मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ झिरमिळता प्रकाश…. ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? झिरमिळता प्रकाश… ? डॉ. माधुरी जोशी 

अजून अंधारात विश्व

गर्द काळोखाची दाटी

तरी देखील कुठे कुठे 

झिरमिळता  प्रकाश भेटी

*

कुठे नाद फटाक्यांचा

आणि फुटती प्रकाशरेषा

आवाजाने भयभीत 

मूक मधुर पक्षी भाषा

*

कितीही होवो झगमगाट 

कितीही लखलख घरी बाजारी

पहाटेची गुलाबी आभा

सांगे आली सूर्याची स्वारी

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपावली… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपावली… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

अहंपणाचं दिवाळं

विकारांना टाळं

तेव्हाच शाश्वत सुख मिळं

हीच खरी दिवाळी…

 

सत्कर्माचं ताट

मोक्षाची वाट

धरु सदगुरुंचे पाय

हीच खरी दिवाळी..

 

समाधानाची पणती

आनंदा नाही गिनती

साधनेवर प्रिती

हीच खरी दिवाळी..

 

भुकेलेल्या खीर

तहानलेल्या नीर

तेचि हो ईश्वर

हीच खरी दिवाळी…

 

नभी अंतरीच्या

तम जाईल लया

रिपूंचे फटाके लागले फुटाया

हीच खरी दिवाळी…

सर्वांना दिवाळीच्या अनंत शुभेच्छा… 🪔🏮💐

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्नेहमयी दिपावली… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ स्नेहमयी दिपावली… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

नभांगणातील तारे सारे

धरतीवरती जणू उतरले

दिव्यादिव्यांच्या रोषणाईने

आसमंत लख्ख उजळले

*

सणांचा हा राजा आला

दिपावली म्हणती त्याला

चैतन्याने फुलून आला

घराघरात उत्साह भरला

*

रांगोळ्यांनी अंगण सजले

दारावरती तोरण बांधिले

आकाशकंदिल वर झगमगले

चमचमणारे जणू नक्षत्र उतरले

*

बालगोपाळांची लगबग चालली

किल्ला बांधता मातीत रमली

चढाओढीने मावळ्यांनी सजली

फटाक्यांची आतिषबाजी फुलली

*

लाडू, करंजी, चकली खमंग

पंचपक्वान्नांचे भोजन

आप्तेष्टांची जमली मैफल

आनंदाचा सोहळा सुंदर

*

झेंडू फुलांचे सजले तोरण

तबकामधे उजळली निरांजन

घरोघरी लक्ष्मीचे पूजन

उत्साह अन् आनंदाचा क्षण

*

राग, द्वेष सारे विसरुनी

एकमेका शुभेच्छा देती

नात्यांमधूनी स्नेह जुळती

दिपावलीची हीच पर्वणी.

*

सर्वांना दिवाळी व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… 🪔🏮💐

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीप दीपावली… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆  दीप दीपावली… 🪔 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

ती दीप होऊनी आली

रात सजवुनी गेली ।। धृ ।।

*

ती अवस शरदाची

ऋतु पालटत होता

गुलाबी मौसमात

नक्षत्रे लेवून आली

तम सर्वही सारून

 चांदणे पिऊनी गेली ।। 1 ।।

*

 नील आकाशी त्या

 आकाश दिप 

 सजला होता

 नक्षत्र माळेत ही 

 शुक्र चमकला होता

 मुग्ध चांदणी एक

 मनात हसून गेली ।। 2 ।।

*

 कार्तिक मासही हा

 पणत्या तेवत होत्या

 मंद धुंद उजळीत

 स्नेह पेरीत होत्या

 दीपास अचानक का

 काजळी धरत गेली ।। 4 ।।

*

थंडीची चाहूल ही

रात किड्यांना होती

त्रिपुरारी पुनवेला

सहस्त्र वाती भिजती

 ते दीप नदीकाठी ही 

 सहज तरंगत होते ।। 5 ।।

*

ती दीप होऊनी आली

रात सजवुनी गेली

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 235 ☆ दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 235 – विजय साहित्य ?

☆ दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ☆

दिवा वातीचं रे नातं

घर आणि घरपण

काळजाची तेलवात

आला एकोप्याचा सण…! १

*

दारामध्ये रंगावली

रंग सुखाचे कोंदण

माणसाने माणसाला

दिली दिवाळी आंदण…! २

*

दिवाळीच्या स्वागताला

फराळाची मेजवानी

सुख दुःख राग लोभ

अलंकार स्वाभीमानी…! ३

*

पणतीने पणतीला

दिली प्रकाशाची वाट

सण दिवाळीचा जणू

सुख सौभाग्याचा थाट…! ४

*

अशी दिवाळी सांगते

मना मनात राहूया

शब्द किरणांचा दीप

अंतरात चेतवूया…! ५

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

डॉ. मधुवंती कुलकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

दीप तेवता मनात सप्तसूर उमटतो

दीप उजळता घरात आसमंत प्रकाशतो

दीप असे हृदयात अन् घरांघरांस जोडतो

दीप असा अंतरात आशिर्वाद बरसतो

*

दीप असे ज्ञानाचा बुद्धी तेज वाढवितो

दीप असे सौख्याचा समाधान जागवितो

दीप असे त्यागाचा तळमळ ही शांतवितो

दीप असे आधाराचा वृद्धांना हासवितो

*

दीप असे निरागस कळ्यांची कोमलता

दीप असे सौंदर्यात बहरली मोहकता

दीप असे गाभाऱ्यात प्रवेशते सायुज्यता

दीप असे दिवाळीत सात्विक सोज्वळता

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🪔🏮💐

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आजचा दिवस शुभेच्छा देण्याचा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

आजचा दिवस शुभेच्छा देण्याचा… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आकाशकंदील विराजमान झालाय

छोट्या छोट्या चांदण्यांसह

दरवाजाही केव्हापासून

तोरण बांधून सज्ज झालाय

अंगणही नटून बसलंय

रांगोळीचा गालिचा घेऊन

डबे सगळे तुडुंब आहेत

तिखट गोड स्वादासह

घर आता डोलू लागलंय

आनंदाच्या लहरींवर

आणि मन…

मन अगदी प्रफुल्लित

लाख लाख शुभेच्छांसह

आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा…

 

आपणा सर्वांना दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा…🪔🏮💐

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवाळी आली – – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ दिवाळी आली – – – ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

लखलख पणत्या लाख लाख शुभेच्छा आकाशकंदील लावायचे

पटपट आवरून फाटफाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

*

अंगणी रंगली रंगीत रांगोळी किल्लेही सुंदर बनवायचे

चिकचिक चिखल कालवताना भूमी शिवराय स्मरायचे ॥

*

वसूबारस धनतेरस धेनू, धन पुजायचे

तेहतीस कोटी देवांसंगे कुबेरासही नमायचे

मन सुमन मानूनी ते चरणावरी अर्पायचे 

पटपट आवरून फाट फाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

*

मनातील नर्कासुरासी आत्मा-कृष्णाने मारायचे

संस्कारांच्या लक्ष्मीमातेस अंतरात जपायचे

वर्षारंभी वर्षाफवारे आकाशामधे पाठवायचे

पटपट आवरून फाटफाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

*

पाडव्यास पतीपत्नीचे बंध नव्याने उजाळायचे

भाऊबीजेला बंधू-भगिनी नात्यास त्या फुलवायचे

यमही जाई यमीकडे त्या नियमास हो पाळायचे

पटपट आवरून फाट फाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

*

अशा दिपोत्सवी छान फराळी पदार्थ बनवायचे

तिखट गोड फराळाचे आदान प्रदान करायचे

चकचक चकली कडकड कडबोळी कर्र्र्म कुर्र्म खायचे

पटपट आवरून फाट फाट फटाके सावधतेने उडवायचे ॥

या निमित्ताने एक सुचवावेसे वाटते – – –

फटाके उडवणे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. तरी फटक्यावीना दिवाळी मनाला पटत नाही. म्हणून एक गाव एक गणपतीप्रमाणे एक गाव एक दिवाळी हि योजना राबवली जावी. यामधे घरोघरी जाऊन फटाक्यासाठी फंड गोळा केला जावा. या फंडापैकी थोड्याच फंडाचे फटाके आणून त्या फटाक्याने सामूहिक आतषबाजी मोकळ्या मैदानावर केली जावी जेणेकरून धूर घरात न येता घरातील आजारी, लहान वा ईतरही लोकांना प्रदूषणाचा त्रास होणार नाही. तसेच ज्याना फटाक्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांना तो घेता येईल. राहिलेल्या फंडाचा ऊपयोग गरीब व गरजू लोकांना नवे कपडे आणि फराळाचे पदार्थ देण्यासाठी केला तर त्यांचीही दिवाळी आनंदाची भरभराटीची साजरी होईल.

Wish you all a very HAPPY DIWALI & PROSPEROUS NEW YEAR. 🪔🏮💐

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लक्ष्मी पूजा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆  लक्ष्मी पूजा …🪔 ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

उजळीत ज्योती दिवाळी पहाटे 

सजले ते दीप दिवाळी पहाटे

*

शरद चांदणे दिव्याचा महिमा 

लक्ष्मी पूजनी त्या दिवाळी पहाटे

*

आकाशदीप नभी मंद तारा 

नक्षत्र चांदणे दिवाळी पहाटे

*

मखमली राती सुटे गार वारा

रंगली मेहंदी दिवाळी पहाटे

*

सजले दिवे ते लक्ष कार्तिकी

भिजल्यात वाती दिवाळी पहाटे

*

गर्भगृही वाजे मंजुळ घंटा नाद

कर्पूर आरती दिवाळी पहाटे

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १५ — पुरुषोत्तम योग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १५ — पुरुषोत्तम योग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्‌ । 

यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ ११ ॥ 

*

 प्रयत्नान्ती जाणती योगी हृदयस्थ आत्म्याला

अज्ञानी परी यत्नाविन जाणू न शकती तयाला ॥११॥

*

 यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्‌ । 

यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्‌ ॥१२॥ 

*

 उजळुन टाकी समस्त जगता तेज भास्कराचे

चांदणे प्रकाशत रात्रीसमयी तेज शशांकाचे

जगी पसरेले दिव्य तेज जे पावक हुताशनीचे

मम तेज या सर्वांठायी अर्जुना गुह्य जाणायाचे ॥१२॥ 

*

 गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा । 

पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥१३ ॥ 

*

 प्रवेश करुनी वसुंधरेत धारयतो मी सर्व जीवांना

रसस्वरूपी शशी होउनी पोषितो मी औषधींना ॥१३॥

*

 अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।

 प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ ॥ १४ ॥ 

*

 सर्व जीवांच्या देहामध्ये मी वैश्वानर प्राणापान

चतुर्विध अन्नाचे देही करीतो मीच अंतर्ग्रहण ॥१४॥

*

 सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । 

वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ ॥१५ ॥ 

*

 समस्त जीवांच्या हृदयात मी अंतर्यामी स्थित

स्मृति-ज्ञानाचा कर्ता मीच माझ्यातुन उद्भवत

वेदांतील जाणावयाचे गुह्य मीच असे ते ज्ञान

वेदांचा कर्ता मीच मलाचि होई त्याची जाण ॥१५॥

*

 द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च । 

क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥१६॥ 

*

 विश्वामध्ये क्षर-अक्षर दोन्ही पुरुष नांदती

नाशवंत काया जीवात्मा अविनाशी म्हणती ॥१६॥

*

 उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः । 

यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥१७॥ 

*

 भिन्न तथापि उत्तम पुरुष वास्तव्य तिही लोकी

धारतो पोषतो सकला ईश्वर परमात्मा अविनाशी॥ १७॥

*

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः । 

अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १८ ॥ 

*

 मी सर्वस्वी अतीत नाश अस्तित्वापासून

उत्तम मीही अविनाशी जीवात्म्याहून 

आमुलाग्र जाण वेदांना श्रेष्ठत्वाची मम

तिही लोकांतुन दिगंत नाम माझे पुरुषोत्तम ॥१८॥

*

 यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्‌ । 

स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १९ ॥ 

*

 ज्ञान जयाला झाले माझे पुरुषोत्तम अर्जुन 

भजतो मज वासुदेवा तो परमेश्वर जाणून ॥१९॥

*
 इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ । 

एतद्‌बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ॥२०॥ 

*
 जाणुन घेता तत्वतः ज्यासी कृतार्थ बुद्धिमान 

अतिगुह्य ज्ञान ते मी कथिले तुज पावना अर्जुन ॥२०॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥ 

*

 ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी पुरुषोत्तमयोग नामे निशिकान्त भावानुवादित पञ्चदशोऽध्याय संपूर्ण ॥१५॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print