मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #153 ☆ संत विसोबा खेचर… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 153 ☆ संत विसोबा खेचर… ☆ श्री सुजित कदम

संत विसोबा खेचर

करीतसे सावकारी

कापडाचे व्यापारी ते

वीरशैव निरंकारी…! १

 

वारकरी संप्रदाय

संत सज्जनांचा सेतू

विठू भेटवावा गळा

साधा सोपा शुद्ध हेतू…! २

 

ज्ञाना निवृत्ती सोपान

मुक्ताईचा द्रेष करी

मांडे भाजताना पाही

ज्ञानदेवा गुरू करी…! ३

 

सन्मानीले मुक्ताईस

विसरोनी अहंकार.

भक्ती योग चैतन्याचा

लिंगायत अंगीकार…! ४

 

योगविद्या अवगत 

नामदेवा उपदेश

अवकाशी फिरे मन

नाव खेचर विशेष..! ५

 

उचलोनी ठेव पाय

जिथे नाही पिड तिथे

गुरू विसोबा तात्विक

नामदेवा लावी पिसे…! ६

 

देव कृपा सहवास

तिथे भक्ता हवे काय

शंकराच्या पिंडीवर

गुरू विसोबांचे पाय..! ७

 

निराकार नी निर्गुण

पांडुरंग भेटविला

परब्रम्ह साक्षात्कार

विसोबांनी घडविला…! ८

 

लिंगायत साहित्यात

तत्व चिंतन पेरून

केले जन प्रबोधन

परखड वाणीतून …! ९

 

शिव मंदिरी बार्शीत

संत विसोबा समाधी

योग आणि परमार्थ

दूर करी चिंता व्याधी…! १०

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ छंदोबद्ध पुरण – कवी अभिनव फडके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ छंदोबद्ध पुरण – कवी अभिनव फडके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(एखाद्याचा “पुरण” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना) — 

श्री. अभिनव फडके यांच्या लेखणीतून…

इंद्रवज्रा:

चाहूल येता मनि श्रावणाची

होळी तथा आणखि वा सणाची

पोळीस लाटा पुरणा भरोनी

वाढा समस्ता अति आग्रहानी ||

 

भुजंगप्रयात:

सवे घेउनी डाळ गूळा समाने

शिजो घालिती दोनही त्या क्रमाने

धरी जातिकोशा वरी घासुनीते

सुगंधा करावे झणी आसमंते ||  

(जातिकोश – जायफळ)

 

वसंततिलका:

घोटा असे पुरण ते अति आदराने

घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने

पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते

पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||

 

मालिनी:

अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते

हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते

कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती

कडक नच करावी राहुद्या तैलवंती ।।

 

मंदाक्रांता:

घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी

ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती

बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा

पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||

 

पृथ्वी:

करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे

पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे

समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे

असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||

 

शार्दूल विक्रिडित:

हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या

उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या

वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे

नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे ||

 

कवी – श्री अभिनव फडके

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – बसंत बहार – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– बसंत बहार – ? ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

वाटेवरती उभी दुतर्फा

झाडे सलामीला सुंदरशी

रंगबिरंगी फुलोऱ्यातूनी

बहरून आली मनभावनशी ||

वाटेवरची आसने ती

वाट पाहती पांथस्तांची

घडीभरीचा देत विसावा

सेवा करती मानवतेची ||

असे वाटते झाडे जणू

भिडुनी खेळती झिम्मा

त्यांच्या खालून आपणही

खेळत जावे हमामा ||

वाटेवरची कमान जणू

साज ल्याली इंद्रधनुचा

पायतळीची  पखरण ती

असे गालिचा भूमातेचा ||

वाट अशी ही सोबतीला

नेते स्वप्नांच्या गावाला

प्रसन्नचित्ते मी ही तिथे

साद घालितसे सख्याला ||

चित्र साभार – सौ.ज्योत्स्ना तानवडे

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुढी उभारु या ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

🌷 गुढी उभारु या 🌷 सौ. विद्या वसंत पराडकर ☆

नव‌ वर्षाच्या प्रारंभी गुढी उभारु या

चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी उभारु  या

श्रीराम चंद्राचा देश आमचा

विजयश्रीचे प्रतीक म्हणूनी गुढी उभारु या 🍀

 

गुढी उभारु आनंदाची

गुढी उभारु सौजन्याची

गुढी उभारु नव संकल्पाची

नव राष्ट्राच्या उत्कर्षाची  🍀

 

सृजनतेला वाव देवुनी

ध्येयाचे कंकण बांधुनी

प्रेमभाव मनी धरुनी

समानतेची गुढी उभारु या🍀

 

स्वराज्याचे रक्षण करण्या

देशहिताचे कार्य साधूनी

भ्रष्टाचाराचा त्याग करुनी

 सदाचार करता गुढी उभारु या🍀

 

विज्ञान व अध्यात्म संगम करुनी

माणूसकीची कास धरुनी

निरपेक्ष धर्म‌ पाळूनी

एकात्मतेची गुढी उभारु या 🍀

 

प्रत्यक्ष कृतीचा अवलंब करुनी

मानव्याची निर्मिती करुनी

अंहकाराचे उच्चाटन करुनी

विशाल दृष्टीची गुढी उभारु या 🍀

© सौ विद्या वसंत पराडकर

वारजे पुणे.

ई मेल- [email protected]

मो.नंबर – 91-9225337330 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 174 ☆ माझ्या वर्गातल्या मुली… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 174 ?

💥 माझ्या वर्गातल्या मुली… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

किती वर्षांनी भेटल्या

माझ्या वर्गातल्या मुली

आणि मनाची कवाडे

केली सर्वांनीच खुली !

वाट शाळेची सुंदर

आणि हातामधे हात

सरस्वतीची प्रार्थना

होई एकाच सुरात

गणवेश नील – श्वेत

खूप आवडे मनास

कुणी हुषार, अभ्यासू

कुणा वेगळाच ध्यास

एक मुलगी निर्मल

नेहमीच नंबरात

छान करियर झाले

टेलिफोन ऑफिसात

संजू,मंगलची मैत्री

होती खासच वर्गात

अशा मैत्र गाठी सखे

देव बांधती स्वर्गात

लता, हर्षा, सरसही

होत्या माझ्याच वर्गात

अल्प स्वल्प साथ त्यांची

खूप राहिली लक्षात

पुष्पा रेखितसे हाती

मेंदी सुबक, सुंदर

जयू अलिप्त,अबोल

साथ परी निरंतर

मधुबाला, उज्वलाही

सख्या सोबतीणी छान

उद्योजिका म्हणूनही

मोठा मिळविला मान

शशी – शारदा असती

दोन मैत्रीणी जीवाच्या

गुणवंत, कलावंत…

वलयांकित नावाच्या

मुग्ध माधुरी, फैमिदा

होत्या दोघीही हुशार

आठवणीच्या कुपीत

त्यांचे निखळ विचार

अशा वर्गातील मुली

अवखळ, आनंदीत

जिने तिने जपलेले

जिचे तिचे हो संचित

अशा आम्ही सर्वजणी

एका बागेतल्या कळ्या

जेव्हा भेटलो नव्याने

सुखे नाचलो सगळ्या

© प्रभा सोनवणे

१६ मार्च २०२३

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत वनी आला ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंत वनी आला ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

कुहू कुहूची तान ऐकता

निसर्गाचा सांगावा आला

पुन्हा नव्याने सृष्टी फुलविण्या

ऋतुराज वसंत आला ||

 

पानगळीने सरले जीवन

नवे कोंब फुलून आले

इवली नाजूक पाने पोपटी

झाड मोहरून डोलू लागले ||

 

रंगबिरंगी फुले डोलती

तरुवर अंगोपांगी फुलती

मकरंदला टिपण्यासाठी

फुलपाखरे भिरभिरती ||

 

पळस पांगारा बहव्याच्या

सवे फुलला गुलमोहर

निसर्गाच्या रंगपंचमीला

अवचित आला किती बहर ||

 

आमराई ती घमघमते

नवयौवना जणू अवनी

वसंताच्या आगमनाने

चैतन्य पसरते जीवनी ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #180 ☆ जन्मदर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 180 ?

☆ जन्मदर… ☆

रावणांचा जन्मदर हा वाढलेला

भ्रूण स्त्रीचा उकिरड्यावर फेकलेला

 

लग्नसंस्थेचाच मुद्दा ऐरणीवर

अन् तरीही माणसा तू झोपलेला

 

साधु संताचे अता संस्कार नाही

वासनेचा डोंब आहे पेटलेला

 

पायवाटा नष्ट केल्या डांबराने

कृत्य काळे आणि रस्ता तापलेला

 

कोणताही पक्ष येथे राज्य करुदे

अन्नदाता दिसत आहे त्रासलेला

 

पाय मातीवर म्हणे आहेत त्याचे

गालिच्यावर तो फुलांच्या चाललेला

 

छान संस्कारात सारे वाढलेले

का तरीही एक आंबा नासलेला ?

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मराठी …”… कवी – माणिक कौलगुड ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “मराठी …”… कवी – माणिक कौलगुड ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

नवरसयुक्त सालंकृत मराठी माझी 

वैभवशाली शालीन मराठी माझी 

वसे हृदयसिंहासनी मराठी माझी 

माय मराठी माझी सखी साजणी ।।

 

ज्ञानियांनी कौतुके जी मिरविली 

शब्दकळा झळके गीतेची वैखरी 

सुरवंद्य गीर्वाण वाणी तव जननी 

माय मराठी माझी सखी साजणी ।।

 

कधी बोलते आर्त बोली तुकयाची 

कधी रोखठोक रामदासी स्वभावे 

भावव्याकूळ नामदेवाची गाऱ्हाणी  

माय मराठी माझी सखी साजणी ।।

 

लेखणीच होई खड्ग विनायकाचे 

धार केसरीची विलायतेस भिववी 

हळवी मृदुल काळजाची दिवाणी 

माय मराठी माझी सखी साजणी ।।

 

विश्व एक होता भेटती मातृभगिनी 

ज्ञानगुरू असो कोणी पूजनीय ती 

आपपर भाव नसे साऱ्या गुणखनी 

माय मराठी माझी सखी साजणी ।। 

 

कवी : माणिक कौलगुड.  

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आडनावांची जेवणाची सभा… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आडनावांची जेवणाची सभा… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

आडनावेंनी जोरदार बेत केला जेवणाचा

सहस्त्रभोजनेंनी विडा उचलला निमंत्रणाचा

 

सोबत पुजारी पंडित आणि शास्त्री आले

देवधर येताच देवापुढे दिवे लावले

 

नंतर श्रीमंत कनकदांडे आले

सराफांनी कुबेरांना सोबत आणले

 

गंधे पोहचले अगदी वेळेवर

टिळक दिसले सर्वांच्या कपाळावर

 

दूध घेऊन दुधाने पळत आले

सोबत श्रीखंडे व केळापूर आले

 

भाजीसाठी भोपळे पालकर जमले

साल्पेकरानी सगळ्यांना सोलून काढले

 

पोळी भाजी बरोबर आमटे व तुपे

काहींना पसंद होते दहिभाते

 

रसासाठी होते छान केशरी गोडांबे

मठ्ठा व पाण्यासाठी भरले होते तांबे

 

पंगत बसण्याअगोदर फडके उत्सुक दिसले

कचरे व धुळेंना शांतपणे बाहेर काढले

 

जेवणानंतर गोड करण्यात गोडबोले झाले व्यस्त

केळकर बोरकर आंबेकरांचे मिश्रण सर्वांनी खाल्ले मस्त

 

नंतर होता कार्यक्रम संगीत व नृत्यांचा

गीतेच्या गाण्यांवर नाचल्या नर्तकी शृंगारपुरेंच्या

 

आचार्यांचा सन्मान करण्याचे सगळ्यांनी ठरविले

मानकारानी शाल श्रीफळ व सव्वालाखे अर्पण केले

 

खास शौर्यपदक देण्यात आले वाघमारेंना

कार्यक्रमाचा खर्च नीट सांभाळल्यामुळे शाबासकी मिळाली व्यवहारेंना

 

तोवर आकाशात सर्वत्र काळमेघ दाटून आले

काळे व अंधारेंनी समारंभ संपल्याचे घोषित केले

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रतिबिंब… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रतिबिंब… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

मीच मला जन्माला घालताना

भासे प्रतिबिंब तुला पाहताना

 

आसवांची जलधारा

नेत्रातून अखंड वाही

गर्भांकुरातील  अंकुर

जगण्याचे दुःख साही

मीच मला जन्माला घालताना

भासे प्रतिबिंब तुला पाहताना

 

एकसंध धवल मळभ

घट्ट  तिमिर  स्थितप्रज्ञ

वाट..ग्रहण सुटण्याची

जणू सारे बंध अनभिज्ञ

पहारा आहे तुझ्यावर, जन्मताना

तरीही..होईल हर्ष तुला पाहताना

 

येशील  घेऊन प्रतिबिंब

माझ्यातलीच मी होऊन

तरणोपाय नाही सृष्टीस

बीजांकुरण नव्याने रुजून

आयुष्य भरडणार स्वत्व जोखताना

कष्टाचे चीज  होईल तुला पाहताना

 

विश्वाची जननी असे नारी

काली,दुर्गा,लक्ष्मी,सरस्वती

अधर्माचा विनाश करण्यास

नानाविध रूप घेई संस्कृती

आनंदाला उधाण येईल तू जन्मताना

जीवनाचा सोहळा होईल तुला पाहताना

 

मीच मला जन्माला घालताना….

भासे प्रतिबिंब तुला पाहताना…

© सुश्री पार्वती नागमोती

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares