मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवडसा ☆ श्री शुभम अनंत पत्की

श्री शुभम अनंत पत्की

? कवितेचा उत्सव ?

☆ कवडसा ☆ श्री शुभम अनंत पत्की 

चाहूल लागता दुःखाची,

धक्का हा सुखद कसा

सवय होताच अंधाराची,

डोकावतो कुठून कवडसा

 

झुंज एकाकी भावनेची

सर्वदूर रंग गडद जसा,

सलगी होताच वादळांशी

डोकावतो कुठून कवडसा

 

उद्विघ्नता ही अंतरीची,

जीव हेलावतो हा असा

घालमेल होता मनाची,

डोकावतो कुठून कवडसा

 

किरणे येती प्रखर सूर्याची,

हाती किरणोत्सव जसा

चाहूल लागताच सांजेची,

डोकावतो कुठून कवडसा

 

© श्री शुभम अनंत पत्की

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 67 – शब्दभ्रम ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 67 – शब्दभ्रम 

नको नुसते शब्दभ्रम करा थोडे तरी काम।

जनतेच जीवन वर किती कराल आराम।।।धृ।।

 

आश्वासनांची खैरात कशी वारेमाप लुटता।

निवडणुका येता सारे हात जोडत फिरता

कधी बोलून गुंडाळता कधी देता थोडा दाम ।।

 

योजनांची गंमत सारी कागदावरच  चालते।

भोळीभाबडी जनता फक्त  फॉर्म भरून दमते।

सरते शेवटी लावता कसा तुम्ही चालनचा   लगाम।।

 

सत्ता बदलली पार्टी बदली, पण दलाली तशीच राहिली।

नेते बदलले कधी खांदे पण लाचारी तिच राहिली।

टाळूवरचे लोणी खाताना , यांना  फुटेल कसा घाम।

 

जात वापरली रंग वापरला ,यांनी  देव सुद्धा वापरले।

 इतिहासातल्या उणिवानी,त्यांचे वंशज दोषी ठरले।

माजवून समाजात दुफळी,खुशाल करतात आराम ।

 

प्रत्येक वेळी नवीन युक्ती कशी नेहमीच करते काम ।

सुशिक्षितही म्हणतो लेका आपलं नव्हेच हे काम ।

म्हणूनच सुटलेत का हो सारेच  कसे बेलगाम  ।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 84 – विजय साहित्य – मोरपीस! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 84 – विजय साहित्य  ✒मोरपीस. . . !✒  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

? कै. वसंत बापट यांनी,  राज्य स्तरीय कवीसंमेलनात या कवितेस दाद देऊन मला ‘कविराज ‘ ही पदवी बहाल केली.  ?

मोरपीसं . . . !

दोन मोरपीसं माझ्याकडची. . .

एक होतं मस्तकावर

आशिर्वादाला आसुसलेलं . . .

दुसरं होतं अंगावर

अंगांगावरून फिरणार. . . !

एक मोरपीस पित्याचं. . .

मस्तकावर विसावलेलं.. .

दूर राहून बाळाला

नजरेच्या धाकात ठेवणारं. . . !

पित्याचा धाक

जशी पावसाची हाक. . .

कडकडाट, गडगडाट,  अन्

अश्रूंचा वाहे पाट. . . !

दुसरं मोरपीस मायेचं

क्षणात हळवं होणारं.. .

कुठल्याही टोकाला स्पर्श करा

पसा मायेचा धरणारं . . .

जरी गेलो दूर कुठेही

नजरेने पाठलाग करणारं.

हाक मारण्याआधीच

सत्वर धावून येणारं.. .

तरीही मला,

प्रेमाच्या धाकात ठेवणारं.. . !

मातेचा धाक. . . .  जशी गाईची कास

प्रेमी भरल्या मायेने

आकंठ स्तनपान करणारी. … !

जरा दूर जाताच

मनी हुरहुर लावणारी. . . !

सतत मला जपणारी . . .

अशी दोन मोरपीसं . . .

माझ्याकडची. . . !

ते वयच काही और होतं. . .

अवखळतेचं, अल्लडतेचं

बालिशतेचं, चंचलतेचं. . .

मोरपीसांना जपण्याचं. . .

त्यांच्या सोबत रमण्याचं…!

हळूहळू काय झालं, कुणास ठाऊक?

पावसाच्या हाका ऐकण्याआधीच

पाऊस झरझर कोसळू लागला. . .

आकंठ स्तनपान करण्याआधीच,

गाडग्यात पान्हा साठू लागला. . . !

या सार्‍याला, मीच कारणीभूत होतो.

जीवंत मोरपीस जपण्यापेक्षा.. .

स्वप्नातली मोरपीस कुरवाळीत होतो.

स्वप्नातली मोरपीस, वास्तवात आली .

सत्यात आल्यावर कळलं, . . .

अरे,  ही तर पीसं लांडोरीची

आयुष्याच्या सुवर्ण काली

माझ्या जीवनात  आलेली. . . . !

आत्ता, माझ्याही मुलाकडं

दोन मोरपीसं आहेत.

जाणिव होतेय. . . .

मी जपलेल्या मोरपीसांची..

मला फारच भिती वाटतेय

माझ्याच भविष्याची. . . !

कारण. . . .  आजकाल. . . .

मोरपीसं कुणी जपत नाही. . .

काचेच्या पेटीत ठेवतात. . .

शो म्हणून. . .  देखावा म्हणून. . .

शो म्हणून. . .  देखावा म्हणून. . . !! 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळीज तुकडा ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सौ.वंदना अशोक हुळबत्ते

? कवितेचा उत्सव ?

☆ काळीज तुकडा ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते 

काळीज तुकडा | दिला विहिणीनं|

करीन जतन | रत्ना परी ||

 

सून माझी जाई | नाजूक साजूक |

दिसते मोहक | फुला परी ||

 

सून म्हणे माय | जोडतसे नाते |

भांडणं करते | लेकी परी ||

 

लेकीच्या मायेने | वावरते नार |

उजळाया घर | आली सून ||

 

सून माझी गुणी | मायेनं वागते |

आपलं मानते | सासर हे ||

 

शेजार पाजार | संभाळून घेते |

निभवते नाते | प्रेमाने ती ||

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दं ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दं ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

मनातल्या पानावर

उतरत नव्हते शब्द

वेड्या मनाला माझ्या

सापडत नव्हते शब्द

शब्दांनी आज मुद्दामच

ठरविले न बोलण्याचे

का कोण जाणे? पण

उगीचच रागे भरले

लपंडावात या शब्दांच्या

मन पुरते अडकले

शोधता शोधता त्यांना

मन फार भरकटले गेले

शब्द… म्हणाले मज

गवसण्यास आम्हाला

ओलांडून वेस या नजरेची

घे भेट त्या सोनेरी क्षितिजाची

मग.. गुंफले शब्दांत शब्द

उमटले नवे बोल

मनातल्या पानावर. ..!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – ☆ सुजित साहित्य # 75 – आठवण ☆ – श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #75 ☆ 

☆ आठवण ☆ 

किती सांभाळावे स्वतःला कळत नाही

तुला आठवण हल्ली माझी येत नाही…!

 

तू येशील असे मला रोज वाटते बस्

तुला भेटण्याची ओढ जगू ही देत नाही…!

 

मी लपवून ठेवतो तुझ्या आठवणींचा पसारा

हे हसणे ही वरवरचे कितीदा रडू देत नाही…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भूतकाळाचा पिसारा ☆ स्व. दत्ता हलसगीकर

स्व. दत्ता हलसगीकर 

दत्ता हलसगीकर

(जन्म 7 ऑगस्ट 1934 – मृत्यु 9 जून 2012)

? कवितेचा उत्सव ?

☆ भूतकाळाचा पिसारा ☆ स्व. दत्ता हलसगीकर  ☆ 

भूतकाळाचा पिसारा फुलवून नाचलेले मोर

आता थकून गेले आहेत

आणि भविष्य तर थिजून गेलेले, आता

निर्माल्यावर पाण्याचा शिडकावा करून

आम्ही फुले टवटवीत करतो, त्या म्लान गंधातही हरवतो…

वसंत ऋतूच्या गोष्टी बोलताना किती हळुवार होतो आम्ही !

कष्ट उपसलेल्या रेषांचे हात ती दाखवते,

स्वप्ने थिजल्या माझ्या मोतीबिंदुच्या डोळ्यात ती डोकावते

विरळ झालेल्या तिच्या रुपेरी केसांना पाहून मी गहिवरतो.

माझ्या छातीवर सांडलेल्या तिच्या काळ्याभोर केसांचा पाऊस आठवतो.

माझ्या बरोबर चालताना थकून थकून गेलेल्या

तिच्या पावलांना मी रोज रात्री तेल चोळतो तेव्हा ती पोटभर रडते,,,,

उसवलेल्या माझ्या आयुष्याला तिने किती वेळा रफू केले..

या आठवणीच्या उमाळ्याने मी जवळ घेतो

तेंव्हा सुरकुतलेल्या तिच्या निस्तेज गालांवर लाली चढते.

उन आणि पाऊस, सकाळ आणि संध्याकाळ

आता वसतीला आली आहेत,

घर आवरून झाले आहे; हाक आली की आता उठून निघायचे ||

 

स्व. कवी दत्ता हलसगीकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 96 ☆ गज़ल ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 96 ☆

☆ गज़ल ☆

का उगा करतोस कांगावा

तू पुन्हा तो शब्द पाळावा

 

आरसा दावे अता भीती

जाणिवांचा हा असे कावा

 

सोहळा तारूण्य ढळल्याचा

साजरा होण्यास ही यावा

 

फारशी नसतेच मी येथे

तेथला येईल सांगावा

 

लादते आयुष्य पाठीवर

का कुणी शेर्पाच नेमावा?

 

तारका नांदोत आकाशी

जन्म हा धुलिकणच रे व्हावा

 

भाबड्या आहेत माझ्या कल्पना जगण्यातल्या

आडवाटा टाळल्याने राजरस्ते गाठले

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कधीतरी ☆ श्रीओंकार कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ कधीतरी☆ श्री ओंकार कुलकर्णी ☆ 

कधीतरी

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

सूर साठवून देतो

साद शिणल्या मेंदूला

ऐकतो गाणे एकाकी

एकटाच असलो जरी

 

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

 

रंग भरूनी घेतो

आसमंत डोळ्यामधी

चालते अशीच ही

एकटीच चित्रकारी

 

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

 

प्राणवायू भरूनी घेतो

फुफ्फुसामध्ये नासिकेतूनी 

लोम अनुलोमातूनी

रोम रोमात रोमांचकारी 

 

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

 

क्षणासाठी माझा असतो

चोचले जीवाचे पुरवूनी

जगतो जरा थोडासा

असलो सत्यात जरी

 

मी होतो माझा कधीतरी

असलो स्वप्नात जरी

 

©  श्री ओंकार कुलकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ? मनमंजुषेतून ?

☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

 “उन्हातल्या चांदण्याचा बहर” श्री. दत्ता हलसगीकर – भाग १

सामाजिक क्षेत्रात वावरत असताना एक कविता बऱ्याचदा भेटत गेली आणि त्या कवितेने मनात घरच केले. ती कविता होती

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळून आले

त्यांनी दोन गाणी द्यावीत ||

अशाप्रकारे सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी ही आशयघन कविता ज्यांची आहे ते आहेत सुप्रसिद्ध कवी श्री गणेश तात्याजी हलसगीकर उर्फ दत्ता हलसगीकर. सात ऑगस्ट १९३४ रोजी जन्मलेले दत्ताजी शेवटपर्यंत सोलापूरला राहत होते. त्यांनी सोलापूरातच लक्ष्मी विष्णू मिलमध्ये वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत नोकरी केली. त्यांना लिखाणाची आवड होती. किशोर वयापासून अखेरपर्यंत त्यांनी काव्यलेखन आणि ललित लेखन केले.

दत्ताजींच्या वागण्या बोलण्यात साधेपणा, सोशिकता, अगत्य होते तेच त्यांच्या कवितेतून व्यक्त होई. प्रेमळ, निर्मळ, सात्विक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

त्यांच्या काव्यरचना सोप्या, हळुवार,प्रवाही होत्या. त्यांनी आपल्या कवितेतून वंचितांचे दुःख मांडले. गोरगरिबांबद्दल कणव बाळगणारी यांची कविता मनाला भिडणारी, सामूहिक आवाहन करणारी आहे.

त्यांची कविता श्रमिकांपासून  श्रीमंतांपर्यंत भाष्य करताना जास्त खुलून येते. तर श्रमिकांबद्दल जास्तीच हळवी होते. जगण्याचा आनंद कशात आहे, जगणे कसे सुखकर करता येईल हे त्यांनी कवितेतून सांगितले. ‘ उंची ‘या कवितेतून त्यांनी ‘ ज्यांची बाग फुलून आली ‘ अशा देखण्या शब्दात सामाजिक परिस्थितीची जाणीव समाजाला करून दिली.

या कवितेने इतिहास घडवला आहे.२२भाषांमधे तिचे भाषांतर झालेले आहे. आकाशवाणीवरून ही कविता असंख्य वेळा वाचली गेलेली आहे. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ताजींचा सक्रिय सहभाग होता. वाराणसीत झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनात दत्ताजींनी हीच कविता वाचली होती.

☆ उंची ☆

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळुन आले

त्यांनी दोन गाणी द्यावीत ||

 

ज्यांच्या अंगणी ढग झूकले

त्यांनी दोन ओंजळ पाणी द्यावे

आपले श्रीमंत हृदय त्यांनी

रीते करून भरून घ्यावे ||

 

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते

त्यांनी थोडा उजेड द्यावा

युगायुगाचा अंधार जेथे

पहाटेचा गाव न्यावा ||

 

आभाळाएवढी ज्यांची उंची

त्यांनी थोडेसे खाली यावे

मातीत ज्यांचे जन्म मळले

त्यांना उचलून वरती घ्यावे ||

अतिशय तरल शब्दात त्यांनी सामाजिक जाणीवेचा वसा सांगितला आहे. त्यांची कविता समाज वेदनांनी व्यथित होतानाच वात्सल्याने भरून येते. अंधाराचे गाऱ्हाणे मांडताना प्रकाशाचे तोरण लावते.मातीशी इमान राखत आभाळाशी नाते सांगते. त्यामुळे त्यांचे शब्द कधी शीतल, सोज्वळ वाटतात तर कधी फटकारे मारणारे वाटतात.म्हणूनच

एकट्याने किती करावी जाग्रणे

झाडांशी अंगणे दुसऱ्यांची ||

असे परखड बोल ते सुनावतात.याच बरोबरीने

एवढासा अंधार मोठा होत गेला

त्याने सूर्य सुद्धा झाकून टाकला |

विनाशाची एवढीशी निसरडी वाट

एवढ्याशा छिद्राने रिता झाला माठ ||

असे चिरंतन जीवनज्ञानही ते सहजपणे सांगून जातात. एकूणच दत्ताजींची विचारसरणी सकारात्मक, वास्तवदर्शी आहे. कोणत्याही परिस्थितीत निराश न होता जिद्दीने पुढे जायचे हे सांगताना ते म्हणतात,

 मला अजून पहाटेची स्वप्ने पडत आहेत

थोड्याशा अंधाराने मी निराश नाही

अजून मला वसंताची चाहून लागत आहे

थोड्याशा पानझडीने मी हताश नाही ||

अशी त्यांची कविता एकाच वेळी आनंद आणि दुःखाचे प्रेरणादायी अनुभव देते आणि आपल्या मनातही सकारात्मकता जागवते.

क्रमशः ....

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares