मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी डिसेंबर… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ मी डिसेंबर… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

नमस्कार लोकहो,

निरोप द्या आता मजला

फिरुन येईन पुढच्या साला

बारा महिन्यातला मी बारावा

नेहमीच असतो नंबर शेवटी माझा

कामी येतो मी तुमच्यासाठी

गुलाबी थंडी असते माझ्याचवेळी

ख्रिसमस आणि दत्तजयंती

साजरी होते माझ्याचवेळी

एकतीस तारीख असते सर्व मासी

पण साजरी होते माझ्याचवेळी

मी जातो म्हणूनच नविन साल

सुरु होते माझ्याच पाठी

म्हणूनच म्हणतो निरोप द्या आता मजला

नविन वर्षाची पहाट येईल आता

स्वागत त्याचे करा जल्लोषी

महिना बारावा म्हणून पुन्हा येईन मी

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ काही राहून तर नाही ना गेलं? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

 

📖 वाचताना वेचलेले 📖

काही राहून तर नाही ना गेलं? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

           तीन महिन्यांच्या बाळाला

             दाईपाशी ठेवून

        कामावर जाणाऱ्या आईला

                 दाईनं विचारलं ~

     कांही राहून तर नाही ना गेलं ?

        पर्स, किल्ल्या सगळं घेतलंत ना ?

             आता ती कशी हो, हो म्हणेल ?

         पैशापाठी पळता-पळता

       सगळं काही मिळविण्याच्या

        महत्वाकांक्षेपोटी

    ती जिच्यासाठी एवढा आटापिटा

      करतेय तीच तर राहून गेलीय !

 *

      लग्नात नवऱ्या मुलीस सासरी

       पाठवताना लग्नाचा हाॅल

       रिकामा करून देताना

      मुलीच्या आत्यानं विचारलं ~

  दादा, कांही राहून तर नाही गेलं ना ?

            चेक कर जरा नीट..!

       बाप चेक करायला गेला, तर

          वधूच्या खोलीत

     कांही फुलं सुकून पडलेली दिसली.

       सगळंच तर मागं राहून गेलंय.

        २१ वर्षे जे नाव घेऊन आपण

    जिला लाडानं हाक मारत होतो,

     ते नाव तिथंच सुटून गेलंय, आणि

       त्या नावापुढे आतापर्यंत

        अभिमानानं जे नाव लागत होतं,

     ते नावही आता तिथंच राहून गेलंय.

 *

       दादा, बघितलंस ?

   काही मागे राहून तर नाही ना गेलं ?

      बहिणीच्या या प्रश्नावर

  भरून आलेले डोळे लपवत बाप

  काही बोलला तर नाही, पण

    त्याच्या मनात विचार आला~

     सगळं काही तर इथंच राहून गेलंय !

 *

     मोठी मनीषा मनी बाळगून मुलाला

     शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं,

   आणि तो शिकून तिथंच सेटल झाला.

     नातवाच्या जन्मावेळी मोठ्या

      मुश्किलीनं तीन महिन्यांचा

      व्हिसा मिळाला होता,

  आणि निघतेवेळी मुलानं विचारलं ~

      बाबा, सगळं कांही चेक केलंय ना ?

          काही राहून तर नाही ना गेलं ?

         काय सांगू त्याला, की आता..

      आता राहून जाण्यासारखं 

      माझ्यापाशी उरलं तरी काय आहे ..!

 *

            सेवानिवृत्तीचे दिवशी

         पी.ए.नं आठवण करून दिली ~

                 चेक करून घ्या सर ..!

           काही राहून तर नाही ना गेलं ?

     थोडं थांबलो, आणि मनात विचार

             आला, सगळं जीवन तर

       इथंच येण्या-जाण्यात निघून गेलं.

      आता आणखी काय राहून

          गेलं असणार आहे?

 *

      स्मशानातून परतताना मुलानं …

      मान वळवली पुन्हा एकदा,

         चितेकडे पाहण्यासाठी …

               पित्याच्या चितेच्या

           भडकत्या आगीकडे पाहून

              त्याचं मन भरून आलं.

                 धावतच तो गेला

       पित्याच्या चेहऱ्याची एक

         झलक पाहण्याचा

           असफल प्रयत्न केला….

             आणि तो परतला.

                 मित्रानं विचारलं ~

            काही राहून गेलं होतं कां रे ?

 *

          भरल्या डोळ्यांनी तो बोलला ~

      नाही , काहीच नाही राहिलं आता.

        आणि जे काही राहून गेलंय,

        ते नेहमीच माझ्या सोबत राहील.

 *

एकदा… थोडा वेळ काढून वाचा,

   कदाचित …जुना काळ आठवेल,

             डोळे भरून येतील, आणि

          आज मन भरून जगण्याचं

         कारण मिळेल !

 *

  मित्रांनो, कुणास ठाऊक ?केव्हा या जीवनाची संध्याकाळ होईल.

 *

             असं काही होण्याआधी

               सर्वांना जवळ घ्या,

           त्यांच्या पाठीवर हात फिरवा.

         त्यांच्याशी प्रेमानं बोलून घ्या

     जेणेकरुन कांही राहून जाऊ नये ..!                                 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मावळला ‘अर्थ – सूर्य’ … – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मावळला ‘अर्थ-सूर्य’? श्री आशिष  बिवलकर ☆

अर्थ व्यवस्थेचा | गेला सरदार |

वित्त कारभार | सुधारून ||१||

*

विद्या विभूषित | श्रेष्ठ अर्थतज्ञ  |

राष्ट्रासी कृतज्ञ | देशसेवा ||२||

*

विसावे शतक | सरता सरता |

तारणहारता | व्यवस्थेचा ||३||

*

अर्थव्यवस्थेची | सुधारली नीती |

विकासाची गती | शिल्पकार ||४||

*

मुक्त धोरणाने | बदलली दिशा |

पल्लवीत आशा | देशासाठी ||५||

*

राजकारणात | अंगी मौनव्रत |

संयमी इभ्रत | राखुनिया ||६||

*

अर्थ माळेतील | मणी ओघळला |

आज मावळला | अर्थसूर्य ||७||

.. .. जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देव हासले… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ देव हासले ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मला तुला जपायला कुणी तरी सुनावले

दिवानगी नको करू जपून टाक पावले

*

म्हणू नको उगाच तू तुलाच खूप चांगला

तुझ्या पुढे कधी तरी बरेच लोक गाजले

*

धरून ध्येय चांगले लपून का बसायचे

जगात या जगायचे करून काम चांगले

*

नमून वागणे बरे नको मिजास दाखवू

गरीब तारले इथे मुजोर दूर फेकले

*

चुका करून वागतो पुन्हा हसून सांगतो

सुधारला कधी न तो उपाय खूप योजले

*

तमाम जिंदगी तुला जगायची खरीखुरी

जुन्यातले जुने खरे बघून सर्व दाखले

*

जगात सत्य तेवढे टिकून आज राहते

पळून दैन्य चालले म्हणून देव हासले

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ न्यायनिवाडा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ न्यायनिवाडा…☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(आनंदकंद)

तत्त्वास सिद्ध करण्या वादात जिंकते मी

नाते जपावयाला वादास टाळते मी

*

डाकू मतामतांच्या चिखलात लोळणारे

पंकात पंकजाची का वाट पाहते मी

*

केले कुणी गुन्हे जर आहेत पाठराखे

निष्पाप शोधते अन चौकीत डांबते मी

*

नादान लोक सारे चलतीच आज त्यांची

साधे दिसो कुणीही वेशीस टांगते मी

*

विसरून मानवत्वा संहार होत आहे

खुर्चीत तेच दिसता चित्तास जाळते मी

*

मी व्यक्त होत नाही झुरते मनात माझ्या

अश्रू गिळून अपुले चुप्पीच साधते मी

*

टीका करून काही निर्माण होत नाही

काव्यात मल्लिनाथी सृजनास गाडते मी

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ज्ञानसविता… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ ज्ञानसविता … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

‘ ज्ञानसविता ‘ म्हणावी अशी विलक्षण बुद्धिमान, कर्तबगार आणि कार्यसमर्पित असणारी माझी पत्नी डॉ. सौ. अपर्णा श्रोत्री हिचे १० डिसेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले. आता केवळ तिच्या असंख्य आठवणी मनात अविरत रुंजी घालत राहिल्या आहेत. अपर्णाने आपले सारे आयुष्य मातृत्वाच्या सेवेच्या संवर्धनात आणि आपल्या शिष्यांना तरबेज आणि निपुण करण्यात वेचले. तिच्या त्या अविरत कार्यापुढे आज पुन्हा एकदा नतमस्तक होतांना मला अगदी माझ्याही नकळत सुचलेली ही कविता — जणू मी मनःपूर्वक तिला वाहिलेली श्रद्धांजलीच – – 

☆ ज्ञानसविता … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली

उजळूनी साऱ्या विश्वाला कर्मप्रभा शाश्वत झाली ||धृ||

*

देवि सरस्वति खिन्न जाहली ज्ञानकोशही स्तब्ध जाहला

मातृत्वाचा विरस जाहला धन्वंतरीही सुन्न जाहला

यमपाशाचा वेध निष्ठुर देवी शारदा निष्प्रभ झाली 

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||१||

*

गुरुस्थानी ती शिष्यगणांच्या सकलांची माता होती

ज्ञान देऊनी कुशल बनविले मातृत्वाची सेवक होती

सक्षम केले लक्ष करांना मातृसेवा बळकट केली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||२||

*

ज्ञान अर्पिले प्रेम वर्षले वात्सल्याची माता ती 

कवच होऊनी निरामयाचे मातृत्वाची रक्षक ती

वसा घेउनीया सेवेचा मातांच्या अजरामर झाली 

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||३||

*

धनसंपत्ती कीर्ति प्रतिष्ठा मनात नव्हती अभिलाषा 

गर्भवतींचे रक्षण करणे जीवनात घेतला वसा

शिष्यगणांना निपुण करुनीया कर्मसिद्ध जाहली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||४||

*

समाजसेवा अंगिकारली कुटुंब अपुले विश्व जाणुनी

जोखीम भरल्या मातांसाठी कवच जाहली झणी धावोनी

विद्ध होउनी मृत्यूने मातांच्या कार्या सिध्द जाहली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||५||

*

अंतर्यामी अखंड अविरत सुरक्षीत प्रसूतीचा ध्यास 

सुदृढ शिशु जन्माला यावे सदैव जागृत होती आंस

साध्य कराया पावन ध्येया बहुत ग्रंथ संपदा लिहिली 

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||६||

*

अजातशत्रू जीवनात या विश्वाची ती सखी जाहली

जन्म देऊनी दोन बालका लाखोंची आई झाली

पत्नी होऊन एक क्षणाची कालातीत माता झाली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||७||

*

निरोप अपुला तृप्त मनाने घेउन निजधामा गेली 

समाधान तिज आत्म्याला कर्तव्याची बूज राखली

आपपराचा भाव कधीही मनी ठेवुनी ना जगली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||८||

*

कर्मापासुनिया निवृत्ती अंतर्यामी तृप्त होऊनी 

झेप घेतली ब्रह्म्यालागी निजदेहाला अंतरली

सद्गती लाभो तुला अपर्णा दिव्य प्रार्थना आळविली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||९||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दिनक्रम ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? दिनक्रम ? ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर 

फेसाळत्या या लाटा 

किनारी भेटाया येती

किनारा तिला भेटता

मिळे त्यांना तृप्ती

*

नभीचे हे सुर्य अन् चंद्र 

यांचे त्यांना आकर्षण 

भेटण्या त्यांना घेती रूप रौद्र 

अन् येताच किनारी होती अर्पण 

*

कधी पोटात घेती

कित्येक ते जीव 

कधी बाहेर फेकती

परतुन त्यांचे शव

*

नसे त्याची लाटांना

कोणतीच खंत 

दिनक्रम हा त्यांना

नसे काही भ्रांत 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सूत्र… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

सूत्र ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

जीवनी ताल असता तू बेताल वागू नको

गोडशा फळा वरील कडू साल होऊ नको

 *

दुसरा हात घेऊनी हाती माणसाने चालावे

भल्या वाटेवर चालताना तू कुणा रोखू नको

 *

नदीनेही वळता वळता दोन्ही काठाकडे पहावे

तिला जाउ दे वळणाने पण तू बांध घालू नको

 *

जगता जगता आपण फसतो, बऱ्याचदा चुकतो

आनंदी जगत असताना तू कुणाला रडवू नको

 *

आकाशातल्या ताऱ्यांशी आपण तुलना करू नये

रात्रीचं ते चमकतील भर दिवसा त्यांना पाहू नको

 *

जे आपले नाही ते मिळवण्या तू उगा मरू नको

दुसऱ्या साठी जगायचे हे सूत्र मात्र विसरू नको

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “काय हवय…?” ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

काय हवय…? ☆ श्री सुजित कदम ☆

☆ 

त्या दिवशी मंदीरातून

देवाच दर्शन घेऊन मी बाहेर पडलो

तेवढ्यात…

मळकटलेल्या कपड्यांबरोबर

लेकराचा मळकटलेला हात

समोर आला…!

मी म्हंटलं काय हवंय..?

त्यांनं…

पसरलेला हात मागे घेतला आणि

क्षणात उत्तर दिलं … आई…!

मी काहीच न बोलता

खिशातलं नाणं त्याच्या मळकटलेल्या

हातावर ठेऊन निघून आलो…

पण.. तो मात्र

वाट पहात बसला असेल…

मळकटलेला हात पसरल्यावर

त्यानं असंख्य जणांना दिलेल्या

उत्तराच्या उत्तराची…!

 

© श्री सुजित कदम

मो .. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “गवतपात्याचे हायकू…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “गवतपात्याचे हायकू” ☆ प्रा. भरत खैरकर 

दवाचा थेंब

गवतपात्यावर पडला

मधातुन चिरला….

 *

सुर्याचे किरण

पात्यावर थांबले

लख्ख चकाकले!

 *

लढवितो वारा

तृणांकुरावरी

इवलाल्या तलवारी…

 *

एक फुलपाखरू

पात्यावर बसलं

हलकेच झुललं…

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares