मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #171 ☆ वातानुकुलित … ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 171 ☆ वातानुकुलित… ☆ श्री सुजित कदम ☆

एका आलिशान वातानुकुलीत

दुकानाच्या आत

निर्जीव पुतळ्यांना

घातलेल्या रंगीबेरंगी

कपड्यांना पाहून,

मला माझ्या बापाची

आठवण येते…

कारण,

मी लहान असताना,

नेहमी माझ्यासाठी

रस्त्यावरून कपडे खरेदी

करताना,

माझा बाप माझ्या

चेह-यावरून हात

फिरवून त्याच्या

खिशातल्या पाकिटाला

हात लावायचा…

आणि

वातानुकुलीत

दुकानातल्या कपड्यांपेक्षा

रस्त्यावरचे कपडे

किती चांगले असतात

हे किती सहज

पटवून द्यायचा…

खिशातलं एखादं चाॅकलेट

काढून तेव्हा तो हळूच

माझ्या हातात ठेवायचा…

आणि

माझ्या मनात भरलेले कपडे

तेव्हा तो माझ्या नजरेतूनच ओळखायचा…

आम्ही कपडे खरेदी करून

निघाल्यावरही

माझा बाप चार वेळा

मागं वळून पहायचा

आणि

“एकदा तरी आपण

ह्या आलिशान दुकानातून कपडे

खरेदी करू”

इतकंच माझ्याकडे पाहून

बोलायचा…

पण आता,

मला त्या निर्जीव पुतळ्यानां घातलेल्या..

रंगीबेरंगी कपड्यांच्या

किंमतीचे लेबल पाहून…

माझ्या बापाचं मन कळतं

आणि त्यांनं तेव्हा…

डोळ्यांच्या आड लपवलेलं पाणी

आज माझ्या डोळ्यांत दाटून येतं…

कारण,

मी माझ्या लेकरांला

रस्त्यावरून कपडे

खरेदी करताना,

त्याच्यासारखाच मी ही

तेव्हा

किलबिल्या नजरेने

ह्या दुकानांकडे पहायचो…

आणि

ह्या रंगीबेरंगी कपड्यांची

स्वप्नं तेव्हा मी नजरेमध्ये साठवायचो…

अशावेळेस,

नकळतपणे

माझा हात

माझ्या लेकरांच्या चेह-यावर

कधी फिरतो कळत नाही…

आणि

पाकिटातल्या पैशांची

संख्या काही बदलत नाही…

परिस्थितीची ही गोळा बेरीज

अजूनही तशीच आहे

आणि

मनमोकळं जगणं

अजून…

वातानुकुलीत व्हायचं आहे..

.© श्री सुजित कदम

(टीप.. कविता आवडल्यास नावासहीतच फाॅरवर्ड करावी ही नम्र विनंती )

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हसरे कुटुंब ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हसरे कुटुंब ! ? श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

चेहरा घेऊन मानवाचा

फुले अनवट फुलली,

किमया भारी निसर्गाची

आज म्या डोळा पाहिली !

गाल गोबरे गोल फुगले

नाकी तोंडी रंग लाल,

दोन डोळे भेदक काळे

शोभे अंगी झगा धवल !

वाटे जणू एका रांगेत  

उभी राहिली मुले गोड,

साथ देती आई बाबा

नसे प्रेमा त्यांच्या तोड !

नसे प्रेमा त्यांच्या तोड !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विनवणी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 विनवणी ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

खळ नाही तुझ्या आभाळा

अविरत धरलीस धार,

केलास इरशाळवाडीमधे

तूच भयंकर कहर !

 

घे उसंत आता जराशी

नदी नाल्या आले पूर,

ओल्या दुष्काळाचे सावट,

करू लागले मनी घर !

 

धीर सुटे बळीराजाचा

पाणी डोळ्याचे खळेना,

उघड्या डोळ्यांनी पाहे

पेरणीच्या शेताची दैना !

 

कर उपकार आम्हावर

पुन्हा एकदा विनवितो,

भाकर तुकडा लेकरांचा

सांग कशास पळवतो ?

सांग कशास पळवतो ?

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 192 ☆ आम्ही विद्याधामीय… ☆ सुश्री प्रभा सोनवणे… ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 192 ?

☆ आम्ही विद्याधामीय… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

दिवस विद्याधामचेआठवणीत ठेवायचे

वर्षे झाली पन्नासच हेच गाणे म्हणायचे

हेडसरांचा दराराआठवतोय आजही

प्रार्थना आणि प्रतिज्ञा, शोधतो आहे ती वही

काळ सुखाचा शाळेचा, तेव्हा नसते कळत

अभ्यासू ,हुषार ,मठ्ठ एका रांगेत पळत

 या शाळेच्या छायेतून गेलो जेव्हा खूप दूर

दोन्ही डोळ्यांच्या काठाशी दाटलेला महापूर

शाळा मात्र नेहमीच होती सदा धीर देत

सा-याच संकटातून पुढे पुढे पुढे नेत

भेटीची ही अपूर्वाई कैक वर्षानंतरची

लक्षात ठेऊ नेहमीआम्ही सारे विद्याधामी

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “वेगळा पाऊस…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “वेगळा पाऊस…” ☆ सौ राधिका भांडारकर 

आजचा पाऊस जरा वेगळा

काहीसा खट्याळ लडीवाळ

हळुच कानाशी कुजबुजणारा

फारच उनाड पण मधाळ..

 

आजचा पाऊस जरा वेगळा

हळुच जाऊन पानांवर बसला

गार वार्‍याशी बोलता बोलता

थेंबाथेंबाने धरणीला चुंबत राहला…

 

आजचा पाऊस जरा वेगळा

पडू की नको पडू भावनांचा

हळुहळु होता आरंभाला

नंतर झाला वर्षाव धारांचा…

 

आजचा पाऊस जरा वेगळा

रानावनात स्वैरपणे हिंडला

चातकाच्या  चोचीत ओघळला

अन् मोराचा पिसारा फुलवला..

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मीच ओलांडले मला… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मीच ओलांडले मला… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मीच ओलांडले मला

मीच ओलांडले मला

जेव्हा तुझी सय आली.

तुझ्या पाऊस स्पर्शाने

काया झाली मखमली

 

मीच ओलांडले मला

मन जेव्हा मळभले

एका प्रकाश-किरणी

मळभ विरुनिया गेले.

 

मीच ओलांडले मला

चांदण- चकव्याची भूल

पडे विसर घराचा

पाय कुठे ग नेतील?

 

मीच ओलांडले मला

आले तुझिया चरणी

देई देई रे आसरा

आता मला चक्रपाणी

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #198 ☆ ‘नवीन आज्ञा…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 198 ?

☆ नवीन आज्ञा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

येणार कोण पक्षी धान्यास कापल्यावर

शेतात मौज तोवर येतील जोंधळ्यावर

कात्रीत सापडोनी झाली दशा अशीही

शिवता पुन्हा न आले काळीज फाटल्यावर

एकाच ईश्वराची आहोत लेकरे तर

का ठेवले अजूनी जातीस दाखल्यावर

दारिद्र्य पाचवीला त्यातच नवीन आज्ञा

सांगा कसे जगावे वाळीत टाकल्यावर

काहे तिखट म्हणूनच ठेचून काढले मी

मिरची कुठे बदलली गुण तोच ठेचल्यावर

नाही पराभवाची चिंता मनास आता

साऱ्या तमोगुणांची मी साथ सोडल्यावर

जल गोठले तरीही फुटतो तयास पाझर

पाझर मला न फुटला का रक्त गोठल्यावर

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर ☆

? काव्यानंद ?

☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर

वैभव जोशी यांच्या गझलचं रसग्रहण

आज त्यांची  देवप्रिया(कालगंगा)वृत्तातली एक गझल मी रसग्रहणासाठी घेतली असून त्यातील प्रत्येक शेराचा आशय माझ्या कुवतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आणखी अनेकांना यातील शेरांच्या अर्थाचे वेगळे पदर उलगडतीलच.

आजची रचना

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

 

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

 

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

 

काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

 

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वैभव जोशी

आता प्रत्येक शेराचा आशय आपण पाहू..

शेर क्र.१

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

एका लेखकासाठी किंवा साहित्यिकासाठी त्याची लेखणी हीच त्याला मिळालेली अमोघ अशी ताकद असते.आपल्यापाशी असलेली शब्दसंपदा लेखणीच्या माध्यमातून तो रसिक मायबापापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो.पण या लेखणीतून फक्त शब्दबुडबुडे बाहेर न पडता जगातल्या दुःखितांच्या,पीडितांच्या वेदना जाणून घेण्याचं सामर्थ्य दे असं मागणं गझलकार ईश्वराकडे मागत आहे!खूप सुंदर असा मतल्याचा शेर!

शेर क्र.२

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

या शेरात गझलकार वरवर अगदी साधं वाटणारं पण अतिशय कठीण,सत्वपरीक्षा पाहणारं मागणं ईश्वराकडे मागत आहेत.आपल्या अवतीभवती भुकेने तडफडणारे अनेक लोक आहेत आणि अशी वेळ कुणावरही,कधीही येऊ शकते!यदाकदाचित असा प्रसंग स्वतःवर कधी आलाच तर एकवेळ पोटाची खळगी भरायला भाकरी नाही दिलीस तरी चालेल,पण भूक सहन करण्याचं बळ दे,आणि तशा अवस्थेतही स्वत्वाची भावना कधी ढळू देऊ नकोस,पोटासाठी लाचारी पत्करायला लावू नकोस असं गझलकारांचं मागणं आहे..असं कुणी एखादाच मागू शकतो कारण आज माझं हक्काचं आहे ते हवंच पण दुसऱ्याचं आहे तेही हवं अशी लोकांची मनोधारणा बनत चालली आहे!खूप गहन अर्थाचा शेर!

शेर क्र.३

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

वाह! या जगात जसे असामान्य लोक आहेत तसेच अतिसामान्यही आहेत.कुणी सडेतोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतो तर कुणी मूग गिळून बसत सतत अन्याय सहन करत राहतो.बळी तो कान पिळी या न्यायाने मोठा अधिक मोठा होत जातो आणि सर्वसाधारण आहे तो जैसे थे अवस्थेत पिचून जातो.प्रत्येक युगात हे असंच चालत आलंय पण अशा वंचितांना आपली व्यथा बोलून दाखवण्याची स्फूर्ती परमेश्वराने द्यावी,त्यांच्या जाणिवा जागृत व्हाव्यात असं या शेरात गझलकारांचं मागणं आहे!सुंदर शेर!*ज्येष्ठ दिवंगत गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांची

बोल बाई बोल काही

हा अबोला ठीक नाही

असा शेर असलेली गझल मला सहज आठवली हा शेर वाचताना!

शेर क्र.४

काय कामाचा गड्या ओठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

हाही शेर खूप उंचीचा खयाल असलेला!आधीच्या शेरात म्हटल्याप्रमाणे युगानुयुगे केवळ अन्याय सहन करत कुढत जगणाऱ्या माणसांच्या शब्दांना कधी तरी वाचा फुटावी आणि मनात दाटून आलेलं सगळं बाहेर यावं जेणेकरून पुढची वाटचाल सुकर होईल!

हो मोकळी बोलून तू हृदयात जे जे दाटले

का भावनांना आपल्या अव्यक्त मग ठेवायचे

या शेरात म्हटल्याप्रमाणे मनातल्या भावनांची कोंडी फुटल्याशिवाय जगणं सुखाचं होणार नाही आणि त्यासाठीच ईश्वराने आपलं मन मोकळं करण्याची स्फूर्ती माणसांना द्यावी,मूक हुंदके सहन करण्यापेक्षा परिस्थितीचं,काळाचं आव्हान पेलण्याची ताकद दे,अश्रूंपेक्षा हिम्मत दे असं गझलकार इथे सुचवतात.

शेर क्र.५

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वाह,हा शेवटचा शेर तर एखाद्या पोथीचा कळसाध्याय असावा तसा आहे!सामान्य माणसाला रोजची भाकरी आणि रहायला मठी असावी एवढीच अपेक्षा असते,त्याला कुठल्या शिखरावर जायची आस नसते आणि किमान सुखाचं आयुष्य लाभावं इतकं त्याचं अल्प मागणं असतं.

प्रस्तुत शेरात गझलकार म्हणतात की मला त्या ध्रुवासारखं आकाशातलं अढळपद मिळण्याची लालसा नाही तर अवतीभवतीच्या माणसांच्या काळजातच जागा हवी आहे जेणेकरून त्यांची सुखदुःख,व्यथा वेदना जाणून घेता येतील.स्वतःपुरेसंच जगण्याची संकुचित वृत्ती न जोपासता इतरांची मनं वाचण्याचा व्यापक दृष्टिकोन या शेरात प्रभावीपणे व्यक्त झाला आहे आणि म्हणूनच या शेरातला खयाल खूप उच्च दर्जाचा वाटतो!एका कवीसाठी, गझलकारासाठी माणसं वाचण्याहून  दुसरं मोठं काही नसतं असाही एक विचार इथे गवसतो!खूप आवडला हा शेर!

ही रचना मला का आवडली?

देवप्रिया वृत्तातली ही खूप सुंदर रचना आदर्श मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यातला प्रत्येक शेर खास आहे. दे रे ईश्वरा या रदिफला अगदी समर्पक असे वरदान,जाण, त्राण, स्फूर्तीगान,आव्हान आणि स्थान हे कवाफी चपखलपणे वापरले आहेत. लेखणी,भूक,भाकरी,हुंदका,गगनातलं अढळपद अशी प्रतीकं, रूपकं आणि प्रतिमा या रचनेचं सौंदर्य खुलवतात त्यामुळे प्रत्येक शेर वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतो!श्री.वैभव जोशी यांच्या तरल आणि संपन्न प्रतिभेला मनापासून नमस्कार!आजच्या वाढदिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा!

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – अन्नपूर्णा…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – अन्नपूर्णा…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

गरीबाची अन्नपूर्णा,

मिळेल ते शिजवतेय !

आपल्या लेकराबाळां,

अन्न खाऊ घालतेय !

उघड्यावर संसार,

कडेवर  मूल !

कढल्यात रांधण,

तात्पुरती चूल !

नशिबात नाही,

कायमचा कुठे निवारा !

पाटीवर बिऱ्हाड,

आभाळाखाली थारा !

चुलीतल्या विस्तवापेक्षा ,

पोटातली आग जास्त धगधगते !

परिस्थितीचे बसती चटके,

मुलाबाळांच्यासाठीच ती जगते !

एकलीच बाई,

चिंता कशाकशाची करणार !

चूल जळतेय तोवर,

पोटातली आग शमवणार !

कारभारी असतो व्यसनी,

गुत्यावर उडवतो मजुरी !

काय खाऊ घालावे लेकीला,

एका आईची दिसे मजबुरी !

स्त्री सुशिक्षित असो वा अडाणी,

त्या कुटुंबाची अन्नपूर्णाच ती असते !

द्रौपदीची थाळी हाती तिच्या,

इष्ट भोजनाची तृप्तता तिच्यात वसते !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझं गाव… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ माझं गाव… ☆ 🖋 मेहबूब जमादार

 मी तुला जपेन सखे  तू मला जप

अशीच  निघून जावोत  तपावर तप

मी तुझ्या डोळ्यात तू माझ्या डोळ्यात

असंच तू बरस ना  भर पावसाळ्यात

नको कुठली दूरी नको मध्ये दरी   

प्रेमानेच भरुया जीवनाच्या सरी

प्रिये तुझ्या रेशमी केसातील मोगरा

 विसरून जातो मी जगाचा पसारा

तुझ्या येण्या सारा आसमंत बहरतो  

माझ्या  गीतात  मी तुझे गीत गातो

 माझं गाव सखे  तुझं ही होऊन जावं

आपल्या प्रेमाचं गाणं  आभाळानं  गावं    

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares