श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆
☆ शब्दात वाच माझ्या ☆
शब्दात वाच माझ्या
शब्दरुप रम्य गाथा
मुखी नाम तुझे येई
गाते तुझीच गीता !!१!!
माझ्या काव्यातुनीच तुजला !
जग दिसेल छान देखणं !
रेखियेले निसर्गदेवाने
आकाशी रंगतोरण !!२!!
शब्दात वाच माझ्या
सुख दुःख लपलेले
कधी फव्वारे हास्याचे !
कधी शब्द मस्त हसलेले !!३!!
शब्दातच पहा माझ्या
माझ्या मनीचा साज
काव्यातील ऐक माझ्या !
सुंदर सागराची गाज !!४!!
सारेच नाही रे कळत
शब्दात सांगुनीया
डोळेच सांगती सर्व
मनातच पाहुनीया !!५!!
शब्दातून उमटे काव्य !
काव्यात शक्ती मोठी
माध्यम न लगे दुजेही
काव्यातच गाठीभेटी !!६!!
एक एक शब्दसुमन
सुंदर सूत्रात विणावे
मंगलमय काव्याच्या
पुष्पहारातच विलीन व्हावे !!७!!
मंगलमय काव्याच्या
पुष्पहारातच विलीन व्हावे!!…
©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
सातारा