मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घाई…कवयित्री : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ घाई…कवयित्री : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

फार घाई होते हल्ली…

प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई…

क्षण फुकट वाया गेला म्हणून

लगेच गळे काढायची पण घाई…

 

माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…

ते पटकन जगाला दाखवायची घाई….

जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…

पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….

 

गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….

व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….

 

Quality मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…

 

विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….

 

नजरेत दृश्य येताक्षणी कॅमेऱ्यात बंद करायची घाई…

विचाराचा कोंब फुटताक्षणी,कृतीत उतरायची घाई…

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….

बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

मेमधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई….

 

बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…!

चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई.

बालांना किशोर व्हायची घाई…

किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर..

काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….

 

तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई…

दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई…

 

प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई…

श्वास थांबता क्षणी श्रद्धांजली वाहायचीसुद्धा घाई…!

 

मुक्कामाला पोहचायची घाई….

कामावरुन निघायची घाई…

 

सिग्नल संपायची घाई….

पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…

 

सगळंच पटकन उरकायची घाई…

आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई…

 

आठ दिवसांत वजन कमी करायची घाई…

महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….!

पाच मिनिटांत गोरं व्हायची घाई…

पंधरा मिनिटांत केस लांब व्हायची घाई…

 एक मिनिटात वेदना शमवायची घाई…

एनर्जी ड्रिंक पिवून वडीलधाऱ्यांना दमवायची घाई…

 

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमून जाई…

भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही….

मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!

 

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धी पेक्षा ही आहे काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

 

कवयित्री : सौ. विदुला जोगळेकर

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नूपूर आणि बेडी… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि सुश्री वर्षा बालगोपाल  ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  नूपूर आणि बेडी… (विषय एकच… काव्ये दोन) ? ☆ श्री आशिष बिवलकर आणि सुश्री वर्षा बालगोपाल  ☆

(जे जे स्कूल ऑफ आर्टचा स्कल्प्चर गोल्डमेडॅलिस्ट श्री.सुहास जोशी, देवगड याने पाठवलेलं चित्र.)

श्री आशिष बिवलकर   

( १ ) 

कुणा पायात  घुंगरू,

कुणा पायात शृंखला !

जीवनाच्या रंगमंचाचा,

वास्तववादी  दाखला !

मेहंदीने रंगले पाय कुणाचे,

कुणाचे रंगले ओघळत्या लाल रक्ताने !

रंगमंची कोणी दंग झाला,

स्वातंत्र्याचा यज्ञ मांडला देशभक्ताने !

कोणी बेधुंद नाचून ऐकवीत होता,

छुमछुमणाऱ्या घुंगरांचा चाळ !

कोणी आनंदाने मिरवीत होता,

अंगावर अवघड बेड्यांची माळ!

कुणा टाळयांचा कडकडाट,

होऊन मिळत होती दाद !

कुणा चाबकाने फटकारत,

देशभक्ती ठरवला गेला प्रमाद !

कुणी नटराज होऊन,

करीत होता कलेचा उत्सव !

कुणी रुद्र रूप धारण करून,

स्वतंत्रतेसाठी मांडले रुद्र तांडव !

कुणी नृत्याने शिंपडत होता,

आनंदात नृत्यकलेचे अमृतजल !

कोणी कठोर शिक्षा भोगून,

प्राशन करत होता हलाहल !

नृत्य कलाकार त्याच्या परी थोर,

साकारला रंगदेवतेचा कलोत्सव!

स्वातंत्र्य सैनिकांना त्रिवार वंदन,

अनुभवला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

(२) 

एक पाय बंधनातील

एक पाय हा मुक्तीचा

दोन्ही मध्ये एकच सीमा

प्रश्न फक्त उंबर्‍याचा॥

एक घर सांभाळते

एक घर साकारते

आजची स्त्री परंतु

दोन्ही भूमिका निभावते॥

बंधनातही मुक्त जीवन

मुक्तीमधेही अनोखे बंधन

जणू हेच अध्यात्म सांगे कृतीतून 

रुदन – स्फुरणाचे एकच स्पंदन॥

बंधनाच्या श्रृंखला वा

कलेची ती मुक्त रुणझुण

नारी जीवन कसरतीचे

कधी बेडी कधी पैंजण॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सखे… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सखे… 🧚 ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

मन रानात-वनात

मन श्रावण थेंबात

मन  प्रतिबिंब माझे

तुझ्या डोळ्यांच्या ऐन्यात

 

मन सावळ्या मेघात

मन आकाशी ताऱ्यात

मन निवांत हे संथ

तुझ्या मनाच्या डोहात

 

मन पावसाची धारा

मन खट्याळसा वारा

मन गुंफले गं माझे

त्या ओलेत्या रुपात

 

मन  आठवांचे तळे

मन गंधाळले मळे

माझे हळवे गं गीत

तुझ्या केशर ओठात

 

मन भिजते दंवात

मन प्राजक्त गंधात

मन पाणीदार मोती

तुझ्या मनी कोंदणात

 

मन माझे गं ओढाळ

मन चांदणं मोहोळ

मन घुटमळे सखे

तुझ्या चाहूल वाटेत

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 153 – तुझी गर्द छाया ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 153 – तुझी गर्द छाया ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

मला आठवे ती तुझी आर्त माया।

पिलांच्या शिरीवर तुझी गर्द छाया।

 

किती राबला तू जिवाचा उन्हाळा ।

तुझ्या रोमरंध्री झरे तो जिव्हाळा ।

 

मनी स्वप्न वेडे पिलींची भरारी।

गरे गोड सारे फणस ते करारी।

 

समजतो पिलांना उशीराच बाबा।

नसे आसवांना तो जाताच ताबा।

 

अशी कौतुकाची पुन्हा थाप यावी।

तुझी गोड वाणी कानी घुमावी।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणसाला शेपूट येईल का ? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ माणसाला शेपूट येईल का ? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

माणसाने माणसाशी

संवाद तोडला आहे

म्हणून तो घराघरात

एकटा पडला आहे

 

येत्या काळात ही समस्या

अक्राळविक्राळ होईल

तेव्हा आपल्या हातातून

वेळ निघून जाईल

 

कदाचित माणूस विसरेल

संवाद साधण्याची कला

याच्यामुळे येऊ शकते

मुकं होण्याची बला

 

पूर्वी माणसं एकमेकांशी

भरभरून बोलायची

पत्रसुद्धा लांबलचक

दोन चार पानं लिहायची

 

त्यामुळे माणसाचं मन

मोकळं  व्हायचं

हसणं काय, रडणं काय

खळखळून यायचं

 

म्हणून तेव्हा हार्ट मध्ये

ब्लॉकेज फारसे नव्हते

राग असो लोभ असो

मोकळेचोकळे होते

 

पाहुणे रावळे गाठीभेटी

सतत चालू असायचं

त्याच्यामुळे प्रत्येक माणूस

टवटवीत दिसायचं

 

आता मात्र माणसाच्या

भेटीच झाल्या कमी

चुकून भेट झालीच तर

आधी बोलायचं कुणी ?

 

ओळख असते नातं असतं

पण बोलत नाहीत

काय झालंय कुणास ठाऊक

त्यांचं त्यांनाच माहीत

 

घुम्यावाणी बसून राहतो

करून पुंगट तोंड

दिसतो असा जसा काही

निवडुंगाचं  बोंड

 

Whatsapp वर प्रत्येकाचेच

भरपूर ग्रुप असतात

बहुतांश सदस्य तर

नुसते येड्यावणी बघतात

 

त्यांनी मेसेज वाचल्याच्या

दिसतात निळ्या खुणा

पण रिप्लाय साठी सुटत नाही

शब्दांचा पान्हा

 

नवीन नवीन Whatsapp वर

चांगलं बोलत होते

दोनचार शब्द तरी

Type करत होते

 

आता मात्र बऱ्याच गोष्टी

इमोजीवरच भागवतात

कधी कधी तर्कटी करून

इमोजीनेच रागवतात

 

म्हणून इतर प्राण्यांसारखी

माणसं मुकी होतील का ?

भावना दाबून धरल्या म्हणून

माणसाला शिंगं येतील का ?

 

काय सांगावं नियती म्हणेल,

लावा याला शेपटी

वाचा देऊन बोलत नाही

फारच दिसतो कपटी

 

हसण्यावर नेऊ नका

खरंच शेपूट येईल

पाठीत बुक्का मारून मग

कुणीही पिळून जाईल

 

म्हणून म्हणतो बोलत चला

काय सोबत येणार

नसता तुमची वाचा जाऊन

फुकट शेपूट येणार

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #175 ☆ माय…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 175 – विजय साहित्य ?

☆ माय…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

लाख संकटे भोवती

तरी माय झुंजतसे

लेकराच्या सुखासाठी

जखमांनी गुंजतसे. ..!

 

अशी धाडसी करारी

माय लेकरा घडवी

नियतीच्या आघातात

भल्या भल्यांना रडवी …!

 

दिस आजचा भागला

चिंता उद्याची लागली

लेकराला घेऊनीया

माय रानात धावली. ..!

 

हाल अपेष्टा सोसून

माय पुढे चाललेली.

तिच्या घरची लक्ष्मी

कडेवरी निजलेली. ..!

 

संकटाशी झुंजायाचं

बाळकडू देते माय

ऊन वारा पावसात

माय सोबतीला र्‍हाय. ..!

 

दारीद्र्याच भोग असे

कधी पांग फिटणार

लेकराच्या सुखासाठी

माय स्वप्ने झेलणार…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साठी… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ साठी… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(चाल… रूणझुण त्या पाखरा)

  आली आली आता साठी,

  नको कपाळाला आठी,

  खोलू कवाडे मनाची,

  जरा बदलूया दृष्टी.

  आली आली आता साठी..||१||

 

  लोकं काय म्हणतील?

  नकोच हा बागुलबुवा,

  फालतू बंधनांना आता,

   देऊन टाकूया ना रजा. 

   आली आली आता साठी.. ||२||

 

   अनुभव जालीम दवा,

   शहाणपणा शिकविला,

   आपल्यांना ओळखताना,

   आता होणार ना चुका.

  आली आली आता साठी..||३||

 

   काय हवे आहे मला,

   शोध मीच घ्यावयाचा,

   आनंदाने जगण्याचा,

   मनी जपायचा वसा.

   आली आली आता साठी..||४||

 

   आयुष्याच्या प्रवासाचा,

   हा तर स्वल्पविराम,

   उमेदीने आता नव्या,

   लिहू पुढचा अध्याय.

   आली आली आता साठी..||५||

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ११ ते १५ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ११ ते १५ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : ऋचा ११ – १५ : देवता वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चोविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले  असल्याने हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा प्रजापतीला, दुसरी ऋचा अग्नीला, तीन ते पाच या ऋचा सवितृ देवतेला आणि सहा ते पंधरा या ऋचा वरुण देवतेला  आवाहन करतात. 

आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या अकरा ते पंधरा  या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद ::

तत्त्वा॑ यामि॒ ब्रह्म॑णा॒ वन्द॑मान॒स्तदा शा॑स्ते॒ यज॑मानो ह॒विर्भिः॑ ।

अहे॑ळमानो वरुणे॒ह बो॒ध्युरु॑शंस॒ मा न॒ आयु॒ः प्र मो॑षीः ॥ ११ ॥

नमन करोनीया स्तवनांनी तुमच्या समीप येतो

अर्पण करुनी हविर्भाग हा भक्त याचना करतो

क्रोध नसावा मनी आमुच्या जवळी रहा जागृती 

दीर्घायू द्या तुमची कीर्ती दिगंत आहे जगती ||११||

तदिन्नक्तं॒ तद्दिवा॒ मह्य॑माहु॒स्तद॒यं केतो॑ हृ॒द आ वि च॑ष्टे ।

शुनः॒शेपो॒ यमह्व॑द्गृभी॒तः सो अ॒स्मान्राजा॒ वरु॑णो मुमोक्तु ॥ १२ ॥

अहोरात्र उपदेश आम्हा सारे पंडित करिती

मना अंतरी माझ्या हाची कौल मला देती

बंधबद्ध शुनःशेप होता तुम्हा आळविले

तुम्हीच आता संसाराच्या बंधनास तोडावे ||१२||

शुन॒ःशेपो॒ ह्यह्व॑द्गृभी॒तस्त्रि॒ष्वादि॒त्यं द्रु॑प॒देषु॑ ब॒द्धः ।

अवै॑नं॒ राजा॒ वरु॑णः ससृज्याद्वि॒द्वाँ अद॑ब्धो॒ वि मु॑मोक्तु॒ पाशा॑न् ॥ १३ ॥

शुनःशेपाचे त्रीस्तंभालागी होते बंधन 

धावा केला आदित्याचा तोडा हो बंधन 

ज्ञानवान या वरूण राजा कोण अपाय करीत 

तोच करी या शुनःशेपाला बंधातुन मुक्त ||१३||

अव॑ ते॒ हेळो॑ वरुण॒ नमो॑भि॒रव॑ य॒ज्ञेभि॑रीमहे ह॒विर्भिः॑ ।

क्षय॑न्न॒स्मभ्य॑मसुर प्रचेता॒ राज॒न्नेनां॑सि शिश्रथः कृ॒तानि॑ ॥ १४ ॥

शांतावावया तुम्हा वरुणा अर्पण याग हवी

तुम्हा चरणी हीच प्रार्थना आम्हा प्रसन्न होई

रिपुसंहारक ज्ञानःपुंज वास्तव्यासी येई

करोनिया क्षय पातक आम्हा पुण्य अलोट देई ||१४||

उदु॑त्त॒मं व॑रुण॒ पाश॑म॒स्मदवा॑ध॒मं वि म॑ध्य॒मं श्र॑थाय ।

अथा॑ व॒यमा॑दित्य व्र॒ते तवाना॑गसो॒ अदि॑तये स्याम ॥ १५ ॥

ऊर्ध्वशीर्ष मध्यकाया देहाच्या खाली 

तिन्ही पाश आम्हा जखडती संसारी ठायी

शिथिल करा हो त्रीपाशांना होऊ पापमुक्त

आश्रय घेण्याला अदितीचा आम्ही होऊ पात्र ||१५||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/hDxy0-AHmcg

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 11-15

Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 11-15

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोन फुले… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ दोन फुले☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

सावली मिळेल आशेने

ऊन्हात तू चालत राहावे

सावली धुंडाळताना

तुजमधूनि झाड निपजावे !

        मोद अखंड वेचून घ्यावे

        ग्रीष्म ऊन्हे ती झेलताना

        आनंदे उर भरुन यावे

        सावलीत कुणी येताना !  

पावसाशी कृतज्ञता

मृदेची जाणिव असावी

एकमेव नसतोच कधी

अहंकारी वृत्ती नसावी !

          निसर्गातून बहरण्याची

          संधी असे साऱ्यांकडे

          बहर ज्यास ठावे त्याने

          दोन फुले इतरांस द्यावे !

सावली शोधत आशेने

ऊन्हात मी चालत राहते

सावली धुंडाळताना

झाड मी होऊन जाते !

मोद = आनंद

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #161 ☆ संत तुलसीदास… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 161 ☆ संत तुलसीदास☆ श्री सुजित कदम ☆

श्रेयस्कर जीवनाचा

महामार्ग दाखविला

राम चरित मानस

भक्ती ग्रंथ निर्मियला…! १

 

जन्म उत्तर प्रदेशी

 चित्रकूटी राजापूरी

श्रावणात सप्तमीला

जन्मोत्सव  घरोघरी…! २

 

मान्यवर ज्योतिषाचे

घराण्यात जन्मा आले.

राम राम जन्मोच्चार

रामबोला नाम झाले…! ३

 

जन्मताच गेली माता

केला आजीने सांभाळ

लहानग्या गोस्वामीची

झाली जन्मतः आबाळ…! ४

 

हनुमान मंदीराच्या

प्रसादात गुजराण

गेली आजी देवाघरी

मातापिता भगवान….! ५

 

नरहरी दास स्वामी

छोट्या तुलसीचे गुरु

वेद पुराणे दर्शने

झाले ज्ञानार्जन सुरू…! ६

 

लघुकथा आणि दोहे

गुरूज्ञान प्रसारित

उपदेश प्रवचन

रामभक्ती प्रवाहीत…! ७

 

भाषा विषयांचे ज्ञान

करी तुलसी अभ्यास

उपनिषदांचे पाठ

नाम संकीर्तन ध्यास…! ८

 

माया मोह जिंकुनीया

ठेवी इंद्रिये ताब्यात

दिली गोस्वामी उपाधी

वेदशास्त्री महात्म्यास…! ९

 

वाल्मिकींचे रामायण

केले अवधी भाषेत

ब्रज भाषा साहित्यात

लोक संस्कृती धारेत…! १०

 

अलौकिक आख्यायिका

प्रभु रामचंद्र भेट

ओघवत्या शैलीतून

ग्रंथ जानकी मंगल…! ११

 

काव्य सौंदर्याची फुले

बीज तुलसी दासाचे

सर्व तीर्थक्षेत्री यात्रा

भक्तीधाम चैतन्याचे…! १२

 

सतसई ग्रंथामध्ये

दोहे सातशे लिहिले

रामकृष्ण भक्तीयोग

संकिर्तनी गुंफियले….! १३

 

हनुमान चालीसा नी

दोहावली गीतांवली

ग्रंथ पार्वती मंगल

काव्य कृष्ण गीतावली…! १४

 

हनुमान रामचंद्र

झाले प्रत्यक्ष दर्शन

संत तुलसी दासांचे

प्रासादिक संकीर्तन….! १५

 

गाढे पंडित वैदिक

वेदांतात पारंगत

आदर्शाचा वस्तू पाठ

दिला नैतिक सिद्धांत…! १६

 

हाल अपेष्टां सोसून

दिले भक्ती सारामृत

संत तुलसी दासांचे

शब्द झाले बोधामृत…! १७

 

थोर विद्वान विभुती

दीर्घायुषी संतकवी

वर्ष सव्वाशे जगली

प्रज्ञावंत ज्योत नवी…! १८

 

जीवनाच्या अखेरीला

काशी श्रेत्रात निवास

राम कृष्ण अद्वैताचा

संत तुलसी प्रवास…! १९

 

गंगा नदीच्या किनारी

शेवटचा रामश्वास

अस्सी घाटावर देह

केला आदर्श प्रवास…! २०

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares