मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भाऊबीज… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

भाऊबीज सुश्री नीलांबरी शिर्के 

माहेरचे संस्कार घेऊन

ती सासरी नांदण्या जाते

आपुलकीच्या वर्तनातुनी

आपलेसे  सर्वांना करते

*

ती नसते तिथल्या रक्ताची

मुले  पण त्यांच्या  वंशाची

निसर्गाची हिच संरचना

होऊन जाते ती त्या घरची

*

भाऊबीजेचा दिन येता

ओढ लागते माहेराची

तबकातील दो निरांजने

एकेक पुतळी दो डोळ्यांची

*

त्या डोळ्यांच्या ज्योतीसह

भावाचे ती औक्षण करते

बळीराजासम राज्य इश्वरा

भावासाठी मागत रहाते

*

भावाचे औक्षण करताना

नात्याला आयुष्य मागते

नाम कपाळी डोई अक्षदा

माहेराचा ती दुवा सांधते

🪔🪔

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १६ — दैवासुरसम्पद्विभागयोगः— (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १६ — दैवासुरसम्पद्विभागयोगः— (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः । 

दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्‌ ॥ १ ॥

*

जया ठायी नाही भय अंतर्यामी जो निर्मलीन

योगी निरंतर दृढ आर्जवे स्वाध्याय तपाचरण ॥१॥ 

*

अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्‌ । 

दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्‌ ॥ २ ॥

*

अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांती अक्रूरता 

करुणा अलोलुपता गात्रविवेक लज्जा मृदुता ॥२॥

*

तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता । 

भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ ३ ॥

*

क्षमा तेज धैर्य अद्रोह निराभिमान नीतिमानता

लक्षणे ही जन्मजात दैवसंपन्नाची जाण भारता ॥३॥

*

दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । 

अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्‌ ॥ ४ ॥

*

गर्व दंभ  अहंकार क्रोध कठोरता तथा अज्ञान

लक्षणे ही संपत्ती ही आसुरी पुरुषाची अर्जुन  ॥४॥

*

दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता । 

मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ ५ ॥

*

देवी संपदा मुक्तीदायक आसुरी होत बंधन

तव संपदा दैवी रे न करी शोक पंडुनंदन ॥५॥

*

द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिनदैव आसुर एव च । 

दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु ॥ ६ ॥

*

दैवी अथवा आसुरी केवळ मनुजाची प्रवृत्ती

कथिली दैवी तुजसी ऐक राक्षसी प्रकृती ॥६॥

*

प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः । 

न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ ७ ॥

*

राक्षसी मनुजा नाही विवेक प्रवृत्ती निवृत्ती

सदाचरण ना सत्य ठावे अंतर्बाह्य ना शुद्धी ॥७॥

*

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्‌ । 

अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम्‌ ॥ ८ ॥

*

जगदोत्पत्तीसी ईश्वर कारण  सर्वथैव असत्य

नर-मादी संभोग या जगताचे हेचि असे सत्य

जगरहाटी राहण्या अखंड काम हाचि कारण

दुजे सारे मिथ्या वदती आसुरी वृत्ती मनुजगण ॥८॥

*

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः । 

प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ ९ ॥

*

मिथ्या ज्ञानाचा अवलंब मंद जयांची मती

अपकारी हे क्रूरकर्मी जगक्षय कारण होती ॥९॥

*

काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः । 

मोहाद्‌गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १० ॥

*

गर्व दंभ अहंकार युक्त नर अतृप्त कामनाश्रित

भ्रष्ट आचरण अज्ञानी स्वीकारत मिथ्या सिद्धांत ॥१०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आता कुनी बलवत नाय’ – कवयित्री : सुश्री अनुराधा हवालदार☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आता कुनी बलवत नाय’ – कवयित्री : सुश्री अनुराधा हवालदार☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

दिवायीच्या फराळाले

आता कुन्नी बलवत नाय

ताटं भरले फटु धाडते

सांगा तेचं करु काय?

*

आठ दिस आधीपासून 

शुबेच्चानं भरते फोन

घरी या फराळाले

आता असं म्हंते कोन?

*

घरी आता फराळाचं

मँड्डम काही करत नाय

रेड्डीमेड आनून खानं

अंगवळनी पडलं हाय

*

किचन झाले पॉश आता

कामासाटी बाया हाय

दोन कामं केली तरी 

मँडम म्हंते दुखते पाय

*

असं होन्यामागं बघा

कारनीभूत थो एकच हाय

हातामंदी चिकटलेला

मुबाईल काई सुटत नाय

*

सारे मिंटा मिंटानं

उघडू उघडू पायते फोन

नवी काय पोष्ट आली

आनलाईन हायेत कोन

*

चकली चिवडा लाडू शेव

ताटलीमंदी सजवतेत

मार त्याचे फटु काढून

वाटसअपवरती पाठवतेत

*

तोंडापुरतं या म्हंतेत

तेच्यातून समजाचं काय

दिस वार स्थळ येळ

काई काई सांगत नाय

*

लोनी लावू लावू बापे

शबूद फेकते गोड गोड

घरी येतो म्हना बरं…

मंग व्हते म्युट मोड

*

मले सांगा फटु पाहून

पोट माह्यं भरन काय?

म्या मनलं कवडीचुंबका

घरी कदीतं बलवत जाय

*

डाएटवरती हावो म्हंते

आईली आमी खातच नाय

पिझ्झा बर्गर मॅगी खातेत

याले काय अर्थ हाय

*

कलियुग हाये बाप्पा

फराळेचे फटुच घ्या

शुगरकोटेड बोलून म्हंते

पुढच्या वर्षी नक्की या

*

पैले आज्जी आय आमची

करत व्हती किती काय

दळन तळण सारं करुन

तक्रार कद्दी केली नाय

*

फार नवती सुबत्ता पन

पावना नेहमी जेऊन जाय

पैसा झाला मोट्टा तरी

मन आता कोतं हाय..

…फराळाचं इसरून जाय…

…बाई फराळाचं इसरून जाय…

कवयित्री : सुश्री अनुराधा हवालदार

नागपूर

प्रस्तुती : डॉ .  मीना श्रीवास्तव.

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “दिवाळी…“ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवाळी…🪔 ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

 शत दीप तेवताना, उजळो ज्योत अंतरीची,

 स्नेहभावासंगे आज, जपा, कृतज्ञता मनी!

 वसुबारसेला करिता, पूजा गाय-वासराची,

 अन्नदाता कृषिवल, नको विसराया आम्ही!

 जन्मदाते माय-बाप, गुरूजन, आप्त-स्नेही,

 संस्काराचे दिले धन, मशागत या मनाची!

 आज नमूया तयांना, ठेवूनिया माथा पायी,

 हात डोईवर त्यांचा, आशीर्वादाची शिदोरी!

 धनत्रयोदशीला पूजता, धन आणि धन्वंतरी,

 सामाजिक स्वास्थ्य आहे, आपलीच बांधिलकी!

 अज्ञान नि दुर्गुणांचा, नरकासुर हा मारूनी,

 सन्मार्गाने जोडू धन, हीच पूजा लक्षुमीची!

 जनकल्याणाचे भान, सय बलि-वामनाची,

 चोख व्यापार – व्यवहार, खरी पूजा चोपडीची!

 करी दृढ यमद्वितिया, भाऊ-बहिणीची प्रिती,

 यम-धर्माचे स्मरण, नित्य असावे जीवनी!

 संगे पंचपक्वान्नांच्या, करता दिवाळी साजरी,

 विसरा न वंचितांना, घास भुकेल्याच्या मुखी!

 सण-वार, परंपरा, जपणूक संस्कृतीची,

 समाधान लाभे मना, घरी-दारी, सुख-शांती !

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपावली शुभेच्छा – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपावली शुभेच्छा – –🪔 ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

 उजळोत लक्ष वाती तुमच्या घरात साऱ्या

दीपावली शुभेच्छा वाटा मनात साऱ्या

*

वातीस लावताना पाहू वळून मागे

काळात बाल्य लपले गाऊ स्वरात साऱ्या

*

पाऊल वाजले बघ जाग्याच आठवांचे

व्हावी मनात जागा होत्या तळात साऱ्या

*

येताच बारसाला दारात गाय गो ऱ्हा

वात्सल्य मायचेही दाटे तनात साऱ्या

*

अभ्यंग स्नान होई लावून गंध उटणे

आरास ही दिव्यांची उजळे नभात साऱ्या

*

लक्ष्मीस पूजताना दारास तोरणेही

आतीष थाट मोठा भरला दिशात साऱ्या

*

बापास पाडव्याला ओवाळणे मुलीचे

राहोत प्रेम वेडया बहिणी जगात साऱ्या

*

भावास वेळ नाही प्रेमास तोड नाही

लांबून लक्ष त्याचे माया उरात साऱ्या

*

दीपावलीत घ्यावा आनंद जीवनाचा

टाळा प्रदूषणाला भरल्या सुखात साऱ्या

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कोजागिरी पौर्णिमा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कोजागिरी पौर्णिमाश्री प्रमोद वामन वर्तक ☆


उजळे कृत्रिम प्रकाशाने 

राजाबाईचा टॉवर सुंदर,

देवी सरस्वतीचा वरदहस्त

त्याच्या कायम शिरावर !

*

उभा थोड्या अंतरावर 

ई. सी. जी. अर्थव्यवस्थेचा,

होती रावाचे रंक मोहाने

सल्ला देतो तुम्हां मोलाचा !

*

चमके गगनात दोघांमधे

कोजागिरीचा शुभ्र शशी,

सुंदर नजारा चंद्रकिरणांचा 

अंधाऱ्या निळ्या आकाशी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 248 ☆ सावित्री… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 248 ?

सावित्री ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

तो — अगदी लहान असल्यापासून

पाहिलेला,

चाळीशीचा तरूण,

कळलं तो शेजारच्या इस्पितळात येतो–‐-

डायलिसीस साठी!

 

मानवी शरीराला,

खूप जपूनही,

कधी काय होईल,

सांगता येत नाही !

 

आम्ही उभयता खूपच,

हळवे झालो होतो…..

त्याला भेटायला गेल्यावर!

सोबत असलेली त्याची पत्नी,

चेहर्‍यावर काळजी, पण—

ठामपणे त्याच्या पाठीशी उभी !

आणि घेत ही होती,

तितक्यात निष्ठेने—

त्याची काळजीही !

 

नंतर समजलं,

त्याच्या शस्त्रक्रियेविषयी….

त्याची पत्नीच देणार होती,

स्वतःची एक किडनी !

 

नतमस्तकच,

त्या तरूणीसमोर!

सावित्री अजूनही—

जन्मते या इथेच,

विज्ञानाची कास धरून,

आणि स्वतःच्या जीवावर,

उदार होऊन,

 घडवते नवऱ्याचा पुनर्जन्म,

याच जन्मी !

कुण्या यमाची याचना न करता,

आपल्या शरीरातला—

एक नाजूक अवयव,

करते बहाल,

पतिप्रेमासाठी!

 

ही सावित्री मला “त्या”

सावित्रीपेक्षाही खूपच

महान वाटते–

जीवच ओवाळून टाकते–

जोडीदारावर,

नातं निभावत रहाते आयुष्यभर !!

☆  

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळजी … ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काळजी… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

अंत का माझ्या नसावा वेदनेला

का लळा माझा न एकाही सुखाला

*
पाडती आठ्या कपाळा अंगणे ही

आपले मी कोणत्या मानू घराला?

*
सोबतीला वादळे माझ्या दिली ही

केवढी रे काळजी माझी जगाला

*
या, कुणी.. केव्हा.. कधी आतूर मी ही

आडणा ना उंबरा माझ्या मनाला

*
नेमकी ना उत्तरे येती कधीही

कोणताही प्रश्न ना लागे धसाला 

*
धाऊनी आल्या सरी तेंव्हा झळांच्या

आळवाया लागता मी पावसाला

*
मी जरी थाटात गेलो उत्सवांना 

दुःख तेथेही उभे रे स्वागताला

*
मी तुझ्यावाचून या सोसेन ग्रीष्मा

मी कसा सोसू परंतू श्रावणाला ?

*
वीण स्नेहाची तुटे वा सैल कोठे

राहिले नाते आता हे सांगण्याला

*
कोरड्या पात्रापरी आयुष्य सारे

(मात्र डोळा नेहमी पाणावलेला)

*
कोणत्या दारी उभा राहू तरी मी 

भेटतो जो गाव तो ओसाडलेला

*
मी तुझ्या स्वप्नी पुरा हरवून गेलो

तू जरी प्रत्यक्ष, मी आभासलेला

*
का मला भेटायची दुःखास घाई?

का गळा माझाच प्यारा हुंदक्याला?

*
हे जिराईतापरी आयुष्य माझे 

जीव नित्याचाच होता टांगणीला 

*
शेवटी मी शोधला ‘माझा’ निवारा

पोरका जो तो इथे आहे स्वतःला 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कोळशाची खाण…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “कोळशाची खाण” ☆ प्रा. भरत खैरकर 

परिसाचे संगे

सोनियाचा गुण

कोळशाची खाण

प्रकाशली – – 

*

पलाच दिवा

पेटवी कुळाला

दुसऱ्याच्या दारी

जेड त्याचा – – 

*
कावळ्यांना आता

गरुडाचे पंख

गिधाडाचे भाव

वधारले – –

*
अविद्येचा अंधार

मृगजळी जिणे

स्वार्थात जगणे

माणसाचे – –

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गरीबाघरली दिवाळी… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

☆ गरीबाघरली दिवाळी☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

 चार भिंतींचं गं घर

 नाही महालाची सर

 सारावता साऱ्या भिंती

 येई सणाचा बहर

*

 दारी सजता रांगोळी

 पोरं धरतील फेर

 दोन पणत्या उंबरी

 उजळती दिशा चार

*

 गेल्या वर्षीचा कंदील

 धुळ त्यावर जमली

 हात मायेचा फिरता

 त्यात चांदणी खुलली 

*

 कोण देईल चिवडा

 कोण देईल चकली

 लाडू पोळीचा खाताना

 पोरं माझी आनंदली

*

 घेता सफाईची कामं

 दोन पैका मिळे ज्यादा

 यंदा केला आहे पोरा

 नव्या कपड्यांचा वादा

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares