श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ मज गावला आनंद… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
सांप्रतच्या काळी नाही
हाती काम फार
पाणी शेंदायासी गेले
दूर दूर बावीवर
कळशीचा हिंदकळ
फेकी पाणीयाचे स्पंद
गार गार त्या थेंबात
मज गावला आनंद ॥
घरी येता येता आधी
गेले रांधण्यासी भात
काड्या सारता चुलीत
चटकला की ग हात
तडतडला निखारा
उडे जळणारा स्पंद
दिसे चिमुकला सूर्य
मज गावला आनंद ॥
घंगाळात पाणी ऊन
लोटा खांद्यावरी रिता
ओघळत्या धारेतुनी
स्पर्शभास झाला होता
अपरोक्ष माझ्या तेथे
उभा असावा मुकुंद
दिव्य स्पर्शातून त्याच्या
मज गावला आनंद ॥
फूल तोडण्या आधीच
हात थबकला बघ
मन धजे ना करण्या
आई बाळाचा वियोग
सुखावून फुलाने त्या
दिला मज रंग गंध
अपूर्व त्या उपहारे
मज गावला आनंद ॥
तू आहेस निकटी
फक्त याच कल्पनेने
मन होतसे विभोर
फक्त तुझ्या आठवाने
आणी वार्याची झुळूक
तुझा मंद श्वासगंध
आणि तुझ्या हुंकारात
मज गावला आनंद ॥
© सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈