सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 89 ☆
☆ पुन्हा आठ मार्च ☆
आजही ती कामावर आली,
महिला दिन, स्त्री स्वातंत्र्य, समानता—–
हे काहीच ठाऊक नव्हतं तिला!
ती घासते भांडी, धुणं धुते,
केर फरशी करते,
लावते संसाराला हातभार,
हातभार कसला?
खरंतर तीच रेटत असते अख्खा संसार!
सात घरं उजळून टाकते,
भांड्यांचे ढीग, दोन बादल्या धुणं,
सात घरच्या सात त-हा,
तीच्या कष्टाची किंमत ठरवलेली!
पण म्हणतं का कुणी,
“माझी कामवाली माझा अभिमान”
हसलात ना?
एकूण दुर्लक्षितच असते ही जमात!
आठ मार्चला मला आठवल्या,
लहानपणापासून हातात आयता काॅफीचा कप आणून देणारी,
पाट्यावर वाटण वाटणारी “कली”
आणि दिवसभर दिमतीला असलेल्या यमुनाबाई, कमल, रसवंती, समिंदरा,गुंफा…. सगळ्या ..
सगळ्या कष्टकरी कामवाल्या आणि,
मी आयुष्यात जगलेले सगळे सुखवस्तू क्षण!
ना बाहेरचे कष्ट ना घरातले
फारसे,
तरीही किती उमाळे बाईपणाच्या दुःखाचे?
भरल्या पोटी लिहिलेल्या कवितांचे,
सुखासिन आयुष्यातही कुरवाळलेल्या दुःखाचे,
मिळवलेल्या पुरस्कारांचे!
सारी पदकं आयुष्यातल्या सगळ्या कामवाल्यांच्या कष्टांना बहाल करून——
“अनुराधा औरंगाबादकर” सारख्या तेजशलाकेचं कौतुक करत साजरा करीन हा आठ मार्च—
आठवतंय त्यांनी सांगितलेलं……
“मी आयुष्यात कधीही कामवाली लावली नाही,सगळी कामं स्वतःचं केली आणि सोनं कधीच मिरवलं नाही अंगाखांद्यावर!”
इथून पुढे देईन दर आठ मार्चला
कामवाली ला सुट्टी,
हा आठ मार्च निश्चितच वेगळा
आहे माझ्या साठी!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈