श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ जागतिक महिला दिना निमित्त – रणचंडिकेचा हात.. ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
पानोपानी, देठोदेठी शकूनी बसले,
करण्या कुरुवंशाचा नाश.
सांग द्रौपदी,काय फायदा निव्वळ देवोनिया शाप…..
कृष्ण सख्यालाही न्याय मिळविण्या,
इथे लागू लागली धाप.
सांग द्रौपदी……..
अंध नसूनही धुतराष्ट्र इथले
बैसले घेऊन गांधारीचा थाट
सांग द्रौपदी………
सद् रक्षणाची प्रज्ञा ज्यांची
ते भीष्म ही बसले कोनाड्यात
सांग द्रौपदी…..
हतबल झाले विदुर इथले
अन् बहुमताच्या करते
न्यायाचा संहार.
सांग द्रौपदी…….
मूकबधीर होऊन स्तंभ ही चवथा
दिसतो कर्णाच्या भूमिकांत.
सांग द्रौपदी……..
निस्तेज जाहले पांडव सगळे,
गांडिव, गदा,
गहाण पडली,सत्तेच्या दारात
सांग द्रौपदी,,,,,,,,,
सत्व युधिष्ठिराचे झाकोळले
पुरते मलिद्यांच्या अस्वादात
सांग द्रौपदी,,,,,,,
काय फायदा अरण्य रुदनाचा
शंढांच्या या बनात.
सांग द्रौपदी……….
सोड भूमिका हतबल द्रौपदीची.
अन् हो रण चंडिकेचा हात
सांग द्रौपदी…………
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈