मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंगपंचमी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ कवितेचा उत्सव ☆ रंगपंचमी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

अशाच एका सायंकाळी,

अवचित गेली नजर आभाळी!

दिसला मज तो वनमाळी ,

खेळत रंगांची ही होळी !

 

करी घेऊनी ती पिचकारी,

होई उधळण ती मनहारी !

सप्तरंगांची किमया सारी,

रंगपंचमी दिसे भूवरी !

 

सांज रंगांची ती रांगोळी,

चितारतो तो कृष्ण सावळी !

क्षितिजी उमटे संध्यालाली,

पश्चिमेवर तो सूर्य मावळी !

 

फाल्गुनाच्या उंबरठ्यापाशी,

सृष्टी अशी रंगात बरसली !

घेऊन नवचैतन्याच्या राशी,

चैत्र गुढी ही उभी राहिली !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 91 ☆ दानत नाही ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 91 ☆

☆ दानत नाही ☆

ब्रह्मानंदी अजून टाळी वाजत नाही

श्रद्धेखेरिज मूर्ती त्याची पावत नाही

 

संपत नाही काही केल्या माझे मीपण

मला कळेना सहज ध्यान का लागत नाही

 

कृपादृष्टिची पखरण केली भगवंताने

तरिही कष्टी मोर मनाचा नाचत नाही

 

ओंकाराचा ध्वनी ऐकण्या आतुर असता

गोंगाटाचे ढोल नगारे थांबत नाही

 

हुंडीमधले दान मोजणे कुठे उरकते

याचकासही द्यावे काही दानत नाही

 

पाप धुण्याची प्रत्येकाला ओढ लागली

किती प्रदूषित गंगा झाली सांगत नाही

 

द्विभार्या ह्या जरी दडवल्या टोपीखाली

वेळप्रसंगी सांगायाला लाजत नाही

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 14 – अव्यक्त!!! ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 14 ☆

☆ अव्यक्त!!! ☆

आतमधून, अगदी आतमधून

उचंबळून आल्याशिवाय….

भावनांच्या लाटेवर उंचच उंच

स्वार झाल्याशिवाय …

शब्दांचा कोंडमारा मनात

असह्य होत असला तरीही

उतरत नाही एखादी कविता

कागदावर अलगद हळुवारपणे

मी वाट पाहतोय तिच्या जन्माची

सहन होईनाशा झाल्यात आताशा

या कळा…. किती काळ????

मी अव्यक्त राहतोय अजूनही..

तिच्यासाठी नाही निदान माझ्यासाठी तरी प्रसवावं तिनं स्वतःला लवकरच

म्हणजे मी होईन रिकामा

एखाद्या नव्या कवितेच्या वेणांसाठी…

© शेखर किसनराव पालखे 

सतारा

06/04/20

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – विडंबन कविता-किचनेशा… ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – विडंबन कविता – किचनेशा (एक जुनी आठवण) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

मूळ कविता – किति यत्ने मी पुन्हा पाहिली तूते, लीनते, चारुते, सीते ।।

 

——-      किति दिवसांनी तुला पाहिले गँसा,  प्रिय माझ्या रे किचनेशा ।।

——–    तू गेल्याचा अजुनि आठवे दिवस, लाविला हात कर्मास।

——–    पाहुणे घरी आले होते खास, मज आठवला विघ्नेश

——–    भोवती स्टोव्ह हे जमले, ते फरफरले, फुरफुरले

——–    तोंडास लागले काळे,मग रोजच रे असली अग्निपरीक्षा  ॥१॥

 

——–    संदेश तुला किती किती पाठवले. नाही का ते तुज कळले?

——–    की कोणि तुला मधुनिच भुलवुन नेले?मी येथे तिष्ठत बसले

——–    भाकरी नीट भाजेना, कुकरची शिटी होईना, झाली बघ दैना दैना

——–    का विरहाची देशी असली शिक्षा,प्रिय माझ्या रे किचनेशा ॥२॥

 

——–    आणि एके दिवशी——

——–    दूरात तुझा लाल झगा झगमगला, जिव सुपा एव्हढा झाला

——–    मी लगबगले, काही सुचेना बाई, महिन्याने दर्शन होई.

——–    ओटा धुतला, स्वच्छ शेगड्या केल्या,कौतुके तुला मी पुसला.

——–    ज्योत तुझी निळसर हसली, महिन्याची शिक्षा सरली,

——–    मुखकलिका माझी खुलली, मनमुक्त अता फिरेन मी दाहिदिशा

——–    प्रिय माझ्या रे किचनेशा ॥३॥

 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – रंगपंचमी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – रंगपंचमी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

रंगात रंग मिसळले

जाहल्या गोपीही श्रीरंग

मीपण तूपण सरले

झाले अवघे विश्व अभंग

 

ही होळी जाळो विद्वेषाला

नांदो ऐक्य जनी

हीच कामना मनी

माझिया हीच कामना मनी

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 39 ☆ प्रेम रंगात रंगले मी… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 39 ☆ 

☆ प्रेम रंगात रंगले मी… ☆

मीरा वदे, श्रीकृष्णासी

नको करू, मज वनवासी

एकरूप होऊ, जवळ घे मजसी…०१

 

प्रेम रंगात रंगले मी

माझी न, राहिले मी

तन-मन तुज वाहिले मी…०२

 

कृष्णा केशवा, देह तुलाच दिला

आता हा, तुझाच रे बघ झाला

आस तुझीच, या जीवाला…०३

 

तुझ्यासाठी हलाहल पिले

राजमहाल, वैभव सोडले

आता सांग ना, काय मग उरले…०४

 

माझी नश्वर कुडी अर्पण

करिते निर्भेळ समर्पण

पाहते, तुझ्यात दर्पण…०५

 

तू कृष्ण मनोहर

मला हवा, तुझा आधार

तुझ्याविना, जगणे लाचार…०६

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ होलिकोत्सव विशेष – होलीकोत्सव…दोलोत्सव…. ☆ प्रस्तुति – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ होलिकोत्सव विशेष – होलीकोत्सव…दोलोत्सव…. ☆ प्रस्तुति – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

वाचताना वेचलेले:

अरुणा ढेरे यांच्या ‘अर्ध्या वाटेवर’ या विविध ललित लेखांच्या संग्रहातील जीवन – मृत्यूचा दोलोत्सव —

वसंत यायचा आहे आणि शिशिर सरलेला आहे. काळाच्या लयबद्ध गतीतून अगदी स्पष्ट जाणवतो आहे हा सांधा!जणू एक पाऊल उचलले आहे, दुसरं टेकायचं आहे- यांच्यामधला एक अधांतरी तरी क्षण!

अरुणा ढेरे यांनी या होळीच्या सणाची सांगड मातीशी जोडली आहे. हा काळ गर्भाधानाचा! एका वर्षातून दुसऱ्या वर्षाचा जन्म!

आपल्यातून नव्हे तर आपली नाळ जिच्याशी जोडली आहे त्या त्या मातीतून बीज रुजते. शिशिराच्या विनाशातून पुन्हा वसंतात फुलून उठणार आहे ही माती! गर्भिणी होणार आहे! सृष्टीची वासनाच जणू पेटलेली! तिचा प्रतीक सरळ उभ्या सोटासारखं झाड आणि वर धान्याची पुरचुंडी, आणि आंब्याचे तोरण!होळीच्या सणाचा संबंध सुफलनाशी आहे! विधीपूर्वक होळी पेटवून तिची पूजा करणे म्हणजे सृष्टीतल्या कामाग्नीचीच  पूजा करणे होय. कारण या अग्नीतून सृष्टीची नवनिर्मिती आहे. होळीतील स्त्री-पुरुषांचा एकत्र वावर थोडा  सैलावलेला असतो. कोळीणी डोक्यावरच्या मडक्या मध्ये दिवा पेटवून मिरवणुकीने होळी कडे जातात आणि त्या मडक्यांचा आहेर होळीला देतात माहेरवाशीण म्हणून! जणू ते आत दिवा असलेलं मडकं म्हणजे आपलंच गर्भाशय! होळी फाल्गुनात येते. सूर्य पौरुषाचे प्रतीक! हा काळ सृष्टीच्या बीजधारणेचा काळ! हा बीज धारणे चा उत्सव म्हणजे होळीचा उत्सव असतो!

सृष्टीची ही मिलनोत्सुक काम मोहित अवस्था संस्कृतीच्या विकासात आपोआप स्वीकारली गेली. पुढे स्त्रियांच्या वर्चस्वातून  पुरुषांच्या वर्चस्वाकडे संस्कृतीचा प्रवास झाला आणि प्रतीकात्मक विधि उरले!

एकीकडे होळीत मिसळत गेला राधा कृष्णाच्या प्रीतीचा एक रंग! कृष्ण विष्णु रूप आहे आणि विष्णू हाच स्वयम् काम आहे! म्हणून प्रणयाचा खेळ कृष्ण खेळतो. तो आमचा लोकसखा आहे. नाना रूपांनी तो प्रकट होतो. सगळे प्रापंचिक सुखदुःख विसरून प्रेमाच्या एका विराट रंगपंचमीत कृष्णानं सर्वांना भिजवून टाकलं! राधेला भिजवलं पण मनोमन राधा होणाऱ्या प्रत्येकाला  भिजवलं! व्यक्तिगत आणि सामूहिक प्रेमाचा एक अद्भुत रंग कृष्ण सहजतेने खेळला! बालपणीच दुष्ट पूतना राक्षसीचा त्याने प्राण घेतला, त्या प्रसंगाची आठवण म्हणजेच होळी! अभद्रावर भद्रा ने केलेली मात म्हणजे होळी!

होळी हा अमंगलाच्या मरणाचा उत्सव आहे. जीवनाच्या जयाचा उत्सव आहे. बंगाल मध्ये झोपाळ्यावर झुलतो कृष्ण आणि होळीचा ‘दोलोत्सव’ होतो हे जीवनाचं आंदोलणं आहे. उत्तर भारतातील रंगाची होळी राधा कृष्णाच्या प्रेम रंगाची आठवण म्हणून खेळली जाते.

जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जीवनाने घेतलेला  एक  सुंदर झोका म्हणजे होळी! शिशिर आणि वसंताच्या मध्ये काळाने घेतलेला झोका म्हणजे होळी! वासना आणि प्रीती यांच्यामध्ये संस्कृतीने घेतलेला झोका म्हणजे होळी!

अरुणा ढेरे यांनी होलिकोत्सवाच्या संदर्भात लिहिलेले  ‘होळी’ सणाचे रूप मनोमन पटले! म्हणून  त्यांच्या लेखाचा  हा संक्षिप्त शब्दरूप भाग!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – विडंबन कविता-दिवस सेलचे सुरु जाहले… ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – विडंबन कविता – दिवस सेलचे सुरु जाहले – बायांचे मन प्रसन्न झाले ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

मूळ कविता –    दिवस सुगीचे सुरु जाहले – शेतकरी मन प्रसन्न झाले–

                                खळखळ ,छमछम,डुमडुम,पटडुम लेझीम चाले जोरात।

                                                                                      कवी- ग.ह. पाटील.

——-                  दिवस सेलचे सुरु जाहले

——-                  जिकडे तिकडे बोर्ड झळकले

——-                  बायांचे मन प्रसन्न झाले

——                   पटकन, झटकन, भर्कन, सर्कन

——                    विक्री होतसे जोरात   ।।

——                    नऊ वाजता शटर उघडुनी,

——                    गाद्या, गिरद्या साफ करोनी

——                    सुंदर साड्या बाहेर टांगुनी

——                    सेल्सगर्ल्स बसल्या थाटात।।

——                    नाश्ता, सैपाक धुंदीत उरकुन

——                   ‘त्या’च्या कडुनी रक्कम उकळुनी

——                    मैत्रीणीना कॉल करूनी

——                    भरभर, तरतर, लवकर, गरगर

——                    फिरति सख्या बाजारात ।।

——                    इथे हकोबा, तिथे बांधणी,

——                    गर्भरेशमी किंवा चिकणी,

——                    वस्त्रांची राणि ही पैठणी

——                    सुळुसुळु, झुळुझुळु, हळुहळु, भुळुभुळु

——                    ढीग संपतो तासात  ।।

——                    विटकि,फाटकी, कुठेकुठे-

——                    घरि आल्यानंतर कळते

——                    कपाट जरि भरभरुन वाहते

——                    भुलवी, झुलवी, खुळावणारा

——                    सेल अखेरी महागात  ।।

 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – अशी ही होळी… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – अशी ही होळी… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

आतंकवादा ची लाकडे

जातीयवादा च्या गोवऱ्या

धर्मांधतेचा घालून नारळ

तिरस्काराची टाकून गोळी

पेटवाहो जागोजागी होळी

 

अर्पण करू तिला द्वेषाची माळ

सदभावनेची घालून त्यात राळ

मोठा होउ द्या एकात्मतेचा जाळ

रुजवू संयमाने माणुसकीची नाळ

 

पारिवारिक स्नेहा ची पुरणपोळी

वर आत्मियतेेच्या तुपाची धार

कर्तव्य परायणतेचा कडकं वडा

वर आपुलकीची थंडाई गारेगार

 

परंपरा संस्कृतीचा तो वरणभात

संगीत ,नृत्य,विनोदाची ती चटणी

आग्रहाचा पापड ,स्नेहाचे लोणचे

मग रंगेल होळीची ती मेजवानी

 

संतांच्या शिकवणीचा तो गुलाल

लावून रंगू ,धरू ताष्यावर ताल

भिजूनचिंब पिऊ हो प्रेमाची भांग

आनंदात होळीच्या होऊ सारे दंग

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – एकदा एक सज्जन माझ्या घरी आले ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – एकदा एक सज्जन माझ्या घरी आले ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

एकदा एक सज्जन माझ्या घरी आले

कविसंमेलनाला चला, टी.ए. डी ए. देईन म्हणाले.

मी म्हणाले, ‘छान छान कवितेचे भाग्य उजळले

कवी मंडळींनाही आता बरे दिवस आले.’

माळ्यावर चढले, ट्रंक उघडली.

बाड काढले, धूळ झटकली.

टाळीच्या कविता शोधत, निवडत संमेलन स्थळी आले. …

एकदा एक सज्जन…

 

दारात होते किती रसिक आणि दर्दी

मागाहून कळले, ती सारी कवींचीच गर्दी

कवींनी घेरले, मंडपात नेले

रिकाम्या खुर्चीत नेऊन बसवले. ….

एकदा एक सज्जन…

 

इतक्यात ते सज्जन आले आतून

म्हणाले, ‘खुर्चीला यांना टाका खिळवून

शंभर  कविता ऐकवा मोजून

शंभर रुपये , टी.ए. डी ए.चे यांना उगीच नाही दिले.’ ….

एकदा एक सज्जन…

 

सज्जन मग कवींकडे वळून

म्हणाले, ‘आता माझे दहा -दहा रुपये, टाका बर देऊन’

शंभर कवींकडून दहा -दहा रुपये घेऊन

हजार रुपये खिशात टाकून, सज्जन गेले निघून

शंभर कवी आणि मीच तेवढी बापडी श्रोती तिथे उरले ….

एकदा एक सज्जन…

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares