काही दिवसांपूर्वी एक हळदुल्या रंगाचा पक्षी आमच्या बाल्कनीत येऊन छानपैकी गोडगोड शिळ वाजवत बसायचा. अगदी नेमानं ठरल्यावेळी यायचा, गाणं गायचा आणि जायचा. बऱ्याचदा मी तेव्हा वाचत बसलेली असायचे. पण त्याचं गाणं सुरु झालं की माझं वाचन थांबायचं आणि नकळत त्याच्याबद्दल विचार चालू व्हायचे… तो इथंच का येतो… कुणासाठी येतो… बरं आला तर त्याच्यासाठी टाकलेले दाणेही खायचा नाही. नुसताच फाद्यांवर झोके घेत बसायचा आणि गाऊन निघून जायचा.
माझ्या चाहूलीने त्याची गानसमाधी भंग पावू नये म्हणून मी तिथं जाऊन त्याचा फोटो काढण्याचा आणि व्हिडिओ करण्याचा मोह टाळला. फक्त एकदाच हळूच दाराच्या फटीतून त्याची ओझरती झलक पाहिली. अतिशय सुंदर तेजस्वी असा पिवळा रंग पटकन नजरेत भरला. पक्षी चिमुकला खरा पण सौंदर्य केवढं! अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्या चाहुलीने तो उडाला आणि दूर लपून बसला. जेव्हा मी दार बंद करून माझ्या जागेवर येऊन बसले तेव्हा तो परत फांदीवर येऊन बसून गाऊ लागला.
मग मी काही मिनिटांचं त्यांचं असणं फक्त अनुभवायचं ठरवलं. त्याची गाण्यामागची आंतरिक उर्मी काय असेल याचा विचारही मी सोडून दिला. डोळे बंद करून फक्त ऐकत राहिले. त्या सुरांचा कानोसा घेत राहिले.
हळूहळू मनातच त्या गाण्यात कुठले शब्द बसतील, ते सूर विरहाचे की आनंदाचे, तो पक्षी पूर्णपणे कसा दिसत असेल अशी कल्पना चित्रं रंगवायला लागले. रोज पंधरा-वीस मिनिटं मी मनातल्या मनात रानावनात जाऊन वेगवेगळ्या पिवळ्या रंगाच्या पक्षांचा शोध घ्यायला लागले. उगाचच, काही कारण नसताना… ती पंधरा मिनिटं मला हिरव्या-पिवळ्या रंगाची वेगळीच दुनिया दाखवणारी ठरली. कधी प्रत्यक्षात बघितलेले झाडांच्या दाटीवाटीत बसलेले पक्षी, कधी चित्रपटातले, तर कधी इंटरनेटवर बघितलेले व्हिडिओ त्यातले सगळे फक्त पिवळ्या रंगाचे पक्षी आठवण्याचा प्रयत्न करू लागले. आणि काय गंमत, हे आठवताना फक्त पक्षीच नव्हे तर कितीतरी वेळा नदीचा काठ, निळं आकाश, रंगीत फुलं, हिरव्यागार फांद्या असंही काहीबाही दिसू लागलं. अर्थातच खूप छान निवांत असं वाटत होतं. मग मी माझ्या या अवस्थेला एक नाव देऊन टाकलं… ‘हळदुली समाधी’.
आणि मग काही दिवसांनी तो यायचा अचानकच बंद झाला. सुरुवातीला दोन-तीन दिवस थोडी हूरहूर वाटली पण मग ठरवलं याला आठवणीत बंदिस्त करावा आणि म्हणूनच त्या पक्षाने मला काय काय दाखवलं ते मी या कवितेत मांडलं——-