श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “मावृत्वाचा पदर”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 43 ☆
☆ मावृत्वाचा पदर ☆
मी नाही देऊ शकत
तुझ्या मातृत्वाच्या पदराला
सागर किंवा आकाशाचं परिमाण…
अमृताहू मधुर अशा मातेच्या दुधावर वाढलेला जीव
अमृतासारख्या भ्रामक कल्पनेला
कसा देऊ शकेल थारा…
ॐकाराचा ध्वनी, चित्त शांत करीत असला तरी
माझ्या मातेच्या मुखातून निघालेले ध्वनी
मला आजही उर्जा देऊन पुलकीत करतात…
सूर्याचा प्रखर प्रकाश सौम्य करण्यासाठी
ती होते चंद्र
आणि
लेकराच्या आयुष्याचं करून टाकते तारांगण…
तारांगणाला बांधलेल्या पाळण्याची दोरी
तिच्या हातात असते म्हणून
चंदनाच्या पाळण्यातलं आणि
झोळीतलं बाळही तेवढ्याच निर्धास्तपणे झोपतं
गरीब श्रीमंतीचा भेदभाव विसरून…
जगातली कुठलीच माता गरीब नसते
मातृहृदयाच्या तिजोरीत
न मावणारी श्रीमंती
तिच्या प्रत्येक कृतीतून दिसत असते.
म्हणूनच मातृत्वाच्या पदराला
मी नाही देऊ शकत
सागर किंवा आकाशाचं परिमाण…
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८