श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ देहाचा बंगला ☆
तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा
हवे तसे झुकण्याची, तरी आहे तुला मुभा
तुझ्या कानांचे पडदे, त्यांना भेटतात वारे
वाजवती कडी हळू, पोचवती शब्द सारे
खोट्या शब्दांची संगत, नको धरूस रे बाबा
तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा…
मुखःद्वार अन्नासाठी, नको उघडे कायम
जठर हे माणसाचे, आहे पावन रे धाम
ज्याचे सपाट उदर, तेच पोट देते शोभा
तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा…
काळजाचे हे घड्याळ, त्याची टिक टिक भारी
नको चावी नको सेल, चालते ते श्वासावरी
नाही तुझ्या हाती काही, आहे ईश्वराचा ताबा
तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा…
अचानक बंगल्याला, आज गेला आहे तडा
काल भरलेला होता, आज रिकामा हा घडा
प्रियजनांच्या हातात, फक्त घेणे शोकसभा
तुझ्या देहाचा बंगला, केला ओळंब्यात उभा…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈