मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग !!! – कवयित्री : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग !!! – कवयित्री : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आज मीच मला चाॅकलेट दिलं,

एक घट्ट मिठी मारून “लव यू ” म्हटलं,

मीच केलय एक प्राॅमिस मला,

कायम खूश ठेवणार आहे मीच मला….

 

प्रायोरिटी लिस्टवर माझं स्थान नेहेमीच शेवटी,

ते आणिन आता थोडं तरी वरती,

सगळ्यांचं सगळं करताना विसरणार नाही स्वतःला,

मीच एक फूल दिलय आज मला….

 

खूप खूप वर्षांनी खाली ठेवलाय 

तो सुपरवुमनचा किताब,

मन होऊन जाऊदे 

फुलपाखरू आज…

 

नाही जमत मला तिच्यासारखा स्वयंपाक,

आणि येत नाही तिच्यासारखं रहायला झक्कास,

येत नाही टाईम मैनेजमेंट मला,

काँम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गैजेट्समधे मी “ढ” गोळा….

 

आज मान्य मला माझे सारे दोष अन् कमतरता,

माझ्यातला वैशाख,

कारण आज उतरवून ठेवलाय,

मी आदर्श भारतीय नारीचा पोषाख….

 

हिचे केस, तिची उंची, हिचा रंग, तिचा आवाज,

नको ती तुलना, नको ती इर्ष्या,

तोच स्त्रीयांचा खरा शाप…

आज मी मिळवणार आहे अपूर्णतेतल्या पूर्णतेचा उःशाप….

 

मी शिकवणार आहे मला, जशी आहे तशी आज,

आरश्यासमोर उभी राहून बघणार आहे स्वतःला,

ना कोणाची बायको, सुन, आई, मुलगी म्हणून… फक्त मला…

गुणदोषांसकट स्वतःच्या प्रेमात पडायचय मला…

 

का हवा मला नेहेमीच घोड्यावरून येणारा स्वप्नातला राजकुमार? 

मीच होणार माझ्या सुखाची शिल्पकार…

आत्ममग्नतेच्या तळ्याकाठी बसेन काही काळ,

आणि फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग!!!

कवयित्री : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वप्न… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ सारे फक्त जगण्यासाठी… ☆ सुश्री त्रिशला शहा

कुटूंब कबिला चालविण्या

पोटासाठी हा धंदा डोंबाऱ्याचा

*

गाण्याच्या तालावरती

नाचनाचते दोरीवरती

*

अपेक्षा काही जास्त नाही

भुकेपुरती मिळावी भाकरी

*

एक दोन रुपये मिळविण्यासाठी

जीवघेणा खेळ खेळते मी

*

आज इथे तर उद्या तिथे

डोंबाऱ्याचे जगणे फिरतीचे

*

कष्ट उपसते जगण्यासाठी

बालपण मज माहित नाही

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 263 ☆ अभिजात मराठी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 263 ?

☆ अभिजात मराठी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आम्ही मानतो आभार

जय राज्य सरकार

नमो केंद्र सरकार

अभिजात हा आधार ॥

 *

महाराष्ट्र शासनाच्या

प्रयत्नांना आले यश

महाराष्ट्री-प्राकृतास

सारे लाभले निकष ॥

 *

मातृभाषा मराठीस

देई मान्यता लगेच

भारताचे  सरकार

गुणग्राही निश्चितच ॥

*

अभिजात मराठीस

मिळो राज्याश्रय खास

डंका मराठी भाषेचा

सदा गर्जो हाच ध्यास ॥

*

ग्रंथ गाथा सप्तशती

पुरातन कितीतरी

ज्ञानेशांची ज्ञानेश्वरी

वही तुकोबांची खरी ॥

 *

माझी मराठी अफाट

परिपूर्ण काठोकाठ

सदा भरलेला राहो

घट अमृताचा ताठ ॥

 *

गोड मराठी आपली

तिला विद्वतेची खोली

आहे रसाळ- रांगडी

 मस्त मराठीची बोली ॥

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

 

 

? कवितेचा उत्सव ?

☆ माय मराठीसौ. वृंदा गंभीर

मातृभाषा मराठी

हीच माय माऊली

झटलो तिच्यासाठी

अभिजात ती झाली

*

सेवा करा मराठीची

जपा संस्कृती भाषेची

नका वाढवू इंग्रजी दर्जा

कास धरा मराठी परंपरेची

*

होऊन गेले दिग्गज

वाहिले प्राण त्यांनी

संस्कृती चे हे राज

मराठीत आणले माऊलींनी

*

ऐकाया गोड मराठी

बोलाया शुद्ध मराठी

माय माऊली मराठी

महाराष्ट्राची शान मराठी

*

अभिमान मराठी

स्वाभिमान मराठी

आदर आमचा मराठी

श्रेष्ठ वाटते मराठी

*

चला करू तिचा उद्धार

गाऊ मराठीची महती

करू मराठीची आरती

सगळे प्रेमाने माय म्हणती

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – माझी भाषा माय मराठी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?  कवितेचा उत्सव ?

माझी भाषा माय मराठी ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

जन्माला आल्यावर,

बोबडे बोल आले ओठी |

श्वासाश्वासात जगतो,

माझी भाषा माय मराठी |

 *

अमृताहुनही गोड,

जीची महती वर्णावी जगजेठी |

ज्ञानाचा महासागर,

सामावते माझी माय मराठी |

 *

शब्दातून व्यक्त होण्यासाठी,

जन्मोजन्मी जिव्हेशी जोडल्या गाठी |

कशाचीही तमा न बाळगता,

व्यक्त होताना बोलतो मराठी |

 *

संतांनी आयुष्य खर्चले,

समाजाच्या उद्धारासाठी |

साध्या सोप्या शब्दात,

लिहल्या ओवी मराठी |

 *

नाठाळांच्या माथी हाणायाला,

वापरतो शब्दरुपी काठी |

संताप व्यक्त करतांना,

शिव्यांची लाखोली वाहतो मराठी |

 *

कविता लिहीयाचा छंद जडला,

मी असेल नसेल त्याच स्मरतील पाठी |

माझ्या शब्दांवर प्रेम करणारे,

काव्य रसिका असतील मराठी |

वास्तवरंग

 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #275 ☆ कर शिलाई… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 275 ?

☆ कर शिलाई… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

उसवलेली जोड नाती कर शिलाई

जोड आता सर्व जाती कर शिलाई

*

चप्पलेचा फक्त तुटला अंगठा तर

फेकतो का घेत हाती कर शिलाई

*

वार शब्दांचे किती हे खोल झाले

फाटलेली खोल छाती कर शिलाई

*

फाटक्या कपड्यातली ही माणसे बघ

आज आशेने पहाती कर शिलाई

*

जोडणारा तू असा माणूस हो ना

जगभरी होईल ख्याती कर शिलाई

*

कापडाचे कैक धागे जोडणारा

तूच धागा तू स्वजाती कर शिलाई

*

सज्जनांचे काम असते जोडण्याचे

संत हेची सांगताती कर शिलाई

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी गौरव दिन… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ माय मराठी गौरव दिन… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

सह्याद्रीचे पाणी झुळझुळ

पडता कपारीतून होते निर्मळ

मनामधुनी झुरतो मरहट्ट हा

होते रचना अमृत प्रांजळ

*

माय बोलीचे करता पूजन

स्त्रवते रांगडी भाषा उज्वल

वागेश्वरीला करता आवाहन

पडती शब्द ओज्वळ सोज्वळ

*

शब्द अलंकार धरता वेठीस

साद देतो मायेने आईस

गाय हंबरते देखता पाडस

फुटे पान्हा निव्वळ मधाळ

*

तप्त तव्यावर फुटती लाह्या

शब्द बिलगती गाणी गाया

सप्तरंगाच्या इंद्रधुनवर

माय बरसते मधुर रसाळ

*

काव्य असावे अक्षर प्रांजळ

जशी वाजते बासरी मंजुळ

जशी काया राधा नितळ

लेणी घडावी सुंदर कातळ

*

संत महात्मे इथे नांदले

अभंग भारुड दिंड्या गायिले

 ज्ञानियाचा राजा होता मंगल

 कीर्तनास त्याच्या होई वर्दळ

*

यवनाची वाढता सळ सळ

नराधमाची होई कत्तल

हरहर महादेव नारा ऐकुनी

जागे झाले बारा मावळ

*

माय भवानी अंबाबाई

सदा आशीर्वाद तिचा पाठीशी

तिच्याच नावाने वाजवतो संबळ

सारस्वतांचा घालतो गोंधळ

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बाईपण भारी देवा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बाईपण भारी देवा…  ? श्री आशिष बिवलकर 

बाईपण भारी | असतेच देवा |

जपतेच ठेवा | संस्कारांचा ||१||

*

बाईपण देते | पुरुषास बळ |

सोसतेच कळ | अंतरीची ||२||

*

बाईपण मनी | आभाळाची माया |

झिझवते काया | संसारात ||३||

*

बाईपण झाके | हृदयात दुःख |

दाखवते सुख | इतरांसी ||४||

*

बाईपण अंगी | दुर्गा अवतार |

करते संहार | दुर्जनांचा ||५||

*

बाईपण देखे | स्वप्न स्वराज्याचे |

यश शिवबाचे | जिजाऊत ||६||

*

बाईपण दावी | सामर्थ्याची दिशा |

जगण्याची आशा | उमेदीने ||७||

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्त्री शक्ती… ☆ श्री रविंद्र सोनवणे ☆

श्री रविंद्र सोनवणे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? स्त्री शक्ती? ☆ श्री रविंद्र सोनवणे ☆

हरेन मी पुन्हा पुन्हा 

जिंकेन परी मी शेवटी 

यत्न ना सोडेन कधी

असले जरी मी एकटी ||

*

अबला न मी, कृतीशील मी

गंभीर पण खंबीर मी

ओझे आहे खांद्यावरी

आकाशही पेलेन मी ||

*

ध्येयधुंदी अंतरी

उत्साह मज बेबंद आहे

संकटांना नमविण्याचा

मज अनोखा छंद आहे ||

*

कोण मजला अडवितो

तटबंदीही भेदेन मी

दश दिशा मज मोकळ्या 

सगळीकडे विहरेन मी ||

*

ढासळणारे धैर्य सावरुन

कोसळताना उठते मी

वैफल्याच्या धुक्यातूनही

क्षितिजा पल्याड बघते मी ||

*

गर्व आहे मज स्त्री शक्तीवर

पर्व नवे अनुभवते मी

अवश्य या आशीष द्यावया

सिद्ध आहे स्वागतास मी ||

© श्री रविंद्र सोनवणे

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

भ्रमणध्वनी : ९२२२०५३४३५/८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी गोडवे गीत… ☆ सौ. जस्मिन शेख ☆

सौ. जस्मिन शेख

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी गोडवे गीत… ☆ सौ. जस्मिन शेख ☆

ती

अरे हो हो हो $$$$

ऐका गाते मी गोडवे

माझ्या माय मराठीचे

मनामनाशी नाळ जोडते

शब्दांगण तिचे कौतुकाचे

माझी अभिजात मराठी माय

माझी अभिजात मराठी माय ||१||

तो

अगं हे हे हे $$$$

शब्दांची उधळण करुनी

शब्दांचाच प्रसाद देऊनी

ज्ञानमंदिराची दारे उघडुनी

जनसागरास करते ज्ञानी

माझी अभिजात मराठी माय

माझी अभिजात मराठी माय ||२||

ती

भाळी शोभे बिंदी अनुस्वाराची

पायी छुमछुम पैंजण उकारांची

डोई मुकुटे चमकती वेलांटीची

अशी नटून येई नार नक्षत्रांची

माझी अभिजात मराठी माय

माझी अभिजात मराठी माय ||३||

तो

नाजुक नार असे जरी माय

प्रसंगी वज्रापरी होऊनी जाय

दुधावरची असेल ती साय

तरीही…

ती

तरीही…

तो

तरीही चुकीला माफी नाय

माझी अभिजात मराठी माय

माझी अभिजात मराठी माय ||४||

दोघे

सर्वांच्या मनात ती असते

सुर तालाच्या ओठी वसते

हळूच गाली खुलुनी हसते

महाराष्ट्राच्या माथी सजते

माझी अभिजात मराठी माय

माझी अभिजात मराठी माय ||५||

© सौ. जस्मिन शेख

मिरज जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares