मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || आरती महाराष्ट्राची || ☆ सौ.विद्या वसंत पराडकर ☆

सौ.विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ || आरती महाराष्ट्राची || ☆ सौ.विद्या वसंत पराडकर ☆ 

जय देव जय देव,जय महाराष्ट्रा जय महाराष्ट्रा

वीरांच्या देशा,कणखर देशा,जय महाराष्ट्रा

जय देव जय देव.      ☘️

 

शिवबाच्या पराक्रमाने पारतंत्र्याची

संपवली निशा

मावळ्यांच्या साह्याने उदयास आणली स्वातंत्र्याची उषा

जय देव जय देव   ☘️

 

सह्याद्रीचा राजमुकूट हा कसा शिरावर विराजे

पद प्रक्षालन करण्या अरबीच्या

उत्तुंग लाटा साजे

जय देव जय देव.    ☘️

 

सह्यगिरीच्या वक्षातुन सरिता झुळझुळती,गुणगुणती

सह्याद्रिच्या दर्या खोर्यांना साद त्या देती

जय देव जय देव.    ☘️

 

हिमालयावरी संकट येता, सह्याद्री

छातीचा कोट करी

अनुज लक्ष्मण बनुनी साह्य करी

जय देव जय देव. ‌‌.    ☘️

 

मुंबापुरी हे भूषण तुझे राजधानी ही

वसे

सुंदर,मोहक या तरुणीला

कित्येक मागण्या असे

जय देव जय देव. ‌‌ ‌ ‌☘️

 

शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना काय येथल्या लेण्या असे

मूर्तिकाराची मूर्ती  भासे,

ती सजीवतेची प्रतिमा दिसे

जय देव जय देव.       ☘️

 

देहू, आळंदी, पैठण, पंढरपूर

जयाचे दिव्य‌अंलकार

अभंग,ओवी, श्र्लोक यांचा

कंठी घातला हार

जय देव ‌जय देव.   ‌.  ‌. ☘️

 

आधुनिक ज्ञान, विज्ञानाने

उन्नत ‌आहे हा देश

अध्यात्मिक ज्ञानाचे‌ माहेरघरच

हा माझा देश

जय देव जय देव.     ☘️

 

कित्येक देश असती,

सुंदर, संपन्न की महान

प्रिय हा देश आमुचा,

महाराष्ट्र महान 

जय देव जय देव जय महाराष्ट्रा ‌.  ‌‌☘️ 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ !! मायबोली !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ !! मायबोली !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

माय मराठीची | ओढ  अंतरीची |

शान शारदेची  | भाषा माझी ||

मायबोली गावी | जीवा वेड लावी |

अंगाईची ओवी | जननीची ||

मनाची गुपिते | जात्यावरी गाते |

आपसूक येते | ओठी माझ्या ||

पुराणे कथांची | ओवी ज्ञानेशाची |

ठेव अमृताची | अलौकिक ||

मनाच्या श्लोकात | गीतेच्या ज्ञानात |

संत साहित्यात | बोध आहे ||

कथा कवितांचा | ठेवा साहित्याचा |

लौकिक मानाचा | विश्वामाजी ||

सार्थ रसवंती | भाषा ओघवती |

देवी सरस्वती | स्वये बोले ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 180 ☆ पुण्याई… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 180 ?

💥 पुण्याई… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती पैलू असतात ना,

बाईच्या जगण्याला,

कसे असतो आपण,

मुलगी म्हणून ?

बहिण म्हणून ?

बायको म्हणून?

आई म्हणून ?

 

एका लेखिकेने लिहिल्या होत्या,

आदर्श मातांच्या,

विलक्षण कथा!

मी दिली होती भरभरून दाद,

त्या लेखनाला!

तिने मला मागितला ,

माझ्या आईपणाचा आलेख,

“मला लिहायचंय तुमच्यावर,

“आदर्श माता” म्हणून!”

 

माझा सविनय नकार,

“किती महान आहेत

त्या सा-याजणीच तुम्ही

ज्यांच्यावर लिहिलंय!”

 

मी असं काहीच नाही केलेलं,

माझ्या मुलासाठी!

अंतर्मुख होऊन,

घेतली होती स्वतःची,

उलटतपासणी !

 

आता परत आलंय आवतंन,

आदर्श माता पुरस्कार

 स्वीकारण्याचे !

हसले स्वतःशीच,

आठवल्या माझ्याचं

कवितेच्या ओळी,

“भोग देणं आणि घेणं

सोपं असेलही

किती कठीण असतं

आई होणं !”

 दूरदेशीच्या मुलाशी बोलले,

मिश्किलपणे,

या पुरस्काराबद्दल–

हसत हसत..आणि…

त्याचं बोलणं ऐकून वाटलं,

आई होणं  हेच

 एक पुण्य,

नव्हे जन्मजन्मांतरीची

पुण्याई —

निसर्गाने बहाल केलेला,

केवढा मोठा पुरस्कार!!

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठगीता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठगीता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

ज्ञानियाची एक ओवी

अमृताची भक्तिगंगा

धन्य सारी संततीर्थे

प्राप्त मोक्षत्व अभंगा !

 

अटकेपारही झेंडे

शिवबाच्या मावळ्यांचे

समशेरींना वंदन

शाहिरांच्या पोवाड्यांचे !

 

वीररसाच्या संगती

शोभे शृंगार साजिरा

लावणीच्या वसंतात

येई लावण्य मोहरा !

 

साध्यासोप्या रूपकांचा

होई संदेश भारूड

गौळणीचे रूपरंग

भक्तिपीठाचे गारूड !

 

लोकगीतांच्या धारांचे

स्थानमहात्म्य आगळे

ओल्या मातीचा सुगंध

शब्द , सूरात दरवळे !

 

माय रात्रीचा गंधर्व

झोपे पाळण्यात बाळ

झरा अंगाईचा वाहे

स्वप्नीसुद्धा झुळझूळ !

 

कोण्या केशवाचा सुत

गेला फुंकून तुतारी

कोण्या कुसुमाग्रजाची

भव्य दिगंत भरारी !

 

पुनर्जन्म वाल्मिकीचा

जन्मे गीतरामायण

रामकथेचे उत्कट

घरोघरी पारायण !

 

ऋतुरंग ओलेचिंब

कुण्या जिप्सीच्या कवनी

कंठी आनंदयात्रीच्या

भावभावनांची गाणी !

 

निरक्षरा अक्षराची

लाभे संजीव मोहिनी

मृदगंधा नभापार

नेई बहिणाई कोणी !

 

प्रभंजन मर्ढेकरी

प्रतिमांची ढगफुटी

अभिव्यक्तीस मोकाट

आशयाच्या दिशा दाही !

 

दीन वंचितांचे लाव्हे

आली होऊन तुफाने

हादरले सारस्वत

‘गोलपीठा’च्या स्फोटाने !

 

संध्यागीतातील ग्रेस

पैलपारीचे चिंतन

एक धुके सांजवेळी

जणू गडद , गहन !

 

फुलराणीच्या गंधात

सप्तरंगी श्रावणात

रिमझिमे बालकवी

रसिकांच्या अंगणात !

 

एका भटाची गझल

रक्तचंदनाची धार

रसिकांच्या काळजात

एक सुरी आरपार !

 

संत पंत आणि तंत

त्रिवेणी ये संगमास

सदा सिद्ध सारस्वत

नवनव्या प्रवाहास !

 

प्रतिभावंत शब्दांचे

गंधर्वांच्या कंठी सोने

गीत संगीतात येता

धन्य श्रुती , धन्य जीणे !

 

प्रतिभेच्या पाखरांना

मायबोलीचे हाकारे

एक एक तारा तुम्ही

एक एक नभ व्हा रे !

 

माझ्या मायमराठीची

किती वर्णू मी थोरवी

नित्य नवे वारकरी

नित्य नूतन पंढरी !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #186 ☆ तुझी गजल… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 186 ?

☆ तुझी गजल…

तुझी गजल तिशीतली मला दिसे विशीतली

उन्हात कोवळ्या पहा चमत्कृती त्वचेतली

चहा बशीत ओतताच थंड होत जाय तो

अधर बशीस टेकता तृषा मिळे बशीतली

जलाशयात नाहत्या सरोजिनीस पाहतो

भिजून चिंब पाकळी शहारते दवातली

कडाडते नभातुनी प्रचंड वेगवान ती

भिती भुईस वाटते तिलोत्तमा नभातली

फडात खेळ चालतो तसाच चालतो घरी

बतावणीच ऐकतो घरी तिच्या मुखातली

हळूच हात दाबला तरी रुतेल बांगडी

अजूनही नवीन होय काकणे चुड्यातली

तुझा वसंत रोजचा नव्या रुपात पाहुनी

फुले प्रसन्न हासती उन्हातही वनातली

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ || अनंत स्तोत्र || ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

|| अनंत स्तोत्र || ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मार्ग दावी रे अनंता | आज येथे ऐसे अडता ||

अंधःकारी बुडून जाता | दिशा काही दिसेना ||१||

कोण आम्ही कोठुनि आलो | आज येथे ऐसे अडलो ||

काय फळाची आशा राहो | बूज ती राहीना ||२||

धरणीखाली बीज सापडे | जळे वेढुनि त्यास टाकिले ||

जगतासाठी जीवन दिधले | तुझियाचि कृपे ||३||

बघता बघता अंकुर आला | डोकावूनिया पाहू लागला ||

मार्ग आपुला शोधु लागला | सूर्यप्रकाशी ||४||

दिधले जीवन आदिपासुनी | ठेवुनि त्याची जाण ही मनी ||

घट्ट धरुनिया धरणी ठेवी | मुळीया रूपे ||५||

परोपकारी धरणीचा हा | वसा घेतला वृक्षलतांनी ||

फळे अर्पुनी जगतासाठी | कृतार्थही जाहले ||६||

दिशा दाविशी रे अनंता | तृणांकुरांना पशुपक्षांना ||

पोरकाच मग मानवचि का | चाचपडे अंधारी||७||

कळत असूनि असा राहिलो | वळता नचही ताठ राहिलो ||

स्वार्था धरुनी अंध जाहलो | असा या जगी ||८||

परमार्थाची आस लागली | मोहाची पण भूलचि पडली ||

मजविण दृष्टी आड जाहली | काही कळेना ||९||

धाव धाव रे भगवंता | कृपाळू होऊन अनंता |

सोडव यातुनिया निशिकांता | तेजा तव दावून ||१०||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ॥ लकी आजोबा॥ ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ॥लकी आजोबा॥ ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

शाळा नाही,

दप्तर नाही

अभ्यास नाही,

परीक्षा नाही

पाढे नाही,

गृहपाठ नाही

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥१॥

ऑफीस नाही,

लँपटॉप नाही

रोजचा त्रासदायक 

प्रवास नाही

आई आजी सारखा 

स्वयंपाक नाही

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥२॥

सारखा फोन 

नाही तर पेपर

फार तर बँकेत 

एखादी चक्कर

कुठेही जा म्हटलं

की काढतात स्कूटर

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥३॥

मित्र जमवतात,

सहली काढतात

देश परदेश 

फिरुन पाहतात

येतांना आम्हांला 

गंमत आणतात

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥४॥

नमस्कार केला की 

काहीतरी पुटपुटतात

आपल्याला नेहमीच 

शाबासकी देतात

चष्मा स्वत: हरवतात 

अन् दुसऱ्यांना 

शोधायला लावतात

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥५॥

सर्व आजोबांना समर्पित….

संग्राहिका : जुईली अमोल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणूस ती… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

माणूस ती..! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

ना गंगा भागिरथी। ना सौभाग्यवती 

स्वतंत्र, सक्षम व्यक्ती । माणूस ती ।

 

लक्ष्मी ना सरस्वती । ना अन्नपूर्णा, 

सावित्रीची लेक । माणूस ती ।

 

गृहिणी, नोकरीधारी । कुटुंब असेल

वा असेल एकटी । माणूस ती ।

 

शिक्षित,अशिक्षित । गरीब, श्रीमंत 

सशक्त वा दुर्बल । माणूस ती ।

 

दुर्गा,अंबिका । कालिका, चंडिका

देव्हारा नको । माणूस ती ।

 

प्रजननक्षम तरी । नाकारेल आईपण

निष्फळ वा ट्रान्सजेन्डर। माणूस ती !

 

काळी वा गोरी । कुरूप वा सुंदरी

विदुषी वा कर्तृत्ववान । माणूस ती !

 

पूजा नको । दुय्यमत्व नको

समतेची भुकेली । माणूस ती !

 

ना अधिकार कुणा ।  छळण्याचा

गर्भात संपवण्याचा । माणूस ती ।

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 129 ☆ अष्ट-अक्षरी…ऊन पावसाचा खेळ… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 129 ? 

☆अष्ट-अक्षरी…ऊन पावसाचा खेळ

ऊन पावसाचा खेळ

जाणा जीवनाचा सार

नका करू वळवळ

वेळ बाकी, थोडा फार.!!

 

ऊन पावसाचा खेळ

सुख दुःख रेलचेल

कधी हसावे रडावे

मन असते चंचल.!!

 

ऊन पावसाचा खेळ

उष्ण थंड अनुभव

सर्व असूनी परंतु

राहे सदैव अभाव.!!

 

ऊन पावसाचा खेळ

सुरु आहे लपंडाव

अश्रू येतात डोळ्याला

काय निमित्त शोधावं.!!

 

ऊन पावसाचा खेळ

भासे दुर्धर कठीण

राज अबोल अबोल

तोही स्वीकारी आव्हान.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-5… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-5…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

अविद्ये भासे त्रिधा

संवित्ति परि नासे भेदा

जाणिजे त्रिपुटीचा अभेद

ज्ञानावाचून भासेल भेद

त्रिपुटी जरी का अभेद

कां वागवे तो हा भेद?

वागवे तो,अज्ञानींसाठी

ज्ञाने मावळे दावीआधी ती॥२१॥

 

अविद्ये दृश्याचा अविर्भाव

त्यायोगे द्रष्टत्व होई संभव

दृश्य द्रष्ट्यात अंतर नसता

दृष्टी पांगळी होई पाहता॥२२॥

 

दृश्य असे तेथे द्रष्टत्व

दृश्य नसता कैसे द्रष्टत्व

दृश्य नसता दृष्टीज्ञान

कोणा करी प्रकाशमान॥२३॥

 

दृश्यापाठी दृष्टत्व येई

दोहींच्या योगे दर्शन होई

विचारे दृश्यत्व नाश पावता

द्रष्टा दृष्टी भावाची नष्टता॥२४॥

 

एवं अविद्ये कारणे त्रिपुटी

ज्ञानमार्गे ती मावळे उठाउठी॥२५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares