प्रा.सौ. सुमती पवार
संक्षिप्त परिचय
प्रा. सौ . सुमती पवार एम ए . बी एड (सेवा निवृत्त ( K T H M College)), नाशिक
छंद …वाचन , कविता लेखन. एकूण पुस्तके ..१५. ( आगामी ३), बालगीत संग्रह …१०, कविता संग्रह …२, “सु” मतीचे श्लोक -भाग १ व भाग २ व ३
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या (बालभारती) पुणे प्रकाशित “सुलभ भारती”, मराठीच्या इ . ६ वी च्या पाठ्यपुस्तकात “हे खरे खरे व्हावे “ ही कविता २०१६ पासून
समाविष्ट…
अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त.
समरसता साहित्य परिषद , मुंबईचा उत्कृष्ट बालवाड.मयातील योगदानाचा पुरस्कार.
अखिल भारतीय लेखक प्रकाशक संघातर्फे बाल वाड.मयातील भरीव कामगिरी बद्दल पुरस्कार व सत्कार .
नाशिक सार्वजनिक वाचनालया तर्फे…. १: कवी गोविंद पुरस्कार २: अ . वा . वर्टी पुरस्कार ३: लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार
“भूमिका मेडिकोज “ मुंबई चा यशवंत देवांच्या उपस्थितीत कवितेचा प्रथम पुरस्कार ….. असे …. अनेक पुरस्कार प्राप्त.
अखिल भारतीय महिला लेखिका संघटनेच्या सदस्य व राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षा( २०१९).
“आनंद “बालमासिक पुणे यांचे १०० व्या दिवाळी अंकातील योगदानाचे गौरव चिन्ह. असे खूप पुरस्कार मिळाले आहेत.
☆ कवितेचा उत्सव ☆ पहाट आणि सूर्योदय .. ☆
उबदार मातीमध्ये तडातडा उमलतं
जगायचं जगायचं म्हणत पहा डोकावतं
जमिनीतून येताच वर आकाशात झेपावतं….
सृजनाचा नियमच पडून रहायचं नसतंच
कशासाठी भीतीने उगाच पहा आकसायचं
उबदार असते माती पांघरूण घालते मऊ
हळू हळू उठ बाळा प्रकाशाकडे जाऊ….
माय असो माती असो “कस” सारा लावणारंच
गर्भात तिच्या कळीचं फूल पहा होणारच
झेपावत वरवर स्वप्न पाहू लागते
माय मात्र जमिनीत मूळं धरून ठेवते …
थंडी वारा ऊन पाऊस सावरत असते सदा
पाऊस झोडपतो वारा हलवतो गदागदा
वादळात वाकतात झाडे भुईला ती टेकतात
जणू काही मातीला वंदन पहा करतात..
निघून जातात ढग पहा स्वच्छ पडते ऊन
रोपाच्या मनात पहा वाजू लागते धून
लधडतात पाने फुले अंगाने ते सजते
हात जोडून आभाळात देवाकडे बघते…
संकटे येतात म्हणून …..
थांबवायचे नसते….
पहाट आणि सूर्योदय …..
सारे …..
आपल्यासाठीच … असते….
© प्रा.सौ .सुमती पवार
नाशिक
मो ९७६३६०५६४२
दि: ३१/०७/२०२०
वेळ: रात्री १०:४०