श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 106 ☆
☆ उधारी ☆
पसरून पंख दोन्ही घेतोय तो भरारी
आव्हान देत आहे सूर्यास भर दुपारी
ऋण वाटतो जगाला मी सावकार आहे
आई तुझ्या ऋणाची फेडू कशी उधारी
डोळ्यांत धाक आहे हृदयात प्रेम माया
तो बाप फक्त दिसतो वरवर जरा करारी
काळीज पोखरोनी घेतोय उंच डोंगर
अंधार पांघरोनी रस्ता उभा भुयारी
पाहून मत्स्यकन्या मी भाळलो तिच्यावर
प्रेमात सागराच्या येऊ कसा किनारी ?
अन्याय वाढलेला डोळ्यासमोर दिसतो
दुष्टास गाडण्याची नाही तरी तयारी
शस्त्रास दुःख होते पाहून रक्त धारा
माणूस होत आहे आता इथे दुधारी
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈