मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भलरी गीत… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ भलरी गीत… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

भलरी दादा भलरी

भलरी दादा भलरी

 

आल्या रिमझिम सरी

पेरणीला या लई भारी

खाचरात भरे पाणी

गाऊ या पाऊस गाणी

 

मनाला येई तरतरी

सपान आलं सामोरी

चिखलात माझी राणी

करते भात लावणी

 

मायेत भिजल्या पोरी

चमकती चंद्रकोरी

आनंदात ही धरणी

पहा देवाची करणी

 

दिवस आज भाग्याचा

गंध श्रावणसरींचा

रोपे खोचून भाताची

पूजा करूया लक्ष्मीची

 

प्रसन्न ती होईल गं

भरभरून  देई गं

घास खाऊ या सुखाचा

भ्रतार माझ्या प्रितीचा

 

भलरी दादा भलरी

भलरी दादा भलरी.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढ पावसाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ ओढ पावसाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आतुरले मन माझे,

    घनाने बरसावे !

तुझ्या जलधारात,

   मी चिंब चिंब भिजावे!

 

किती ओढ घेई तू,

  तृषार्त मी, तृषार्त मी!

एक एक थेंबासाठी,

  मनी झुरत आहे मी!

 

 तुझ्या मनाची मर्जी,

   सत्त्व पाहते सर्वांचे !

 आभाळाकडे डोळे लावून

    सुकले गं डोळे त्यांचे!

 

  हिरवाई बहराचे दिवस,

    असे दिसती सुकलेले !

 एकेक दिवस जाई ,

    मन माझे मिटलेले !

 

 लवकर ये सत्वरी,

   वाट पाही भूवरी!

शांतव तू जीवाला,

   हीच ओढ अंतरी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – दोन पेले… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– दोन पेले… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुगंधाने भरले असे दोन पेले

 आकर्षक  रंग तया लाभलेले

 नासिके समीप प्याल्यास नेता

  दरवळात  गात्र प्रफुल्लित झाले …… 

   मोहकवर्णासवे  दो चषकांना

   ओठाशी घ्याया मन राहवेना

   तबक पाचुचे सौंदर्यात वाढ

   निसर्गापुढे झुकतात माना …… 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ढग उतार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ढग उतार… ☆ श्रीशैल चौगुले ☆

पुर्वेकडचे ढग आता

पश्चिमेस धावू  लागले

वार्यासंगेच धुंद मन

आठवात गाऊ लागले.

 

मनावरचा ताबा थोडा

अल्लड झाला थकलेला

पावसासम डोळे आता

नजर शुन्यी रोखलेला.

 

आधार तुटे वादळात

अनावर भाव बेभान

यत्न करुन असमर्थ

हात तोकडे थेंब प्राण.

 

वाटले होते अजिंक्यच

आयुष्य स्वप्न मुक्त सारे

कोसळले ऋतूत प्रेम

काळीज भिजले,पिसारे.

 

सरतच गेले किनारे

झरत गेली दुःख दरी

पावसाळा कधी सुखाचा

सांजवेळी भरे अंतरी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 164 – श्रावण सरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 164 – श्रावण सरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

ठुमकत मुरडत

आल्या श्रावणाच्या सरी।

पोरीबाळी  थिरकती

रिमझिम तालावरी।।

 

ओथंबती जलदही

कधी उन्हे डोकवली।

मोहवितो निलकंठ

नृत्यासवे केकावली।।

 

अवखळ नद्या नाले

ऊन्मादात खळाळती।

शीळ घाली रान वारा

गीत पाखरे ही  गाती।।

 

नववधुपरी धरा

शालू हिरवा नेसली।

ठेवा जपुनी सौख्याचा

सृजनाचं लेणं ल्याली।।

 

सृजनाच्या सोहळ्यात

ओटी धरेची भरली

सप्तरंगी तोरणाने

चैतन्यात सृष्टी न्हाली।।

 

सुखावला कृषिवल

सणवार मांदियाळी।

अनुबंघ जपणारी

प्रथा श्रावणी आगळी।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निवृत्त होत नाही… ☆ श्री विठ्ठल बाबुराव घाडी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ निवृत्त होत नाही… ☆ श्री विठ्ठल बाबुराव घाडी ☆

निवृत्त तो झाला निवृत्तीला ती आली

मंडळी रोजच्या व्यापातून मुक्त झाली..

 

सागर म्हणाला मी ही निवृत्त होतो

जळून एकदाच ढगात जाऊन बसतो..

 

ढगाने ही निवृत्ती जाहीर केली

थेंबा थेंबासाठी सृष्टी हवालदिल झाली..

 

खूप भिजले कधी तापून लाल झाले

निवृत्त होते आता खूप काही मी दिले..

 

पेरले कितीक तरी उगवणार नाय

तिच्याशिवाय सांगा कुणी जगेल काय..

 

वारा म्हणतोय धावून थकलोय आता

निवृत्तीत निवांत होतो वाहता वाहता..

 

श्वास अडकेल जगाचा निवृत्त मात्र होवू नका तुम्ही

निसर्ग रक्षण करू हा शब्द विश्वप्रार्थनेत देतो आम्ही..

 

शुभ प्रभाती येणारा निवृत्त होत नाही..

शुभेच्छांसाठी शब्द यायचा थांबत नाही..

 

✍🏻साधे शब्द

© श्री विठ्ठल बाबुराव घाडी

चारकोप, मुंबई 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “जुने – नवे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “जुने – नवे….” ☆ श्री सुनील देशपांडे

जुने मरूद्या सांगा आधी तुम्हापाशी काय नवे ?

आम्हा सांगा नव्यामधूनी काय वाटते हवे हवे ?

युगे युगे ते सूर सात, आठवा सापडला का आठवा !

जुन्यास घालून  नवे आंगडे होतिल का ते सूर नवे ?

तीच अक्षरे शब्द तेच अन् नवी बाटली दाखवता ?

जीवन आमुचे खर्चून आम्हा सापडले ना काही नवे.

ध्यास नव्याचा खरेच सुंदर, जीवन त्याच्यामधे सरे.

नवे खरोखर सापडले तर सा-यांना ते हवे हवे.

म्हणून म्हणतो ध्यास नव्यांचे पिढ्यापिढ्यांना हवे.

परंतु मागिल संचित पाहुन प्रयत्न व्हावे नवे नवे.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गाडा जगाचा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

गाडा जगाचा श्री सुहास सोहोनी ☆

कुणीच कुणाचं ऐकत नाही

कारण प्रत्येकजण बोलतोय

कुणीच कुणाला थांबवत नाही

कारण प्रत्येकजण धावतोय —

 

कुणीच कुणाला शिकवत नाही

कारण प्रत्येकजण शहाणा

स्वतः पडला उताणा तरी

शहाणपणाचा बहाणा —

 

कुणीच कुणाला फसवत नाही

तरी प्रत्येकजण फसतो

स्वतःच्याच फसव्या जाळ्यात

स्वत:च फसून अडकतो —

 

कुणीच कुणाला देत नाही

दुसऱ्याची खात्री वा भरोसा

स्वतःची स्वतःलाच नसते तेव्हा

तिसऱ्याची हमी देणार कसा —

 

तरिही या बिनभरोशी जगात

आशेचा एक किरण दिसला

बिगरमायच्या भुकेल्या तान्ह्यास

जवा तिसऱ्याच मायनं उराशी घेतला —

 

आपल्या चतकोरातला एक तुकडा

भिकाऱ्यास दुसऱ्या देतांना

दिसला जेव्हा एक भिकारी

माणुसकीच्या दिसल्या खुणा —

 

सारा समाज बिघडत नसतो

दहा वीस टक्के तरी माणूस असतो

त्याच्याच योगदानामुळे

जगाचा गाडा चालू राहतो —

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #186 ☆ एक भाकर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 186 – विजय साहित्य ?

☆ एक भाकर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

चुलीतला जाळ

जसा जसा भडकायचा

झोपडीबाहेरचा अंधार

तसा तसा वाढायचा.

भाकरीचा चंद्र

नशीबाच्या कलेकलेनं

रोज कमी जास्त हुयाचा.. . !

कधी चतकोर, कधी अर्धा

कधी आख्खाच्या आख्खा

डागासकट हरखायचा.. !

माय त्याच्याशी बोलायची .

अंधारवाट तुडवायची. . . !

लेकराच्या भुकंसाठी

लाकडागत जळायची.. !

आमोशाच्या दिसात बी

काजव्यागत चमकायची. . . !

त्या नडीच्या दिसात ती. . .

गाडग्यातल मडक्यात अन्

मडक्यातल गाडग्यात करीत

माय जोंधळं हुडकायची.

जात्यावर भरडायची.

तवा कुठं डोळ्याम्होरं.. . .

चंद्रावानी फुललेली

फर्मास भाकर दिसायची..!

घरातली सारीच जणं

दोन येळच्या अन्नासाठी

राबराब राबायची…!

चुलीमधल्या लाकडागत

जगण्यासाठी जळायची.. . !

पडंल त्ये काम करून

म्या, तायडी,धाकल्या गणू

मायची धडपड बघायचो

बाप आनल का वाणसामान

सारीच आशेवर जगायचो.. . !

चुल येळेवर पेटायसाठी

हाडाची काड करायचो. . . !

चुलीवर भाकर भाजताना

माय मनात रडायची.

भाकर तयार व्हताच

डोळ्यात चांदणी फुलायची.. !

लाकड नसायची, भूक भागायची.

आमच्या डोळ्यावर झोप यायची

पण . . . कोण जाणे कुठपर्यंत

एक थंडगार चुलीम्होर.. .

बा ची वाट बघत बसायची.

भाकरीच्या चंद्रासाठी

तीळ तीळ तुटायची.

उजेडाची वाट बघत

आला दिवस घालवायची…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ६ ते १०— मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ६ ते १० — मराठी भावानुवाद. ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवतेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या सहा ते दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

ऊ॒र्ध्वस्ति॑ष्ठा न ऊ॒तये॑ऽ॒स्मिन्वाजे॑ शतक्रतो । सम॒न्येषु॑ ब्रवावहै ॥ ६ ॥

 कार्यांमध्ये पराक्रमांच्या करि संरक्षण अमुचे

सामर्थ्यशाली देवेंद्रा उभे उठुन ऱ्हायचे

हे शचीपतये तुमच्या अमुच्या मध्ये कोणी नसावे

संभाषण अमुचे आता तुमच्यासवेचि हो व्हावे ||६||

 योगे॑योगे त॒वस्त॑रं॒ वाजे॑वाजे हवामहे । सखा॑य॒ इंद्र॑मू॒तये॑ ॥ ७ ॥

 वैभवाची आंस जागता अमुच्या आर्त मनात

शौर्य अपुले गाजविण्याला तुंबळ रणांगणात

भक्ती अमुची देवेन्द्रावर चंडप्रतापी तो

सहाय्य करण्या आम्हाला त्यालाची पाचारितो ||७||

आ घा॑ गम॒द्यदि॒ श्रव॑त्सह॒स्रिणी॑भिरू॒तिभिः॑ । वाजे॑भि॒रुप॑ नो॒ हव॑म् ॥ ८ ॥

 कानावरती पडता अमुची आर्त स्तोत्र प्रार्थना

मार्ग सहस्र दाविल अपुले अमुच्या संरक्षणा

प्रदर्शीत करुनी अपुल्या बाहूंचे सामर्थ्य 

खचीत येईल साद ऐकुनी देवेंद्राचा रथ  ||८||

 अनु॑ प्र॒त्नस्यौक॑सो हु॒वे तु॑विप्र॒तिं नर॑म् । यं ते॒ पूर्वं॑ पि॒ता हु॒वे ॥ ९ ॥

 अगणित असुनी रिपू भोवती अजिंक्य हा शूर
तव पितयाने केला इंद्राचा धावा घोर

सोडून अपुल्या दिव्य स्थाना आम्हासाठी यावे

देवेंद्रा रे सदैव संरक्षण आमुचे करावे ||९||

 तं त्वा॑ व॒यं वि॑श्ववा॒रा शा॑स्महे पुरुहूत । सखे॑ वसो जरि॒तृभ्यः॑ ॥ १० ॥

 प्रेम अर्पिण्या दुजा न कोणी विशाल या विश्वात

अखंड आळविती विद्वान तव स्तोत्राला गात

आम्हीही सारे करितो देवेंद्रा तुझी स्तुती

मूर्तिमंत तू भाग्य तयांचे स्तुती तुझी जे गाती ||१०||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/sxUQqA61WDU

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares