्र फिरणे थांबत नाही

ती पण नाचते प्रियकरासाठी

त्याला तिची परी पर्वा नाही॥

प्रियकर तिचा अष्टौप्रहर

काम करितो दुसर्‍यांसाठी

याच गुणामुळे ना रूष्टते ती

पण सदा असते त्याच्या पाठी ॥

त्या नृत्यावर सृष्टी फिदा

तिच्या अंकावरीच नांदे

पृथ्वीच्या या नवख्या नृत्यात

चराचर सारे रंगे

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

अर्जुन उवाच 

ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । 

तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥ 

कथित अर्जुन 

कर्मापेक्षा श्रेष्ठ ज्ञान कथिसी जनार्दना

घोरकर्म आचरण्या उद्युक्त का करिशी कृष्णा ॥१॥

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । 

तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ २ ॥ 

तुमच्या या वाणीने झाली भ्रमित माझी मती

कल्याणकारक आता सांगा मजला निश्चित युक्ती ॥२॥

श्रीभगवानुवाच

लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । 

ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३ ॥ 

कथित भगवान

विश्वामध्ये निष्ठा असते दोन प्रकाराची

ज्ञानयोगे सांख्ययोग कर्मयोगे निष्ठा योग्यांची ॥३॥

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । 

न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥ 

ना आचरता कर्म निष्कर्मता ना होई प्राप्त

त्यागाने कर्माच्या केवळ सिद्धी ना होई प्राप्त ॥४॥

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ । 

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ५ ॥ 

सृष्टीने सकलांना दिधले गुण जीवन जगण्या कर्मी

क्षणमात्र ना जीवनात कोणी राहू शके अकर्मी ॥५॥

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ । 

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ६ ॥ 

मूढ करितो जरी आपला इंद्रियसंयम

मनी तयाच्या सदैव जागृत विषयचिंतन ॥६॥

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन । 

कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७ ॥ 

अनासक्त होऊनी मनाने इंद्रिय नियमन

श्रेष्ठ पार्था रे ते निश्चित कर्मयोगआचरण ॥७॥

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । 

शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥८ ॥ 

शास्त्रविहित तू कर्म करावे राहून अकर्मी मनी 

देहाचा निर्वाह न सिद्ध होतो अकर्मी राहूनी ॥८॥

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । 

तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ९ ॥ 

यज्ञार्थ व्यतिरिक्त कर्मांने मनुजा कर्मबंधन

सोडुनिया फलाशा तू करी कर्म आचरण ॥९॥

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । 

अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ १० ॥ 

कल्पारंभी प्रजापतीने यज्ञासवे प्रजा निर्मिली

मनोरथांची पूर्ती होईल यज्ञाची महती सांगितली ॥१०॥

– क्रमशः भाग तिसरा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । 

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥ 

आचरणासी श्रेष्ठांच्या  अनुसरती सामान्य

बोल तयांचे  समस्त जगत मानिती प्रमाण्य ॥२१॥

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । 

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥ 

तिन्ही लोकी मजला पार्था  ना कर्तव्य काही

मजला अप्राप्त असेही काही या विश्वात नाही

देहाचे परि जाणुनिया भोग विन्मुख ना झालो

जीवनात जी विहीत सारी कर्मे करीत आलो ॥२२॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । 

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥ 

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ । 

सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥ 

सावध राहूनीया मी पार्था नाही केली कर्मे

सर्वनाश जगताचा होइल जाणुन घे  वर्मे

मलाच अनुसरते हे विश्व मजला श्रेष्ठ मानून

अकर्मी होता मीच सारे होतील रे कर्महीन ॥२३-२४॥

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।

कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥ 

कर्मे करिती कर्मासक्त असती अज्ञानी

कर्म करावी अनासक्त ज्ञानी विद्वानांनी 

संग्रह करणे लोकांचा मनी धरुनी इप्सिता

कर्माचरणी मनुजे व्हावे हे कर्तव्य भारता ॥२५॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ । 

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ २६ ॥ 

परमात्मस्वरूपी लीन स्थित ज्ञानी विद्वान

कर्मासक्त अज्ञान्याचा करू नये बुद्धीसंभ्रम

शास्त्रविहित आचरुनीया कर्मे आदर्श मांडावा

कर्म करण्याचा सकलांना सुमार्ग दावावा ॥२६॥

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । 

अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥ 

मनुष्यद्वारे कर्मे घडती गुणपरत्वे प्रकृतीच्या

अहंकारमूढ मानतो परी कर्ता मी मम कर्मांचा ॥२७॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । 

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥ 

समस्त गुण स्थायी गुणात शूर अर्जुना जाण

ज्ञान्या उमगते त्यांचे विभाग कर्म तथा गुण 

जीवन त्याचे असते सदैत तयात विहरत

तयामध्ये तो कधी न बद्ध होउनी आसक्त ॥२८॥

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । 

तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ २९ ॥ 

आसक्तीने मूढ जाहले गुणकर्मातच लुब्ध 

अर्धज्ञानी ते अज्ञानी असती मंदबुद्ध

बुद्धिभेद ना कधी करावा त्यांच्या आचरणात

प्रज्ञावाने मग्न असावे कर्मा आचरत ॥२९॥

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । 

निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३० ॥ 

चित्तासी तव एकरूप कर म्या परमात्म्याठायी

अर्पण करी रे तव कर्मांसी माझीया पायी

त्याग करोनी आशेचा ममत्वाचा अन् संतापाचा

शस्त्र धरोनी सिद्ध होई वसा घेउनी युद्धाचा ॥३०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हवा गुलाबी… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘हवा गुलाबी…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(वृत्त~अनलज्वाला)

मिठीत सखया आज तुझ्या मज राहू दे ना

थंड हवा ही कशी गुलाबी पहडू दे ना ।।१।।

पुनवेची ही रात चमकते गुलाबी हवा

मोरपिसाचा स्पर्श तुझा मज वाटतो हवा ।।२।।

युती पहा ही गगनामध्ये चंद्र रोहिणी

मीलन अपुले इथे मंचकी तुझी मोहिनी ।।३।।

झुळझुळ करतो पहाटवारा पक्ष्यांचा रव

किरण कोवळे दिवाकराचे कुक्कुट आरव ।।४।।

दाट धुक्याची चादर खुलते अवनीवरती

श्वासामध्ये तुझे नि माझे श्वास मिसळती ।।५।।

शीतल वारा तनुला माझ्या किती झोंबतो

कवेत येता तुझ्या राजसा जीव हरखतो ।।६।।

नकोस येऊ अरे भास्करा वरती वरती

हवा गुलाबी अशीच राहो प्राचीवरती ।।७।।

दुलईमध्ये गुडुप निजाया रंगत न्यारी

सखयासंगे थंड गुलाबी पहाट प्यारी ।।८।।

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #180 ☆ फाटक कापड…!! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 180 ☆ फाटक कापड…!! ☆ श्री सुजित कदम ☆

माझी माय 

जितक्या सहज

सुईत दोरा ओवते ना..

तितक्याच सहज जर 

बापाला मरणाच्या दारातून

परत आणता आलं असतं तर ?

किती बरं झाल असतं…!

आज …

तो असता तर ,

आमच्या चिमूकल्या डोंळ्यात

भरून आलेल्या आभाळा ऐवजी

इंद्रधनूचे रंग असते.. . . 

आणि.. . . 

त्याच्या आठवणीत बोचणा-या

सा-याच क्षणांना

फुलपाखरांचे पखं असते

तो असता तर. . . . 

मायेच्या हातातली सुई

कँलेडरच्या कोणत्यातरी पानावर 

फडफडत राहीली असती

दिवस रात्र…

पण आता मात्र

हातशिलाई करताना ती 

टोचत राहते मायेच्या बोटांना

अधूनमधून

आणि…

शिकवत जाते

एकट्या बाईन संसार

करायचा म्हटंला तर

टोचत राहणाऱ्या समाजाकडे

दुर्लक्ष करून

आपण आपल्या संसाराचं

फाटकं कापड कसं शिवायचं ते..!

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझा संसार व मी …… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ माझा संसार व मी …… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

माझ्या लग्नानंतर मला कळलेल्या व पटलेल्या आणि मनाला भिडलेल्या, बऱ्याच गोष्टी या लेखात मला वाचण्यास मिळाल्या, पहा वाचा तुम्हालाही कदाचित पटतील व विचार करण्यास भाग पाडतील…

संसार काय असतो हे नेमक्या आणि मोजक्या शब्दात येथे मांडलंय

कागदावर जुळलेली पत्रिका

आणि

काळजावर जुळलेली पत्रिका 

यात नेहेमीच अंतर राहतं…

 

लाखो मनांच्या 

समुद्रातून योगायोगाने 

२ मनं अगदी एकमेकांसारखी 

समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, 

हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.

 

वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे 

असतीलच कसे?

 

सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं 

हीच तर नियतीची जुनी हौस आहे.

 

सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. 

या न देण्याचंच ‘देणं’ 

स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.

 

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर 

तुला मिळणारा ‘जीवन साथीदार’ अगदी तुला हवा तसा 

असणार कसा?. 

त्याचे – आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. 

त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, 

त्याचं माणूस म्हणून 

वेगळेपण आहे, 

हे मान्य करणार असाल 

तरच संसारात पाऊल टाकावं.

 

अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.

 

कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. 

बघण्याच्या समारंभात 

गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, 

श्रद्धा-अंधश्रद्धा असे 

तेलकट प्रश्न विचारा..  

या प्रश्नांची उत्तरं ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या 

सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.

 

लग्नानंतर मग 

खरं काय ते एकमेकांना कळत जातं. 

 

तेव्हा म्हणाली होती …. ‘वाचनाचा छंद आहे’ 

पण नंतर साधं वर्तमानपत्र 

एकदाही उघडलं नाही बयेनं…

जाब विचारू शकतो आपण?

किंवा

 तो म्हणाला होता – ‘प्रवासाची आवड आहे; 

जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं – असं स्वप्न आहे!’

पण

प्रत्यक्षात कळतं; 

कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.

जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं…

 

प्रवासाची आवड कसली?

कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब… 

वर्षभर सांगतेय .. माथेरानला जाऊ 

तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो…

 

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे.

उरलेले न जुळलेले ४ कुठले 

ते कळले असते तर…

 

मनापासून सांगतो,

त्या न जुळलेल्या गुणांशीच 

खरं तर लग्न होत असतं आपलं.

 

तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, 

तीच व्यक्ती टिकली…

 नाही जमलं की विस्कटली.

 

अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला… 

पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन, 

नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता  दोघांमध्ये हवी.

 

पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाहीये;

 

आपल्याला ‘हवी तशी’ व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; 

पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं 

हेच खरं वास्तव आहे.

 

धुमसत राहणाऱ्या राखेत

 कसली फुलं फुलणार ?..

 

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, 

ते मी स्वीकारणार आहे का?-

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी देऊन 

मगच संसार मांडायला हवा.

 

आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं 

… हे या वाटेवरच पाहिलं पाऊल…

 

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की मग … 

इतर सहा पावलं सहज पडत जातात.. 

आणि मग ती “सप्तपदी” – “तप्तपदी” होत नाही..

हेच संसाराचं खरं मर्म आहे.

हरीॐ

“मेड फॉर इच अदर” आपोआप होत नाहीत…. 

… होत जातात…

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ये की रे जरा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ये की रे जरा? सुश्री वर्षा बालगोपाल 

माकडा माकडा कर हुपहुप

ये जरा खाली खेळू खूपखूप 

तुझी आई गेली सोडून तुला

माझी आई पण गेली कामाला

दोघे आपण मित्र नको गुमान गुप

ये जरा खाली खेळू खूपखूप ॥

येताना जरा तू चिंचा ये घेऊन

मी पण आणले आहे एक केळ घरून

दोघे मिळून खाऊ, बाकीच्यांना टुकटुक

ये जरा खाली खेळू खूपखूप ॥

आपण दोघे एक झालो बाकिचे बघतात

आपल्या गोड मैत्रीला उगाचंच हसतात

हसले तर हसू दे पण भेटत राहू गुपचुप

ये जरा खाली खेळू खूपखूप ॥

तू माझा हनुमंत मी तुझा राम

अशी मैत्री नसते कुणाची त्यांना असते काम

नात्यात श्रेष्ठ नाते हे मैत्रीचे लोणकढी तूप

ये जरा खाली खेळू खूपखूप ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समाधीस्थ  ज्ञानदेव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ समाधीस्थ  ज्ञानदेव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आळंदी सोडून चालली ती,

चार सान गोजिरी  मुले !

काट्याकुट्यांच्या मार्गामध्ये,

अडखळत होती त्यांची पाऊले!….१

   आळंदीकरांनी  हिणविले तयांना,

‘.   ‘संन्याशाची मुले’ म्हणूनी!

      व्याकुळलेली मने घेऊनी,

     चालली लेकरे हतबल होऊनी!..२

निवृत्तीचा स्वभाव संयत,

ज्ञानाची त्या होती साथ!

सोपान मुक्ता पाठी त्यांच्या,

 चालू लागले अवघड वाट!…३

  पैठण क्षेत्री गेली भावंडे,

  मिळेल काही न्याय म्हणूनी!

 मोठे पण त्यांचे नाही आले,

  शास्त्री पंडित यांच्याही ध्यानी!..३

दुःखी होऊनी परत निघाली,

घेऊन आली शुद्धिपत्रास !

आता तरी मिळेल का हो,

 करण्या आम्हा आळंदीत वास!..४

पैठण,नेवासे वाट चालता,

 केले काही चमत्कार जनी!

कळून येता त्यांची महती,

 अवाक् झाली सारीच मनी!…५

आळंदीला परतून येता,

 ज्ञाना म्हणे कार्य ते झाले!

गुरु निवृत्तीची आज्ञा होता,

 समाधी घेण्या सिद्ध जाहले!..६

तिथे पाहिली जागा सत्वर,

 खोल विवर शोधिले त्यांनी!

ज्ञानदेव त्या विवरी शिरता,

 शिळा ठेवली निवृत्तीनाथांनी!…७

योगेश्वर रूप ते ज्ञानदेव,

आळंदीस समाधीस्थ झाले!

अजून त्याची साक्ष देत हा,

 सोन्याचा पिंपळ त्यावरी झुले !…८

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 208 ☆ वाट माझी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे


? कवितेच्या प्रदेशात # 208 ?

वाट माझी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

चांदण्याची वाट माझी

चालले आहे सुखाने

भोगले जे सौख्य येथे

तृप्ततेच्या जाणिवेने

एक छोटा गाव माझा

डोंगराच्या पायथ्याशी

जन्म माझा धन्य झाला

चंद्र घेता मी उशाशी

वाट माझी गंध ल्याली

रातराणी शुभ्र साधी

चार वाटा ज्या मिळाल्या

चौक झाला की सुगंधी

त्या सुगंधी वादळाला

काय आता नाव द्यावे

जन्म घेण्या या इथे मी

चांदणी, आकाश व्हावे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares