मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत यावा आनंदाचा ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ मी तो निर्गुण यती…  श्री सुहास सोहोनी ☆

कुणा मिळाला लाभ कृपेचा

कुणा दर्शनाचा

तीही आस न उरली आता

बसलो बिनवाचा…

*

कुणी भजावा कुणी पुजावा

तू तारक देवा

मनी कुणाची नाही असुया

नाही कुणाचा हेवा…

*

मागणेच ना आता काही

नाही आस कशाची

असेल दैवी प्रारब्धी जे

घडेल मिळेल तेची…

*

नाही धरली कधी कास मी

अभद्र अविचारी

अशिष्ट ना बोलून कधीही

विटाळली वैखरी

*

सात्विकतेच्या पंढरपुरचा

मी तो वारकरी

नम्रताच दाविली जन्मभरी

अबोल वीटेपरी

*

काय करावे माझे आता

सारे तुज हाती

सुख दु:खाची नुरे भावना

मी तो निर्गुण यती…..

                मी तो निर्गुण यती…

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माळिण गावाची दुर्घटना  ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ माळिण गावाची दुर्घटना… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

माळिण नव्हती वैरिण माझी, होती खरी मैत्रीण 

मला भासले, करीत होती प्रगती सर्वांगीण 

सह्याद्रीच्या कुळातला मी, फार जुना डोंगर 

परंतु माझ्या शरीरी नव्हता कातळ तो कणखर 

*

घट्ट मातीचा पुष्ट देह हा, वृक्षवल्लीनी सजला 

कुशीत माझ्या माळिण वस्ती रक्षित होतो तिजला 

पुत्रांनी पण तिच्याच, अवघी वनराई कापिली 

तोडुन लचके या देहाचे, भूमी सपाट केली 

*

तिथे बांधला त्यांनी जलाशय, पाणलोट अडवुन 

कसाबसा मी उभा राहिलो भुसभुशीत होवुन 

तशात पडता अविरत पाऊस, तोलच माझा ढळला 

कोसळलो मी, माळिण गावच नामशेष झाला 

*

कितिक माणसे मम वजनाने गुदमरून गेली 

आठ-दहा जी वाचली पुरती जायबंदी झाली 

या घटनेमधी सांगा, माझा काय असे दोष ?

न्याय निवाडा तुम्ही करावा होऊन न्यायाधीश 

*

डोंगरमाथे आणि पायथे, सोडून द्या मोकळे 

नकोच तेथे लोकवस्ती आणि नकोत शेतमळे 

वाचवाल जर पर्यावरण तुम्हीही वाचाल 

स्वच्छ शुद्ध या हवेत सारे, श्वास मोकळे घ्याल 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 233 ☆ स्नेहबंध…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 233 – विजय साहित्य ?

☆ स्नेहबंध…! ☆

नाते हळवे सांगते

कसे राखावे अंतर

भावनांचे भावनांशी

अव्याहत मन्वंतर…!

*

राखी रेशमाचा धागा

राखी नाजूक बंधन

प्रेम माया संयमाचे

राखी दैवी संघटन…!

*

राखी ठेवते जोडून

देहातील माणसाला

राखी देते संजीवन

एक ‌हळव्या नात्याला…!

*

राखी जाणिवांचा बंध

राखी बंधुत्वाची कास

निरपेक्ष प्रेम प्रिती

बंधुभाव रुजे खास…!

*

राखी आहे आश्वासक

नात्यातले भावबंध

त्याच्या तिच्या आठवांचा

राखी असे स्मृती गंध…!

*

बंधू भगिनी प्रेमात

राखी घेई खास जागा

स्नेह बंध अलबेला

रेशमाचा एक धागा…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || शब्द || ☆ सुश्री कावेरी रोहिदास सुतार ☆

सुश्री कावेरी रोहिदास सुतार

? कवितेचा उत्सव ?

|| शब्द || सुश्री कावेरी रोहिदास सुतार ☆

शब्द जर अर्थाना नेहमीच 

पूर्णपणे न्याय देऊ शकले असते,

तर नात्यांमध्ये गैरसमज 

कधी निर्माण झालेच नसते… 

*

शब्द जर स्वतःचा तोल 

स्वतःच सावरू शकले असते,

तर मनावर आघात 

कधी झालेच नसते… 

*

शब्द जर दुःख, वेदना, यातना 

व्यक्त करू शकले असते,

तर डोळ्यांमध्ये अश्रू 

कधी आलेच नसते… 

*

शब्द जर स्वतःच्या मर्यादा 

स्वतःच ठरवू शकले असते,

तर नात्यांमध्ये दुरावे 

कधी आलेच नसते…

© सुश्री कावेरी रोहिदास सुतार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – विडंबन गीत… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ – विडंबन गीत… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ

(चाल – लटपट लटपट तूझं चालणं)

चमचम  चमचम चमचम चमचम

तुझं चमकणं साऱ्यांच्या नजरेत

नेसणं तुला अंमळ कष्टांचं

साडी ग…साडी ग..ग साडी ग..ग साडी ग…

*

विविधता नवनवतीची, कितीक रंगाची नव्या ढंगाची

 ह्रदयाच्या तू  जवळी

दिसे नार तुझ्यामुळे चवळीची शेंग कवळी

तूला  नेसून ती  मिरवी

असे नार तूझ्यासाठी पहा किती हळवी

बाईपण ती जपते ने मिरवते तोऱ्यात

आवडे कौतुक स्वतःचं

फिटे मग पारणं डोळ्यांचं

साडी ग…साडी ग..ग साडी ग..ग साडी ग…

*

नऊवारी चा डौल, शालू अनमोल, पटोला पहा ना

 कशिद्यावरती राघू मैना

 कितीही असल्या तरी मन काही भरेना

साडीचं दुकान सोडवेना

बिलाचा आकडा बघून नवऱ्याची होई  दैना

असा हा महिमा साडीचा

साडीवरचं प्रेम असं आम्हा बायकांचं

पुढेही चालतंच रहायचं

तिच्या पुढे चालेना ड्रेसचं

साडी ग…साडी ग..ग साडी ग..ग साडी ग….. 

*

🥰दEurek(h)a 😍

🥰दयुरेखा😍

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

थैमान  या शब्दातच रौद्र रसोत्पत्ती आहे.  थैमान निसर्गाचे असो,  एखाद्या विषाणूचे असो, सामाजिक राजकीय घडामोडींचे असो  किंवा  व्यक्तीच्या मनात उसळलेल्या विचारांचे असो पण थैमान  या शब्दात एक भयानकता आहे, हिंसाचार आहे.  कुठलाही सौम्यपणा अथवा सौंदर्य त्यात जाणवत नाही.  तांडव आणि थैमान हे तसे एकाच अर्थाचे दोन शब्द.  थैमानात  तांडव असते आणि तांडवात थैमान असते. एकच तीव्र सुरावट घेऊन ते अंगावर आढळतात.  थैमान बाहेरचे असो किंवा आतले असो ते काहीही करून ओसरावे याची आस लागून राहते.  थैमान म्हणजे नको असे काहीतरी आणि त्यापासून दूर जाण्यासाठी चाललेली झुंज म्हणजेच नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याची धडपड. 

सुश्री अरुणा मुल्हेरकर

साधारण अशाच अर्थाची  थैमान या शीर्षकांतर्गत, माननीय कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची एक गझल वाचण्यात आली आणि त्यातल्या भावभावनांचा मागोवा घ्यावासा वाटला.

अगोदर आपण कविता वाचूया.

☆ – थैमान – कवयित्री : सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

काळोख दाटलेला काहूर माजलेले

अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले

*

नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी

सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले

*

दिन सारखेच सांगा असतात का कधीही

होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले

*

अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा

कोडे कधी न सुटले मज तूचि घातलेले

*

घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी

दावानलात एका सर्वत्र जाळलेले

*

आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली

पाऊस शांत होतो  विश्रांत भागलेले

*

आता मला कळाले हे सार जीवनाचे

सारे पळून गेले थैमान दाटलेले

*

कवयित्री : सुश्री अरूणा मुल्हेरकर

आनंदकंद  वृत्तातील ही संपूर्ण गझल वाचताक्षणीच मनात आले की हे कवयित्रीच्या मनात चाललेलं विचारांचं थैमान आहे.  विचारांचं ओझं पेलवेनासे झालं की माणूस हतबल होतो आणि नकळतपणे गतायुष्याच्या आठवणीत खेचला जातो आणि त्या क्षणापासून आठवणींशी मनाचा संवाद सुरू होतो. 

अरुणाताई गझलेतल्या मतल्यात म्हणतात,

 काळोख दाटलेला काहूर माजलेले अस्वस्थ का असे मन माझेच जाहलेले

 ही एक मनाची बेचैन स्थिती आहे. काहीशी उदास,  निराश. मनातले

विचारांचे काहूर,  विचारांचे वादळ अजिबात स्वस्थता मिळू देत नाहीत.  वरवर,  दर्शनी जरी एखादी व्यक्ती स्थिर आणि शांत भासत असली तरी अंतर्मनातल्या वादळी लाटा धक्के  देत असतात आणि मग सहजपणे मनात येतं की का घायाळ माझे मन? कशासाठी मी अस्वस्थ आहे? बेचैन आहे? 

 एकदा का मनाशी संवाद सुरू झाला की अनेक भेंडोळी उलगडायला लागतात…

 नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी   सुख नेमके समोरी होतेच ठाकलेले

 आयुष्यात जपलेल्या सुखाच्या कल्पना काही अवास्तव  नव्हत्या आणि विशेष म्हणजे सुख माझ्या दारातच होते.  ते शोधण्यासाठी मला कधी धावाधाव करण्याची गरजच पडली नाही. अरुणाताईंनी लिहिलेल्या या पहिल्या शेरातच आनंदी राहण्याची,  आहे त्यात समाधान आणि सुख वेचण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. 

 नाही कधी सुखाच्या पाठीस धावले मी हा उला फार अर्थपूर्ण आहे.   आयुष्यभर माणूस सुख समजून मृगजळापाठीमागे  धावत राहतो कारण खरं सुख कशात आहे हेच त्याला उमगलेल नसतं आणि परिणामी त्याच्या पदरी दुःख आणि निराशाच येते पण कवयित्री आपल्या या शेरात स्वतःबद्दल खात्रीपूर्वक सांगतात की “उंबरठ्यावरच्या सुखाला डावलून त्या पळत्याच्यापाठी कधीही गेल्या नाहीत.”

 घरात असता तारे हसरे 

मी पाहू कशाला नभाकडे?

*

 अशीच त्यांची वृत्ती असावी.

*

 दिन सारखेच सांगा असतात का कधीही

 होणार अस्त नक्की ऋतुचक्र चाललेले

 हा  तिसरा शेर अरुणाताईंच्या मनाची अध्यात्मिक बैठक दर्शवणारा आहे.  काळ स्थिर नसतो, तो बदलत असतो. जे आज आहे ते उद्या नसणार आहे  हा निसर्गाचा नियम आहे.  बदलणारे ऋतू म्हणजे निसर्गात घडणारी स्थित्यंतरे. मानवी जीवनातही अशी स्थित्यंतरे होत असतात.  सुखदुःखाचा लपंडाव चालू असतो.  हा शेर वाचताना असे वाटते की यात जीवनाविषयीची स्वीकृती आहे,  स्वतःच्या मनाला बजावणं आहे आणि मनाला समजवण्याच्या प्रक्रियेतूनच हे विचारांचं थैमान उठलेलं आहे.

अर्ध्यावरीच माझा संसार का तुटावा  कोडे कधी न सुटले मज तू चि  घातलेले

 मनात प्रचंड दुःख आहे, तीव्र घालमेल आहे.

 भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी 

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी

 या गीताची आठवण करून देणारा आहे. अरुणाताईंचा हा शेर मन कातरून टाकतो. 

सुखासमाधानात दिवस चालले होते, खाच— खळगे, काटेकुटे तुडवतही एकमेकांच्या साथीने हसऱ्या सुमनांची ओंजळ भरली होती मग मध्येच हात सोडून माझा जिवलग हे जग सोडून का गेला? 

काही प्रश्नांना उत्तरेच नसतात आणि म्हणून ते न सुटणारी कोडी बनून आयुष्य व्यापून टाकतात मग या कोड्याचं उत्तर कोणाला विचारायचं?  एका अज्ञात शक्तीला, आकाशातल्या त्या बापाला… “तू मला अनंत सुखं देता देता हे न पेलवणारे दुःख का माझ्या झोळीत टाकलेस?  असा मी काय गुन्हा केला होता?”

हा संपूर्ण शेर म्हणजे मनात तुडुंब भरलेल्या वेदनेचीच घागर आहे. कुठल्यातरी अलवार क्षणी ती डचमळते आणि मग मनातलं हे वादळ अधिकच थैमान घालू लागतं. 

घन दाटतात गगनी दिसते धरा सुहासी दावानलात एका सर्वत्र जाळलेले

ग्रीष्माने फाटलेली,  भेगाळलेली धराही  शांत होते जेव्हा आभाळात मेघ  दाटतात. एकाच वेळी वादळ आणि सांत्वन,  वेदना आणि शमन या भिन्न भावाविष्काराचे सुंदर वर्णन या ओळींमध्ये आहे.  हा संपूर्ण शेर रूपकात्मक आहे.  सानीमध्ये वापरलेला दावानल हा शब्द  मनासाठी रूपक म्हणून वापरला आहे.  शांत दिसणाऱ्या अर्णवाच्या उदरात वणवा पेटलेला असतो तसा मनाच्या सागरातही विचारांचा वणवा पेटलेला असतो.  भावनांचा उद्रेक झालेला असतो.  

 घन दाटतात गगनी

 दिसते धरा सुहासी

मनात शांत वारे अचानक वाहू लागतात,  सकारात्मक विचार येऊ लागतात,  हरवलं जरी असलं  खूप काही तरी अजूनही बरंच बाकी आहे. आठवणींच्या रूपात,  त्याच्या अंशांच्या रूपात.. जे आनंददायी आहे.  इथे या विचारांना घन  दाटले  गगनी  ही उत्प्रेक्षा म्हणजेच कवयित्रीची काव्यात्मकता ! 

मनातला नकोसा कचरा जळत आहे आणि पुन्हा सुखाचा भास होत आहे. नकळत थैमान ओसरत आहे.

आयुष्य शिकविते मज खोटे नि काय असली 

पाऊस शांत होतो विश्रांत भागलेले

आयुष्याच्या प्रवासात खूप काही शिकले.  खरं काय,  खोटं काय,  काय अस्सल काय हीणकस याची धक्के खात का होईना ओळख झाली आहे आता.

मनाची अशी एक स्थिती असते की आता साऱ्या लाटा ओसरून गेल्यात, किनाऱ्यावरचा गाळ,  कचराही त्या लाटांबरोबर वाहून गेलाय आणि आता किनारा स्वच्छ,  सुंदर आणि स्थिर झाला आहे. 

सहजच  केशवसुतांच्या या ओळी आठवतात. 

* शांतच वारे शांतच सारे*

 शांतच हृदयी झाले सारे

कवयित्रीचे मनातले वादळ आता असेच  शमत आहे.  मनातल्या विचारांच्या पावसाचे  थैमान आता ओसरत आहे कारण आता गतकाळातल्या सुखी जीवनाच्या आठवणीतच मन रमू लागलं आहे.  या शेरात अरुणाताईंनी त्यांच्या हृदयातला एक अव्यक्त सरगम  व्यक्त केला आहे.

 आता मला कळाले हे सार जीवनाचे

 सारे पळून गेले थैमान दाटलेले 

या शेवटच्या शेरामध्ये जीवन यांना कळले हो असा एक अध्यात्मिक विचारच जणू मांडला आहे. 

जीवन हे एक मंथन आहे. साऱ्या सुखदुःखाची घुसळण होते आणि मग हाती सार लागते.  सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख हा नियतीचा नियमच आहे.  दुःखातून सुखाचा मार्ग काढणे म्हणजे जीवन जगणे.  विचार करता करता कवयित्री अरुणाताईंना याची जाणीव झाली आहे आणि त्या म्हणतात,

 आता मला कळाले हे सार जीवनाचे 

“दुःख उगाळत राहण्यापेक्षा सुखाला दार उघडून द्यावे”  हे मी जाणते आणि आता हे मनातल्या काळोखातलं थैमान कसं ओसरत आहे याचाही अनुभव घेत आहे.

ही गझल म्हणजे मनाचा एक प्रवास आहे.

अस्वस्थतेकडून स्थैर्याकडे नेणारा.

मिटलेलं दार उघडून देणारा.

अस्तापासून उदयाकडे नेणारा.

अतिशय सुंदर, अर्थपूर्ण, अशी ही गझल.  साध्या साध्या पण सुंदर रूपकातून जीवनाविषयीचा एक सखोल संदेश ही गझल वाचत असताना मिळतो. वादळातून शांततेकडे,  नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा एक विचार प्रवाह या गझलेत अतिशय नेमकेपणाने,  सुटसुटीत शब्दात मांडलेला आहे

 माजलेले,  जाहलेले,  ठाकलेले, चाललेले, घातलेले यासारखे लगावली साधणारे काफीया  शेरामधली खयालत आणि राबता यांची खोली दर्शवतात.

 थोडक्यात अरुणाताई मुल्हेरकर यांची थैमान म्हणजे एक सुंदर गझल,  एक सुंदर खयालत,  एक सुंदर संदेश.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वातंत्र्य दिन 🇮🇳 ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

स्वातंत्र्य दिन 🇮🇳 ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

(१५.०८.२०२४)

आज भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिवस. 🇮🇳

मागील ७८ वर्षात भारताने लक्षणीय प्रगती केलेली आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यात राहूनही काही वर्षात अशी नेत्रदीपक प्रगती करणे हा पराक्रम म्हणावा लागेल….!

अनेक क्षेत्रातील प्रगतीची उंच शिखरे गाठत असताना, आपण माणुसकीच्या शिखरावरून खाली तर येत नाही ना याचाही विचार केला पाहिजे.

आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीने मागील हजारो वर्षात कोणावरही आक्रमण केले नाही, तर याउलट सर्व विचारधारांना आपल्या मध्ये सामावत माणुसकी धर्म वाढवण्याचा प्रयत्न केला.

*भगवंताने गीतेत सांगितलेला उपदेश प्रत्यक्ष आचरणात/कृतीत आणण्याचा कालावधी सुरू झाला आहे असे म्हणता येईल. देशातंर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आपल्याला आढळून येईल. भागवतांनी सांगितलेली गीता अर्जुनाने नुसती पाठ केली नाही, तर ती समजून घेऊन अधर्मी लोकांचा नाश केला. हा इतिहास आपण आजच्या पावन दिनी आठवूया.

अर्जुनाने शमी वृक्षावर ठेवलेली शस्त्रे काढून युद्ध केले. आज आमच्या घरात उंदीर मारायला काठी असेल असे सांगता येत नाही. आपल्या सर्व देवी देवतांच्या हातात शस्त्र आहे आणि ते चालवण्याची धमक आणि कुशलता देखील आहे. आपण याचे अनुकरण आणि अनुसरण करण्याची गरज आहे.

अधर्माचा नाश आणि धर्माची प्रतिष्ठापणा करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. भारत विश्विजेतेपदी विराजमान होण्यासाठी दुर्जन सक्रिय आणि सज्जन निष्क्रिय हे समीकरण उलट करावे लागेल.

यासाठी आरक्षणाची नाही तर स्वतः देशाचे, धर्माचे संरक्षण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

आजच्या पावनदिनी आपण अशी प्रतिज्ञा करू की भारतमातेच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, यापुढे माझी भारतमाता कधीही खंडीत होणार नाही…!!

“मोठा झालो तरी देखील

मी तुला विसरणार नाही

दे म्हटले तरी देखील

तुला अंतर देणार नाही

तू सुखी तर आम्ही सुखी

तुला सारे कळते आई

तुझ्या डोळ्यांत अश्रू येतील

असे कधी होणार नाही.”

भारत माता की जय!! 🇮🇳

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय!!!💐

*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अर्जुन उवाच 

एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते । 

ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १ ॥

कथित अर्जुन 

कोण भक्त श्रेष्ठ योगवेत्ता समजावा भगवाना

निरंतर सगुण भक्त वा करितो ब्रह्म उपासना ॥१॥

श्रीभगवानुवाच 

मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते । 

श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥

कथित श्रीभगवान

मजठायी करुनी एकाग्र अपुल्या मनास ध्यानात

श्रेष्ठ योगी श्रद्धेने मज सगुणस्वरूपा भजतात ॥२॥

*

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते । 

सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्‌ ॥ ३ ॥ 

सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः । 

ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४ ॥

*

संयम ज्याचा गात्रांवरती ध्यान मनबुद्धीतीत 

निराकार अचल शाश्वत अविनाशी ब्रह्म्यात

कल्याणास्तव चराचराच्या सदैव जे तत्पर

समानभावी योगी विलीन होत माझ्यात अखेर ॥३,४॥ 

*

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्‌ ॥ 

अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥

*

गुंतला देहाभिमानी त्या ब्रह्मप्राप्ती कष्टप्रद मार्गाची 

सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मसाधना अधिक कष्टाची  ॥५॥

*

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः । 

अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥

*

मत्परायण भक्त कर्मे अर्पण करिती मजला

अनन्य भक्तियोग उपासना ही सगुणरूपाला ॥६॥

*

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्‌ । 

भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम्‌ ॥ ७ ॥

*

माझ्याठायी गुंतविता पार्था अपुले चित्त

तयासी भवसागरातुनि करितो मी मुक्त  ॥७॥

*

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय । 

निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥

*

एकाग्र करुनी मन माझ्यात करी मतीला स्थिर

ममांतरी संशयातीत स्थान असेल तव निरंतर ॥८॥

*

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्‌ । 

अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥ ९ ॥

*

नसेल निश्चल होत तव मन माझ्या ठायी स्थिर

योगाभ्यासे मम प्राप्तीची धनञ्जया इच्छा कर ॥९॥

*

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव । 

मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ॥ १० ॥

*

असशील जरी असमर्थ तू योगाभ्यासाशी

माझ्यास्तव कर्मपरायण होई मम प्राप्तीशी ॥१०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 242 ☆ पंधरा ऑगस्ट…🇮🇳 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 242 ?

पंधरा ऑगस्ट…🇮🇳 ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

या ही वर्षी सगळी मंडळे,

जोरात साजरा करतील,

आपला स्वतंत्रता दिवस!

देशप्रेमाच्या गाण्यात मधेच एखादी,

विसंगत रेकॉर्ड,

पोरी जरा जपून…..सारखी !

कर्ण कटू आवाज,

रस्त्यावर घर असल्यामुळे,

रहदारीच्या आवाजाबरोबरच,

देशभक्तिचे आवाज!

लहानपणचा पंधरा ऑगस्ट,

किती सुंदर होता,

झेंडा वंदनाचा,

प्रभात फेरीचा….

कलेक्टर ऑफिस मधे,

पेढा मिळाल्याच्या आनंदाचा!

 अगदी साधा सुधा,

देशासाठी बलिदान देणाऱ्या,

शहिदाच्या आठवणींचा,

ए मेरे वतन के लोगो…..

किंवा

वंदेमातरम्…..

सारख्या मधूर गाण्यांचा !

 माणसांसारखाच ,

हा राष्ट्रीय सणही बदलला आहे !

पण सगळेच बदल अपरिहार्य,

आता पटवून द्यावेच लागेल,

पुढच्या पिढीला,

मेरा भारत महान

कसाकाय ते !

☆  

© प्रभा सोनवणे

११ ऑगस्ट २०२३ 

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “स्वरधुंद पाऊस… —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वरधुंद पाऊस…—” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

पाऊस येई घेऊन संगे सप्तसूर मनमोही 

स्वतःच धरुनी ताल आणि हा आळवितो आरोही ।।

 *                  

कधी वाटे हा अहीरभैरव, गुणगुणतो कानाशी 

कधी आळवे संथपणे जणू, गुजरी तोडी खाशी ।।

*

थांबवुनी सूर्यास ऐकवी, मुलतानी, मधुवंती 

भीमपलासी मारीत ताना, फिरे स्वत:च्या भवती ।।

*

मधेच होई उदास का हा, पडे जणू एकला 

सोबत येई पूरिया आणि मारवाही साथीला ।।

*

भान नाही या दिनरातीचे, स्वरात किती हा दंग 

जग रंगे त्या मालकंसी वा, भूप-यमनी हो गुंग ।।

*

कधी कधी परि होई नाहीसा, विसरून सूरच सारे 

जो तो शोधीत त्याला, होती सैरभैरही वारे ।।

*

आर्त होऊनी विश्वच मग हे गाई मेघमल्हार 

विसरुनी रुसवा मनीचा आणि बरसे फिरून ही धार ।।

*

स्वत:च उधळी मैफल परि कधी, होत अती बेसूर 

सूर सृष्टीचे वाहून जाती, अश्रूंना ये पूर ।। 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print