☆ कवितेचा उत्सव ☆ पाखरू ☆ श्रीशैल चौगुले☆
पाखरांचा जीव भिरभिरतो
अजून रानोमाळी
कलमी फळा पिकात शोधीत
जुनीच माती काळी.
दगड नाही, कुसळ नाही
तरीही कोंडतो श्वास
रसायनात गुदमरलेली
गगनभरारी पंखा आस.
फुलात नसले मध तरीही
काळीज भृंगराचे भ्रमरे
कालवे-धरणे दुथडी भरुन
पाखरांच्या मनात, जुनीच
ओहोळ-झरे.
कसे-कोण जाणे, ऊंच-ऊंच
टोकावरती पाखरु बसले
वार्यावरती पंख हलेनात
हे तर टॉवर, पर्वत कसले.
आता पाखरु पावसाशिवाय रोजच भिजते, चिवचिवते
घरट्यासाठी वेड्यासारखी घिरट्या घालीत, बोन्सायभोवती
जुने मंदिर-वाडे, वड, पिंपळाच्या
पाऊलखुणा शोधीते.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈