प्रा. अशोक दास
☆ कवितेचा उत्सव ☆ विश्व सारे सुखी व्हावे ☆ प्रा. अशोक दास ☆
काळ अनंत आहे,अजर अमर आहे!
त्याच्या उदरात दिवस, महिने, वर्षे
वर्षे येतील तशी जातील चिंता कशाला?
उगीचच भूत, भविष्याचा विचार कशाला?
प्रत्येक नवे वर्ष वर्तमान घेऊन येते
काळ त्याला आशिर्वाद देतच असतो ना ?
कालच्या वर्षातील सारे वाईटपण संपावे
उत्तमोत्तम होते ते सगळे मनात साठवावे.
मागचे वर्ष आपल्याला खूप काही शिकवून गेले
चांगल्याचे,वाईटाचे धडे सर्वांना देऊन गेले
अहो, पानगळ होणार म्हणून झाड कधी रडते का?
नवी पालवी नक्की येणार, मनास विश्वास नसतो का ?
कडकडीत उन्हाळे येतात, सर्वांना भाजून जातात
पण वर्षाऋतू येतोच येतो, सर्वांना थंड करतोच ना ?
कालचे वाईट विसरूया, चांगले ते ध्यानी धरूया
नव्याने स्वागत करताना मने उदार ठेवूया.
कल्याण व्हावे सर्वांचे, हीच अपेक्षा ठेवूया
विश्व अवघे सुखी व्हावे, एक आकांक्षा बाळगुया.
© प्रा. अशोक दास
..इचलकरंजी
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈