मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 79 – बाप्पा…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #79 ☆ 

☆ बाप्पा…! ☆ 

बाप्पा तुझा देवा घरचा पत्ता

मला तू ह्या वर्षी तरी

देऊन जायला हवा होतास..

कारण..,

आता खूप वर्षे झाली

बाबांशी बोलून

बाबांना भेटून…

ह्या वर्षी न चूकता

तुझ्याबरोबर बांबासाठी

आमच्या खुशालीची

चिठ्ठी तेवढी पाठवलीय

बाबा भेटलेच तर

त्यांना ही

त्याच्यां खुशालीची चिठ्ठी

माझ्यसाठी

पाठवायला सांग…

बाप्पा…,

त्यांना सांग त्याची चिमूकली

त्यांची खूप आठवण काढते म्हणून

आणि आजही त्यांना भेटण्यासाठी

आई जवळ नको इतका हट्ट

करते म्हणून…,

बाप्पा तू दरवर्षी येतोस ना तसच

बाबांनाही वर्षातून एकदातरी

मला भेटायला यायला सांग..,

तुझ्यासारखच…,त्यांना ही

पुढच्या वर्षी लवकर या..

अस म्हणण्याची संधी

मला तरी द्यायला सांग…,

बाप्पा.., पुढच्या वर्षी तू…

खूप खूप लवकर ये..

येताना माझ्या बाबांना

सोबत तेवढ घेऊन ये…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

पाऊस टाळ मृदूंग

वाटे विठ्ठल माउली

माळकरी ते दंग

भासे देवाची सावली

 

पाऊस बडवी ढोल

पाऊस तडतड ताशा

कधी जोशात बोल

भासे मांडला तमाशा

 

पाऊस नाचे लावणीय

पाऊस दिसे लक्षणीय

रंभा उर्वशी नर्तकी

भासे अप्सरा स्वर्गीय

 

पाऊस पहाटे भूपाळी

निशेला जोड भैरवीची

पाऊस मेघ मल्हार

भासे बैठक सुरावटीची

 

पाऊस बासरी कान्हाची

कधी मोहक अवखळ 

पाऊस एकतारी मीरेची

भासे ओंकार निखळ

 

पाऊस प्रतीक मैत्रीचे

धरती गगन भेटीचे

पाऊस वाजवी सनई

भासे मिलन अद्वैताचे

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ☆ मृगजळ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मृगजळ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

दिसे दूर तो एक जलाशय

रूप मनोहर तसेच निर्मळ

भुलोनी जाऊ नको मानवा

ते तर आहे केवळ मृगजळ

 

संसार ही तर माया

धावू नकोस मृगजळापाठी

मोह तो तर क्षणिक सुखाचा

नलगे काही तुझ्याच हाती

 

झेलुनिया वादळ वारे

ताठ उभे तरूवर सारे

सुखदुःखात समभाव ठेवुनी

तू पण मनुजा उभा रहा रे

 

ईश्वरनिर्मित अवघी सृष्टी

आनंद असे जीवनाचा

जीवन परि हे आहे नश्वर

नको ध्यास मृगजळाचा

 

सत्य असे तो परमात्मा

असत्य बाकी सारे

धाव घेऊनी ईश्वरचरणी

मुखी रामनाम घ्या रे.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 103 ☆ प्रार्थना ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 103 ?

☆ गझल ☆

चंद्र परका चांदणेही पाहवेना

आजची कोजागरी का पेलवेना 

 

सोनचाफा आवडीचा फार माझ्या

मात्र आता गंध त्याचा साहवेना

 

वेढते वैराग्य की वय बोलते हे

वाट आहे तीच आता चालवेना

 

फोन माझा, चार वेळा टाळला तू

या मनाला काय सांगू सांगवेना

 

खूप झाला त्या  तिथेही  बोलबाला

मूक अश्रू ढाळलेले ऐकवेना

 

पूर्वजांचे मानले आभार मी ही

कंठ दाटे या क्षणाला बोलवेना

 

कावळा आलाय दारी घास खाण्या

आप्त आहे पण मला हे मानवेना

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तरी प्रश्न वेडा ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

? कवितेचा उत्सव  ?

☆ तरी प्रश्न वेडा ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

इथे सावलीला, सुखाच्या किनारी

तरीही जरासे,उभे ऊन दारी|

 

असे केवड्याला, सुगंधी कहाणी 

कशी वेढते रे, मिठी ही विषारी|

 

उगवत्या सकाळी, झळाळी नव्याची

धुक्याने स्वतःची, पसरली पथारी|

 

गुलाबी फुलांचे, गुलाबी इशारे

परी हाय काटा, रुते का जिव्हारी?

 

मनाच्या तळाशी, निराकार सारे

तरी प्रश्न वेडा, पुन्हा तो विखारी|

 

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ !!  प्रार्थना  !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ ?  !!  प्रार्थना  !! ? ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

भक्त जनांचा कैवारी तू

नमितो गजवदना

दुःख सरू दे गर्व हरू दे

स्वीकारी “प्रार्थना”

गणेशा, स्वीकारी प्रार्थना ||

 

सकल जनांचा तू अधिनायक

सकल कलांचा तू वरदायक

रिद्धी सिद्धीचा तू भवतारक

                 देवा दे दर्शना

गणेशा, स्वीकारी प्रार्थना ||

 

जन अपराधा उदरी घेसी

कृपाप्रसादे प्रसन्न होसी

मनात तुझिया अपार प्रीति

            देई तव दर्शना

गणेशा, स्वीकारी प्रार्थना ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 104 ☆ पावलांचे ठसे ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 104 ☆

☆ पावलांचे ठसे ☆

कालच तर

आपल्या सुखी पावलांचे ठसे

विस्तीर्ण सागरी किनाऱ्यावर

मखमली वाळूत

एकमेकांना मिठ्या मारत होते

 

सागरातून चार लाटा काय येतात

मिटवू पाहतात सारं अस्तित्व

पण त्यांना माहीत नाही

ते ठसे आम्ही डोळ्यांत जतन केलेत

आयुष्यभरासाठी

 

ते शोधण्यासाठी

आता समुद्र किनारी यायची गरज नाही

कोरलेत ते काळजाच्या आत

समुद्रा पेक्षा मोठा तळ आहे त्याचा

आमच्या दोघांखेरीज

तो तळ कुणालाच दिसणार नाही

 

तुम्ही आत उतरायचा प्रयत्न करू नका

बरमूडा ट्रायंगल सारखी परिस्थिती होईल

म्हणूनच सांगतो

तुम्ही तुमच्या जगात रहा

आम्हाला आमच्या जगात राहुद्या

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ (1) फसवाफसवीचा डाव (2) चेटूक – सदानंद रेगे ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

?  काव्यानंद  ?

 ☆ (1) फसवाफसवीचा डाव (2) चेटूक – सदानंद रेगे ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर

काव्यानंद  (श्री. सदानंद रेगे यांची कविता) 

[1]

फसवाफसवीचा डाव

तुझ्या एका हातात 

ऊन आहे

एका हातात

सावली आहे

मला माहीत आहे

माझ्याशी खेळलीस

तसलाच

फसवाफसवीचा डाव

तुला श्रावणाशी 

खेळायचा आहे..

 सदानंद रेगे….

[2]

चेटुक...

श्रावणाची सर

फुलांच्या पायांनी

येते आणि जाते

चेटूक करुनी..

 

पाने झाडीतात

पागोळ्यांची लव

फुलांच्या कोषात

ओलेते मार्दव….

 

वार्‍याच्या चालीत

हिरवी चाहूल

अंगणी वाजते

थेंबांचे पाऊल…

 

पिसे फुलारते

ऊन्हाचे लेकरु

लाडे हंबरते

छायेचे वासरु….

 

अभाळी झुलते

निळाईची बाग

इंद्रधनुला ये

रेशमाची जाग…

 

आणिक मनाच्या

वळचणीपाशी

घुमे पारव्याची

जोडी सावळीशी….

सदानंद रेगे

 ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर

२१ सप्टेंबर हा कवी सदानंद रेगे यांचा स्मृतीदिन.

त्या निमित्ताने, त्यांच्या काव्याचा रसास्वाद—–

वास्तविक ते नाटककार,लघुकथा लेखक,व्यंगचित्रकारही होते…पण साहित्यविश्वात ते कवी म्हणून अधिक ठसले. त्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य, वेगळेपणा म्हणजे,त्यांची मुक्त ,स्वैर कल्पनाशक्ती. वेगळा दृष्टीकोन. त्यांच्या कवितेत आढळणारा व्हिजन. मात्र त्यांच्या व्हीजनमधे त्याच त्याच मनोभूमिकेची बांधिलकी आढळत नाही .विषय एकच असला तरी कवितेतला आशय निराळा भासतो. कल्पनाशक्तीला चौफेर स्वातंत्र्य दिल्याचे जाणवते. कुठल्याही एकाच विचारात ती अडकून पडत नाही ती निरनिराळ्या कोनांतून व्यक्त होते. त्यामुळे सदानंद रेगे यांची कविता ही विशुद्ध वाटते. त्यांच्या कवितेतली भरारी अथवा कोलांटी ,यांचं कुतुहल वाटतं.

त्यांची कविता सर्वसमावेशक आहे. म्हणजे संस्कृती,परंपरा ,अस्मिता,आपली माती अशा वर्तुळात ती गिरक्या घेत नाही…ती संकुचीत नाही.विमुक्त आणि सर्वस्पर्शी आहे.मनमोकळ्या वार्‍यासारखी आहे.—-मात्र सदानंद रेगे यांची कविता ,गाभार्‍यातल्या जाड काळोखात ,प्रकाशाचे कण शोधावा तशी आहे..त्यांची कविता वाचताना जाणवतं, की कविता ही कवीचीचअसते. वाचकाचा असतो तो गर्भशोध. दडलेल्या आशयाचा शोध. कधी वाचकाची,कवीच्या मानसिकतेशी नाळ जुळते तर कधी ती अधांतरीही राहते. पण लहान ओळी,ओळीत गुंफलेले शब्द कधी मऊ,कधी भेदक–..पण त्यातून तयार झालेला हा काव्यसर वेगळ्याच तेजाने चमकतो.थक्क करतो.

फसवाफसवीचा डाव आणि चेटूक  या दोन्हीही कवितेत श्रावण आहे. पण एकाच श्रावणाच्या माध्यमातून ,व्यथेला पाहण्याची, विचार करण्याची दृष्टी मात्र वेगळी आहे. फसवाफसवीचा डाव हे  मुक्तछंदातील लघुकाव्य आहे.आणि चेटूक हे षडाक्षरी (षटकोळी) किंवा अक्षर

छंद काव्य आहे…

‘तुझ्या एका हातात ऊन आहे

एका हातात सावली आहे…’

–नियतीनं आयुष्यभर चकवलं. सुखदु:खाचे चटके दिले. चढउतार दाखवले. उन सावल्यांतून फिरवलं–असं हे विरोधाभासी आयुष्य जगताना, कवीला कुठेतरी श्रावणातल्या उनसावल्या जाणवतात. आणि हा फसवाफसवीचा खेळ मानवी जीवनात जसा आहे तसा निसर्गातही आहे याची समज मिळते. अगदी दहाच ओळीतला हा मानवी जीवनाचा निसर्गाशी असलेला संबंध श्रावणाकडे बघण्याची एक पलीकडची दृष्टी देतो. मानव आणि निसर्ग याची घातलेली ही सांगड मनात राहते.

‘श्रावणाची सर

फुलांच्या पायांनी

येते आणि जाते

चेटुक करुनी….’

—वास्तविक फुलं म्हणजे कोमलता. चेटूक या शब्दात उग्रता आहे. म्हणजे हे दोन्ही शब्द अर्थाने विरोधाभासी असले तरी कवितेच्या मानसिकतेत ते चपखल बसतात.

—मात्र सदानंद रेगे यांच्या फिनीक्सदुपाररस्ते, ब्रांकुशाचा पक्षी*, वगैरे कवितातून आढळणारे निखारे,ठिणग्या नागडेपणा ,काठिण्य  हे ,चेटुक या कवितेत आढळत नाही. त्यामानाने ही कविता सौम्य आहे.

–पागोळ्यांची लव, ओलेतं मार्दव, हिरवी चाहुल, थेंबांचं पाउल, उन्हाचं लेकरु, छायेचं वासरु, हे शब्द एकेका घुंगरासारखे मनावर नाद उमटवतात.कवितेतला हा इंद्रधनु, रेशमी श्रावण मनावर तरंगत असतानाच, शेवटच्या कडव्यात मात्र ,कवीच्या एकाकीपणाशी येउन थबकतो.

‘आणिक मनाच्या

वळचणीपाशी

घुमे पारव्याची

जोडी सावळीशी…’

—हा रेशीम मुलायम श्रावण, कुठेतरी तुटलेल्या क्षणांपाशी येउन थांबतो.अन् आठवणींचे हे  चेटुक कवीला वेदना देते असं वाटतं…

–त्यांचीच ‘अक्षरवेल’ या काव्यसंग्रहातील श्रावणावरचीच आणखी एक कविता सहज आठवते…

‘आला श्रावण श्रावण

गुच्छ रंगांचे घेउन

आता मेल्या मरणाला

पालवी फुटेल

गोठलेल्या आसवांना

पंख नवे येतील….’

–अशी आहे सदानंद रेगे यांची कविता!!—एकांगी किंवा एकात्म नसलेला ,विविधांगी,अनेक कोनी  व्हीजन त्यांच्या कवितेत सातत्याने जाणवतो….विषय एक पण अंतरंग निराळे…

— ‘ सूर्याच्या नरडीवर उमटलेले सावल्यांचे व्रण…” अशा पंक्तीही जाणीवेला अंकुर फोडतात…आणि एक तीव्र कळ घेउनच, सदानंद रेगे यांची कविता जाणीवेच्या पलीकडे जात राहते….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैफल तालांची… शंतनु किंजवडेकर ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ मैफल तालांची… शंतनु किंजवडेकर  ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

(एक अल्लड बोल-अभिनय गीत)

असे एकदा     स्वप्नी आले

तबला डग्गा    बोलु लागले 

नवथर बोटें     नाचु लागली 

तालांची मग   मैफल सजली 

               ***

त्रिताल बोले     ‘धा धिं धिं धा’

जसा चमकतो   रुपया बंदा

टाळी आणिक   ‘खाली’ मधला 

सम-प्रमाणी      शासक खंदा 

               ***

झप-तालाचे    रूप-आगळे 

दोन-तीनचे      छंद-वेगळे  

जणु-संवादे     वंदी-जनांना

धीना-धीधीना  तीना-धीधीना 

               ***

 रूपक   हसे-गाली

 पावलें   सात-चाली

 मारीतो  गोड-ताना

 तिंतिंना धीना-धीना   

                 ***

दादरा करीतो       भलता नखरा 

सहाच मात्रांत      मारीतो चकरा 

लाडीक स्वभाव   मोहक दागीना

धाधीना-धातीना  धाधीना-धातीना

                  ***

केहेरवा म्हणे       मी रंगीला

नर्तनातुनी           करतो लीला

चला नाचुया      एकदोन दोनतिन्

धागेनतिनकधिन् धागेनतिनकधिन् 

                  ***

एकताल मग   हसुन बोलला

राजा मी तर    मैफिलीतला  

मी तर देतो     भक्कम ठेका

चलन देखणे   माझे ऐका 

                ***

ताल-मंडळी   खुशीत सगळी

तबल्यामधुनी  बोलु लागली

समेवरी मग     अचूक येता

स्वप्न संपले      जाग जागली 

स्वप्न संपले      जाग जागली 

                ***

– शंतनु किंजवडेकर

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणेश विसर्जन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ गणेश विसर्जन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

नाद रंग अन उत्साहाचा , उत्सव चाले चोहीकडे

             परि या जल्लोषात हरवली, उत्सवमूर्ती कुणीकडे ——-

 

दहा दिवस त्या मांडवात ,बांधून घातले त्यालागी

             आज त्यास किती बरे वाटले, घरी जाण्याची घाई उगी —–

 

रात्रीपासून मोटारीवर बसवून त्याला ठेवियले

               सहनशील हा गजानन परि, आसन ना त्याचे ढळले —–

 

सकाळपासून जल्लोषाला पूर पहा हो किती आला

                वाजतगाजत जमले सगळे, उधाण आले उत्साहाला —–

 

मोटारीवर मुकाट बसुनी, गणपती सारे पहात होता

                 जाणवले त्यालाही होते, तो त्या गर्दीत चुकला होता —–

 

लेझीम-ढोल नि टिपरीचा तो तालही गर्दीमध्ये हरवला

                 धांगडधिंगा किती चालला, विसरलेच त्या गजाननाला —-

 

छंदच नित त्या ,सकल जनांना चकवीत असतो नशीब रूपे

                  म्हणे, “ आज मी स्वतःच चकलो, चकविती ही माझीच रूपे “—–

 

विचार करता करता थकुनी, गजाननाचा लागे डोळा

                   दचके जेव्हा जागे होता दिसे तळपता सुवर्ण गोळा ——

 

जाण्याचा की दिन पालटला, कसल्या भक्तांशी ही गाठ

                    जातो जातो म्हणतो तरिही सोडती ना ते त्याची वाट ——

 

“पुढच्या वर्षी नक्की येईन “ म्हणे “ एक परि शर्त असे

                    लैलामजनूची गाणी नको, मज सनई-चौघडा पुरे असे ——

 

बीभत्स वर्तन कुठे नसावे, मंगल वातावरण हवे

                     माझ्या नावे सर्वार्थाने जनजाग्रण व्हायाची हवे “—–

 

—- गजाननाचेही मन हाले, या भक्तांचा निरोप घेता

                   जलमार्गे जाताजाता त्या पाण्यावर हलती लाटा —–

 

—–” काल स्वतःतच आम्ही गुंगलो, जणू  त्याचाही विसर की पडला

                       आज तयाला निरोप देता, मनमांडवही रिताच झाला “ ——-

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares