☆ कवितेचा उत्सव ☆ बाजी जीवाची… ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆
दीन दीन ऐकून आरोळी
दाट अंधाऱ्या गडद राती |
सुन्न जाहली शिव छावणी…
आवस अवतरली चेहऱ्यावरती ||
चिंता रायांची बाजीला पडली,
कसा वाचवू रयतेचा वाली |
घालमेल उडाली त्या देहाची …
क्षणात नजरेत ठिणगी लकाकली ||
सत्य वचन जणू मुखी हुंकारले,
विजेसम अल्लद रंध्री भडकले |
अवघ्या देहात व्यापून राहिले …
सूर्यतेजा सम धरणी अवतरले ||
निश्चयी नेत्र भिडले शिव नेत्राला,
संकेत समजले केवळ एकमेकांना |
शिवराय उमगले तो इशारा …
जणू हुकूम त्या रणमर्दाचा ||
पाठीवर साक्षात मृत्युचा घाला
वीस कोसावरचा गड विशाळ दिसला |
आज्ञा मानुनी बाजी आलिंगिला …
जड अंतःकरणे राजा निघाला ||
यवनी वेढा पडता खिंडीला,
उभ्या देही नृसिंह अवतरला |
दोनशे हातांचा चुडा फुटला …
पाहुनी बाजी बेभान झाला ||
रक्तरंजित त्या समशेर हातात,
नजरेतून जणू ओसंडता जाळ |
यवन टाकती अचूक फास
वर्मी बैसला लोहाचा फाळ ||
धिप्पाड देह कोसळला धरणी,
जणू मदमस्त गज पडती |
काळ बिलगला त्या देहासी…
थक्क झाला पाहुनी स्वामी-भक्ती ||
राजा सुखरूप विशाळ गडी,
खबर पोचली त्या नरवीरासी |
प्रसन्न हसूनी निश्चिन्त होई …
रक्तवर्णी मुजरा शिव चरणासी ||
लज्जित होउनी यवन माघारी,
देहावर भगवा कवटाळूनी |
रक्त-पुष्पे खिंडीत पसरुनि…
बाजी निघाला खिंड पावन करुनी ||
© श्री बिपीन कुळकर्णी
मो नं. 9820074205
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈