मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 96 ☆ नांगराचा फाळ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 96 ☆

☆ नांगराचा फाळ ☆

नांगराचा फाळ घेते काळजावर

वेदनेचा मातिच्या गर्भात वावर

 

वेदने खेरीज येथे सृजन नाही

सृजन दुःखालाच देते फक्त ग्वाही

मातिचा आधार ज्याला तेच स्थावर

 

तू प्रवासी पाहुणा आहे घडीचा

डाव रोजच खेळतो आहे रडीचा

तू सुखाला मागतो आहेस सत्वर

 

मोह माया येत नाही सोबतीला

सत्य आहे जे मिळाले ह्या घडीला

दौलतीचा सोस आहे सांग कुठवर

 

पेटली ही लाकडे जेव्हा स्मशानी

थांबली ही माणसे बघ दूर स्थानी

पेटलेला देह आहे फक्त नश्वर

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जपताना शब्द ☆ श्रीशैल चौगुले

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ जपताना शब्द ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

जपताना शब्द

मनातला एक एक

लेखणीत काव्य

ऊतरते प्रत्येक.

काजवा होऊनी

भावनांचे रंग

तिमीरा भेदतो

चैतन्याचे अंग.

ओंजळीत ओळ

काहूर कल्लोळ

कवणांची रात्र

प्रहरीचे लोळ.

चांदण वेलीत

मन चंद्रकोर

हृदया बिलगे

शब्दांचा चकोर.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खांब – स्व शांताबाई शेळके ☆ प्रस्तुति – सौ.वंदना हुळबत्ते

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

स्व शांताबाई शेळके

? कवितेचा उत्सव ?

☆ खांब ☆ स्व शांताबाई शेळके 

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

बाईच्या ओठांआड दडलेले असते रडणे

वर वर हसणे आणि आतल्या आत कुढणे

आल्यागेल्यांचा सत्कार बाई स्वत: करते

घरभर वारे होऊन ती सतत फिरते

नवरा,मुले,सासू,सासरे तिलाच साद देतात

रात्रंदिवस तिचे विनामोबदला घेतात

आजाऱ्याच्या उशापाशी दिवा होऊन जागते

भल्या पहाटे उठून पुन्हा बाई कामाला लागते

‘ रांधा वाढा उष्टी काढा’ चे कपाळावर गोंदण

राबण्याचा गाव तिला लग्नात मिळाला आंदण

गोंदणात खुलत असतो सूर्य गंध टिळा

चार काळ्या मण्यांनीच साजरा दिसे गळा

तिच्या अहेव चुड्याआड मनगट असते घट्ट

‘ सारे मीच करीन’ तिचा जन्मजात हट्ट

कुशीत भार वाहुन देते वंशाचा दिवा

पुढच्या अनेक पिढ्यांसंगे तीच जुळविते दुवा

भुईत पाय रूजवून ती आभाळात फुलते

देहाचाच खांब करून अवघे घर तोलते

  चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia

स्व. शांताबाई शेळके

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शांताबाई शेळके यांची कविता – समंजस ☆ स्व शांताबाई शेळके

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

स्व शांताबाई शेळके

? कवितेचा उत्सव ?

समंजसस्व शांताबाई शेळके 

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

 दुःख समंजस माझे

नाही फिरविली द्वाही

कधी आले आणि गेले

मला कळलेही नाही

 

मला कळलेही नाही

उरे पुसटशी खूण

…..फक्त फिकट चांदणे

…..फक्त मंदावले ऊन.

    चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia

स्व. शांताबाई शेळके

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तोच चंद्रमा नभात – समंजस ☆ स्व शांताबाई शेळके

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

स्व शांताबाई शेळके

? कवितेचा उत्सव ?

☆ तोच चंद्रमा नभात ☆ स्व शांताबाई शेळके 

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी

एकांती मज समीप तीच तू ही कामिनी

 

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे

छायांनी रेखियले चित्र तेच देखणे

जाईचा कुंज तोच तिच गंध मोहिनी

एकांती मज समीप तीच तू ही कामिनी

 

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे

मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे

ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी

एकांती मज समीप तीच तू ही कामिनी

 

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा

वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा

गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतूनी

एकांती मज समीप तीच तू ही कामिनी

    चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia

स्व. शांताबाई शेळके

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – अशा होत्या शांताबाई !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – अशा होत्या शांताबाई !! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

जणू वडीलधारी आक्का किंवा ताई

अशा होत्या शांताबाई !!

 

दिसणे त्यांचे राजसवाणे

हसणे त्यांचे लोभसवाणे

काव्या मधले स्निग्ध चांदणे

मुखावरती जणू विलसणे

त्यांची गाणी,त्यांची वाणी घंटा किणकिणत जाई

अशा होत्या शांताबाई !!

 

ती बालगीते, ती लावणी

ती प्रेमगीते, ती विराणी

विचार, प्रज्ञा,सौंदर्य, माधुरी

यांची सुरेल हातमिळवणी 

या साऱ्यांचा चित्ताकर्षक काव्यौघ खळाळत जाई

अशा होत्या शांताबाई !!

 

कथा-कादंबरी, गीते-कविता

ललित लेख,अनुवाद समीक्षा

प्राध्यापिका,बालसाहित्यिका

भावसंपन्न साहित्य,रसिकता

एका बिंबातून असंख्य प्रतिमा उमटत जाई

अशा होत्या शांताबाई !!

 

विरहाला या नाव नसे

अंतरीचा हा भाव असे

या हृदयीचे त्या हृदयासी

भावबंध जुळाले जसे

मुकुट मस्तकी ल्याली शारदा ‘शांत-रत्न’ झळाळून जाई

अशा होत्या शांताबाई

अशा होत्या शांताबाई!!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शांताबाई शेळके यांची कविता – आज वाटते पुन्हा बघावी ☆ स्व शांताबाई शेळके

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

स्व शांताबाई शेळके

? कवितेचा उत्सव ?

☆ आज वाटते पुन्हा बघावी ☆ स्व शांताबाई शेळके

(१२ अक्टूबर १९२२ – ६ जून २००२)

आज वाटते पुन्हा बघावी

सळसळणारी हिरवी शेते

आणि पडावी कानावरती

झुळझुळणारी निर्झरगीते

 

      कडेकपारी घुमवित यावा

      रानांतिल पवनाचा नाद

      आणि तयाने मनिंच्या निद्रित

      मृदूभावांना द्यावी साद

 

मोहरलेल्या  आंब्याखाली

शीतळशा छायेत निजावे

उग्रमधुर गंधाचे आसव

सर्वांगानी पिउनी घ्यावे.

 

      आकाशाचा गूढ नीलिमा

      अर्धोन्मीलित नयनी देखत

      घटकेमागून घटिका जावी

      स्वप्नांच्या मधुमाला रेखित

 

हृदयामधल्या निर्माल्याची

फिरूनी व्हावी सुमने ताजी

मनभृंगाने स्वैर तयावर

भिरभिरता घालावी रूंजी

 

    हाय परी ते स्थान लाडके

    आज दिसावे पुनरपि कैसे!

    फिरूनी कसे आणावे सान्निध

    स्वप्नदर्शि यौवनही तैसे?

    चित्र साभार – Shanta Shelke – Wikipedia

स्व. शांताबाई शेळके

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देह झिजतो ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ देह झिजतो ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

 

योजना योजून कोणी खेळ बदले गोमटे

जिंकताना देह झिजतो निघत जाते सालटे

 

जंगलाच्या भव्यतेची ज्यास सत्ता लाभली

बांधले तेथेच त्याने शांत त्याचे खोपटे

 

लावणारा लावतोना भोगण्याला सावली

अंगणाच्या कोपऱ्याला वाढणारे रोपटे

 

पुण्य सारे साठवाया थोर केली साधना

चोरण्या साठीच आले आस-याला भामटे

 

राजमार्गी चालण्याची ज्यास मिळते पावती

रोखण्याला धाव त्याची लाल होती बावटे

 

का विरोधी लोकशाही मांडताना भांडती

लावती मागे जगाच्या खूप त्यानी झेंगटे

 

घेतले खावून ज्यांनी तेच झाले बावळे

ताप देती रोज आता भाजलेले पावटे

 

माणसाने माणसाचा तोडला विश्र्वास का

तेरडा होवून तो ही रंग त्याचा पालटे

 

(देवप्रिया/कालगंगा)

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 66 – बाळ गीत – शाळेत जाऊ द्याल का? ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 66 – बाळ गीत – शाळेत जाऊ द्याल का?

आई बाबा आई बाबा

पाटी पेन्सिल घ्याल का!

पाटीवरती घेऊन दप्तर

शाळेत जाऊ द्याल का!

 

भांडीकुंडी भातुकली

आता नको मला काही।

दादा सोबत एखादी

द्याल का घेऊन वही।

 

नका ठेऊ मनी आता

मुले मुली असा भेद।

शिक्षणाचे द्वार खोला

भविष्याचा घेण्या वेध।

 

कोवळ्याशा मनी माझ्या

असे शिकण्याची गोडी।

प्रकाशित जीवन  होई

ज्योत पेटू द्या ना थोडी।

 

पार करून संकटे

उंच घेईल भरारी।

आव्हानांना झेलणारी

परी तुमची करारी।

 

सार्थ करीन विश्वास

थोडा ठेऊनिया पाहा।

थाप अशी कौतुकाची

तुम्ही  देऊनिया पाहा।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुलाल ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ गुलाल ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

मोहरला,खुलला,फुलला

अंगणी गुलाल उधळला.

 

      पेटून उठली अग्नीफुले

      हिरव्या पानामधून ज्वाळा

      धगधगता हा यज्ञकुंड

     जणू नीलमंडपी सजला

     अंगणी गुलाल उधळला

 

कोण चालली युवती अशी

सोडून गुलाबी पदराला

की स्वाराच्या पागोट्यासम हा

वार्यावरती फडके शेला

अंगणी गुलाल उधळला

 

      लाल पताका फडकावीत

      हा खुणवितो वसुंधरेला

      जणू मेघांची येता चाहूल

      पायघड्या हा घालीत आला

     अंगणी गुलाल उधळला

 

लाल चुटूक ओठ कुणाचा

उगीच कसा तो आठवला

लाल गुलाबी रंगामधूनी

प्रतिक प्रीतिचा बहरला

अंगणी गुलाल उधळला

 

        हा खुलला,फुलला आणिक

        हा मुक्तपणाने उधळला

        जणू उषेचा रक्तवर्ण हा

        संध्येसाठी लेऊन बसला

        अंगणी गुलाल उधळला

 

मोहरला,खुलला,फुलला

अंगणी गुलाल उधळला.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares