मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 50 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 50 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९२.

माझ्या डोळ्यावर अखेरचा पडदा पडेल,

या पृथ्वीवरील दृश्य दिसेनासं होईल,

जीवन शांतपणं रजा घेईल.

तो दिवस येणार हे मला ठाऊक आहे.

 

रात्री चांदण्यांचा पहारा असेल,

नेहमीप्रमाणे सकाळ उगवेल आणि

सागराच्या लाटाप्रममाणं सुख – दुःखावर

कालक्रमण होत राहील.

 

जेव्हा माझ्या अखेरच्या क्षणाचा

विचार मनात येतो,

तेव्हा क्षणाचं बंधन तुटतं आणि मृत्यूच्या

प्रकाशात तुझं अस्ताव्यस्त वैभव मला दिसतं .

तिथं सर्वात कमी दर्जाचं आसन

अगदी क्वचितच असतं,

जीवनातील क्षुद्रताही अगदी क्वचितच असते.

 

ज्या गोष्टीची निरर्थक वासना मी धरली होती,

आणि ज्या गोष्टी मला प्राप्त झाल्या होत्या,

त्या सर्व किती निरर्थक आहेत

हे आता मला समजतं.

ज्यांच्याकडं मी दुर्लक्ष केलं आणि

त्या लाथाडल्या त्यांचं मोल आता मला कळतं.

 

९४.

माझी सुटका झाली. बंधूंनो! मला निरोप द्या.

नमस्कार! आम्ही जातो!

या माझ्या घराच्या किल्ल्या! माझ्या घरावरील

सर्व हक्क मी तुमच्या स्वाधीन करतो.

मधुर शब्दांत तुम्ही निरोप द्यावा एवढीच माझी इच्छा!

फार पूर्वीपासूनचे आपण शेजारी -शेजारी!

मी तुम्हाला जे देऊ शकलो

त्याहून अधिकच मला मिळालं.

 

दिवस उजाडलाय.

माझा काळोखी कोपरा प्रकाशणारा दिवा

आता विझला आहे.

 

बोलावणे आले आहे.

प्रवासाला जायची माझी तयारी झाली आहे.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्रांतीसूर्य सावरकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ क्रांतीसूर्य सावरकर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

जयोस्तुते श्री परम् विक्रमी क्रांतीच्या सूर्या

तेजोमय ही जीवनारती आपण गाऊया ।

राष्ट्राचा अभिमान सार्थ तू स्फूर्ती शहिदांची

पूजा बांधिली प्राणपणाने स्वातंत्र्यदेवीची ।

खड्गासंगे कलमाच्या तू इतिहास रचियेला

पतिता  संगे  पतित  पावन पावन तू  केला ।

पर्वत   बनुनी  धैर्याचा  तू   झुंज  कधी  देशी

सार्थ नाम हे ‘विनायक’, तू शब्दप्रभू होशी ।

शक्ती, बुद्धी ही तुझीच रूपे तू शूर सेनानी

अनादी आणि अनंत तू ,गातो तूज कवनी ।

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ वीर जवान तुझे सलाम… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ वीर जवान तुझे सलाम… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

प्रेमळ पाश घर सोडूनी

देशासाठी देतो बलिदान

वीर जवान तुझे सलाम

तूच खरा देशाचा सन्मान

 

धाडस शौर्य पराक्रमाची

तुझी चहुकडे बघ ख्याती

अभिमान तुझा प्रत्येकाला

कशी विसरेल तुझी आहुती

 

वर्दीचा मान ठेवूनी भान

सीमेवरती उभा राहतो

खडा पहारा तुझा सैनिका

त्यामुळे आम्ही सुखे नांदतो

 

आदर तुझा आहे सर्वांना

माथा नकळत नत होतो

धाडस हिम्मत तुझी पाहुनी

खरा हिरो तू आमचा होतो

 

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द देवते… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

☆ शब्द देवते… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

जीवन हा प्रचंड रंगमंच आहे. या मंचावर मनुष्य अनेक अनुभूती घेत असतो, अनुभव घेत असतो. 

शास्त्रीय ज्ञानानुसार एकदा अनुभवलेले मनुष्याच्या स्मरणात कायम राहते. तथापि मानवी स्वभावानुसार मात्र काही प्रसंग त्याला कधीच विसरू नये असे वाटते तर काहींची आठवण कधीच येऊ नये असे वाटत असते. त्यातही काही घटना तर अकल्पित असतात, अविश्वनीय असतात, अद्वितीय असतात. 

माझ्याही आयुष्यात अशीच एक अभूतपूर्व घटना ६ जानेवारी २०२३ रोजी घडली. काय घडले ते कथन करण्यापूर्वी, तिचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी आधी मी थोडी पूर्वपीठिका सांगतो. 

अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी मला खेळतांना एक अपघात झाला होता. दुर्घटनेत माझा उजवा डोळा अधू झाला होता. तरीही मी जवळजवळ पंचवीस वर्षे व्यवस्थित शस्त्रक्रिया करू शकत होतो, प्रसूति करू शकत होतो. नंतर मात्र त्या डोळ्याला मोतीबिंदू, काचबिंदू वगैरे त्रास सुरु झाले. त्यावर तीन-चार शस्त्रक्रिया करायला लागल्या आणि अखेरीस त्याचे नेत्रपटल आतून फाटले. लगेच केलेल्या शस्त्रक्रियेमुळे डोळा आणि दृष्टी वाचली, पण ते नावापुरतेच ! मला उजव्या डोळ्याने समोरची माणसे देखील ओळखता येत नाहीत. 

तथापि माझा डावा डोळा मात्र विलक्षण कार्यक्षम होता. उजवा डोळा इतकी वर्षे अधू असून देखील मी पन्नासपेक्षा अधिक पुस्तके लिहू शकलो…. अन् अचानक गेले महिना-दीड महिना मला साधे वर्तमानपत्र देखील वाचता येईना झाले, पानात आलेली मिरची देखील ओळखता येईना. 

नेत्रपटल विशारद नेत्रतज्ज्ञाला दाखवायला गेलेलो असतांना तपासणीच्या आधी माझ्या डोळ्यात वरचेवर औषध टाकून मला डोळे बंद  करून बसविले होते. माझ्या या डोळ्याचे काय होणार या विचाराने मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो. आता हाही डोळा गेला तर मी करायचे काय – कसे वाचायचे, कसे लिहायचे आणि कसे जगायचे? माझ्या मस्तकात विचारांचे प्रचंड मोहोळ उठले होते.  सूरदास व्हायची भीती मला भेडसावत होती. सूरदासांनी उदंड काव्य केले खरे; पण कुठे त्यांच्यासारखे प्रासादिक व्यक्तिमत्व आणि कुठे माझ्यासारखा सामान्य माणूस ! ज्या शब्दांची आणि अक्षरांची मी आयुष्यभर सेवा केली तेच आता मला पारखे होणार की काय या विचाराने माझे डोके फुटायची वेळ आली; मस्तकात गरगरायला लागले. अखेरीस मी तेथील एका डॉक्टरांकडे एक कागद मागितला. तिला वाटले मला डोळे पुसायला कागद हवा आहे. तिने मला एक टिश्यू पेपर आणून दिल्यावर मी तिला सांगितले, ‘मला लिहायला कागद हवा आहे.’ 

आणि माझ्या आयुष्यातील ती अद्वितीय अनुभूती मला आली. बंद डोळ्यांनी मी शब्ददेवतेची आळवणी करणारी कविता लिहिली.   

शेजारीच बसलेल्या माझ्या मुलाच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘आम्हाला उघड्या डोळ्यांनी देखील इतके सरळ रेषेत लिहिता येणार नाही, तितके  सुबक तुम्ही बंद डोळ्यांनी लिहिलेत !’

… ही अनुभूती आणि ती कविता आज मी माझ्या समस्त वाचकांसाठी घेऊन आलो आहे : 

☆ शब्ददेवते…

शब्ददेवते रुसू नको गे अपुल्या भक्तावरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी  ||ध्रु||

कुवत जशी मी सजवीत आलो अलंकार चढवुनी 

कथा कविता कादंबरीना नटविले  रूपांनी

अगतिक झालो वयोपरत्वे दृष्टी झाली अधुरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी     ||१||

सादाविले तुम्हाला येता ओथंबुन भाव मना

निराश कधी ना केले माझ्या भावभावनांना

असे कसे मी सांडू माझ्या कवीकल्पनांना तरी 

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी   ||२||

देवी शारदे कृपा करावी जागृत ठेवी कविता 

अमर करी मम साहित्याला देऊनिया शाश्वता

सारे सोडून गेले तरीही ते पावो अक्षरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी   ||३||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

संपर्क – एम.डी., डी. जी. ओ., श्रोत्री निवास, ४०/१-अ, कर्वे रस्ता, पुणे ४११ ००४

मो – ९८९०११७७५४ ईमेल – [email protected].

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कविता स्मरण… – बा. भ. बोरकर ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– कविता स्मरण… – बा. भ. बोरकर – ? ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

बा. भ. बोरकर 

बोला कुणाकुणा हवे

फुलपाखरांचे थवे

जादूगार श्रावणाच्या

कर्णकुंडलीचे दिवे

निळे जांभळे तांबडे

जर्द पिवळे हिरवे

काळे पांढरे राखेरी

भुरे पोपटी पारवे

कोणी उन्हेरी चंदेरी

कोणी अंजिरी शेंदरी

मोरपिसापरी कोणी

वर्ख ल्यालेले भर्जरी

कुणी मख्मली मल्मली

कुणी वर्गंडी वायली

किनखापी मुलायम

कुणी शीतल सायली

कुणा अंगी वेलबुट्टी

चित्रचातुरी गोमटी

इंद्रधनूचेही वर्ण

होती पाहून हिंपुटी

वर्णलाघवाचे थवे

जाती घेत हेलकावे

कधी थांबून पुसती

फुलापानांची आसवे

कधी पिकलेल्या साळी

कधी साळकांची तळी

कधी लालगुंज रस्ता

जाती लंघून मंडळी

त्यांच्या लावण्याने दुणा

येथे श्रावणाचा हर्ष

अशा मोसमी गोव्यात

खरेच या एकवर्ष

पण धरायचा त्यांना

फक्त करावा बहाणा

सुखे बघत रहावा

सप्तरंगांचा तराणा

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देशाटन… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

 कवितेचा उत्सव ?

☆ देशाटन… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

जग भ्रमंतीचा थोर

आनंद किती वर्णावा

ज्ञान ठेवा मिळवण्या

मनी उत्साह असावा

 

भौतिक त्या साधनांनी

जग समीप भासते

स्वकर्तृत्व जागवीत

ती देशाटन करते

 

अंतरा अंतरावर

वेशभाषा निराळीच

परी सूर्य चंद्र तोच

मूळ गाभा, सृष्टी तीच

 

सुखदुःख मानवाचे

सर्वत्र असे सारखे

तरी प्रेमळ नात्यास

कुणी न व्हावे पारखे

 

बुद्धी कौशल्याचा कस

साथ घेते अध्यात्माची

संघर्ष तो झेलताना

जोड आत्मविश्वासाची

 

चूल मुलं सांभाळून

संस्कारांना ती जपते

साता समुद्रा पार ही

ती वंदनीय ठरते

 

याची देही याची डोळा

पाहा, जे नितांत सुंदर

यशापुढे न पडावा

माय भूमीचा विसर.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 141 – शुक्रतारा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 141 – शुक्रतारा ☆

खुणावतो   शुक्रतारा

साद घाली मंद  वारा।

श्यामरंगी रंगलेला

हा निशेचा रंग न्यारा ।

तेज भारे उमलणारा

तारकांचा हा फुलोरा

रातराणीच्या फुलांनी

व्यापलेला गंध सारा।

रजनीकांता साद घाली

मुग्ध धुंद ही निशा रे।

भाव वेड्या या फुलांना

वेड लावी ही दिशा रे।

कल्पनेचे पंख न्यारे

मन मयूरा लाभले रे।

दंग झाले विश्व सारे

नृत्य छंदी व्यापले रे ।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुझी आठवण… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ तुझी आठवण… ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

तुझी आठवण सखे

मला विसरत नाही

तुझ्या घराची वाट

कशी हरवून जाई?

 

क्षण तुझ्या सहवासाचे

होते  अंगणा  भारून

तू जाता रानांतली

 पाखरे जाती काहुरुन 

 

तू जाता  परीसरी

बाग फुलणार नाही

दिसलीस ना तू जरा

पिक   डोलणार नाही

 

तुझ्या सौंदर्याने रात्र

चंद्राविना फुलत होती

आता तू जवळ नसता

सारी रात्र रडत होती

 

सखे तू असता जवळ

साऱ्या क्षणांना गं गंध

 सखे  तुझ्याविना आता

आज वाराही  झाला बंद  

 

कसे काढायचे दिस

 मला कळतच  नाही

सारे कळूनिया तुझे

पाऊल  वळतच  नाही…

 

© मेहबूब जमादार

मु -कासमवाडी पो .पे ठ  जि .सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #163 ☆ देवदूत ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 163 – विजय साहित्य ?

☆ देवदूत ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

चिंध्या पांघरोनी बाबा

धरी मस्तकी गाडगे

डेबुजी या बालकाने

दिले स्वच्छतेचे धडे…!

 

विदर्भात कोते गावी

जन्मा आली ही विभूती.

हाती खराटा घेऊन

स्वच्छ केली रे विकृती…!

 

वसा लोकजागृतीचा

केला समाज साक्षर

श्रमदान करूनीया

केला ज्ञानाचा जागर.

झाडूनीया माणसाला

स्वच्छ केले अंतर्मन.

धर्मशाळा गावोगावी

दिले तन, मन, धन…!

 

देहश्रम पराकाष्ठा

समतेची दिली जोड

संत अभंगाने केली

बोली माणसाची गोड…!

 

धर्म, वर्ण, नाही भेद

सदा साधला संवाद

घरी दारी, मनोमनी

गोपालाचा केला नाद…!

 

स्वतः कष्ट करूनीया

सोपी केली पायवाट

संत गाडगे बाबांचा

वर्णीयेला कर्मघाट…!

 

असा देवदूत जनी

मन ठेवतो निर्मळ

त्यांच्या आठवात आहे

प्रबोधन परीमल…!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे कविते… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ हे कविते… ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

अवेळी तुझं येणं नसतंच कधी

दस्तक देतेस तू तुझ्या आर्ततेचे

 

झंजावत असतेस तू …

घुसमटलेल्या हल्लकल्लोळांचा

 

घोंगावणारा वारा असतेस तू…

पिंगा घालणाऱ्या भावभावनांचा

 

कोसळणारा धबधबा असतेस तू…

उचंबळून येणाऱ्या आर्त हुंदक्यांचा

 

झेपावणारा झोत असतेस तू…

उत्तुंग भरारी घेणाऱ्या अग्नीपंखांचा

 

खळखळणारा झरा असतेस तू…

हर्षोल्लासाने चिंब झालेल्या सुखांचा

 

प्रज्वलित करणारा किरण असतेस तू..

पथ चुकलेल्यासाठी उचित मार्गदर्शकांचा

 

धगधगणाऱ्या ज्वाळा असतेस तू…

अन्यायांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या सत्यतेचा

 

भळभळणारा जखमी प्रवाह असतेस तू…

 अस्तित्वासाठी झगडलेल्या तीव्र वेदनांचा

 

ओघळणारा अश्रू-प्रवाह असतेस तू…

मनतळ्यातील थिजलेल्या यातनांचा

 

हे कविते, तुझ्या अनेक रूपांनी

तू समोर येऊन अवेळी उभी ठाकतेस.

अगदी अचानक…

 

© सुश्री पार्वती नागमोती

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares