श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ वळ ☆
अजूनी माळरानातच, तुझा दरवळ कसा आहे
असे ही वाट काट्यांची, तनाचा छळ कसा आहे
जरी पाषाण हृदयी तो, तरी पाझर मनी त्याच्या
झऱ्याला अमृताच्या या, म्हणू कातळ कसा आहे
गळाचा पाहुनी गांडुळ, गळा तो फाडतो मासा
फणा काढून बसलेला, कळेना गळ कसा आहे
मला सोडून तू गेला, तुला विसरून मी गेले
तरीही काळजावरती, ठळकसा वळ कसा आहे
अजूनी यौवनातच मी, असा तो वागतो वेडा
वयाची उलटली साठी, तरीही चळ कसा आहे
छडीचा मार पाठीवर, तरी हा बोलतो सुंदर
विचारा गोंधळ्याला त्या, तुझा संबळ कसा आहे
विवाहाचे गणित साधे, विचारा प्रेम वेड्यांना
कधी ना पाहिला त्यांनी, तिचा मंगळ कसा आहे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈