मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घरोघर ईश्वर…☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

☆ कवितेचा उत्सव ☆ घरोघर ईश्वर… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

कुंदकळ्या सांडती मुखातून, जेंव्हा बोलते लेक

लडिवाळ किती तीअसते पहा, नजरेची तिच्या ती फेक..

डाळिंबाचे दाणे दात हो, नजरेतून ती सुमने

पाहता क्षणीच जिंकून घेते, साऱ्यांचीच ती मने..

 

आभाळातील जणू चांदणी, उतरून येते घरी

निळ्या नभातील चंद्रकोर ती, कोमल सुंदर परी

मायेचे ते कोंदण असते, भरजरी रेशमी शाल

जणू लक्षुमी घराघरातील, करते मालामाल…

 

नक्षत्रे नि तारे सारे, तिच्या पुढे हो लटके

छुन छुन पायी चाळ वाजवत,पहा कशी ती मटके

आनंदाचा असतो ठेवा, प्रसन्न असतो वारा

सुगंधित ती करून टाकते, घर नि परिसर सारा…

 

बागडते नाचते नि गाते, बनून जाते माय

जणू तापल्या दुधावरील ती, स्निग्ध मायाळू साय

लळा लावूनी जाते निघूनी, सावरण्या परघर

तुटत नाही माया तरीही, जरी राहते दूर….

 

जीव गुंततो माहेरी पण, गृहलक्ष्मी सासरची

प्रतीमाता ती … पाठवतो हो …

घरोघर ईश्वर …ती …

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि:१४/०९/२०२०, वेळ:सकाळी :०९:४३

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 27 ☆ शाळा सुटली… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 27 ☆ 

☆ शाळा सुटली… ☆

शाळा फुटली पाटी फुटली

गाणे पुन्हा पुन्हा आठवते

शाळेचा तो वर्ग भरतो

त्यातील माझी जागा भेटते

 

अलगद तिथे जाऊन बसतो

पाटी डोक्यावर ती पुसतो

ओरडतात मास्तर मजला

त्यांच्याकडे कानाडोळा होतो

 

हसायला येते मज्जा वाटते

शाळेत मग जाऊ वाटते

शाळेच्या ह्या आशा आठवणी

अंग अंग पुलकित होते

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंदाज ☆ मेहबूब जमादार

☆ कवितेचा उत्सव ☆ अंदाज ☆ मेहबूब जमादार

मला माझं म्हणून क‌ा जगता येईना

मनातल्या प्रश्नांच उत्तर काही मिळेनां….

 

कोणी म्हणेल मग कशाला केलं लग्न

स्वप्नात मी बायकोला हा विचारला प्रश्न

मी म्हणून टिकले तिचा हेका काही सुटेना…१

 

बसताय कुठे निवांत, पहिलं घ्या पोरानां

पेपर द्या फेकून डोळं जातील वाचतानां

पोराबाळांच घर आपलं एवढं पण कळेनां?..२

 

मी कुठे जायचं तर खर्चाचा पडतो भार

माहेरा जायचं की ती सदैव असतें  तयार

मला सारं कळतं पण तिला का समजेना…३

 

कोणाशी बोलावे तर कोण ती तुमची

शंकाकुशंका ने हालत बिघडते माझी

होतो तळतळाट परी सांगावे कोणा?….४

 

थोडे कांहीं बोलले तर धरी अबोला

विनवले किती?सोडत नाही हट्टाला

म्हणे सोडतेे हट्ट पण घ्या मला  दागिना….५

 

मी आजारी पडता घायाळ ती होते

रात्रभर बिछान्यावर बसून ती रहाते

अशा तिच्या वागण्याचा अंदाजच येईनां….६

 

वय वाढलं तसं प्रेम ही वाढू लागलं

आपणाला कोण? हे दोघानां पटू लागलं

आतां माझ्या शिवाय तिचं पान ही हलेनां….७

 

© मेहबूब जमादार

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे फूल कळीचे झाले गं… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ हे फूल कळीचे झाले गं… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

बालपणीच्या कुंजवनातून

यौवन पुलकित वैभव घेऊन

वसंत उधळीत आले ग

हे फूल कळीचे झाले गं

 

        दिवस संपले भातुकलीचे

        सत्य जाहले स्वप्न कालचे

        नयनापुढती रूप तयाचे

        कसे अचानक खुलले ग

       हे फूल कळीचे झाले गं.

 

परीकथेतील परी मी झाले

राजपुत्र ‘ते’मनात ठसले

निशा लाजली,जरा हासली

खुणवीत मजला आली गं

हे फूल कळीचे झाले गं.

 

         पाऊल पडते नव्या जीवनी

         नव्या भावना येती खुलूनी

         गीत प्रीतिचे नवे,माझिया

         ओठावरती आले गं

         हे फूल कळीचे झाले गं.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 60 – खिळा…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #60 ☆ 

☆ खिळा…! ☆ 

माझ्या बा नं

घर उभारताना

भिंतीत ठोकलेला खिळा

आजही..,

आहे तिथेच आहे …

फक्त..

परिस्थितीच्या ओझ्यानं

तो ही . . .

माझ्या बा सारखाच

कमरेत वाकलाय..

आता..,

तो ही माझ्या बा सारखीच

वाट पहातोय

स्वतः च्या घरातून

एकाएकी वजा होण्याची

आणि..,

आपल घर

एका नव्या खिळ्यासाठी

मोकळं करून देण्याची ..!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झपूर्झा ☆ कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆  प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे

कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

जन्म – 7 ऑक्टोबर 1866

मृत्यु – 7 नोव्हेंबर 1905

☆ कवितेचा उत्सव ☆ झपूर्झा ☆

कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆  प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

हर्ष खेद ते मावळले,

हास्य निमाले;

अश्रु पळाले;

कण्टकशल्यें बोंथटली,

मखमालीची लव वठली;

कांही न दिसे दृष्टीला

प्रकाश गेला,

तिमिर हरपला;

काय म्हणावें या स्थितीला?-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!१!!

 

हर्षशोक हे ज्यां सगळें,

त्यां काय कळे ?

त्यां काय कळे ?

हंसतिल जरि  ते आम्हांला,

सर न धरू हे वदण्याला:-

व्यर्थी अधिकचि अर्थ वसे

तो त्यांस दिसे,

ज्यां म्हणति पिसे.

त्या अर्थाचे बोल कसे ?-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!२!!

 

ज्ञाताच्या कुंपणावरून,

धीरत्व  धरून,

उड्डाण करून,

चिद्घनचपला ही जाते,

नाचत तेथें चकचकते;

अंधुक आकृति तिस दिसती,

त्या गाताती

निगूढ गीति;

त्या गीतीचे ध्वनि निघती-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!३!!

 

नांगरल्याविण भुई बरी

असे कितितरी;

पण शेतकरी

सनदी तेथें  कोण वदा !-

हजारांतुनी एकादा !

तरी न्, तेथुनि वनमाला आणायाला,

अटक तुम्हांला;

मात्र गात हा मंत्र चला-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!४!!

 

पुरूषाशीं त्या रम्य अति

नित्य प्रकृति

क्रीडा करिती;

स्वरसंगम त्या क्रीडांचा

ओळखणें,  हा ज्ञानाचा

हेतु;  तयाची सुंदरता

व्हाया चित्ता-

प्रत ती ज्ञाता,

वाडें फोडें गा आतां-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!५!!

 

सूर्य चंद्र आणिक तारे

नाचत सारे

हे प्रेमभरें

खुडित खपुष्पें फिरति जिथें,

आहे जर जाणें तेथें,

धरा जरा नि:संगपणा

मारा फिरके,

मारा गिरके,

नाचत गुंगत म्हणा म्हणा-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!६!!

 

कवी – स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)   

(चित्र साभार कृष्णाजी केशव दामले – विकिपीडिया (wikipedia.org))

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)  

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ शब्दात वाच माझ्या ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

☆ शब्दात वाच माझ्या ☆

शब्दात वाच माझ्या

शब्दरुप रम्य गाथा

मुखी नाम तुझे येई

गाते तुझीच गीता !!१!!

 

माझ्या काव्यातुनीच तुजला !

जग दिसेल छान देखणं !

रेखियेले निसर्गदेवाने

आकाशी रंगतोरण !!२!!

 

शब्दात वाच माझ्या

सुख दुःख लपलेले

कधी फव्वारे हास्याचे !

कधी शब्द मस्त हसलेले !!३!!

 

शब्दातच पहा माझ्या

माझ्या मनीचा साज

काव्यातील ऐक माझ्या !

सुंदर सागराची  गाज !!४!!

 

सारेच नाही रे कळत

शब्दात सांगुनीया

डोळेच सांगती सर्व

मनातच  पाहुनीया !!५!!

 

शब्दातून उमटे काव्य !

काव्यात शक्ती मोठी

माध्यम न लगे दुजेही

काव्यातच गाठीभेटी !!६!!

 

एक एक शब्दसुमन

सुंदर सूत्रात विणावे

मंगलमय काव्याच्या

पुष्पहारातच  विलीन व्हावे !!७!!

 

मंगलमय काव्याच्या

पुष्पहारातच विलीन व्हावे!!…

 

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेत्रदान ☆ सौ.अस्मिता इनामदार.

सौ.अस्मिता इनामदार

☆ कवितेचा उत्सव ☆ नेत्रदान ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆ 

कर्णासारखा उदार दाता

आजच्या कलियुगात नाही

माझे ते माझे, तुझे तेही माझे

असेही म्हणणारे आहेत काही…

 

तीर्थक्षेत्री करूनी दान

पुण्य मिळवती सारेजण

इतर वेळी पापे करूनी

आनंद मिळवती काहीजण…

 

देवा-धर्माच्या नावाखाली

लूटच करती या जगती

दानाच्या त्या पावित्र्याला

नष्ट करणे ही प्रगती…

 

यापरतेही अनेक दाने

जगी आहेत, जाणूनी घ्या

त्या दानातून मिळणाऱ्या

समाधानाचा लाभही घ्या…

 

दानाचेही प्रकार अगणित

द्रव्यदान वा रक्तदान

या साऱ्याहून श्रेष्ठतम ते

ते म्हणजे हो नेत्रदान…

 

अंधकार तो नयनापुढचा

क्षणात एका होईल दूर

नेत्रदानाचे पुण्य घेऊनी

आनंदाला येईल पूर…

 

त्या दानातून कुणी अभागी

पाहील जग हे डोळेभरूनी

आयुष्याच्या वाटेवरती

चालत राहील दुवा देऊनी…

 

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सेतू – कवी स्व वसंत बापट  ☆  कवितेचे रसग्रहण सौ.अमृता देशपांडे

स्व वसंत बापट

जन्म – 25 जुलाई 1922

मृत्यु – 17 सितम्बर 2002

☆ कवितेचा उत्सव ☆ सेतू ☆ कवी स्व वसंत बापट  ☆  प्रस्तुति – सौ. अमृता देशपांडे ☆ 

शरदामधली पहाट आली तरणीताठी

हिरवे हिरवे चुडे चमकती दोन्ही हाती

शिरि मोत्याचे कणिस तरारुन झुलते आहे

खांद्यावरती शुभ्र कबूतर खुलते आहे

 

नुक्ते झाले स्नान हिचे ते राजविलासी

आठ बिचा-या न्हाऊ घालित होत्या दासी

निरखित अपुली आपण कांती आरसपानी

थबकुन उठली चाहुल भलती येता कानी

 

उठली तो तिज जाणवले की विवस्त्र आपण

घे सोनेरी वस्त्र ओढुनी कर उंचावुन

हात दुमडुनि सावरता ते वक्षापाशी

उभी राहिली क्षण ओठंगुन नीलाकाशी

 

लाल ओलसर पाउल उचलुन तशी निघाली

वारा नखर करीत भवती

रुंजी घाली

निळ्या तलावाघरचे दालन उघडे आहे

अनिश्चयाने ती क्षितिजाशी उभीच आहे

 

माथ्यावरती निळी ओढणी तलम मुलायम

गालावरती फुलचुखिने व्रण केला कायम

पायाखाली येइल ते ते

खुलत आहे

आभाळाची कळी उगिच

उमलत आहे

 

झेंडू डेरेदार गळ्याशी

बिलगुन बसले

शेवंतीचे स्वप्न सुनहरी

आजच हसले

निर्गंधाचे रंग पाहुनी

गहिरे असले

गुलाब रुसले, ईर्षेने

फिरुनि मुसमुसले

 

फुलांफुलांची हनु कुरवाळित

अल्लड चाले

तृणातृणाशी ममतेने ही

अस्फुट बोले

वात्सल्य न हे! हे ही

यौवन विभ्रम सारे

सराईताला कसे कळावे

मुग्ध इशारे

 

दिसली ती अन् विस्फारित

मम झाले नेत्र

स्पर्शाने या पुलकित झाले

गात्र नि गात्र

ही शरदातिल पहाट…..

की……ती तेव्हाची  तू?

तुझिया माझ्या मध्ये

पहाटच झाली सेतु

 

कवी – स्व वसंत बापट 

(चित्र साभार लोकमत https://www.lokmat.com/maharashtra/todays-memorial-day-vasant-bapat/)

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 56 – जीवनाच्या रंगमंची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 56 – जीवनाच्या रंगमंची ☆

जीवनाच्या रंगमंची

सुख दुःखाची आरास।

समन्वय साधुनिया

नाट्य येईल भरास।

 

बालपण प्रवेशात

स्वर्ग सुखाचे आगर।

बाप विधाता भासतो

माय मायेचा सागर।

 

स्वार्थ रंगी रंगलेली

सारी स्वप्नवत नाती।

तारुण्यास मोहवीते

स्वप्न परी ती सांगाती।

 

आलो भानावर जरा

खाच खळगे पाहून ।

माय पित्याच्या भोवती

लाखो संकटे दारूण।

 

इथे पिकल्या पानांना

सोडू पाहे जरी खोड।

रंगविती पिलांसाठी

वसंताचे स्वप्न गोड।

 

जीवनाच्या रंगमंची

खेळ रंगे जगण्याचा।

दुःख उरी दाबुनिया

अभिनय हासण्याचा।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares