मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जागे होई सारे विश्व… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ जागे होई सारे विश्व ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

रविराजाच्या रथाला

प्रकाशाचे शुभ्र अश्व

रथ जाई पुढे तसे

जागे होई सारे विश्व

*

गोपुरात घंटानाद

घराघरातून स्तोत्र

किरणात चमकते

सरितेचे शांत पात्र

*

कुणब्याचे पाय चाले

शेत वावराची वाट

झुळुझुळू वाहताती

पिकातुन जलपाट

*

सुवासिनी घालताती

माता तुळशीला पाणी

सुखसौख्य मागताती

 वैजयंतीच्या चरणी

*

 शुभ शकुनाने होई

 दिन सनातनी सुरू

 रविराजाला वंदता

 पंचमहाभूता स्मरू

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “धुके…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “धुके…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

झाली पहाट आली जाग हळूहळू साऱ्या सृष्टीला

थंडी गुलाबी लपेटलेल्या तरुण निसर्गाला… 

*

किलबिल चिवचिव करीत सारे पक्षीगण ते उठले

किलकिल डोळे करीत आणि जागी झाली फुले… 

*

पहाटवारा गाऊ लागला भूपाळी सुस्वर

पानांच्या त्या माना हलवीत दाद देती तरुवर… 

*

मिठी परी साखरझोपेची, निसर्गराजा त्यात गुंगला

गोड गुलाबी पहाटस्वप्ने जागेपणी अन पाहू लागला… 

*

बघता बघत चराचर आता धूसर सारे झाले

आपल्या जागी स्तब्ध जाहली वेली वृक्ष फुले… 

*

स्वप्नांचा तो मोहक पडदा धुके लेवुनी आला

कवेत घेऊन जग हे सारे डोलाया लागला… 

*

फिरून एकदा निरव जाहले वातावरणच सारे

धुके धुके अन धुके चहूकडे.. काही न उरले दुसरे… 

*

परी बघवेना दिनकरास हे जग ऐसे रमलेले

स्वप्नरंगी त्या रंगून जाता.. त्याला विसरून गेले… 

*

गोड कोवळे हासत.. परि तो लपवीत क्रोध मनात

आला दबकत पसरत आपले शतकिरणांचे हात… 

*

दुष्टच कुठला, मनात हसला, जागे केले या राजाला

बघता बघता आणि नकळत स्वप्नरंग उधळून टाकला… 

*

 स्वप्न भंगले, दु:खित झाला निसर्गराजा मनी

दवबिंदूंचे अश्रू झरले नकळत पानोपानी… 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घडो ऐसे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ घडो ऐसे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

विग्रहा समोर

बसता डोळे मिटून

येते अबोल उत्तर

तिच्या हृदयातून…

 

न लगे शब्द

नच स्पर्श वा खूण

मौनात मी, मौनात ती

संवाद तरी मौनातून…

 

न मागणे न देणे

व्यवहार नाहीच मुळी

मी तू गेले लया

जन्मलो तुझिया कुळी..

 

सुटली येरझार

चक्रव्यूही भेदला

आई तूझ्या कृपे

सार्थक जन्म झाला…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 239 ☆ संस्कार सावली… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 239 – विजय साहित्य ?

संस्कार सावली ☆

(काव्यप्रकार अष्टाक्षरी.)

अनाथांची माय

करुणा सागर

आहे भोवताली

स्मृतींचा वावर…! १

*

ममतेची माय

आदर्शाची वाट

सुख दुःख तिच्या

जीवनाचा घाट..! २

*

परखड बोली

मायेची पाखर

आधाराचा हात

देतसे भाकर…! ३

*

जगूनीया दावी

एक एक क्षण

संकटाला मात

झिजविले तन…! ४

*

पोरकी जाहली

माय ही लेखणी

आठवात जागी

मूर्त तू देखणी…! ५

*

दु:ख पचवीत

झालीस तू माय

संस्कार सावली

शब्द दुजा नाय..! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खरे-खोटे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

खरे-खोटे☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

माझ्या सभोवताली स्वार्थांध लोक जमले

त्यांना पुरून उरण्या जगणे तसेच शिकले

 *

परके कधी न माझे का त्यास दोष देऊ

अपुलेच शत्रू झाले त्यांनी मलाच लुटले

 *

जो दुर्जनास आधी वंदेल तो शहाणा

ही रीत ज्यास कळली जीवन तयास कळले

 *

ज्यांच्या घरात आहे साम्राज्य मंथरेचे

तुटतील खांब तिथले पक्के खरेच असले

 *

नाना कळा मनी पण दिसतो वरून भोळा

त्याने दिले जरीही खोटेच शब्द खपले

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १८ — मोक्षसंन्यासयोगः — (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान्‌ । 

वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्‌ ॥ २१ ॥ 

*

सकल जीवांत भिन्न भाव भिन्नतेने जाणणे

राजस या ज्ञानासी मनुष्यातून पार्था जाणणे ॥२१॥

*

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम्‌ । 

अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ २२ ॥ 

*

एकाच कार्यदेही सर्वस्वी आसक्त जे ज्ञान

तामस ते अहेतुक तत्वशून्य अल्प ज्ञान ॥२२॥

*

नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम्‌ । 

अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ २३ ॥ 

*

नियत कर्म अभिमान रहित

रागद्वेषासम भावना विरहित

निरपेक्ष भाव निष्काम कर्म

हेचि जाणावे सात्विक कर्म ॥२३॥

*

यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः । 

क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्‌ ॥ २४ ॥ 

*

जरी बहुप्रयासाचे कर्म भोगासक्तीने युक्त 

राजस जाणावे कर्म असते अहंकारयुक्त ॥२४॥

*

अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम्‌ । 

मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ २५ ॥ 

*

परिणती हानी हिंसा सामर्थ्य नाही विचारात

अज्ञाने कर्मा आचरिले तामस तयासी म्हणतात ॥२५॥

*

मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः । 

सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥ २६ ॥ 

*

संगमुक्त अहंकाररहित धैर्योत्साहाने युक्त

कार्यसिद्धी वा अपयश मोदशोक विकार मुक्त

कर्तव्य अपुले जाणून मग्न आपुल्या कर्मात

सात्त्विक कर्ता तयासी म्हणती अपुल्या धर्मात ॥२६॥

*

रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः । 

हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥ २७ ॥ 

*

लोभी मोही कर्मफलाशा मनात जोपासतो

अशौच आचरण दुजांप्रति पीडादायक असतो

हर्षाने शोकाने कर्माच्या परिणतीने लिप्त राहतो

असला कर्ता राजस कर्ता ओळखला जातो ॥२७॥

*

अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः । 

विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥ २८ ॥ 

*

शठ गर्विष्ठ अयुक्त असंस्कृत परजीवित नाशतो

दीर्घसूत्री आळशी विषादी तो तामस कर्ता असतो ॥२८॥

*

बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु । 

प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥ २९ ॥ 

*

साकल्याने तुला कथीतो समग्र विवेचन

गुणागुणांचे पृथक् तत्वे धनंजया तुज ज्ञान

बुद्धीधृतीचे त्रिविध भेदांचे तुज करितो कथन

ऐकोनीया चित्त लावुनी अंतर्यामी तू जाण ॥२९॥

*

प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । 

बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ ३० ॥ 

*

प्रवृत्ती-निवृत्ती कर्तव्याकर्तव्य मोक्ष तथा बंधन

भय-अभय यथार्थ जाणी सात्त्विक ती बुद्धी अर्जुन ॥३०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – राजमाता जिजाऊ… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? राजमाता जिजाऊ? श्री आशिष  बिवलकर ☆

स्वराज्याची जननी,

राजमाता जिजाऊ!

थोरवी त्यांची आज,

सारे मिळून गाऊ!

*

जाधवांची होती कन्या,

शुर आणि कणखर!

भोसल्यांची झाली सून,

कर्तव्यात होती तत्पर!

*

तीनशे वर्षाची होती,

काळीकुट्ट अमावस्या!

माय भवनीला साकडे

घातले, केली तपस्या!

*

पराक्रमी पुत्र शिवाजी,

येई जन्माला पोटी!

स्वराज्याचे बाळकडू

पाजले त्याच्या ओठी!

*

तावून सलखून केले,

संस्कार शिवबावर!

सोळाव्या वर्षी केला,

तोरणा किल्ला सर !

*

 एक एक मावळ्यावर,

 केली त्यांनी माया!

 पाठीशी उभे ते राहिले,

 बळ दिले शिवराया!

*

तीन तपे देव मस्तकी,

धरून केला हलकल्लोळ!

साऱ्या मुघलांनी घाबरून,

काढला स्वराज्यातून पळ!

*

स्वराज्याची गुढी उभारली,

हिंदवी स्वराज्य स्थापन केले!

दहा दिशातून अरुणोदय झाला,

छत्रपती शिवाजी महाराज झाले!

*

धन्य ते शिवाजी महाराज,

धन्य राजमाता जिजामाता!

त्यांच्या मुळेच हिंदुस्थानात,

हिंदूधर्म अभिमानाने पहाता!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आ रं भ शू र ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🤣🚶🏻‍♀️आ रं भ शू र ! 🚶🤣 ⭐ श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

दिसले सकाळी मजला

चेहरे नवीन फिरतांना,

पाहून उत्साह वाटला

मज ते सारे बघतांना !

*

अजून थोडे दिवस तरी

त्यातले काही दिसतील,

जसं जसे दिवस जातील

थोडेतरी गायब होतील !

*

एक तारीख नववर्षाची

करती चालण्याचा संकल्प,

पण भर सरता उत्साहाचा

होतो आळसाचा प्रकोप !

*

‘उद्या नक्की’चा वायदा

करून आपल्या मनाशी,

आरंभशूर करती सलगी

मऊ ऊबदार गादीशी !

मऊ ऊबदार गादीशी !

© श्री प्रमोद वामन वर्तक

०१-०१-२०२५

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “महा⭐तारे” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “ महातारे ” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

मित्रहो..

आजकाल समाजात वृध्द म्हणजे ज्येष्ठ नागरीक म्हणजेच “म्हातारे” म्हणण्याचा प्रघात आहे.

परंतु एका कवीने या शब्दाची फारच सुंदर आणि यथार्थ फोड केली आहे.

‘म्हातारे’ म्हणजे “महा तारे” !

 

…. जे कर्तव्यपूर्तीच्या जीवनानुभवाने समृध्द असतात म्हणून ते खरोखरच स्वयंप्रकाशी व त्यांच्या बृहन्कुटुंबीय, समाजासाठीसुध्दा प्रकाशमान व मार्गदर्शक असतात. मात्र आपल्या संस्कृतीत असलेला

“थोरांना वयाचा मान देण्या”चा प्रघात तितकासा पाळला जातोय का ?

 

After all, respect is not to be demanded, but commanded ! 

Here is how..

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

पहाटे पाच वाजता उठतात

सगळं आवरून फिरायला जातात

व्यायाम करुन उत्साहात परततात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

धडपडतात, पडतात, परत उठतात

एवढंसं खातात, काही औषधं घेतात

रात्री निशाचरागत जागत बसतात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

पेपर वाचतात, बातम्या पाहतात

राजकारणावर हिरीरीने बोलतात

नाटक सिनेमा आवडीने पाहतात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

दूध, भाजी, किराणा आणतात

नातवंडाना शाळेतही सोडतात

संध्याकाळी त्यांना खेळायला नेतात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

नातवंडाशी खेळून मस्ती करतात

घरभर पळून उच्छाद मांडतात

नव्या नव्याच्या शोधात रमतात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत !

 

लग्नसमारंभात थाटात मिरवतात

लहानथोरांची खुशाली विचारतात

आनंदी, ताजेतवाने घरी परततात

हे महा🌟तारे, म्हणूनच थकत नाहीत ! 

 

ते कधीच थकणार नाहीत,

कारण ते म्हातारे नाहीत..

ते तर महा 🌟 तारे आहेत !

 

महा 🌟 ताऱ्यांनो,

🌃 लुकलुकत रहा.. 🎇 चमकायला बिल्कुल बिचकू नका

कवी : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “ स्थितप्रज्ञ“ ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – स्थितप्रज्ञ – ? ☆ श्री सुहास सोहोनी

वर्षे सरली, युगे उलटली,

काळ किती लोटला

स्थितप्रज्ञ मी अविचल अविरत

शिलाखंड एकला

 

सजीव प्राणी पक्षी त्यांसी

स्वर्ग, नरक अन् मोक्ष

निर्जीवांसी गति न कोणती

केवळ अस्तित्व

 

घडले नाही कधीच काही

उबूनि गेला जीव

अंतर्यामी आंस उठे परि

जिवास भेटो शिव

 

शिल्पकार कुणि दैवी यावा

व्हावी इच्छापूर्ती

अंगांगातुन अन् प्रकटावी

सुबक सांवळी मूर्ती

 

मोक्ष हाच अन् हीच सद्गती

निर्जीवाचे स्वत्व

छिन्नीचे घन घाव सोसुनी

लाभतसे देवत्व…

©  श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares