मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आला श्रावण श्रावण / वेध माहेराचे… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ आला श्रावण श्रावण / वेध माहेराचे… श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆ आला श्रावण श्रा व ण ! ☆

आला श्रावण श्रावण 

सर पडे पावसाची 

वस्त्र ल्याली अंगभर 

मही हिरव्या रंगाची 

आला श्रावण श्रावण 

ऊन पावसाचा खेळ 

पडे गळ्यात नभाच्या 

कधी इंद्रधनूची माळ

 *

आला श्रावण श्रावण

नद्या नाले ओसंडले 

उंच उंच डोंगर दरीत 

मग प्रपात गाते झाले

 *

आला श्रावण श्रावण

सारे चराचर आनंदले 

कंबर कसून कासकर 

शेती कामाला लागले

 *

आला श्रावण श्रावण

डोळे सयीत पाणावले 

नव्या नवरीच्या मनी 

वेध माहेराचे लागले

वेध माहेराचे लागले …. 

वरील  “श्रावण !” कवितेतल्या शेवटच्या कडव्यात म्हटल्याप्रमाणे, नव्या नवरीला श्रावणात माहेरी जाण्याचे लागलेले वेध कसे असतील, ते सांगायचा प्रयत्न पुढील कवितेत !

 वेध माहेराचे ! ☆

आला श्रावण श्रावण

ऊन ओथंबल्या सरी, 

मोर नाचे आनंदाने 

माझ्या दाटल्या उरी !

   *

आला श्रावण श्रावण

साद येई माहेराची,

दारी उभी वाट पाहे

माय माझी कधीची !

 *

आला श्रावण श्रावण 

माहेराची हिरवी वाट,

वाटे भेटता सोयरे 

होती आठवणी दाट !

*

आला श्रावण श्रावण

 सख्या साऱ्या भेटतील,

 “होतो सासरी का जाच?”

 लाडे लाडे पुसतील !

 *

आला श्रावण श्रावण

गौर साजरी करीन,

पुजून अन्नपूर्णेला 

फेर सख्यांसवे धरीन !

  *

आला श्रावण श्रावण

व्रत वैकल्याचा मास,

शुभ चिंतून साऱ्यांचे 

करीन उपास तापास !

करीन उपास तापास !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुदाम्या भाग्यवान आपण… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुदाम्या भाग्यवान आपण… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

स्वर्गातल्या रोजच्या कामाला

कंटाळून भगवंताने मारली दांडी |

भगवंत अवतरले सुदाम्यासंगे

बघायला भूतलावरची दहीहंडी |

*

कुठे जावे विचार करून

आले दोघेही मुंबापुरीत |

आपला जयघोष ऐकून

हायसे वाटले या नगरीत |

*

भगवंत आश्चर्याने म्हणाले

कोणाचे प्रयत्न चालले अथक |

सुदामा हसत हसत उत्तरले

हे मुंबईतले गोविंदा पथक |

*

दही हंडी का रे टांगली 

त्यांनी इतक्या उंचावर |

पुढाऱ्यांनी महत्वाकांक्षेचे

लावलेत इथे थरावर थर |

*

मडक्यात काय घातलंय 

दही का नुसतेच पाणी |

व्यासपिठावरच्या मंडळीनीच

आधीच मटकावलंय लोणी |

*

अरे त्या कोण नाचत आहेत 

तिथे सुंदर गौळणी |

सेलिब्रिटी तारका डोलती 

डीजेवरची कर्कश्य गाणी |

*

लोणी नाही तर मिळेल का 

थोडंसं दूध आणि दही |

जीएसटी लागलाय आता 

प्रश्न विचारता तुम्ही काही |

*

सुदाम्या भाग्यवान आपण

द्वापार युगातच सरलो |

कलियुगात नामस्मरणासाठी

पोथीतच नाममात्र उरलो |

 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीकृष्ण मुरारी… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रीकृष्ण मुरारी ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

श्रीकृष्ण मुरारी | नंदाच नंदन |

ललाटी चंदन | टिळा असे ||1||

*

गोपिकांचा कान्हा | सावळा श्रीहरी |

वाजवी बासरी | वनराई ||2||

*

राधेचा मुरारी | खोड्या करी भारी |

राधा ही बावरी | मनामध्ये ||3||

*

यशोदेचा लाल | उखळी बांधला | 

जीव हा कोंडला | गवळणींचा ||4||

*

सुदामाचा सखा | वासुदेव पुत्र |

जिवेभावे मित्र | ओळखला ||5||

*

कंसाचा संहारी | हा कर्दन काळ |

देवकीचा बाळ | झाला असे ||6||

*

बारागवे अग्नी | प्याला असे कृष्ण |

मुक्त केले वन | मथुरेत ||7||

*

वृंदा म्हणे कान्हा | माझा नटखट |

वाट दावी नीट | जीवनाची ||8||

*

धरावा विश्वास | असावा मानस |

जाईल मोक्षास | मनुष्यही ||9||

 – दत्तकन्या

© सौ. वृंदा गंभीर

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “नाहीतर धर्मच जिवंत ठेवणार नाही…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? कवितेचा उत्सव  ?

☆ “नाहीतर धर्मच जिवंत ठेवणार नाही…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

संध्याकाळच्या भाकरीचं गणित

जी माणसं दिवसभर सोडवतात,

त्यांना लोकशाहीची व्याख्या 

विचारू नका कधीच,

पण,

तेच लोक भुकेचा अर्थ  सांगतील तेव्हा,

कानावर हात ठेवा 

फार भयंकर बोलतात ही माणसं

*

कोणत्याही फुलांचं सौंदर्यशास्त्र 

त्यांच्यासमोर उलगडू नका

भाकरीसारखं सुंदर फुल 

पाहण्यासाठी तडफडत असतात ही माणसं 

*

ह्या माणसांची भूकच फार फार

सुंदर आहे माझ्या देशा

तरी सुद्धा त्यांची विझेलेली चूल 

राष्ट्रगीत अभिमानाने गाते 

*

राशनच्या दुकानात हातात कार्ड धरून

फार उशिरापर्यंत उभी राहतात ही माणसं

तेव्हा धान्य देणारा राशनवाला माणूस

त्यांना कायम हिटलरच वाटत आलाय

तरीसुद्धा,

ही माणसं चार्ली चॅप्लिनपेक्षाही

हसण्याचा फार सुंदर अभिनय करतात

*

मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे भारता

ह्या माणसांनी भाकरीवरच प्रतिज्ञा लिहिली

तर तुला वाचता येईल का?

प्रतिज्ञा तीच असेल जराही फरक नसेल

तरीसुद्धा तुला ती वाचता येणार नाही

कारण एक भाकरी

फक्त इथंच चारी धर्मात वाटली जाते

कदाचित पोट भरल्यावर कळेल

कोण हिंदू

कोण मुसलमान

कोण सिख

आणि कोण इसाई..

*

पण पोट भरत नाही कारण,

भुकेवर फार प्रेम करतात ही माणसं

ही माणसं कधीच प्रतिज्ञा वाचत नाहीत भारता

ती मनोमन जगतात प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे

सारे भारतीय माझे बांधव आहेत

*

जाता जाता माझ्या कवितेला एवढंच सांग

ही लढाई लढताना त्यांच्या उपाशी पोटाला

जात आणि धर्म काय कळणार आहे.?

*

आणि माझी कविता वाचणाऱ्या 

प्रत्येकाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे

तुम्हा सर्व भारतीयांना

माणूस म्हणून जिवंत राहायचंय की,

तुमच्या धर्माचे पाईक म्हणून?

*

तुम्ही काहीही म्हणून जिवंत राहा

पण,भुकेचे बळी देऊन जर तुम्ही

ही लढाई जिंकणार असाल 

तर मात्र,

मी तुमचा कुणाचाच धर्म जिवंत ठेवणार नाही.

कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 187 ☆ पहिला पाऊस… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 187 ? 

पहिला पाऊस… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

पहिला पाऊस पडला ,

मनाचा गाभारा खुलला

अशांत मन स्थितीला,

शांतीपद देता झाला…०१

*

पहिला पाऊस पडला,

प्राची शहारली गहिवरली

तप्त रखरखीत वाळवंट,

न कळत दशा बदलली…०२

*

पहिला पाऊस पडला,

नदीला शिगेची आस लागली

ओढा अवखळ होता होता,

सागराची उत्कंठा वाढली…०३

*

पहिला पाऊस पडला,

आसमंत शीतल जाहले

बळीराजा सुखावून जाता

ज्वारी दाणे मौक्तिक बनले…०४

*

पहिला पाऊस पडला

निरभ्र झाले आकाश सारे

दमट वातावरण खुलून जाता

सर्वांचेच झाले, वारे न्यारे…०५

*

पहिला पाऊस पडला,

राज ला कविता सुचली

निसर्गाच्या करामती,

रचनेला लय लाभली…०६

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हंडी…” – कवयित्री : सुश्री अश्विनी परांजपे रानडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “हंडी…” – कवयित्री : सुश्री अश्विनी परांजपे रानडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हंडी बांधली षडरिपूंची

रचले सहा पदरी थर 

सहज पार करू म्हणत

चढू लागले वरवर 

*

मोह होता दही लोण्याचा 

प्रत्येकाची नजर वर 

एकमेकांच्या आधाराने 

मार्ग होई अधिक सुकर 

*

जो पोहोचे हंडीपाशी 

वाटे त्याचा मनी मत्सर 

आधाराची कडी सुटता

निसटत जाई प्रत्येक थर 

*

काम क्रोध येता आड 

एकजुटीवर होई वार 

लोभ सुटेना लोण्याचा 

कृष्ण एकच तारणहार 

*

करांगुली सावरे उतरंड 

पुन्हा एकदा रचे डाव 

कर्माचा सिद्धांत सांगे 

फळाची नकोच हाव 

*

हंडी बांधली संकल्पाची 

कर्मयोग स्मरुनी मनात

सत्कर्मांची रास रचता

समाधान ओसंडे उरात ……. 

कवयित्री :  सुश्री अश्विनी परांजपे – रानडे

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावणमासी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावणमासी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(वृत्त~मनोरमा ~गालगागा गालगागा)

श्रावणाचा मास आला

या धरेला मोद झाला

*

लेवुनी ती गर्द वसने

ठाकलेली हर्षवदने

*

चिंब झाली पावसाने

साज ल्याली या उन्हाने

*

रत्न ही बघ भासताती

या पृथेच्या शालुवरती

*

सोनचाफा गेंद फुलले

केतकीचे पर्ण डुलले

*

गंध पसरे आसमंती

उल्हसीता ही मधुमती

*

इंद्रधनुचे रंग गगनी

रंगमय ही खास धरणी

*

पाहताना रूप सुंदर

मोहवी मन हे खरोखर

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

अल्प परिचय 

वय ७१
कथा कविता लेखनाचा छंद.
एकत्र कुटुंब. प्रायव्हेट कंपनीत सेल्समन होतो. २०११ ला निवृत्त झालो.

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस … ☆ श्री अनिल वामोरकर ☆

गरजतात ढग

बरसतात सरी

अवनीच्या गाली

आली बघ लाली..

*

लपंडाव चाले

रवी अन् कुट्ट मेघांचा

हार जीत नसते

खेळ ऊन सावल्यांचा..

*

नेसून शालू हिरवा 

नदीचा तिज किनार

लाजून चूर धरित्री 

नाचे जणू नवनार..

*

गंधाळलेला वारा

रिमझिम ती झड 

नवपरिणीत जणू

लपे झाडाआड…

*

मनमोर नाचे

हर्षित होऊन 

नको जाऊस रे गड्या

तू तर माझा साजण..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ धुंद करी सुगंध… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ धुंद करी सुगंध ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

फुल हिरवे पान हिरवे

हिरवाच त्यांचा गंध

कितीही लपला पानात

तरी सुग॔धच करी धुंद

*

 तीच धुंदी उद्युक्त करी

 शोध घेण्या गंधाचा

 कितीही लपला गर्द पानी

 परिमल सांगे पत्ता त्याचा

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही नेम नाही… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ काही नेम नाही … ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

काही नेम नाही,

फसव्या मृगाचा.

फसवा पाऊस,

फसव्या ढगांचा.

*

कधी कृष्णमेघ,

कधी स्वच्छ हे आभाळ.

जरी चार थेंब,

तरी पाऊस सांभाळ.

*

तुझे माझे आता,

आकाश वेगळे.

वेगळा पाऊस,

वेगळे सोहळे.

*

नको करू आता,

नवी मांडवली.

लखलाभ तुला,

तुझी भातुकली.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares