सुश्री प्रभा सोनवणे
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में महात्मा गांधी जी के जन्मदिवस पर एक समसामयिक एवं विचारणीय कविता राष्ट्रपिता। मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे। आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 66 ☆
☆ गांधी जन्मोत्सव विशेष – राष्ट्रपिता ☆
कळू लागलं लहान मुलाला की,
पहिले राजकिय नेते—-
येतात समोर ते गांधीजीच !
पद्धत आहे आपल्याकडे…
लहान मुलांच्या हाती नोट द्यायची!
मलाही भेटले गांधीजी
लहानपणी,
आजीने सांगितलेल्या गोष्टीत,
आजीही सहभागी झाली होती म्हणे,
स्वदेशीच्या चळवळीत!
ऐकलं जायचं, बोललं जायचं,
खुपच भक्तीयुक्त प्रेमभावाने गांधीजींबद्दल—-घरी, दारी, शाळेत, सिनेमा गृहात!
“ती पहा ती पहा बापूजींची प्राणज्योती, तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहताती”
ही कविताही तोंडपाठ होती,
एकसूरात म्हणत असू खुप आदराने!
गांधीजी भेटायचे कवितेत, धड्यात, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या एखाद्या नाट्यच्च्छटेत, पंधरा ऑगस्टच्या भाषणात!
अगदी आमच्या गावातला,
गणपत गायकवाड ही करायचा दावा, “येरवडा जेल मध्ये मी केली आहे गांधीजींची दाढी !”
हजामती करता करता मारायचा फुशारकी!
एकूण काय तर—
जनमानसात खुपच भक्तिभाव गांधीजींविषयी!
नंतर गांधीजी भेटले, आगा खान पॅलेस मध्ये,
बेन किंग्जले च्या ‘गांधी ‘ या सिनेमात
त्यानंतर अहमदाबाद ला गेले असताना,
साबरमती च्या आश्रमात!
मला सप्रेम भेट मिळालेल्या,
सविता सिंग लिखित “सत्याग्रहा”या इंग्रजी पुस्तकातही !
अलिकडे गांधीजी भेटतात इंटरनेटवर, बदलत्या विचारधारेत
लोकापवादात, उलट सुलट चर्चेत!
पण मला -आमच्या पिढीला,
ते माहित आहेत,
महात्मा, राष्ट्रपिता, गांधीजी म्हणूनच,
आणि त्यांची ती तीन माकडं आहेत आदर्श आमच्यासाठी—-
“बुरा मत कहो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो ।” सांगणारी!
© प्रभा सोनवणे
२९ सप्टेंबर २०२०
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈