मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला श्रावण श्रावण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🦚 आला श्रावण श्रावण ! 🌴 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

आला श्रावण श्रावण

धरली पावसाने धार,

नव्या नवरीच्या मनी

नाचे आनंदाने मोर !

 

आला श्रावण श्रावण

सय येते माहेराची,

दारी उभी वाट पाहे

माय तिची कधीची !

 

आला श्रावण श्रावण

सख्या माहेरी भेटतील,

होतो सासरी का जाच ?

लाडे लाडे पुसतील !

 

आला श्रावण श्रावण

सण ये मंगळागौरीचा,

पुजून देवी अन्नपूर्णेला

रात खेळून जागायाचा !

 

आला श्रावण श्रावण

व्रत वैकल्याचा मास,

ताबा ठेवून जिभेवर

करा उपास तापास !

करा उपास तापास !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सृष्टि… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘सृष्टी…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(सृष्टी वृत्त ~मंजूघोषा(गलगागाx३))

श्रावणाच्या पावसाने स्नात आहे

खोडकर वार्‍यासवे ती गात आहे

 

सूर्य डोकावे ढगाआडून विलसे

तेज त्याचे सावळ्या मेघात आहे

 

शाल हिरवी ही धरेने पांघरावी

शुभ्र मोत्यांची जणू बरसात आहे

 

मोगरा जाई जुईचा गंध सुटला

केतकीचा दर्प हा श्वासात आहे

 

शंकराला वाहताना बिल्वपत्रे

पारिजातक गालिचा परसात आहे

 

धुंद केले श्रावणाच्या या सरींनी

हासते सृष्टी कशी दिनरात आहे

 

देखणे हे दृष्य अवघे श्रावणाचे

शांतता जीवास लाभे ज्ञात आहे

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #187 ☆ 🇮🇳 यशस्वी मोहीम चांद्रयान-३ !! 🚀 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 187 – विजय साहित्य ?

☆ 🇮🇳 यशस्वी मोहीम चांद्रयान-३ !! 🚀 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

यशवंत यशोगाथा

अंतराळी चांद्रयान

भारतीय शास्त्रज्ञांचे

संशोधक अभियान…! १

 

धृव दक्षिण चंद्राचा

तिथे यान उतरले

चार वर्षे परीश्रम

मोहिमेत सामावले…! २

 

वैज्ञानीक प्रगतीचा

उत्तुंगसा अविष्कार

चांद्रयान तीन जणू

तिरंग्याचा पदभार…! ३

 

खगोलीय ज्ञानालय

इस्त्रो शास्त्रज्ञ अभ्यासू

गुणातीत चंद्रकला

मती सकल प्रकाशू..! ४

 

देऊ कौतुकाचे बोल

जयहिंद मुखी नारा

अंतराळी विश्वामाजी

बुद्धी चातुर्याची धारा..! ५

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ श्रावण तो आला आला…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ श्रावण तो आला आला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

गर्भ रेशमी हिरवागार शामियाना..

पसरला घरा घराच्या अवतीभवती…

निळे पांढरे आभाळ…

हरखून थबकले माथ्यावरती..

मेघडंबरी कोंदणातून…

सुवर्ण रश्मीचे दान सुटले अवनीवरी..

सोनेरी मुकुट शोभले…

तृणपाती तरूवरुंच्या शिरी…

मंद मंदसा हलकासा …

वारा गोंजारून जाई शरीरी..

झुकले तन मान लवून …

आनंद वाहे लहरी लहरी..

खगांनी फुंकली मंजुळ सनई,

अन मधूनच वर्षा बरसून जाई..

खिल्लारे चरती कुरणी…

निर्भर होऊनी रानीवनी..

 उल्हासाची इंद्रधनूची …

तोरणं आकाशी झळकली..

सणवारांची  फुले उमलली…

आनंदाची पालवी बहरली..

बलाकमाला उडती गगनी…

संदेश देण्या माहेरवाशीणी..

सय दाटता मायेची…

मनात गुंजली रूदनगाणी..

माय ती वाट पाही…

दूर दूरच्या लेकीसाठी…

खळबळ माजे तिच्या अंतरी…

खळखळणाऱ्या ओढयातल्या जलापरी..

सांगत आली, वाजत गेली…

गावागावातून वाऱ्याची तुतारी…

.. श्रावण तो आला आला…

 घरोघरी अंगणी नि परसदारी..

..श्रावण तो आला आला…

घरोघरी अंगणी नि परसदारी..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ युगायुगांचे नाते… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ युगायुगांचे नाते…🚀☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

श्री सुहास रघुनाथ पंडित

🚀 युगायुगांचे नाते…🚀

आले चंद्रा तुज भेटाया आज तुझ्या अंगणी

अब्ज युगांनी भेटे तुला आज तुझी ही भगिनी

तू मामा , तूच चंद्रमा , तूच रूपाची खणी

अनेक रूपे तुझी पाहती जन सारे भूवनी

 

ज्ञानामधुनी विज्ञानाची मारुन उंच भरारी

आज बांधते राखी तुजला नव्या युगाची खरी

वळण लागले आज वेगळे सत्य असे हे जरी

भावबंध हे नात्यामधले  जपू असे अंतरी

 

कास धरुनिया विज्ञानाची सत्य आता शोधणे 

साहित्यातील स्थान तुझे कधीही नाही ढळणे

ब्रह्मांडातील आपण जरी दूर दूर राहणे

युगायुगांचे नाते जपूया, हेच एक मागणे.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रेमसमाधी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रेमसमाधी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

आणखी किती जगावे

हे युगही पुरणार नाही

जगलो प्रेमाने जितुके

तु ही अन् मी ही उरणार नाही.

 

डोळ्यात हरवले विश्व

दोन हृदय कसे एक झाले

मना मनातले शब्द हे

व्यक्त होताना भाव नेक झाले.

 

कवितेत तरी अर्थ कुठे सध्या

गत् जन्माच्या चल गप्पा मारु

त्या कृष्ण-राधेचे गोकुळ

अपुल्या प्रेमसमाधीवर कोरु.

(कृपया प्रेम हा विषय कवी कालिदास यांचेपासूनचा प्रेमभाव अभिव्यक्ती व हळवे मन, विरह अशा वास्तवातून सत्य कल्पनेचा अभ्यासात्मकसुध्दा विषय आहे तरुण मनाला शाब्दिक ताकदीने तत्वांचा प्रबंध लिहायला लावणारा. त्यामुळे या कवितेकडे मी कवी म्हणूनच वाचकांनी दृष्टीकोन ठेवावा.)

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ. मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

तृणांकुर हिरवे पिवळे

दवबिंदू ओले पानांवरी

मनभावन आला श्रावण

इंद्रधनु हसले अंतरी

 

सुगंध दरवळ सृष्टीत

रिमझिम झरे जलधारा

तिकडे दूर क्षितिजापाशी

ओढत नेई स्वप्न फुलोरा

 

नवजीवन घेऊन येती

धवल शुभ्र श्रावणसरी

आनंद फुलतो मनामध्ये

व्रत, वैकल्ये करिती नारी.

 

प्रासादात, हो पुजुनी “देवा”

प्रार्थना करिता कल्याणाची

मार्ग अनुसरता भक्तीचा

लकेर घुमे समाधानाची

 

असा नेमेची येई श्रावण

अंगणी नाचे मन मयुरी

कालचक्र ऋतूंचे गोंदण

आंदणात, श्रावण भूवरी.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – वृक्षराज…– ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– वृक्षराज… – ? ☆ सौ. विद्या पराडकर ☆

हे वृक्षराज,

तुज सगुण म्हणू की निर्गुण

तुज जीवनदाता म्हणू की ,जीवन

ज्ञानदाता तू की ज्ञानदास

कर्मयोगी तू की कर्मदास !

 

आपुले नाते‌ युगायुगाचे

शिष्यत्वाचे, गुरुत्वाचे

दीपस्तंभ तू  आदर्शाचे

लेणे असे तू बहुमोलाचे !

 

तन मनाने तू श्रीमंत

पाहुनी वैभव चकित आसमंत

गुण पाहून ‌तुझे दाटे उर

कृतज्ञतेने येई नयना पूर !

 

वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरी

बोलली तुकारामाची वैखरी

वृक्षराज तू छत्र माऊली

लेकरांवर करी  मायेची सावली !

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 196 ☆ गझल – प्रीती… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 196 ?

☆ गझल – प्रीती… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

त्या कालच्या क्षणांचा केला विचार आहे

सांजावता असे का मन बेकरार आहे

अव्यक्त तू जरासा,मी ही मुकीच होते

वाचाळ वेदनाही आता फरार आहे

माझे मला कळेना घडले असेच काही

तो जेवढा मिळाला तितकाच फार आहे

नावे नकाच देऊ नात्यास त्या कधीही

होईल या पुढे जे त्याला तयार आहे

गेले म्हणून कोणी  “वर्षाव ‘तो’ पडो ही”

लाभे क्षणैक प्रीती ती बेसुमार आहे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मधुमास श्रावण… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ मधुमास श्रावण… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

आला श्रावणाचा महिना

सणासुदीचा तो राजा

येती लेकी माहेराला

काय आनंद  वर्णावा

 

झुला झुलण्याचा सण

झोके घेती गं ललना

करती वंदन नागराजा

सण नागपंचमीचा आला

 

गोकुळाचा तो गं कान्हा

जन्मे श्रावणाच्या अष्टमीला

दहीहंडी फोडण्याला

गल्ला चालला मुलांचा

 

भावाबहिणीचे बंधन

नाते पवित्र निर्मळ

राखी बांधून भावाला

म्हणे रक्षणा माझ्या रहा सदा

 

मंगळागौरीची आरास

नवविवाहिताचा हा असे सण

दुर्वा,पत्री वाहून मागे

पतीसाठी गं आयुष्य

 

सोमवारचा उपवास

करती मनोभावे शिवपुजन

बेल वाहून शिवाला

हात जोडती मनोमन

 

याच श्रावणात येतो

स्वातंत्र्याचाही उत्सव

करुन झेंडावंदन

सलाम करती तिरंग्यास

 

किती बाई हा अनोखा

श्रावणाचा हा महिना

जीवा वाटतो सौख्याचा

बारा महिन्याचा राजा

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares