मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गोष्ट मोक्षाची…” – कवी : श्री वासुदेव महादेवराव खोपडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “गोष्ट मोक्षाची…” – कवी : श्री वासुदेव महादेवराव खोपडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

नको मले खीर पूरी

नको देऊ भजा वळा

गोष्ट मोक्षाचिच सांगे

दारी एकाक्ष कावळा !!

 *

दारी एकाक्ष कावळा

कसा काव काव बोले

मानवाचे कटू सत्य

पट अंतरीचे खोले !!

 *

पट अंतरीचे खोले

एकाक्ष बहुजनांत

तुमचाच बाप कैसा

येतो पित्तरपाठात !!

 *

येतो पित्तरपाठात

आत्मा हा स्वर्गातूनी

आत्म्याचा प्रवास सांगा

पाहिलायकारे कुणी ?

 *

पाहिलायकारे कुणी ?

रस्ता स्वर्ग नरकाचा

सारा कल्पना विलास

धंदा धनाचा पोटाचा !!

 *

धंदा धनाचा पोटाचा

भट शास्त्री पंडिताचा

कधी कळेल रे तुला

खेळ डोळस श्रद्धेचा !!

 *

खेळं डोळस श्रद्धेचा

खेळ होऊन माणूस

मायबापाच्या मुखात

घाल जित्तेपणी घासं !!

 *

घाल जित्तेपणी घासं

नको वृद्धाश्रम गळा

नको करू रे साजरा

अंधश्रद्धेचा सोहळा !!

 *

अंधश्रद्धेचा सोहळा

भीती धर्माची ग्रहाची

आत्म मोक्षासाठी फक्त

भीती असावी कर्माची !!

 *

भीती असावी कर्माची

कर्म सोडीना कुणाला

सांगे मोक्षाचिच गोठ

दारी एकाक्ष कावळा !!

कवी : श्री वासुदेव महादेवराव खोपडे

 सहा पोलीस उपनिरीक्षक (से. नि.), अकोला 9923488556

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ नाते स्वतःशी – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ नाते स्वतःशी – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

समाजात वावरत असताना कधी कधी आपणही नकळत एक मुखवटा चढवलेला असतो. अनेकांच्या मुखवट्यासोबत तोही वावरत असतो. आपल्या मनात नक्की काय चाललं आहे हे इतरांना कळू नये म्हणूनही असेल कदाचित ही यातायात पण कधीतरी हा बुडबुडा फुटतो आणि अजाणता आपलाच आपल्या मनाशी संवाद घडतो. मनात अनेक प्रश्न उभे राहतात. का? कशाला? का मी या सगळ्यातून स्वतःला सोडवू शकत नाही आणि त्या क्षणापासून सुरू होतं एक सूक्ष्म मानसिक परिवर्तन, बदल, एक ठाम निर्णय, ठोस भूमिका.

अशाच अर्थाची माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची नाते स्वतःशी ही गझल वाचण्यात आली आणि रसिक काव्यप्रेमींपुढे त्याची रसात्मकता मांडावी असे तीव्रतेने वाटले म्हणून हा लेखनाचा अट्टाहास…

सुश्री अरुणा मुल्हेरकर

 नाते स्वतःशी ☆

मी बोलते स्वतःशी समजावते मनाला

सारेच हे मुखवटे पाठी पळू कशाला

*

वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी

हे डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला

*

नात्यात नाही उरले काहीच बंध आता

माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला

*

हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे

पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला

*

स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही

घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला

*

सूर्यास्त होत आला दिन मावळेल आता

पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला

*

संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी

कोषात मीच माझ्या हे सांगते जगाला

*

— गझलकारा अरुणा मुल्हेरकर, मिशिगन

ही गझल प्रातिनिधिक स्वरूपात आहे असे म्हटले तर काहीच गैर ठरू नये. सारं काही जणू आपल्याच मनातलं आहे अशी भावना वाचकाच्या मनात ही गझल वाचताना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आणि इथेच, याच क्षणी गझलेतला अस्सलपणा जाणवतो.

मी बोलते स्वतःशी समजावते मनाला

सारेच मुखवटे मी पाठी पळू कशाला

मतल्याची सुरुवातच फार परिणामकारक झालेली आहे. जगता जगता एक क्षण असा काही येतो की साऱ्यांचाच उबग येतो. अवतीभवती वावरण्यार्‍यां विषयी शंका निर्माण होतात. काहीतरी चुकतंय, नको असलेलं पुन्हा पुन्हा आपल्यापाशी येऊन ठेपतंय आणि “पुरे झाले आता” अशी भावना निर्माण होऊन आपल्याच मनाला समजवावं लागतंय. “अरे! हे सारं किती फोल आहे, पोकळ आहे! यांच्या मुखवट्यामागची अव्यक्त गढूळ वृत्ती जाणल्यानंतरही मी त्यांच्यात का गुंतून पडू? कशासाठी मी या फसव्या लोकांच्या पाठीमागे पळत राहू?

वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी

डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला 

अधरावर अमृत आणि उदरात मात्र जहर. यांच्या गोड बोलण्याला मी का खरं समजावं? जरी त्यांची वाणी मधुर असली तरी ती खोटी आहे, कावेबाज आहे हे मी जाणलंय. हे सारेच गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत. हे सारे गोड बोलून माझा फायदा घेणारे आहेत. यांना माझ्याविषयी जराही आत्मीयता नाही. सारेच मतलबापुरते माझ्या भोवती आहेत. “गरज सरो ना वैद्य मरो” हेच यांच्या मनातलं कडवट वास्तव मला माहीत आहे आणि हे मी पूर्णपणे जाणल्यानंतरही मी माझी फसवणूक का करून घेऊ? 

या शेरात गझलकाराने वापरलेला डोंगळे गुळावर हा शब्दप्रयोग अगदी चपखल आहे. खरंच यालाच दुनियादारी म्हणतात. जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत प्रधान आहे. राज्य गेलं की सगळ्यांची पाठ फिरते. स्वार्थापुरते सारेच जवळ येतात. अशा लोकांची साथ नेहमीच अशाश्वत असते. डोंगळे गुळावर या दोनच शब्दातून कवयित्रीने हेरलेला जगाचा स्वभाव स्पष्टपणे व्यक्त होतो.

नात्यात नाही उरले काहीच बंध आता

माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला

गणगोत, नातीगोती, त्यातले भावबंध जणू काही आता संपलेत. जो तो स्वतःत मशगुल आहे. प्रेम, आपुलकी, आस्था, माया, उपकृतता, कर्तव्य काही काही उरले नाही. जो तो स्वतःत मग्न आहे. इतरांचा विचारही करण्याची त्याला गरज वाटत नाही. नात्यातून जाणवत असलेला हा कोरडेपणा कवयित्रीला अक्षरशः व्यथित करत आहे. हा बदल अनपेक्षित आहे. धक्का देणारा आहे पण तरीही हे वास्तव आहे आणि या वास्तविकतेने मन विदीर्ण झाले असतानाच कवयित्रीच्या मनात सहज येते…

हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे

पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला

पाण्यात मुक्तपणे पोहणाऱ्या राजहंसाचे चित्र कवियत्रीच्या मनात साकारते. त्याच्याशी नकळत तुलना केली जाते.

“पहा! कसा हा राजहंस पक्षी स्वतःच्या धुंदीत स्वैरपणे विहरत आहे. त्याचं नातं फक्त भोवतालच्या अथांग, निर्मळ, पवित्र जलाशयाशी आहे आणि पाण्याचा निर्मळ, निरपेक्ष स्पर्श म्हणजेच त्याच्यासाठी जणू काही स्वर्गीय आनंद आहे. ”

संपूर्ण गझलेवर कळस चढवणारा हा शेर आहे. या शेरात राजहंस— पाणी हे रूपकात्मकतेने वापरलेले आहे. पाणी म्हणजे जीवन. माणूस आणि जीवन यांचा संबंध उलगडणारं हे रूपक अतिशय प्रभावी वाटतं. “जगावं तर राजहंसासारखं! जगण्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद जीवनात वेचावा. ” हा अत्यंत मोलाचा संदेश या शेरातून मा. अरुणाताईंनी किती सहजपणे दिला आहे! 

स्वत:शी संवाद साधता साधता आता कवयित्रीच्या मनात काही निर्णयात्मक विचार येऊ लागले आहेत. त्या आता स्वतःला सांगत आहेत,

स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही 

घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला

आता जगायचं ते मुक्त, स्वच्छंद, स्वैर बंधन मुक्त, नको बेड्या, नको शृंखला. कशाला ज्यातत्यात अडकून नैराश्य येऊ द्यायचे आणि उरी जखमा करून घ्यायच्या? या संकुचित, आक्रसलेल्या, गढूळलेल्या, जीवनरुपी डबक्याचा त्याग करून उंच, मोकळ्या, अथांग, गगनी मुक्त झेप का न घ्यावी? खरोखर अशा या भरारीतल्या अनमोल सुखालाच मला आता कवटाळायचं आहे.

किती सुंदर शेर! किती लयबद्ध आणि अर्थपूर्ण! हा शेर वाचताना मला सहज गदिमांच्या ओळी आठवल्या.

जोड झणी कार्मुका 

सोड रे सायका 

मारही त्रटिका रामचंद्रा..

प्रस्तुत गझलेतल्या ओळी आणि गदिमांच्या या ओळीतले अर्थ, प्रसंग, वातावरण निराळे असले तरी आवेश तोच आहे. काहीतरी सोडताना, तोडताना मग ती जगण्यातली बंधने का असेनात पण त्यासाठी एक आवेश लागतो, जोश लागतो आणि तो व्यक्त व्हावा लागतो आणि वरील शेरात तो याच ताकदीने व्यक्त झालेला मला जाणवला.

आता अरुणाताईंची गझल पुढे सरकते..

सूर्यास्त होत आला दिन मावळेल आता

पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला

वा क्या बात है!

हा शेरही रूपकात्मक आहे. सूर्यास्त, मावळता दिन, पानगळ हे शब्द संपत आलेल्या जीवनाविषयी सांगत आहेत. “एक दिवस हे जग सोडून जायचंय. सूर्य मावळण्याची चिन्हं क्षितिजावर उमटत आहेत, या जीवनरुपी वृक्षांची पानं गळून जात आहेत, हळूहळू हा वृक्ष निष्पर्ण होईल, गात्रे थकली.. ती आता केव्हाही निस्त्राण होऊ शकतात. ”

या शेरामध्ये कवयित्रीची जीवनाच्या अंताविषयीची एक स्वीकृती तर जाणवतेच पण शब्दांच्या पलीकडचं, त्यांच्या मनातलं काहीतरी सहजपणे वाचता येतं. आता कशाला? हा एक सूर त्यात जाणवतो. संपतच आलं की सारं आता! जे काही शेवटचे क्षण उरलेत ते तरी मुक्तपणे मनासारखे का जगू नयेत? याच भावनेतून त्या त्यापुढे म्हणतात..

संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी कोषात मीच माझ्या हे सांगते जगाला या क्षणी, या सांजवेळी, आयुष्याच्या या किनारी मी माझ्याच मनाशी साधलेला हा संवाद आहे. माझ्या मनाशी जुळवलेले माझे हे निखळ नाते आहे. माझ्या भोवती मीच विणलेल्या या कोषातून मुक्त होऊन मी माझ्या मनातले काहीतरी जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ”

जणू काही या ओळीतून अरुणाताई काहीतरी निर्वाणीचं सांगत आहेत. ते जरी निर्वाणीचं वाटत असलं तरी ते निर्णयात्मक आहे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला असा भाव कुठेतरी या ओळीतून उलगडतो.

अप्रतिम गझल.

मी दूरस्थपणे गझलकाराची मानसिकता टिपण्याचा फक्त प्रयत्न केला आहे. या गझलेला असलेली एक तात्त्विक बैठक शोधण्याची धडपड केली आहे. सुरुवातीला ही गझल काहीशी नकारात्मक भासत असली तरी हळूहळू ती सकारात्मकतेकडे झुकत जाते. जीवनातले अस्सल अर्थ उलगडत जाते. आनंदकंद वृत्तातील ही मुसलसल गझल मनाला भिडते ती त्यातल्या सहज, सोप्या पण अर्थपूर्ण शब्दांमुळे. प्रत्येक शेरातला उला आणि सानी यात अर्थाची सुरेख सरमिसळ झालेली जाणवतते. स्पष्ट राबता आणि सुरेख खयालत यामुळे ही गझल फारच परिणामकारक झाली आहे. रदीफ विरहित आणि मनाला कशाला स्वतःला कुणाला त्याला सुखाला झाला जगाला या काफियांनी गझलेची रुची आणि उंची अधिक वाढलेली आहे.

या गझलेचा आनंद आपण सर्वांनी जरूर घ्यावा हीच अपेक्षा..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पीक गेलं कुजुनी… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ पीक गेलं कुजुनी … ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

पीक गेलं कुजुनी साऱ्या रानात आलं पाणी

शेतकऱ्यांनी कशी गायची खळ्यातली गाणी

*

गेले तीन महिनं सारा संसार मांडला रानी 

कसा आलास अवकाळी गेलास सारं घेऊनी

*

अरे मेघ राजा असं काय केलं होतं आम्ही तुझं

असा कसा बरसलास रे झाली सारी आबादानी

*

पिकलं नाही रानात तर आम्ही कुठे रं जावाव

डोळा दाटत आभाळ, तुला सारी सांगता कहानी

*

ठिगळ जोडूनी जगतो, कसं शिवाव आभाळ

माती मोल झालं जिणं स्तब्ध झाली आमची वाणी

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुटुंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆  कुटुंब… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

घरासारखे घर असावे 

नकोच नुसत्या भिंती 

प्रेमाने उजळून निघावे

गंधित होईल माती 

*

घरात मुख्य स्तंभ हा 

दक्ष राजा आणि राणी 

रेशीम धागे सहज गुंफता 

सुचतील मग गाणी 

*

मातीची होईल पणती 

आणि सगे सोयरे नाती 

प्रेमाचे तेल घालता 

उजळत जातील वाती

*

घर असावे गोजिरवाणे 

आजी आजोबा वृद्ध 

नातवंडे असावी सालस

प्रत्येक जण होईल बद्ध 

*
नांदावे एकत्र कुटुंब हे 

आपुलकीची भाषा 

सहानभूती एकमेकांना 

भविष्याची आशा 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ किनारा… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ किनारा… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

कसे जगावे ठरले नाही अजून माझे

असे चालले व्यर्थच जीवन निघून माझे

*

अरे ! न हे दव कळ्या.. फुलांच्या.. पानां.. वरचे

हे अश्रू त्यांचे… दुःखाश्रू बघून माझे

*

तुझ्या मनीच्या स्मरणातुन मी जिवंत अजुनी

जरीही गेले पंचप्राण हे विझून माझे

*

काळ वेळही निघून गेली तू येण्याची

तरी बिचारे स्वप्न तिष्ठते सजून माझे

*

तसे एरव्ही राहून जाते जगावयाचे 

भेटताच तू पुरते होते जगून माझे

*

अखेर जो भेटला मला तो भोंदू होता

नित्य नको त्यालाच होतसे भजून माझे

*

जरी हिंडतो जगी, न रमते मन हे कोठे

तुझ्या अंगणी थबके पाऊल फिरून माझे

*

नको स्वर्ग वा सुख.. संपत्ती.. स्थावर.. जंगम

रम्य बालपण दे काहीही करून माझे

*

जगणे म्हणजे केवळ आता मरण सोसणे 

ऋतु जगण्याचे कधीच गेले सरून माझे

*

समाधान.. आनंदाचा क्षण अनुभवताना 

अवचित येती डोळे का हे भरून माझे?

*

सागर-तळ मी अशांत कोणा कळल्यावाचुन

प्रसन्न असणे.. दिसणे.. जरिही वरून माझे

*

बदलू दे जग, परिस्थितीही किती कशीही

वागायाचे कसे, कधीचे ठरून माझे

*

जन्मापासुन मी स्वच्छंदी वादळवारा

कसे म्हणू, ” तू चाल बोट हे धरून माझे.. “

*

विश्वासक तो तुझा किनारा नजरेपुढती

वादळलेले तारू गेले तरून माझे

*

हवेतला ‘मी’ पुन्हा पातलो धरतीवरती

असे-तसेही भलेच झाले हरून माझे 

*

श्रावण- ओला तुझ्या प्रितीचा मेघ बरसता

उठले जीवन मरगळले तरतरून माझे

*

कुणा पांघरू? पाय, पोट-या की हे डोके?

हीss थंडी अन् थिटेच हे पांघरूण माझे

*

हा नुसता आवाज घुमे लाटांचा आता 

उधाण गेले कधीच ते ओसरून माझे 

*

सांग कधी ‘त्या’ यात्रेसाठी निघावयाचे

तयार मी, झाले सारे आवरून माझे

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ फक्त ठरवा …कधी आणि किती… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ फक्त ठरवा …कधी आणि किती… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

कधी भुंकायचं !

किती भुंकायचं !

आताच ठरवून

लक्षात ठेवायच 

*

 नंतर काम आपापला

 एरिया सांभाळायचं 

 भुंकून भागलं नाही तर … 

.. तर चावे घेत सुटायचं 

*

 किती सज्जन असो

समोर लक्ष ठेवायचं

विरोधी आपला नसतो

आपण फक्त भुंकायचं 

*

 पोटाला तर मिळतंच

 काळजी का करायची

 संधी मिळाली की मात्र

 तुंबडी आपली भरायची

*

 आपल्या अस्तित्वाची

 भुंकणं ही खूण आहे

 पांगलो तरी जागे राहू

 चौकस नजर हवी आहे

*
 खाऊ त्याची चाकरी करू

 म्हण जूनी झाली आहे

 रंगानं, अंगानं वेगवेगळे

 तरी काम आपलं एक आहे……..

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोजागिरी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कोजागिरी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

शितल चांदणे

सद्गुरू कृपेचे

मन शांत शांत 

आरसपानी…

 

पूनव नेहमीची

पण शितलता

येते कोजागिरी दिनी 

शुभ्रकिरणी…

 

आटवून नात्यासी

साधनेची घालू साखर

सत्कर्माचे वेलदोडे

खरे मोक्षदानी…

 

सद्गुरु कृपेचा

गारवा साधकांच्या हृदयी

फुंकर घाली विकल्पा

ठेवा ध्यानी…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कशी घडणार सांगा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

कशी घडणार सांगा…☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

रामापाशी राहूनही जन उपाशी उपाशी

कशी घडणार सांगा, सांगा गंगा आणि काशी…

*

सोडा सोडा हो जन हो काम क्रोध आणि दंभ

मग जातील निघून शुंभ आणि तो निशुंभ

करा घर हो देवाचे मनाचे ते देवालय

मनाभोवती फिरेल रामरायाचे वलय…

*

नका देव देव करू देव माणसात पहा

तुम्ही माणूस बनूनी माणसात नित्य रहा

नको कपटाचे धनी नका बनू हो संशयी

आहे फारच कृपाळू पंढरीत असे आई..

*

नाही बोलवत कुणा सांगे ठेवा हो मनात

मी श्वासात श्वासात तुमच्याच हो प्राणात

का हो शोधता मला त्या तीर्थक्षेत्री देवालयी

किती वेळा सांगितले पाठीराखा मीच आई…

*

आधी मन करा शुद्ध राग लोभ द्वेष सोडा

असूयेचा विषभरा काटा मनातून काढा काढा

घर होताच शुद्ध ते रामरायाच येईल

खांद्यावरती घेऊन पैलतीरासी नेईल …

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तह… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ तह… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

युद्धाचे परिणाम माहीत नसल्यामुळेच..

तिने लढाया केल्या.

मला कारणं माहीत होती,

म्हणूनच मी तह केले.

 

त्यांनी विजोड जोड्या लावल्या 

म्हणून आम्हीही गाळलेले शब्द भरले.

व्यत्त्यासाने प्रमेये सिद्ध केली-

भूमितीची.

 

हातचे वापरुन गणितं सोडवली.. व्यवहाराची.

दुर्देवाचे सगळे फेरे….

प्रगतीबुकावर लाल शेरे.

तरीही पुढची यत्ता गाठली.

 

इतुके यश होते रगड.

अगदीच नव्हतो आम्ही दगड.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाते स्वर्ग-धरेचे ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नाते स्वर्ग-धरेचे… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

आपल्या समूहातील लेखिका व कवयित्री सुश्री दीप्ती कुलकर्णी यांना नुकताच “माझी लेखणी साहित्य मंचता. शहापूर, जि. ठाणे आयोजित, रामायण काव्यलेखन मंच या अंतर्गत “रामायणावर आधारित काव्यलेखन “ या विषयावरील महास्पर्धेत “सर्वोत्कृष्ट काव्यलेखन “ म्हणून प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले आहे. आपल्या सर्वांतर्फे दीप्तीताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐

आजच्या अंकात ही पुरस्कारप्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ,

ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग.

☆ नाते स्वर्ग धरेचे ☆

दिव्य स्वयंवर जनक सुतेचे

विष्णु अंश प्रभु राम -सीतेचे

*

भव्य मंडपी, नृप विश्वाचे

हर्षभरे ऋषी, जन मिथिलेचे

उभी जानकी, जनकाजवळी

मन भरले औत्सुक्याचे ||१||

*

शिवधनु ते अवजड सजले

जनकाने मग पण सांगितला

धनु पेले तो सीतेचा वर

ऐकताच नृप भयभीत झाले ||२||

*

उचलता धनु सारे ते थकले

लंकेशही अपमाने थिजले

यत्न वृथा तो क्रोधित झाले 

गुरुआज्ञेस्तव रामही उठले ||३||

*

अलगद हस्ते धनु उचलले

दोर लावता भंगच झाले 

कडाडता ते थक्कच सारे

प्रमुदित तर सर्व जाहले ||४||

*

जानकीने त्या क्षणीच वरले

मायपित्यासह पुढे जाहली

तनामनासह माळ अर्पिली

पुष्पवृष्टी स्वर्गातुनन विलसली ||५||

*

नाते स्वर्ग-धरेचे बनले

मिथिलेचे तर भाग्य उजळले

दिव्य स्वयंवर जनक सुतेचे

विष्णु अंश प्रभु राम सीतेचे ||६||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

कोल्हापूर 

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print