(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपका भावप्रवण कविता – कथा क्रम (स्वगत)…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 193 – कथा क्रम (स्वगत)…
☆ आता तरी सावरा रे… कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆
कधी कधी मनाची अस्वस्थता इतकी टोकदार असते की अशावेळी कुणी सोबत असण्यापेक्षा एकटेपणातच डुबून जाणं अधिक सुखाचं वाटतं किंवा आपल्या भोवतालचं जग हे किती ढोंगी, फसवं आहे याची जाणीव झाल्यामुळे या सर्वांपासून दूर राहण्यातच मन:शांती आहे अशा तऱ्हेची एक एकाकी मानसिकता बनते. शिवाय, “माझं मीच पाहून घेईन” माझं यश माझं अपयश याचं काय करायचं ते मी बघेन.” अशा तऱ्हेचा कणखर कल मनाचा त्याच क्षणी होतो. माननीय सुहास पंडित हे अशाच प्रकारचा विचार त्यांच्या, आता तरी सावरा रे या कवितेतून मांडत आहेत. मला ही कविता फारच आवडली आणि या कवितेत दडलेले अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी याचा रसास्वाद घ्यावा असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
श्री सुहास रघुनाथ पंडित
☆ आता तरी सावरा रे ☆
☆
मी किती अस्वस्थ आहे शांतविण्या येऊ नका
दाह आहे अंतरीचा लेप वरचे लावू नका.
*
निसटले जे यश तयाला निश्चये मिळवेन मी
दूर माझा गाव गेला तरी तो पुन्हा गाठेन मी
*
शब्द साधे बोलतो तरी का बरे ते बोचती
फूल वेचायास गेलो काटेच सारे टोचती
*
कष्टणारा कष्टतो अन् पाहती सारे मजा
मूर्ख सुखी लोळतो अन् शहाणा भोगी सजा
*
थांबवा हे खेळ फसवे लाज थोडी बाळगा रे
तोल ढळत्या या भूमीला, आता तरी सावरा रे
☆
– सुहास रघुनाथ पंडित .सांगली.
ही संपूर्ण कविता वाचल्यानंतर कवितेतला विषाद प्रकर्षाने जाणवतो. विचारातून विषाद आणि विषादातून सत्याकडे जाण्याचा एक अदृश्य प्रवास या कवितेत अनुभवायला मिळतो आणि या विषयातलं वास्तव मनाला भिडतं. वाचकालाही ते विचार करायला लावतं.
मी किती अस्वस्थ आहे शांतविण्या येऊ नका
दाह आहे अंतरीचा लेप वरचे लावू नका…
कवी म्हणतात,” माझी अस्वस्थता का आणि किती आहे हे तुम्हाला कळणारच नाही किंबहुना ती कळून घेण्याची क्षमता तुमच्यात आहे का याबद्दलच मी साशंक आहे. माझ्या अंतरात पेटलेली ही धग आहे आणि ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल? तुमचे शब्द, तुमचे सांत्वन हे वरवरचे आहे आणि ते लटके आहे. त्यात कुठल्याही खऱ्या भावनांचा अंश नाही म्हणूनच सांगतो जरी मी अत्यंत अस्वस्थ असलो तरी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या या सांत्वनपर शब्दलेपनाने माझ्या अंतःकरणातला जाळ निवणार नाही. त्यापेक्षा मला एकटेच राहू द्या. LEAVE ME ALONE.”
लेप वरचे लावू नका ही काव्यपंक्ती खूपच लक्षवेधी आहे. लोक मुखवटे घालून आपल्या आजूबाजूला फिरत असतात. अधरी एक आणि उदरी एक अशी त्यांची दुहेरी वृत्ती असते आणि या लोकांच्या बेगडीपणामुळेही कवी कमालीचे अस्वस्थ आहेत.
निसटले जे यश तयाला निश्चये मिळविन मी
दूर माझा गाव गेला तरी पुन्हा गाठेन मी
अपयशाने सर्वसामान्य माणूस खचतो. काही क्षणाची निराशा जीवनात येते ही. कधी ते नैराश्य जगण्या बोलण्यातून व्यक्त होते आणि भोवतालची माणसं सहानुभूतीपूर्वक काही सल्ले देतात तर काही असेही महाभाग असतात की ते नैराश्यात अधिक भर घालतात त्यापेक्षा हे काही नकोच.
“माझ्या निराश मनाला मी सावरेन. जे निसटले ते पण स्वबळाने, जिद्दीने मी मिळवेन. स्वप्नभंगाचं दुःख पचवून, देअर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम असा विचार बाळगून जे दुभंगलं ते सांधण्याचा प्रयत्न करेन.”
दूर माझा गाव गेला तरी पुन्हा गाठेन मी ही ओळ रूपकात्मक आहे. इथे माझा गाव यात माझ्या स्वप्नांचा गाव म्हणजेच माझी स्वप्नं असा अर्थ अभिप्रेत असावा आणि त्या दृष्टीने कवी म्हणतात की,” एक ना एक दिवस मी माझे स्वप्न पूर्ण करेनच.”
शब्द साधे बोलतो तरी का बरे ते बोचती
फूल वेचावयास गेलो काटेच सारे टोचती
कवीच्या मनात खंत आहे. ते म्हणतात,”खरं म्हणजे लोकांच्या या दुनियेत ना मी स्वतःला सिद्धच करू शकलो नाही. लोकही माझ्या विचारापर्यंत पोहोचू शकले. कुणीच मला खऱ्या अर्थाने समजून घेण्यास सफल झालेले नाहीत. माझ्या साध्या बोलण्याचाही विपर्यास केला जातो.मला समजत नाही त्यातून नकारात्मक अर्थ काढून ते टोचणारे का ठरावेत? वास्तविक मला फुलं वेचायची असतात पण माझ्या वाटेला मात्र काटेच येतात.. असे का? “
फुले वेचावयास गेलो काटेच सारे टोचती ही ओळ रूपकात्मक आहे. ज्याचे चिंतावे भले तो म्हणे आपलेच खरे
“काहीतरी चांगलं पेरण्याचा मी प्रयत्न करतो पण ते सारं फुकाचं ठरतं. करायला जातो एक पण घडतं मात्र भलतंच.”
कष्टणारा कष्टतो अन् पाहती सारे मजा
मूर्ख सुखी लोळतो आणि शहाणा भोगी सजा…
कवीच्या मनात असे नकारात्मक विचार येण्यास कारणीभूत आहे सद्य परिस्थिती हे निश्चितच. आजकाल जीवनात खरोखरच कष्टांना मोल राहिलेलं नाही. कष्ट करणारी व्यक्ती समाजात हास्याचा नाहीतर उपहासाचा विषय होतो.
“फुका कष्टतो तू लेका” असे शब्दांचे फटकारे त्याला मारले जातात.
हे कडवं वाचताना कवीच्या मनातले विचार वाचक वाचू शकतो. केल्या कष्टाची अथवा कामाची दखल घेतली जात नाही. पुरेशी दाद मिळत नाही, ॲप्रिसिएशन हे तर फारच दूर राहिलं पण कित्येक वेळा आपल्या श्रमाचे श्रेय कोणीतरी दुसराच घेऊन जातो आणि आपण मात्र त्याच खड्ड्यात राहतो. ज्याला अक्कल नाही, उमज नाही तो राज्यपदावर सहज बसतो आणि शहाणा मात्र न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगतो.
कवी सुहास पंडितांनी केलेलं हे भाष्य म्हणजे ज्वलंत वस्तुस्थिती आहे. यात नकारात्मकता असली तरी त्यात एक दारुण सत्य, वास्तव, दडलेलं आहे. कुणाही जागृत,संवेदनशील मनाच्या माणसाला याची चीड येणं, विषाद वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे.
थांबवा हे खेळ फसवे लाज थोडी बाळगा रे
तोल ढळत्या या भूमीला आता तरी सावरा रे…
हा शेवटचा चरण म्हणजे कवीच्या संपलेल्या सहनशक्तीचा परिपाक आहे. भोवतालचा बदललेला माणूस, त्याची घसरलेली मूल्ये, नीती, बेरडपणा ढोंगीपणा, खोटेपणा, मतलबीपणा, आत्मकेंद्रीतपणा, मूळातच हरवलेली विश्वासार्हता, सडलेली सारी यंत्रणा आणि त्यात भरडलेली अस्सल माणूसकी पाहून कवीचं मन रक्तबंबाळ झालं आहे. त्याच्या मूल्याधिष्ठित, तत्त्वप्रेमी मनाला या सर्वांशी जुळवून घेणे आता अशक्य झाले आहे आणि त्याचाच उद्रेक झाला आहे आणि त्यामुळेच त्याच्या मुखातून असे उद्गार बाहेर निघतात,
“अरे षंढा! हे फसवे खेळ आता तरी थांबव. थोडी तरी लाज बाळग. सद् सद् विवेकबुद्धीला विचारून पहा आणि तुला याची जाणीव आहे का तुझ्या या मायाजालात तूच गुंतत चालला आहेस. जागा हो माणसा! जागा हो! डोळे उघड.”
तोल ढळत्या या भूमीला आता तरी सावरा रे यातही एक सुंदर रूपक आहे. भूमीचा तोल ढळतोय म्हणजे साऱ्या विश्वातच नैतिकतेची पातळी ढळलेली आहे, खालावलेली आहे. एक अनाचार, अनागोंदी सर्वत्र माजलेली आहे. या दोन ओळीत मला साऱ्या जगात चाललेला मानवतेचा संहार जाणवतो. सत्तेसाठी होणारी युद्धे, बळी तो कान पिळी हा जंगलचा कायदा बोकाळलेला दिसतोय हे पाहून कवीचं मन अत्यंत उद्विग्न होतं आणि त्या क्षणी त्याला एकच जाणवतं, ज्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे ती सावरण्याचं कामही आता त्यांचंच आहे.बूमरँग सारखी त्यांची स्थिती झाली आहे म्हणूनच कवी त्यांना म्हणतो,” “आता तरी सावरा रे.. अजून वेळ गेलेली नाही. या मानवी जीवनात शांती, समृद्धी, एकोपा, समता, बंधुता आणि खऱ्या भावनांची, सहानुभूतीची पेरणी व्हायला हवी.”
अशी सुंदर संदेश देणारी खोल, गंभीर अर्थ उलगडवणारी सुरेख काव्यरचना. हे वैयक्तिक विषादातून निर्माण झालेलं काव्य असलं तरी एक जळजळीत वास्तव मांडणारं आहे.
येऊ नका— लावू नका, मिळवेन मी— गाठीन मी, बोचते— टोचते, मजा— सजा ही काफियत मनातल्या उद्रेकाच्या भावनांना चांगलीच अधोरेखित करते. ही संपूर्णपणे नियमात रचलेली गझल नसली तरी या रचनेला गझलेचा बाज जाणवतो. वाचताना वाचक कवीच्या भावनांशी तितक्याच आवेशाने जोडला जातो हे या काव्यरचनेचे संपूर्ण यश आहे असे मला वाटते.
कुठलाही कवी कविता रचतो तेव्हां त्याच्या मनातले विचार वाचकाला जसेच्या तसे उमजतीलच हे संभाव्य नाही.
इतकं सारं लिहिल्यानंतर मला क्षणभर असेही वाटले की विकासाची धुंदी चढलेल्या माणसामुळे पर्यावरणाची जी प्रचंड हानी होत आहे त्यामुळे तर कवीचं मन या ठिकाणी अस्वस्थ झालेलं आहे का? आणि कुठल्याही प्रकारची विकासास पोषक ठरणारी समर्थनं त्याला आता ऐकायचीच नाहीत? एकाच विचाराने कवी घेरलेला आहे की आता हे
भूमीला ओरबाडणारं विकासयंत्र थांबलंच पाहिजे. पृथ्वीचा तोल सांभाळलाच पाहिजे.