श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ कवितेचा उत्सव ☆ श्रीरंग खेळतो रंग ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
श्रीरंग खेळतो रंग, गोपिका दंग
जाहल्या चिंब, भिजूनिया अंग
श्रीरंग खेळतो रंग, श्रीरंग खेळतो रंग.
गातात गीत रानात, धरूनिया हात
देऊनी साथ, एक तालात, एक सुरात
गातात गीत रानात, नादांचे होती अभंग
श्रीरंग खेळतो रंग.
रंगात रंग उधळिती, कितीक त्या रीती
प्रीती अन् भक्ती, वात्सल्य पहा मिसळती
रंगात रंग उधळिती, मनी भाव असे उत्तुंग
श्रीरंग खेळतो रंग.
घन श्याम बरसतो आज, एक नवतेज
चढतसे सहज, सृष्टीवर साज
घन श्याम बरसतो आज, बरसती तृप्तीचे थेंब
श्रीरंग खेळतो रंग.
सृष्टीच गोपी अन् गोप, एक नव रूप
विणूनिया चैतन्याचा गोफ, विहरती समीप
सृष्टीच गोपी अन् गोप, लाभता गोपालांचा संग
श्रीरंग खेळतो रंग.
कधी एकचित्त जाहले, कुणा ना कळले
कसे मिसळले, मन मनात विरून गेले
कधी एकचित्त जाहले, मनास नलगे थांग
श्रीरंग खेळतो रंग.
शब्द न उरले, नुरली भाषा, शब्दातीत झाले
भाव मनीचे खुलले, तनमन कृष्णरूप जाहले
शब्द न उरले, नुरली भाषा, मौनातून जुळती बंध
श्रीरंग खेळतो रंग.
श्रीरंग सहज खेळतो, सहज निर्मितो
सहज भंगितो, सहज तो चराचरी वसतो
श्रीरंग सहज खेळतो, रंगात असूनी निःसंग
श्रीरंग खेळतो रंग, श्रीरंग खेळतो रंग.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈