मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुनरागमनायच  श्री प्रमोद जोशी

? कवितेचा उत्सव ?

⭐ पुनरागमनायच ? श्री प्रमोद जोशी ⭐

कशा पताका धागा सोडून आल्या खाली!

त्याना कळले …….आनंदाचा गेला वाली!

 

फुटे हुंदका पाट रिकामा…..पाहुन मखरा!

उदबत्त्याना सहन होईना….गंधित नखरा!

 

जाण्यासाठी यावे हा का….नियम तुला रे?

निर्माल्यास्तव उमलुन यावे नियम फुला रे!

 

रांगोळीचे विस्कटणे हा…….भाव मनाचा!

परतीच्या गाडीत कोंबणे……भार तनाचा!

 

मूर्ती नव्हती कधी मानली……कुटुंबीय तू!

अश्रद्धेच्या श्रद्धा होता………..वंदनीय तू!

 

श्रीफळ आता एकाकी बघ……पाटावरती!

विसर्जनाने येई अवकळा…….काठावरती!

 

विरहाची ही नाही कविता…..अस्फुट टाहो!

निरोप कुठला?स्वागत घेण्या लौकर या हो!

 

पुन्हा रोजचे जगणे आणि…….खोटे हसणे!

मिटून डोळे बघतो पुन्हा…….मखरी बसणे!

 

साथ सोडुनी दुर्वा आल्या…….पाण्यावरती!

शोक तरंगे अता सुखाच्या……गाण्यावरती!

 

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 13 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 13 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[६९]

शांत… नि:शब्द हो

माझ्या मना

हे विशाल वृक्ष म्हणजे

प्रार्थना आहेत.

 

[७०]

सुंदरते,

स्वत:ला शोधताना 

कशाला विसंबतेस

या तोंडापुज्या आरशावर

शोध ना स्वत:ला

प्रीतीमधून

 

[७१]

कुठली अज्ञात बोटे

हलकेच फिरतात

रेंगाळणार्‍या झुळकीसारखी

माझ्या काळजातून

उठवत तरंग गीतांचे

 

[७२]

नदीचं पात्र

भरभरून टाकणारे

हे जलद मेघ

लपवतात स्वत:ला

दूरातल्या डोंगरात

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रार्थना गणेशास… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रार्थना गणेशास… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

गजानना, तू वक्रदंता ,

   सज्ज झालो तुझ्या स्वागता!

सोंड हलवीत येई तू आता ,

  रूप तुझे सुखवी अनंता !

 

सुपा एवढे कान तुझे ते

  गंडस्थळ हे तुला शोभते !

तीक्ष्ण नजर तुझी रोखून बघते,

  स्वारी तुझी ही डौलातच येते!

 

देतो आम्हास चांगली बुद्धी ,

  तूच असशी तो संकटनाशी !

साकडे घालतो तुलाच आम्ही,

 नांदो,

स्वास्थ्य, आरोग्य, संपदा तिन्ही!

 

येतोस जरी काही दिवसापुरता,

 साथ दे आम्हा अखंड आता !

सोडवी संकटापासून या जगता,

 विनऊ आम्ही  तुला प्रार्थिता!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणेश प्रार्थना ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ गणेश प्रार्थना ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

बुद्धिच्या देवा तू गणनायका

सर्व दुःखहर्ता तू सुखकर्ता

सर्व मंगलकर्ता तू विध्नहर्ता

चौसष्ट कला धारका तू वक्रतूंडा

सर्व देवांचा अधिपती तू गणपती

प्रथम पुजेचा मानकरी तू प्रथमेशा

मनःशांतीचा सहाय्यक तू मोरेश्वरा

आठ जागी वससी स्वयंभू तू गणेशा

मुषकवाहना तू गणाधिशा

करामतींचा धनी तू गौरीपुत्रा

रिद्धीसिध्दींचा नायक तू भालचंद्र

राक्षस मारक तू धुर्मवर्णा

सर्व कामना पुर्तीकर्ता तू कामनापुर्ती

वरदायक तू वरदविनायका

सर्वांचा स्फुर्तीदाता तू मयुरेश्वरा

सकलजनांच्या चुका पोटी घेसी तू लंबोदरा

मंगलमूर्ती तू एक गजानना

मोदक तुज आवडती तू चिंतामणी

अनंत रुपे,अनंत नावे अपुरी माझी मती

क्रुपावंत हो तू दयाधना

???

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निरोप ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  कवितेचा उत्सव ? 

☆ निरोप ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आला गणराया

दहा दिवस राहिला

मंगलमूर्तीने

कोपरा उजळला…

 

आरत्यांच्या गजरात

टाळ मृदुंग नादात

नैवेद्याच्या सुगंधात

आनंदाची बरसात…..

 

हरल्या चिंता

हरले वाद

मन झाले मुक्त

होता गणाशी संवाद….

 

निरोपी एक वचन

कास धरु सत्याची

नको क्रोध मद मत्सर

कर्मे करु मानवतेची

 

गणेशाचे निर्गुणत्व

मृत्तीका जल तत्व

पूजीली मूर्ती सगुणाची

विसर्जनी पावे एकतत्व..

 

निरोप देता उदास मन

जरी माझे मोरया

दृढ विश्वासे विनवितो

पुढच्या वर्षी लवकर या……

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनंत चतुर्दशी -कवी अनामिक ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अनंत चतुर्दशी -कवी अनामिक ⭐ संग्राहक – सौ.शशी.नाडकर्णी-नाईक ⭐

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

 

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत – चतुर्दशी !

 

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा…

 

थोडा वेळ आहोत इथे

तर थोड जगुन घेऊया

बाप्पा सारखे थोडे

लाडु मोदक खाऊन घेऊया…

 

इथे सर्वच आहेत भक्त आणि

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा…

 

मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद…

 

जातील निघुन सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला…

 

बाप्पा सारखं नाचत यायचे

आणि लळा लावुन जायचे

दहा दिवसांचे पाहूणे आपण

असे समजून जगायचे…

 

किंमत तुमची असेलही

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ

अन् विसर्जित करतील तुमची राख…

 

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव

हा काळ दोन घडींच्या सहवासाचा………….

 

संग्राहक –  सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुढल्या वर्षी….. ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक 

? कवितेचा उत्सव ?

⭐ पुढल्या वर्षी….. ? श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

दहा दिवसांचा सोहळा

आता उद्या संपन्न होणार,

वाजत गाजत आले बाप्पा

वाजत गाजत जाणार !

 

          वेळ होता आरतीची

          कानी घुमेल झांजेचा नाद,

          गोडधोड प्रसादाचा पुन्हा

          पुढल्या वर्षी मिळेल स्वाद !

 

जातील परत चाकरमानी

घरी आपल्या मुंबईला,

येऊ पुढल्या वर्षी लवकर

सारे बाप्पाच्या तयारीला !

 

          घर मोठे गजबजलेले

          आता शांत शांत होईल,

          सवय होण्या शांततेची

          वेळ बराच बघा जाईल !

 

होता उद्या श्रींचे विसर्जन,

रया जाईल सुंदर मखराची,

पण घर करून राहील मनी

मूर्ती मखरातल्या गणेशाची !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

१८-०९-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 72 – किती उगा झुरायचे…? ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 72 – किती उगा झुरायचे…? ☆

(वृत्त – देवप्रिया, लगावली –गालगाल गालगाल गालगाल गालगा)

आठवात गुंतुनी,  किती  उगा झुरायचे

श्रावणातल्या सरी, तरी मनी  जळायचे….!

 

स्वार्थ साधण्यास गोड, बोलतात माणसे

प्रेम शोधुनी तयात का उगा रडायचे….!

 

मीच भक्ष जाहले , अनेक रंग पाहुनी

रंग बदलणे तुझे,  कधी मला कळायचे….!

 

कृष्ण भेटतो कुणास,द्रौपदीसमान त्या

तू स्वतःस रक्षण्या, स्वतःस ओळखायचे…!

 

पंख लाभता नवीन, पाखरे उडायची

प्रेत आठवातले तुला, पुन्हा छळायचे….!

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 89 – आयुष्याचे धडे . .  ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 89 – विजय साहित्य ?

☆ ✒ आयुष्याचे धडे . .  ! ✒  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 

आयुष्याशी घेतो बोलून

जगणे उसवत जाताना

शब्दांच्या अर्कात नांदतो

एकेक कविता जगताना. . . . !

 

सुखदुःखाचे चाळ बांधतो

अनुभव सारे टिपताना .

शब्दांच्या विश्वात राहतो

भावभावना सजताना.. . . . !

 

धगधगत्या जीवनाची गाथा

बाप आठवे रडताना.

आयुष्याचे धडे गिरवतो

माय माऊली स्मरताना. . . . !

 

जबाबदाऱ्यांचे ते कुंपण

या जीवनाच्या परिघाला.

शब्दांच्या परीघात रंगतो

ह्रदयसुता ही खुलताना.. . . . .!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू लाडका गणपती ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ तू लाडका गणपती ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

तुझ्या पूजनाने सारी कार्ये सिद्धीस जाती,,,

प्रथम पुजती सारे तुला तू लाडका गणपती,,,

 

चौदा विद्या चौसष्ट कलांचा तू अधिपती,,,,

सुखकर्ता दुःखहर्ता चिंतामणी असा तू लाडका  गणपती,,,,

 

रूपे विविध तुझी भक्तजना मोहवती,,,

करतो तू भक्तांच्या मनोकामना पूर्ती तू लाडका गणपती,,,,

 

रिद्धी सिद्धीचा नायक तू गुणा धिपती,,,,

नेवैद्य मोदकांचा तुला अर्पिती तू लाडका गणपती,,,

 

तुझ्या आगमनाचा आनंद मानावा आम्ही किती,,

फुलांची आरास दीपमाळा सजती तू लाडका गणपती,,,,

 

मूषकावर असे तुझी स्वारी तू मंगल मूर्ती,,,

टळो कोरोना संकट ही एकच विनंती तू लाडका गणपती,,,

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares