मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अज्ञेयाचे रुद्धद्वार…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ अज्ञेयाचे रुद्धद्वार… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ अज्ञेयाचे रुद्धद्वार…. स्व. वि. दा. सावरकर ☆

ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे

येणार घरासी मार्ग त्याचि ते सारे ॥ ध्रु.॥

ऐकोनि तुझ्या भाटांच्या

गप्पांसि गोड त्या त्यांच्या,

व्यापांसि विसावा माझ्या

जीवासि ये घरीं तुमच्या

ठोठावित थकलो! अजुनि नुघडती बा रे ।

आंतूनि तुझी तीं बंद सदोदित दारें ॥१॥

विस्तीर्ण अनंता भूमी

कवणाहि कुणाच्या धामीं

ठोठावित बसण्याहूनी

घेईन विसावा लव मी

येईन पुन्हा ना तुझ्या घरा ज्याची रे ।

हीं वज्र कठिणशी बंद सदोदित दारे ॥२॥

ज्या गाति कथा राजांच्या

सोनेरि राजवाड्यांच्या

मी पथें पुराणज्ञांच्या

जावया घरा त्या त्यांच्या

चाललो युगांच्या क्रोशशिला गणितां रे ।

तो पथा अंति घर एक तुझें तें सारें ॥३॥

दुंदुभी नगारे शृंगे

गर्जती ध्वनीचे दंगे

क्रांतिचे वीर रणरंगे

बेभान नाचती नंगे

मी जात मिसळुनी त्यांत त्या पथें जों रे ।

अंतासि उभें घर तेंचि तुझें सामोरे ॥४॥

कोठूनि आणखी कोठे

चिंता न किमपि करिता ते

ही मिरवणूक जी मातें

नटनटुनि थटुनि या वाटे

ये रिघूं तींत तों नाचनाचता मारे ।

पथ शिरे स्मशानी! ज्यांत तुझें ते घर रे ॥५॥

सोडुनी गलबला सारा

एकान्त पथा मग धरिला

देताति तारका ज्याला

ओसाडशा उजेडाला

चढ उतार घेतां उंचनिंच वळणारे ।

अजि मार्ग तो हि ये त्याचि घरासी परि रे ॥६॥

जरि राजमार्ग जे मोठे

तुझियाचि घराचे ते ते

घर अन्य असेलचि कोठे

या अरुंद आळीतुनि तें

मी म्हणुनि अणूंच्या बोगबोगद्यांतुनि रे ।

हिंडुनी बघे घर अन्ति तुझे सामोरें ॥७॥

घर दुजे बांधु देईना

आपुले कुणा उघडीना!

या यत्न असा चालेना

बसवे न सोडुनी यत्ना

ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपी बा रे ।

तीं तुझ्या घराची बंद सदोदित दारे ॥८॥

कवी – वि. दा. सावरकर

या कवितेचा आकृतीबंध मोठा लोभस आहे. प्रत्येक  कडव्यात यमकाने अलंकृत चार छोट्या ओळी व तद्नंतर प्रत्येक  कडव्यात ध्रुवपदाशी नातं सांगणाऱ्या दोन मोठ्या ओळी. सर्व आठ कडव्यांतल्या या सोळा मोठ्या ओळी व ध्रुवपदाच्या दोन अशा अठराच्या अठरा ओळी अज्ञाताच्या बंद घरा/दाराविषयी भाष्य करतात व संबोधनात्मक, रे (अरे) ने  संपतात. यामुळे कवीची आर्तता, अगतिकता अधोरेखित होते तसेच यामुळे कविता एवढी गेय होते की आपण ती वाचतावाचताच गुणगुणू लागतो.

सावरकरांनी ही कविता ते अंदमानात २५+२५ अशी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेंव्हा लिहिलेली आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही, की ५० वर्षांचा तुरुंगवास झालेल्या माणसाची मनःस्थिती कशी असेल. त्यातून  तो माणूस असा की ज्याला मातृभूमीसाठी फक्त राजकीय नाही तर सामाजिक क्रांती देखिल घडवून आणण्याची तीव्र इच्छा होती. तुरुंगवासांत आपलं जीवन व्यर्थ  जाणार. आपल्या हातून देशसेवा घडणार नाही या विचाराने त्यांना हतबलतेची जाणीव झाली असेल. हे विश्व संचलित व नियंत्रित करणार्‍या अज्ञात शक्तीला याचा जाब विचारावा किंवा त्यालाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग पुसावा असं वाटलं असेल. किंवा कदाचित मृत्यूने येथून सुटका केली तर पुन्हा भारतमातेच्या उदरी जन्म घेऊन  परदास्यातून तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे असंही त्यांना वाटलं असेल. यासाठी त्या अज्ञाताच्या घराचा बंद दरवाजा किती काळ आपण ठोठावत आहोत पण तो उघडतच नाही असा आक्रोश सावरकर या कवितेत  करत आहेत. ही आठ कडव्यांची कविता सावरकरांच्या त्यावेळच्या मनःस्थितीचं दर्शन घडविते.

ध्रु.) अज्ञाताचं घर हे जीवनमृत्यूच्या आदिपासून अंतापर्यंतच्या चक्राकार मार्गावरचे स्थान आहे. जीवनाचे सगळे मार्ग येथूनच सुरू होतात व याच रस्त्याला येऊन मिळतात.

1) सावरकर त्या अज्ञातास उद्देशून म्हणतात, तुझे स्तुतीपाठक म्हणतात म्हणून, मी त्यांच्यावर विश्वसलो, मला वाटले की तुझ्या घरी मला थोडा विसावा मिळेल. पण तुझ्या घराचं बंद दार ठोठावून मी दमलो तरी ते उघडतच नाही.

2) ही भूमी विशाल आहे. तुझ्या घराचं न उघडणारं दार असं ठोठावित बसण्यापेक्षा मी कुणाच्याही घरी जाऊन थोडी विश्रांती घेईन पण तुझ्या घरापाशी येणार नाही कारण ही वज्राप्रमाणे कठीण असलेली तुझ्या घराची दारे सदोदित बंदच असतात.

3) पोथ्यापुराणांतून ज्ञानी माणसांनी सांगितलेल्या राजे राजवाड्यांच्या कथा ऐकून, त्यांच्या मार्गावरून मी युगांचे ‘मैलाचे दगड’ओलांडत त्यांच्या घरी जाऊ लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी तुझेच घर होते.

4) दुंदुभि, नगारे यांच्या आवाजांच्या कल्लोळात क्रांतीवीर जेथे बेभान होऊन नाचत होते त्या मार्गावर मी त्यांच्यातलाच एक होऊन चालू लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी पण तुझेच घर होते.

5) मी नटून थटून या मिरवणुकीत सामील झालो. ही मिरवणूक कुठून कुठे जात आहे हे ठाऊक नसतानाही नाचत नाचत त्या वाटेवरून जाऊ लागलो तर ती वाट स्मशानात जाऊन पोचली व तिथेही तुझेच घर होते.

6) हे सगळं सोडून मग मी मिणमिणत्या प्रकाशातल्या, उदास अशा एकांत मार्गावरून जाऊ लागलो. तो उंच सखल रस्ता चढ उताराचा, वळणावळणाचा होता पण तो सुध्दा शेवटी तुझ्या घरापाशीच जाऊन पोचला.

7) तुझ्या घराकडे जाणारा राजमार्ग  सोडून मी दुसर्‍या घराच्या शोधार्थ अरुंद रस्त्यावरून, अणुरेणूंच्या बोगद्यातून जाऊन पाहिलं पण शेवटी तुझ्या घरापाशीच येऊन पोचलो.

8) तू आपलं घर उघडत नाहीस, दुसरं बांधू देत नाहीस. माझे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत पण मला प्रयत्न सोडून देऊन बसणं पण प्रशस्त वाटत नाही म्हणून मी पुनःश्च तुझ्या घराची बंद दारं ठोठावत आहे.

सावरकर अज्ञात शक्तीला उद्देशून म्हणतात, ” जीवनाचे सर्व मार्ग जर तुझ्यापाशी येतात व तुझ्यापासून सुरू होतात तर आता माझ्या जीवनाचा मार्ग मला अशा ठिकाणी घेऊन आला आहे की मला पुढचा मार्गच दिसत नाही. म्हणून  तू मला मार्ग दाखव जेणेकरून मी माझ्या देशसेवेला अंतरणार नाही. यासाठी मी तुझ्या घराचे बंद दार ठोठावतो आहे. तू  दार उघडतच नाहीस म्हणून मी निरनिराळ्या मार्गांनी जाऊन दुसरे पर्याय शोधून पाहिले पण सगळे मार्ग  शेवटी तुझ्या बंद दाराशीच येतात. तू तुझे दार उघडत नाहीस, दुसरे घर बांधू देत नाहीस म्हणजे तू सोडून दुसरं कोणी मला या परिस्थितीतून बाहेर काढू शकेल अशी शक्यता तूच निर्माण केली नाहीस वा करू दिली नाहीस म्हणून मी पुनःपुन्हा तुझेच दार ठोठावत आहे व ठोठावत राहेन” असं सावरकर त्या अज्ञात शक्तीला ठणकावून सांगत आहेत.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रुपे पाऊसाची ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ रुपे पाऊसाची ☆ सौ. विद्या पराडकर ☆

आला आला पाउस आला

हासत,नाचत,बागडत आला

कधी गर्जत ‌धुवांधार

कधी मंद्र सप्तकातील कलाकार ☘️

 

घननिळा बरसला

धरतीच्या कलशात

जीवन दान देई वसुंधरेला

नव निर्माणाचे रंग रंगविण्यात ☘️

 

कधी खेळतो विद्युल्लतेच्या तालावर

कधी नाचतो ढोलकीच्या ठेक्यावर

कधी गातो मेघ मल्हार च्या सुरावर

कधी भूप तर कधी यमनच्या लयीवर☘️

 

शिवाच्या कधी तांडव नृत्यासम

रुप तुझे हे प्रलयंकारी

जीवनाधार देवदूत कधी बनतो

कधी वाटतो विनाशकारी दैत्यासम☘️

 

कधी बनु नको रे दुर्योधना सम

अश्र्वथाम्या सम नको होऊ रे क्रूर

कृष्ण बनुनी ये पृथ्वीवर

रक्षण करी जीवन दे अर्जुनासम☘️

 

चित्र रेखाटे मानसीचा चित्रकार

तुझी अनेक रुपे कोरली हृदयपटलावर

संभ्रम होतो मानव येथे

अनेक रुपांचा तू गुच्छ मनोहर☘️

 

संतुलनाचे ऋतुमान कार्य करिशी

तेव्हा खेळे तू यश:श्रीशी

चर अचर  सारा तव  ओंजळीत

जीवन सारे कृतार्थ करिशी ☘️

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वप्न ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वप्न… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

पुन्हा एकदा भरास यावी

आषाढाची मस्ती

कडाडकडकड वीज चमकता

उडून जावी सूस्ती

 

हलवून गदगदा डोंगरमाथे

पाणलोट उसळावे

कवेत वनराईस वाऱ्याने 

 पुन्हापुन्हा घुसळावे

 

मेघांचा सोपान उतरुनी

हळूच श्रावणाने यावे

तारुण्याचे इंद्रधनू मग

सर्वांगात फुलावे

 

सखे साजणी तुझ्या स्मृतींना

हळूच मी बिलगावे

फुले होऊनी प्राजक्ताची

तू मजवर बरसावे

 

नृत्य थांबले मनमोरांचे

फुटले स्वप्न बिलोरी

 चूर तयाचा अजून मात्र मी

वेचीतो वेड्यापरी

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मास्तरच्या लेखणीतून …” – लेखक : एक अज्ञात मास्तर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मास्तरच्या लेखणीतून …” – लेखक : एक अज्ञात मास्तर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

विद्यालयाच्या जागेपायी

कुणीच इथं भांडलं नाही

अन् देवालयाच्या जागेसाठी

रक्त कमी सांडलं नाही..

 

माझाच देव मोठा म्हणण्यात

रक्ताच्या नद्या वाहील्या

ज्ञानगंगा कोरडी पडत

ओसाड शाळा झाल्या…

 

शाळा अजूनही तशीच

पडक्या, तुटक्या भिंतींची 

गरीब माझ्या देशामधी

उभी मंदिरं सोन्याची…

 

शाळेमधली दानपेटी

भरलेली कधी पाहिली नाही

अन् मंदिराची दानपेटी

रिती कधी राहिली नाही…

 

शाळेतला पालक मेळावा

पालकांवाचून राहून गेला

देवालयात चेंगराचेंगरीत

माणूस मात्र तुडवून मेला…

 

विद्या, ज्ञान सर्व देऊन

गुरूजी गरीबच राहीला

अन् अंधश्रद्धेचं दान घेऊन

पुजारी मात्र धनवान झाला…

 

खरंतर धर्म नावाचं पुस्तक 

शाळेत कधीच उघडत नाही

अन् धर्माच्या नावाशिवाय

देशात पानही हाललं नाही…

लेखक : एक अज्ञात मास्तर

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – तंटामुक्तता… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– तंटामुक्तता… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

घराघरात दारादारात

गल्लीबोळात, रस्त्यावर – माळावर

हाॅटेलात ,दुकानात …. 

तंटा भांडण यांचं प्रमाण वाढू लागलं 

शहाण्यांनी  काही उपायही काढलं 

सर्वानुमते एक ठरलं

तंटामुक्त  समिती स्थापण्याचं ठरलं

 

सगळे  जमले चर्चा चालली

तंटामुक्त समिती स्थापन करायची

कल्पना नक्की झाली

समितीला अध्यक्ष कुणी व्हावे …  चर्चा अगदी रंगात आली

तु होणार तर मी का नको

आवाजाचा घुमु लागला एको

 

कुणीच कुणाच ऐकुन घेईना

ओरडलं तरी काहीच  कळेना

मुद्यावरुन गुद्यावर आपोआपच आलं 

बैठकीचं  रूपांतर हाणामारीत झालं 

मुद्दा राहिला बाजूला — 

गोंधळाची सगळ्या …. बातमी मिळाली पेपरला !!!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुंदर  ते ध्यान… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सौ. नेहा लिंबकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सुंदर  ते ध्यान☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सुंदर ते ध्यान, सुंदर मन

सुंदर ज्ञान—–संताठायी

 

सुंदर ते रूप,  सुंदर स्वरूप

सुंदर प्रारूप—- देवाठायी

 

सुंदर ते भाव,  सुंदर प्रभाव

सुंदर  निभाव—– भक्ताठायी

 

सुंदर ते गुण,  सुंदर निर्गुण

सुंदर प्रमाण—– द्वैताठायी

 

सुंदर ते परिमळ, सुंदर निर्मळ

सुंदर प्रेमळ—– अद्वैताठायी

 

सुंदर ते आकाश,  सुंदर प्रकाश

सुंदर पाश—– मनाठायी

 

सुंदर ते भान,  सुंदर पावन

सुंदर जीवन—–जीवाठायी

 

सुंदर ते प्रणव,  सुंदर जाणीव

सुंदर नेणीव—— आत्म्याठायी

 

सुंदर सुंदर आत्म्याचे तादात्म्य

राहावे सदा   परमात्म्याठायी

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

मो – 9422305178

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 169 – जन्मले सिद्धार्थ ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 169 – जन्मले सिद्धार्थ ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

लुंबीनी या पिठी।

महामाया पोटी।

दिव्य रत्न।

पिता शुद्धोदन।

हर्षलासे फार।

सजे दरबार।

स्वागतास।

होता सात दिन।

माता स्वर्गवास।

लाभली ना कूस।

मातृत्वाची।

माय मरो परि।

मावशी उरावी।

उक्ती सार्थ व्हावी।

गौतमीने।

माता गौतमीने।

केला प्रतिपाळ।

गौतम ते नाम।

सार्थ झाले।

ऋषी  विश्वामित्र।

देते झाले ज्ञान।

कौशल्य निपून।

राजपुत्र।

भार्य ती यशोदा।

पुत्र यशोधन।

भाग्य प्रतिदिन।

उजळले।

मानवी व्यथेने।

मन खिन्न झाले।

जागृत ते केले।

वैराग्यासी।

त्यागुनी संसार।

केले तप ध्यान।

दुःखाचे कारण।

शोधण्यास।

 पुनव वैशाखी।

 लाभे बोधीतत्व।

जीवनाचे सत्व।

सापडले।

दिव्य त्या ज्ञानाचा।

करण्या प्रसार।

विश्वची संसार।

बुद्धांसाठी।

बौद्ध धम्माचे ते।

थोर संस्थापक।

ज्ञान ते सम्यक।

जगा दिले।

सम्यक ती दृष्टी।

बुद्धमय सृष्टी ।

करुनिया वृष्टी।

साधकास।

वैशाखी पुनव।

अवघे जीवन।

जन्म,दिव्य ज्ञान।

नि निर्वाण।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘दहीकाला…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘दहीकाला…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

ब्रह्मरूप दहीहंडी टांगलीसे आकाशात ।

दहीदूधरूपी मोद भरुनी राही तयात।।१।।

 

आनंद तो मिळवण्या मानव करितो यत्न ।

परी उपायांनी नाना नाही होत हस्तगत ।।२।।

 

कामक्रोधादिक गोप जेव्हा शिर नमविती ।

आत्मरूप तो श्रीकृष्ण । चढे त्यांच्या खांद्यावरती ।।३।।

 

अहंकार घट फुटे परब्रह्मरूप भेटे ।

साधकास मिळताती आनंदरूपाचे  साठे ।।४।।

 

मग परब्रह्म हंडी येई तयाच्या हातात ।

गोपरूपी इंद्रिये ती आनंदाने नाचतात ।।५।।

 

सारे काही एकंकार मावळले आपपर ।

परमात्मस्वरूपी त्या आत्मा झाला तदाकार ।।६।।

 

ऐसा दहीकाला झाला जीव शिवासी भेटला ।

ऐसा कृष्णजन्म आम्ही साजरा असे तो केला ।।७।।

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रश्न… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रश्न… ☆ सुश्री शोभना आगाशे

तूच घालतोस जन्मा

तूच निर्मितोस त्रिगुणा

तूच देतोस क्रोध कामा

कसा आठवू मी नामा?

 

मोहात पाडिसी पाप करण्या

सजा देतोसी भोग भोगण्या

तूच आहेस जर सर्वांभूती

फिरे कैसी मग माझी मती?

 

ज्ञाना, नामा, तुका, एका

नच शमविती आमुच्या भुका

त्यासाठीच देतो दिवस सारा

कधी करू रे नामाचा पुकारा?

 

इथे बुवा, साधु, योगी, गुरू

मुखवटे केवळ, आत लुटारू

मार्ग न ठावा मी काय करू?

 

कसा सावरू? भेटवी सद्गुरू

पंढरीत होता म्हणे संतभार

इथेतिथे आता फक्त पापभार

हा अन्याय नाही का आम्हावर

कल्की रूपात ये आता पृथ्वीवर

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मोल  क्षणाचं…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “मोल  क्षणाचं” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

जगण्याची धडपड

कधीच नाही संपत

वेळ काढल्याशिवाय

वेळ कधीच नाही भेटत….

 

हरवलेल्या क्षणांचे

दुःख असते मोठे

रोज धावता धावता

जगायचे मात्र राहते…

 

वेळ नाही म्हणून

किती काळ ढकलणार

अर्ध आयुष्य संपल्यावर

मागे वळून मग पाहणार…

 

आजचा सुंदर दिवस

जगायचा राहून जातो

भूत भविष्यात

आपण हरवून बसतो….

 

काल गेलाय निघून

परतून न येण्यासाठी

उद्याची कोण देते हमी

सांगा या जीवनी….

 

आज आणि आता

यावर आपली सत्ता

नको विचारांचा गुंता

ओळखा आपली क्षमता..

 

झालं गेलं सोडून द्यावं

जगायचे ते जगून घ्यावं

उद्यासाठी का बरं थांबावं

आजच्या क्षणाचं मोल जाणून घ्यावं …

😊

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares