मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ शेवटचा निरोप समारंभ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शेवटचा निरोप समारंभ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

 आज आयुष्यात पहिल्यांदाच तिला इतका मानपान मिळाला

असा मानपान मिळण्यासाठी तिने पुनः जन्मा यावे असा विचार क्षणभर डोकावला…

 

आज तिच्या घरी सर्वच आले,

माहेरचे, सासरचे, मानाचे अन पानाचे…

 

 आज तिने नाही कुणाच्या पायाला हात लावला,

 तरी कुणालाच तिचा राग नाही आला… 

खरंच आज तिचा पाहुणचार वेगळाच झाला.

 खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 ती आज पहाटे उठली नाही,

म्हणून कुणीच तिला हटकले नाही… 

उशिरा का असेना पण तिने उठावे अशा विनवण्या सगळ्यांनीच तिला केल्या,

खरंच आयुष्यात असा क्षण पहिल्यांदा आला…

 हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 नेहमीच आटप म्हणून कटकट करणारा नवरा आज स्वतःच तिची तयारी करायला लागला,

 तिने त्याचं आज्ञा पालन नाही केलं,

तरीही साश्रू प्रेमाने तिला भिजवू लागला…

 खरंच आयुष्यात पहिल्यांदाच नवऱ्याच्या मनाचा ठाव लागला…

 हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 तिची नवी साडी नेहमीच हसण्याचा विषय होता,

पण आज मात्र सर्वांनी तिला पैठणीचा आहेर दिला…

खणखणत्या बांगड्यांचा चुडा भरला,

तरी आज कुणाच्या डोळ्यात उपहास नाही दिसला…

 खरंच आयुष्यात पहिल्यांदा तिच्या सौंदर्याचा गौरव झाला…

 खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 आज तिच्या डोळ्यात स्मित हास्य,

 तर दुसऱ्यांच्या डोळ्यात मात्र आसवांचं रहस्य…

 तिचे हात कुणाचे अश्रू नाही पुसायला गेले,

 तरी प्रत्येकजण तिच्यासाठी हळहळला…

 खरंच आयुष्यात पहिल्यांदाच प्रत्येक जण तिच्यासाठी रडला…

 हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 आज तिला कुणाचीच पर्वा नव्हती,

 सगळ्या बंधनातून ती मुक्त होती…

 आक्रोश करून पुनः तिला बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला,

 आज पहिल्यांदा जगाला तिचा मोह झाला…

 खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 जिवंतपणी नेहमीच तिच्यावर जबाबदारी राहिली,

 थोडीशी चुकली तर तिला धारेवर धरली…

 आज सर्व त्यागून ती निर्धास्त झाली,

 तरी गुलाबाची शेज सजवून सर्वांनी तिची कदर केली…

 आज पहिल्यांदाच  काट्याशिवाय गुलाब तिच्या वाट्याला आला…

खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

 

 आज प्रत्येकाने तिचा सोहळा पाहिला,

बाकी ती मात्र शांत होती.

तिला पाठवणारा प्रत्येकजण रडला… 

घरचाही रडला, दारचाही रडला, 

पाठचाही रडला, पोटचाही रडला…

 लहानही रडला, मोठाही रडला,

 जेव्हा नवऱ्याने हंबरडा फोडला…

 मुलांनी एकच गलका केला,

तेव्हा तिच्या स्त्रीपणाला खरा अर्थ प्राप्त झाला…

खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

कवी :अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 232 ☆ ज्ञानयज्ञ… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 232 – विजय साहित्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ ज्ञानयज्ञ ☆

रत्नागिरी जिल्ह्यामधे

जन्म चिखल गावात

लाखों मने संजीवित

लोकमान्य समाजात…! १

*

ख्याती निर्भय विद्यार्थी

बुद्धी चौकस प्रखर

झाले निष्णात वकील

नाव बाल गंगाधर….! २

*

जन्मसिद्ध हक्क माझा

स्वराज्याचा अधिकार

थोर विचारी तत्वज्ञ

वाणी अमोघ साकार…! ३

*

स्वराज्याची चळवळ

चतुसुत्री बहिष्कार

दिले राष्ट्रीय शिक्षण

स्वदेशीचा अंगीकार…! ४

*

वंगभंग आंदोलन

शक्तीमान संघटना

होमरूल लीग क्रांती

जन जागृती चेतना…! ५

*

काल गणना पद्धती

आलें टिळक पंचांग

गणिताचे अभ्यासक

दृष्टी शोधक अथांग…! ६

*

ग्रंथ गीतारहस्याने

केला जागृत भारत

ओरायन’ ’आर्क्टिक ने

वैचारिक मशागत….! ७

*

सुरू केसरी मराठा

वृत्तपत्र संस्थापक

हिंदू मुस्लिम ऐक्याचे

परखड संपादक…! ८

*

लावी ब्रिटिशांना घोर

लोकमान्य ही लेखणी

डोके ठेवा रे ठिकाणी

दिला इशारा अग्रणी….! ९

*

तन मन धन दिले

देशसेवा अलौकिक

देशभक्त पत्रकार

ग्रंथ निर्मिती मौलिक…! १०

*

लखनऊ कराराने

एकसंध केला देश

लोकमान्य टिळकांचा

देशभक्ती हाची वेष…! ११

*

उत्सवाची परंपरा

सुरू शिवजन्मोत्सव

गावोगावी गणपती

भक्ती शक्ती महोत्सव…! १२

*

कार्य शैक्षणिक थोर

केला शिक्षण प्रसार

संस्थापक प्रशालेचे

केला ज्ञानाचा प्रचार..! १३

*

लाल बाल पाल यांनी

घडविला इतिहास

दुष्काळात टिळकांनी

पुरविला मुखी घास…! १४

*

वैचारिक मतभेद

वाद आगरकरांशी

ध्येयवादी विचारांनी

लढा दिला ब्रिटिशांशी…! १५

*

गाणी व्याख्यान मेळ्यांनी

जोपासली लोककला

लोकोत्तर कार्य केले

पत्रकार योगी भला…! १६

*

सरदार गृहामध्ये

स्फूर्ती देवतेचे रूप

आज त्यांची पुण्यतिथी

तेजाळल देहधूप…! १७

*

लोकमान्य टिळकांचा

शब्द शब्द अंतरात

ज्ञानयज्ञ स्वराज्याचा

प्रज्वलित दिगंतात…! १८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महापूर… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ महापूर… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

नदी म्हणजे जीवनदायिनी

स्वच्छ, सुंदर निर्मळ पाणी

साऱ्या जीवा संजीवन देई

वाहत असते बारमाही

*

पावसाच्या नक्षत्राने

आसमंताला चिंब केले

धरण,नदीचे पाणी चढले

प्रश्न पाण्याचा मिटला ,वाटले

*

पण निसर्गाचे चक्र फिरले

पावसाने थैमान घातले

पाण्याचे लोंढे वाहिले

महापूराचे संकट आले

*

पै पै करुन संसार सजवला

जणू स्वप्नांचा रचला इमला

सारे सारे वाहून गेले

नदीमाय गं असे का झाले?

*

कसा उभारु डोलारा पुन्हा

घरात न उरला एकही दाणा

आवर आता तुझा पसारा

साऱ्या जीवाना मिळू दे दिलासा

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

*

आख्याहि मे को भवानुग्ररूपोनमोऽस्तु ते देववर प्रसीद ।

विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यंन हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्‌ ॥३१॥

*

कसले हे उग्र रूप आपले देवश्रेष्ठा नमन तुला

प्रसन्न व्हा आदिपुरूषा दावी गुण ना तव रूपाला ॥३१॥

श्रीभगवानुवाच

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धोलोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।

ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥३२॥

कथित श्री भगवान

महाकाल मी नाशकर्ता तिन्ही लोकांचा

या समयाला या योद्ध्यांचा अंत व्हायाचा

शस्त्रसज्ज होउनी होई युद्धाभिमुख पार्थ

तव कर्माविनाही यांचा नाश आहे खचित ॥३२॥

*

तस्मात्त्वमुक्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्‍क्ष्व राज्यं समृद्धम्‌ ।

मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्‌ ॥३३॥

*

जिंकण्यास शत्रूला समरी यशःप्राप्ति करण्या 

युद्धास्तव उत्तिष्ठ भवान समृद्ध राज्य भोगण्या

तू तर केवळ कारण होशिल वीरांच्या या मृत्यूचा

सव्यसाची हे केला मीच अंत तयांच्या जीवनाचा ॥३३॥

*

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान्‌ ।

मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठायुध्यस्व जेतासि रणे सपत्नान्‌ ॥३४॥

*

द्रोण भीष्म जयद्रथ कर्णादि वीरांचा मम हस्ते अंत

साधन होउनिया माझे युद्धात करी तू त्यांचा अंत

विजयी होशिल या समरात हाचि कालाचा लेख

शंकित होउनिया मानसी होई ना तू युद्धपराङ्मुख ॥३४॥

संजय उवाच

एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी ।

नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णंसगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥३५॥

कथित संजय

ऐकुनिया ही केशववाणी अर्जुन भयभीत

प्रणाम करता झाला कृष्णा कंपित जरी हस्त

लीन होउनी पूरभु चरणांसी भावभरा तो स्वर 

व्यक्त करोनी भाव आपुले कथिता होई सत्वर ॥३५॥

अर्जुन उवाच

स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।

रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्‍घा: ॥३६॥

*

मुदित होतसे तुझ्या कीर्तने  इहलोक समस्त

धन्य जाहले तव अनुराग तयांस होता प्राप्त

समग्र सिद्धसमुदाय होत तव चरणांवर नत

असूर सारे करित पलायन होउनिया भयभीत ॥३६॥

*

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्‌ गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।

अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्‌ ॥ ३७ ॥

*

ब्रह्माचे आदिकर्ता अनंत सर्वश्रेष्ठ महात्मन

सदसत्परे अक्षर  देवेश ब्रह्म सच्चिदानंदघन 

तव चरणी लीन होउनी सर्वस्वाचे समर्पण 

शरण पातलो हे भगवंता तुम्हासी करितो नमन ॥३७॥

*

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम्‌ ।

वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥३८॥

*

आदिदेवा पुराणपुरुषा संरक्षण करुनी पाळता  तुम्ही या विश्वाला

अनन्तरूपी हे परमेशा परिपूर्ण अहात व्यापुनी अखिल जगताला ॥३८॥

*

वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्‍क: प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च।

नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥३९॥

*

अनल अनिल वरुण सोम प्रजापति ब्रह्मा ब्रह्मपिता

पुनःपुनः सहस्रावधी नमन तुम्हा चरणी हे जगत्पिता ॥३९॥

*

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व। 

अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वंसर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥४०॥

*

आदि ना अंत तव सामर्थ्या अष्टदिशांनी नमन तुम्हा

विश्वव्यापी सर्वरूपी अतिपराक्रमी प्रणाम असो तुम्हा ॥४०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत यावा आनंदाचा ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंत यावा आनंदाचा…  श्री सुहास सोहोनी ☆

आजोबा :

झाडाच्या फांदीवर होते

पान एकले विसावले

झाडावरचे वेगवेगळे

खेळ बघोनी सुखावले …

 

आजी :

पानाच्या जोडीला होते

एक आणखी पान

जाणत होती दोन्ही पाने

एक‌ दुज्याचे मन …

 

मुलगा नि सून :

नकळत येऊन पाउस वारे

पान भिजावे पान डुलावे

नकळत फांदिस मिळता झोका

हिंदकळोनी पान हसावे …

 

नातू :

गाता पक्षी कुणी चिमुकला

येऊन पानासी बिलगावा

पानावरती तरंगणारा

थेंब चोचिने पिऊन जावा …

 

नात :

सानुकल्या लाघवी कळीने

लाजत घालावी साद

कुरवाळुनिया मग पानाने

द्यावा तिजला प्रतिसाद …

फांदी पाने कळ्या नि पक्षी

ऐसा मेळ जुळावा

वसंत यावा आनंदाचा

अवघा वृक्ष फुलावा …. .

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – लेकुरवाळा – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– लेकुरवाळा – ? ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे 

संत मांदियाळी विठूचे गोजिरे ||

*

ज्ञाना तुका नामा हाती कडी घेती

निवृत्ती सोपान सवे चालताती

लेकुरवाळे रूप पाहुनी भान नुरे

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||

*

वाळवंटी सारे संत जमा झाले

संतांच्या मेळ्यात देव दंग झाले

मायबाप हरी संगे विठू घोष पसरे

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||

*

वारीची पर्वणी जीव शिव जमले

चंद्रभागा तीर नाचू गाऊ लागले

दंग पंढरी क्षेत्र नामाच्या गजरे

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भक्तांची आण… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? भक्तांची आणश्री प्रमोद वामन वर्तक ☆

विरह विठुरायाचा 

होणार आजला दूर

सावळ्याच्या पंढरीला

येई भक्तीचा महापूर

*

धन्य झाली चंद्रभागा

सारी पंढरी रंगली

पांडुरंगाच्या दर्शनाने 

भक्ती रसात दंगली 

*

नको देवू तू अंतर

जीव तुटे तुझ्याविण

घडुदे वारी दरवर्षी

तुला भक्तांची आण 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 240 ☆ गज़ल – रंग सारे पाहिले की… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 240 ?

गज़ल – रंग सारे पाहिले की☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

कोणत्याही सत्यतेला शक्यतो टाळू नको

त्या जुन्या नात्यास आता व्यर्थ सांभाळू नको

*

रंग सारे पाहिले की, मैफलींचे तू इथे

मौन त्यांनी पाळलेले तू तरी पाळू नको

*

श्वापदांची काळजीही घेतली जातेच की

माणसांच्या भावनांना,  जास्त कुरवाळू नको

*

कोण आहे राव येथे, चोरट्यांनी हेरले

अक्षरांची रत्नमाला कुंतली माळू नको

*

तूच जा परतून आता, थांबली आहेस  का ?

काळ तो बदलून गेला, पुस्तके चाळू नको

*

मान्य आहे फक्त  पूर्वी ,खेडकर पूजा इथे

तू न कोणी संत वेडे, आसवे ढाळू नको

*

वेगळे आहे जगाचे वागणे आता “प्रभा”

त्या जुन्या चाफ्यासवे आकंठ गंधाळू नको

☆  

© प्रभा सोनवणे

१३ जुलै २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झळा श्रावणाच्या… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ झळा श्रावणाच्या… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

कधी ऊन.. पाऊस..वारा सुगंधी 

                  धरा तृप्त.. ओसंडणारी तळी

*

खुले वैभवाचेच भांडार झाले 

                 भराव्या कश्या अन् किती ओंजळी 

*

दिशातून उस्फूर्त आनंद धावे

                 प्रफुल्ले उदासी, निवाल्या धगी

*

सरे दुःख.. दुष्काळ रानी..मनीचा 

                 सुरू जाहलेली सुखाची सुगी

*

क्षणी विध्द पक्षी निवा-यास येई

                 उदासीन डोळे..भिजे..गारठे

*

आता ऊन.. पाऊस..वारा.. झळांचा

                 ऋतू श्रावणाचा दिसेना कुठे…

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 138 – बूढ़ी आजी माँ और मैं☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “बूढ़ी आजी माँ और मैं। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 138 – बूढ़ी आजी माँ और मैं ☆

मैं

टकटकी लगाए

देख रहा हॅूं ,

उन हाथों को

जो कर्मठता के

प्रतीक थे ।

माटी के लौंदो में

सने वे हाथ

अपने व अपने-

जिगर के टुकड़ों के लिए

घरौंदा बनाने

कितने उतावले थे ।

संग्रह की प्रवृत्ति ने

उन्हें कहीं का न छोड़ा था ,

तन तार-तार कर दिया था –

और सम्पूर्ण जीवन

लगा दिया था, दाँव पर ।

तब कहीं जा कर

एक घर बना था ।

ऐसा घर, जहाँ पूरा

कुनबा का कुनबा

रह रहा था-बड़े ठाट से,

बड़े आराम से ।

आज वही हाथ

झुर्रियों से भऱे थे –

और काँप रहे थे ,

किसी सहारे की आस में ।

इस कोने से उस कोने

घिसट- घिसट कर

लोगों के दिलों में

बैठने भर के लिये

स्थान ढूँढ़ रही थी ।

पर जगह तो

बिल्कुल सिमट कर

रह गयी थी ।

अब तो वह मात्र

पूजा गृह से बुहारे गये

बासे फूलों

और शेष बचे हवन के

कचरे जैसी थी ,

जिसे यूँ ही झाड़ कर

कहीं भी नहीं डालते

क्योंकि ऐसा करने से

लगता है -पाप ।

फिर तो उसे अभी कुछ दिन और

एक कोने में पड़े रहना है ।

जब तक वह ढेर न हो जाये,

ऐसा करने से किसी को भी

पाप नहीं लगेगा ।

और साथ ही सब पुण्य के

भागीदार बनेंगे ।

बस सभी को इंतजार है,

उनकी मृत्यु और उनसे मुक्ति का ।

जीवन का यह अंतिम सत्य

इसी तरह बार-बार दुहराया जाता है ।

इसीलिए कभी -कभी

मुझे अपना शरीर भी

झुर्रियों के आवरण से ढॅंका,

कमानी सा झुका,

खाँसता खखारता-

और हड्डियों के ढाँचे सा

किसी डॉक्टर की डिस्पेंसरी में टंगा

कैडलॉक सा नजर आता है।

बूढ़ी आजी के

काँपते तन के समान

स्वयं को पाता हूँ ।

और लगता है- मैं भी

उस कचरे के समान पड़ा हूँ ,

एक किनारे

ढेर होने के लिए ।

कोई आए और मुझे भी

विसर्जित कर आए ।

शायद इसी को

प्रत्येक के जीवन की

नियति कहते हैं ।

या कृतघ्नता की

पराकाष्ठा ।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares