मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘दहीकाला…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘दहीकाला…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

ब्रह्मरूप दहीहंडी टांगलीसे आकाशात ।

दहीदूधरूपी मोद भरुनी राही तयात।।१।।

 

आनंद तो मिळवण्या मानव करितो यत्न ।

परी उपायांनी नाना नाही होत हस्तगत ।।२।।

 

कामक्रोधादिक गोप जेव्हा शिर नमविती ।

आत्मरूप तो श्रीकृष्ण । चढे त्यांच्या खांद्यावरती ।।३।।

 

अहंकार घट फुटे परब्रह्मरूप भेटे ।

साधकास मिळताती आनंदरूपाचे  साठे ।।४।।

 

मग परब्रह्म हंडी येई तयाच्या हातात ।

गोपरूपी इंद्रिये ती आनंदाने नाचतात ।।५।।

 

सारे काही एकंकार मावळले आपपर ।

परमात्मस्वरूपी त्या आत्मा झाला तदाकार ।।६।।

 

ऐसा दहीकाला झाला जीव शिवासी भेटला ।

ऐसा कृष्णजन्म आम्ही साजरा असे तो केला ।।७।।

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रश्न… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रश्न… ☆ सुश्री शोभना आगाशे

तूच घालतोस जन्मा

तूच निर्मितोस त्रिगुणा

तूच देतोस क्रोध कामा

कसा आठवू मी नामा?

 

मोहात पाडिसी पाप करण्या

सजा देतोसी भोग भोगण्या

तूच आहेस जर सर्वांभूती

फिरे कैसी मग माझी मती?

 

ज्ञाना, नामा, तुका, एका

नच शमविती आमुच्या भुका

त्यासाठीच देतो दिवस सारा

कधी करू रे नामाचा पुकारा?

 

इथे बुवा, साधु, योगी, गुरू

मुखवटे केवळ, आत लुटारू

मार्ग न ठावा मी काय करू?

 

कसा सावरू? भेटवी सद्गुरू

पंढरीत होता म्हणे संतभार

इथेतिथे आता फक्त पापभार

हा अन्याय नाही का आम्हावर

कल्की रूपात ये आता पृथ्वीवर

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मोल  क्षणाचं…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “मोल  क्षणाचं” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

जगण्याची धडपड

कधीच नाही संपत

वेळ काढल्याशिवाय

वेळ कधीच नाही भेटत….

 

हरवलेल्या क्षणांचे

दुःख असते मोठे

रोज धावता धावता

जगायचे मात्र राहते…

 

वेळ नाही म्हणून

किती काळ ढकलणार

अर्ध आयुष्य संपल्यावर

मागे वळून मग पाहणार…

 

आजचा सुंदर दिवस

जगायचा राहून जातो

भूत भविष्यात

आपण हरवून बसतो….

 

काल गेलाय निघून

परतून न येण्यासाठी

उद्याची कोण देते हमी

सांगा या जीवनी….

 

आज आणि आता

यावर आपली सत्ता

नको विचारांचा गुंता

ओळखा आपली क्षमता..

 

झालं गेलं सोडून द्यावं

जगायचे ते जगून घ्यावं

उद्यासाठी का बरं थांबावं

आजच्या क्षणाचं मोल जाणून घ्यावं …

😊

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #189 ☆ बालकृष्णा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 188 – विजय साहित्य ?

☆ बालकृष्णा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

बालपणी बालकृष्णा

होती आवड काल्याची

दुध साय दही लोणी

होती श्रीमंती घराची…! १

 

धष्टपुष्ट होण्यासाठी

हवा सकस आहार

दही दुध लोण्यासाठी

पडे गोविंदाला मार…! २

 

गोपालांचे घरदार

दह्या दुधाचा सागर

देई मिळवोनी धन

हेची सुखाचे आगर…! ३

 

मथुरेच्या बाजारात

दूध दही विकोनीया

चरितार्थ गोपालांचा

दुग्धामृत सेवुनीया..! ४

 

दुध‌ दही विकताना

नको मुलांची आबाळ

चोरी करून लोण्याची

येई कृष्णावर आळ..! ५

 

बालकांना चुकवोनी

दही हंडी शिंक्यावरी

चोरूनीया लोणी खाणे

दंगामस्ती घरोघरी…! ६

 

उंच मानवी मनोरा

रचुनीया गोपालांचा

हाती लागे दही‌हंडी

मेवा हाती रे लोण्याचा..! ७

 

बाळलीला गोकुळीच्या

त्यात कृष्ण सामावला

फोडूनीया‌ दहीहंडी

कृष्ण अंतरी धावला..! ८

 

हंडी दही उत्सवाने

दिला ऐक्याचा संदेश

आला आला रे गोविंदा

त्याचा आगळा आवेश..! ९

 

बाल गोपालांची लिला

साठवण शैशवाची

दहीहंडी जपतसे

आठवण गोकुळाची..! १०

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तर, आयुष्य खूप सुंदर आहे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

तर, आयुष्य खूप सुंदर आहे… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

माणसाचे कपडे फाटले तर, ते शिवता येतात. 

पण विचारच फाटके असतील, तर आयुष्याच्या चिंध्या होतात. 

 

काय बोलावे हे ज्ञान ठरवते, 

कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, 

किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते, 

…. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही,

हे आपला संयम आणि, संस्कारावर अवलंबून असते. 

 

चुकीला चूक, आणि बरोबरला बरोबर .. म्हणायला शिकलं पाहिजे. 

नुसतं स्वार्थासाठी जगणं, सोडून दिलं पाहिजे. 

जिथे चूक नाही तिथे झुकु नका. आणि जिथे सन्मान नाही, तिथे थांबू नका. 

 

उशिरा मिळालेले सत्य हे, कुलूप तोडल्यानंतर, चावी मिळाल्यासारखे असते. 

यशस्वी होण्यासाठी, चुकणं आणि शिकणं, दोन्ही महत्वाचं असतं. 

कुठे व्यक्त व्हायचं, आणि कधी समजून घ्यायचं, 

हे कळलं तर, आयुष्य भावगीत आहे.!! 

 

किती ताणायचं, आणि कधी नमतं घ्यायचं, 

हे उमजलं तर, आयुष्य ‘निसर्ग’ आहे. !! 

किती आठवायचं, आणि काय विसरायचं, 

हे जाणलं तर, आयुष्य ‘इंद्रधनुष्य’ आहे. !! 

किती रुसायचं, आणि केव्हा हसायचं, 

हे ओळखलं तर, आयुष्य ‘तारांगण’ आहे.!! 

कसं सतर्क रहायचं, आणि कुठे समर्पित व्हायचं, 

हे जाणवलं तर, आयुष्य नंदनवन’ आहे.! ! 

 

कुठे,? कधी,? किती,? काय,? केव्हा,? कसं,? 

याचा समतोल साधता आला तर, आयुष्य खूप सुंदर आहे… 

 

काही माणसं लाखात एक असतात, 

आणि काहींकडे लाख असले, तरी ते माणसात नसतात. 

 

दु:खांच्या दिवसांमध्ये, आनंदाची आशा ठेवणारी माणसं, 

कुठल्याही प्रसंगी, ठामपणे उभी राहतात. 

 

ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता, याचे ‘भान’, 

आणि भान म्हणजे कधी काय करू नये, याचं ‘ज्ञान’, 

 

दुःख गिळून आनंद व्यक्त करणे, म्हणजे जीवन… 

कष्ट करून फळ मिळवणे, म्हणजे व्यवहार… 

स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे, म्हणजे सहानुभूती… 

आणि माणूसकी शिकून, माणसासारखे वागणे, म्हणजे अनुभूती… 

 

प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. 

ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर, 

काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. 

 

सुख‌ म्हणजे नक्की काय,? ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे …. 

भरलेलं घर, आणि एकमेकांची साथ…!!

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वर्षा की शरद, काय हवं अंबरा ? ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

वर्षा की शरद, काय हवं अंबरा ? ☆ सौ.मंजिरी येडूरकर

कैवल्यदानीच्या दोन पोरट्या धरा, अंबरा

समंजस हि धरा,अंबरा परि खळखळणारी॥

 

म्हणे अंबरा, ” नेसू माझे कधी काळे तर कधी राखाडी

क्वचितच असते रेष त्यावरी लखलखणारी”॥

 

नच खळेना डोळ्यामधले पाणी हळवे

कधी करी आकांत तर कधी मुसमुसणारी॥

 

रंगबिरंगी फुलवेलींची नक्षी रेखली

धरेस मिळते हिरवी साडी झगमगणारी॥

 

अखेर थोडी हसली गाली आज अंबरा,

नेसून दावी पिवळी साडी सळसळणारी॥

 

चैतन्याने रात भारली प्रणयरंगी

काळी साडी, खडी त्यावरी चमचमणारी॥

 

मनोमनी तो आज लाजला, चकोर भोळा

लख्ख प्रकाशी, बघून अंबरा थरथरणारी॥

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #172 ☆ राखी… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 172 ☆ राखी… ☆ श्री सुजित कदम ☆

आताशा का कोणास ठाऊक..?

राखी पौर्णिमा म्हटलं की

डोळे भरून येतात कारण ..

मला अजूनही आठवतात

ते लहान पणी चे दिवस..

राखी पौर्णिमा असली की

मी सकाळी लवकर उठून ताईने

माझ्या हातावरती राखी बांधण्याची

वाट पहात बसायचो…

आणि माझ्यासारखीच ताई सुध्दा

ताईने हातावर राखी बांधली ना

की मला खूप

श्रीमंत झाल्यासारखं वाटायचं आणि

आई नंतर कुणीतरी आहे

आपली काळजी घेणारं…

असं सहज मनात यायचं…!

लग्न करून जेव्हा ताई

सासरी गेली ना..

त्या नंतर सुध्दा

रात्रीचा प्रवास करून मी

राखी पौर्णिमेला सकाळीच

ताईला भेटायला जायचो …

तेव्हा ताई मला म्हणायची

एवढी दगदग कशाला करायचीस?

त्यावर मी तिला म्हणायचो

तू एकच बहीण आहेस माझी

तुझ्यासाठी मी कूठूनही येऊ शकतो

त्या वेळी राखी पौर्णिमेला ताईने

प्रेमाने मनगटावर बांधलेली राखी

पुढचं वर्ष भर मी मनगटावर

तशीच ठेवून द्यायचो

ताईची आठवण म्हणून…!

पण आता मात्र

राखी पौर्णिमा म्हटलं की

डोळे भरून येतात

आणि मोकळ्या मनगटावर

फक्त आसवांचे थेंब ओघळतात..!

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जुन्या वाड्याच्या आठवणी…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “जुन्या वाड्याच्या आठवणी…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

अनेक कुटुंबे गुंफणारा

वाडा म्हणजे हाराचा धागा असतो,

समूहगानातला मल्हार असतो

तो भूप असतो आणि भैरवीही असतो.

 

वाड्याचे अंगण म्हणजे नंदनवन असते

छोट्यांचे क्रिडांगण असते,

महिलांचे वृंदावन असते,

पाणवठा असते, शिळोपा असते,

मोठ्यांचे कधी कुरुक्षेत्रही बनते

अंगण सगळ्यांनाच बोलावत असते.

 

वाड्यात अनेक बिऱ्हाडे असतात

कुटुंब मात्र एक असतं,

एका घरातल्या फोडणीची चर चर

सगळीकडे पोहोचत असते

वाड्यात कुणाचेच काही खाजगी नसते.

 

जोशाचं बाळ कुलकर्ण्यांकडे झोपते

बंडुला घरच्यापेक्षा शेजारच्यांची भाजी आवडते,

मिनी लोखंडयांकडे अभ्यासाला बसते

देसाईआजी पावशांची भाजी निवडत असते.

 

भावाकडे मुंज आहे ना, मग अशी कशी जाते

माझ्या पाटल्या घेऊन जा,

नव्या साडीची घडी मोडायचिये घेऊन जा

कुणाचे दागिने, कुणाची पैठणी

कुणाची वेळ कशी साजरी करायची ते वाड्यालाच माहित.

 

जा रे , शेजारून वाटीभर डाळीचे पीठ आण

देसाई वहिनी थोडं दूध द्या,

तुमचा गॅस संपलाय, आमचा घेऊन जा,

पाहुणे आलेत तुमची मोठी सतरंजी द्या

हे संगीत केवळ वाड्यातच गायलं जातं.

 

जोशी वहिनींचे वडील वारले कोकणात

तार मिळताच वातावरण बदललं,

जोशी वाहिनिंचे घर माणसांनी भरलं

वाड्यासह अंगणही गहीवरलं,

सुख दुः खाचं वाटप केवळ वाड्यातच असतं.

 

वाडा प्रेमळ होता, त्याचा धाक होता

कुणालाच एकाकी ठेवत नव्हता,

वाडे गेले, फ्लॅट आले, घरे मोठी पण मने छोटी झाली,

सोयी वाढल्या , रुबाब वाढला

कुटुंबाची संख्या वाढली,

एकाकी कुटुंबाच्या गर्दीची आता सोसायटी झाली.

 

वाडा गेला, नुसताच गेला नाही

माणसामाणसांना बांधणाऱ्या रेशीम धाग्याच्या गाठी उकलून गेला,

वाडा गेला, वाडा गेला

उरला फक्त आठवणींचा पाला.

 

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – गुरू…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– गुरू… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

ज्याला अभ्यास आवडी,

त्यास कौतुकाची गोडी !

जो काढेल  खोडी,

त्याला हातावर छडी !

चुकलात तर हक्काने,

करकचून कान पकडी !

चांगले शिक्षक म्हणजे,

जीवनाची खरी  शिडी !

विद्यार्थ्यांच्या यशात गुरुचे,

असते  मोठे योगदान !

विद्यार्थ्यांचे यश बघून,

गुरुची उंचवते मान !

शिक्षक आदराचे  स्थान,

भागावी  ज्ञानाची  तहान !

भावी पिढीचा शिल्पकारच तो,

ज्ञानदानाचे कार्य करी महान !

कृतज्ञतेचे भाव शिष्य,

गाती गुरुचे  गुणगान !

धन्य गुरु धन्य शिष्य,

या परंपरेचा अभिमान !

© श्री आशिष  बिवलकर

05 सप्टेंबर 2023

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कौशल्य… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– कौशल्य… – ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

पुष्पकृती घडवली

पहा किती कौशल्याने

नथ आणखी कोयरी

दावते मोठ्या खुबीने॥

गजमुखही सुंदर

त्यात दिसे साकारले

का आहे हे मला सांग

विठोबाचे कानातले?

दिसतील यातूनच

अजूनही काही चित्रे

सुमनावलीची स्तुती

योजूनिया शब्द पत्रे॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares