मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ज्ञानसविता… ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ ज्ञानसविता … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

‘ ज्ञानसविता ‘ म्हणावी अशी विलक्षण बुद्धिमान, कर्तबगार आणि कार्यसमर्पित असणारी माझी पत्नी डॉ. सौ. अपर्णा श्रोत्री हिचे १० डिसेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले. आता केवळ तिच्या असंख्य आठवणी मनात अविरत रुंजी घालत राहिल्या आहेत. अपर्णाने आपले सारे आयुष्य मातृत्वाच्या सेवेच्या संवर्धनात आणि आपल्या शिष्यांना तरबेज आणि निपुण करण्यात वेचले. तिच्या त्या अविरत कार्यापुढे आज पुन्हा एकदा नतमस्तक होतांना मला अगदी माझ्याही नकळत सुचलेली ही कविता — जणू मी मनःपूर्वक तिला वाहिलेली श्रद्धांजलीच – – 

☆ ज्ञानसविता … ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली

उजळूनी साऱ्या विश्वाला कर्मप्रभा शाश्वत झाली ||धृ||

*

देवि सरस्वति खिन्न जाहली ज्ञानकोशही स्तब्ध जाहला

मातृत्वाचा विरस जाहला धन्वंतरीही सुन्न जाहला

यमपाशाचा वेध निष्ठुर देवी शारदा निष्प्रभ झाली 

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||१||

*

गुरुस्थानी ती शिष्यगणांच्या सकलांची माता होती

ज्ञान देऊनी कुशल बनविले मातृत्वाची सेवक होती

सक्षम केले लक्ष करांना मातृसेवा बळकट केली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||२||

*

ज्ञान अर्पिले प्रेम वर्षले वात्सल्याची माता ती 

कवच होऊनी निरामयाचे मातृत्वाची रक्षक ती

वसा घेउनीया सेवेचा मातांच्या अजरामर झाली 

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||३||

*

धनसंपत्ती कीर्ति प्रतिष्ठा मनात नव्हती अभिलाषा 

गर्भवतींचे रक्षण करणे जीवनात घेतला वसा

शिष्यगणांना निपुण करुनीया कर्मसिद्ध जाहली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||४||

*

समाजसेवा अंगिकारली कुटुंब अपुले विश्व जाणुनी

जोखीम भरल्या मातांसाठी कवच जाहली झणी धावोनी

विद्ध होउनी मृत्यूने मातांच्या कार्या सिध्द जाहली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||५||

*

अंतर्यामी अखंड अविरत सुरक्षीत प्रसूतीचा ध्यास 

सुदृढ शिशु जन्माला यावे सदैव जागृत होती आंस

साध्य कराया पावन ध्येया बहुत ग्रंथ संपदा लिहिली 

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||६||

*

अजातशत्रू जीवनात या विश्वाची ती सखी जाहली

जन्म देऊनी दोन बालका लाखोंची आई झाली

पत्नी होऊन एक क्षणाची कालातीत माता झाली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||७||

*

निरोप अपुला तृप्त मनाने घेउन निजधामा गेली 

समाधान तिज आत्म्याला कर्तव्याची बूज राखली

आपपराचा भाव कधीही मनी ठेवुनी ना जगली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||८||

*

कर्मापासुनिया निवृत्ती अंतर्यामी तृप्त होऊनी 

झेप घेतली ब्रह्म्यालागी निजदेहाला अंतरली

सद्गती लाभो तुला अपर्णा दिव्य प्रार्थना आळविली

आश्वासुनिया मातृत्वाला ज्ञानसविता अस्त पावली ||९||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दिनक्रम ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? दिनक्रम ? ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर 

फेसाळत्या या लाटा 

किनारी भेटाया येती

किनारा तिला भेटता

मिळे त्यांना तृप्ती

*

नभीचे हे सुर्य अन् चंद्र 

यांचे त्यांना आकर्षण 

भेटण्या त्यांना घेती रूप रौद्र 

अन् येताच किनारी होती अर्पण 

*

कधी पोटात घेती

कित्येक ते जीव 

कधी बाहेर फेकती

परतुन त्यांचे शव

*

नसे त्याची लाटांना

कोणतीच खंत 

दिनक्रम हा त्यांना

नसे काही भ्रांत 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सूत्र… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

सूत्र ☆ 🖋 मेहबूब जमादार ☆

जीवनी ताल असता तू बेताल वागू नको

गोडशा फळा वरील कडू साल होऊ नको

 *

दुसरा हात घेऊनी हाती माणसाने चालावे

भल्या वाटेवर चालताना तू कुणा रोखू नको

 *

नदीनेही वळता वळता दोन्ही काठाकडे पहावे

तिला जाउ दे वळणाने पण तू बांध घालू नको

 *

जगता जगता आपण फसतो, बऱ्याचदा चुकतो

आनंदी जगत असताना तू कुणाला रडवू नको

 *

आकाशातल्या ताऱ्यांशी आपण तुलना करू नये

रात्रीचं ते चमकतील भर दिवसा त्यांना पाहू नको

 *

जे आपले नाही ते मिळवण्या तू उगा मरू नको

दुसऱ्या साठी जगायचे हे सूत्र मात्र विसरू नको

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “काय हवय…?” ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

काय हवय…? ☆ श्री सुजित कदम ☆

☆ 

त्या दिवशी मंदीरातून

देवाच दर्शन घेऊन मी बाहेर पडलो

तेवढ्यात…

मळकटलेल्या कपड्यांबरोबर

लेकराचा मळकटलेला हात

समोर आला…!

मी म्हंटलं काय हवंय..?

त्यांनं…

पसरलेला हात मागे घेतला आणि

क्षणात उत्तर दिलं … आई…!

मी काहीच न बोलता

खिशातलं नाणं त्याच्या मळकटलेल्या

हातावर ठेऊन निघून आलो…

पण.. तो मात्र

वाट पहात बसला असेल…

मळकटलेला हात पसरल्यावर

त्यानं असंख्य जणांना दिलेल्या

उत्तराच्या उत्तराची…!

 

© श्री सुजित कदम

मो .. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “गवतपात्याचे हायकू…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “गवतपात्याचे हायकू” ☆ प्रा. भरत खैरकर 

दवाचा थेंब

गवतपात्यावर पडला

मधातुन चिरला….

 *

सुर्याचे किरण

पात्यावर थांबले

लख्ख चकाकले!

 *

लढवितो वारा

तृणांकुरावरी

इवलाल्या तलवारी…

 *

एक फुलपाखरू

पात्यावर बसलं

हलकेच झुललं…

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “अगदी मनातले…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ “अगदी मनातले…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

खाली दगड असोत की वाळू असो 

खत – पाणी असो नसो 

मनापासून फुलणं मी विसरत नाही 

मला कशानेच फरक पडत नाही…

*

रंग नाही रूप नाही 

आकर्षित करणारा सुगंध नाही 

आणि माझ्याकडे कुणी बघतंय की नाही 

याने मला काहीच फरक पडत नाही…

*

बस् निसर्गाची कृपा आहे 

किंचित प्राण माझ्यातही फुंकलेला आहे 

हे माझ्यासाठी काही कमी नाही 

मग फरक मला मुळी पडतच नाही…

*

इवलंसं माझं जग आहे 

इवल्याशा डोळ्यांनी मला ते दिसतं आहे 

मग मी कुणाला दिसो ना दिसो 

मला मुळीच फरक पडत नाही…

*

आयुष्य म्हणजे मुठीतली वाळू 

माणसाला कळतं पण वळत नाही 

मी मात्र मजेत डोलतांनाही हे विसरत नाही 

मग त्याने मला फरक काहीच पडत नाही…

*

मी आज आहे आणि उद्या नसणार आहे 

हे त्रिकालाबाधित सत्य मी जाणलं आहे 

पण म्हणून मी आजच कोमेजणार नाही 

एकदा हे सत्य स्वीकारलं की…

 मला ‘आज’ काहीच फरक पडत नाही…

कवयित्री : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 254 ☆ त्या  वाटेवर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 254 ?

☆ त्या  वाटेवर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गतकाळाचा  जन्म जिव्हाळा

आठवणींचा फक्त पाचोळा

त्या वाटेवर ……

 

हुंदडणारे मुग्ध बालपण

नात्यांची गहिरी गुंफण

त्या वाटेवर …….

 

खळखळणारा  अवखळ ओढा

सोनपिवळ्या तरवडाची  गर्दी

पाण्या मधली  दाट लव्हाळी

इथेच होती एकेकाळी …….

पाहते आता ठक्क कोरडी

फुफाटलेली ओढ्याची जागा

त्या वाटेवर ……

 

बुजलेल्या  ढव-याची  खूण,

पाषाणाची  जुनी शुष्क डोण

त्या वाटेवर …….

 

दगडी वाड्याच्या  जागी आता

बोरी ,बाभळी आणि  सराटा ,

परी वास्तुचे  रक्षण करतो ,

भुजंग काळाचा निरंतर …..

त्या वाटेवर ………..

© प्रभा सोनवणे

१४ नोव्हेंबर २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कवितेचे झाड….” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “कवितेचे झाड…. ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

मनास अंकुर फुटता

भावनांचा जन्म होई

शब्दातून मग कवितेस

फुटे नवी पालवी….

*

अनुभवांचे खतपाणी

संवेदनांचे सिंचन

विचारांची निगराणी

कल्पना वास्तवाचे मिलन…

*

कधी मोहर कधी पानगळ

कवितेचे झाड अवखळ

तिच्यासोबत मी कणखर

आणि जगणे सहज, सुंदर….

*

प्रेम आनंदाने बहरते

कवितेचे झाड माझे

मायेच्या सावलीत त्याच्या

ही शब्दकळी सुखावते….

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ काळरात्र… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ काळरात्र… ☆ श्री सुनील देशपांडे 

कोयनानगर – ज्या भूमीवर माझं बालपण, शालेय शिक्षण झालं ती स्वप्ननगरी १९६७ मध्ये ११ डिसेंबर या दिवशी भूमिगत (!) झाली.  त्याच्या आठवणी अजूनही मधून मधून डोके वर काढतात आणि कधी कधी काव्यरूपातही उमटतात.

☆ काळरात्र … ☆ श्री सुनील देशपांडे 

ती काळरात्र होती, भूमीतुनी उसळली.

तोडून काळजाचा, लचका, निघून गेली

ती काळरात्र होती, फाडून भूमी आली.

गाडून स्वप्ननगरी, कोठे निघून गेली ?

 *

झोपेत साखरेच्या, देऊन वेदनांना,

क्रूर हसत होती, ती काळरात्र होती.

कित्येक चांदण्यांना, विझवून ती निमाली,

की कृष्णविवर कोठे, शोधून लुप्त झाली?

 *

कित्येक भक्त होते, देवास प्यार झाले.

ती काळरात्र मग का, देवाकडून आली?

कित्येक संत गुरुजन, मंत्रून भूमि गेले.

तप पुण्य त्या जनांचे, उधळून ती परतली.

 *

कित्येक वर्ष सरले, तो काळ निघून गेला.

पण काळजावरी ती, दुश्चिन्ह कोरूनी गेली.

 — श्री सुनील देशपांडे

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “== जीभ ==” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “== जीभ ==” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जीभ चालते, सुटते, चावली ही जाते

उचलता जिभेला ती टाळ्याला लागते

हाड नाही तिला, वळेल तसे बोलते

 चाटता जिभल्या कोणी चोचले पुरविते॥१॥

*

सोडताच सैल जीभ म्हणे लगाम घालावा

जीभ चाळवता आवळती ताबा ठेवावा

धार लावून बसू नये तिला आवर घालावा

दावली म्हणून हासडू नये तुकडा न पाडावा॥२॥

*

जीभ वेडावते जडावते चुरचुर करते

काळी जीभ फाटकी जीभ चुकचुक करते

जीभ घोळवित बोलता साखरपेरणी करते

दांडपट्टा जिभेचा चालता कोणा गारद करते॥३॥

*

जीभेचा शेंडा मिरवी कोणी कोणाला शेंडाच नसतो

मुळ पोटात जीभेचे हाताने करता चाखतो

कोणी उगाच जीभ नाकाला की लावतो

गिरणी पट्ट्यासम चालता त्यास सुमार नसतो॥४॥

*

जिभेने चाटून खाताना चव त्यावर रेंगाळते

कधी टाळूला चिकटता वळवळ न करते

जीभ दाताखाली येता तिला जिभाळी लागते

कडवटपणा येता जिभेवर तीळ भिजू न देते॥५॥

*

दोन जीभा असू नये, काळा तीळही नसावा

नको तिचे हुळहुळणे तिखटपणाही नसावा

नको ऐनवेळी लुळी पडाया त्यावर फोडही न यावा

सरस्वतीचे नर्तन करीत जिभेवर साखर खडा असावा॥६॥

*

अशी जीभ बहुगुणी योग्य वापर करावा

पडजीभेविना अधुरी तिचा विसर न पडावा

जीभ देवाची देणगी तिला जपू सारेजण

गोड बोलून तिच्या योगे जपू माणूसपण॥७॥

– कवयित्री : वर्षा बालगोपाल 

तुम्हाला कळले का यात जिभेशी संलग्न किती वाक्प्रचार, म्हणी आल्या आहेत ते? चक्क 53….

 ०१) जीभेला हाड असणे 

 ०२) उचलली जीभ लावली टाळ्याला 

 ०३) जीभ वळेल तसे बोलणे 

 ०४) जीभ तिखट असणे 

 ०५) जीभेवर साखर असणे 

 ०६) जिभल्या चाटणे 

 ०७) जिभेचे चोचले पुरवणे 

 ०८) जीभ सैल सोडणे 

 ०९) जीभेला लगाम घालणे 

 १०) जीभेवर ताबा ठेवणे 

 ११) जीभेवर रेंगाळणे 

 १२) जीभेला धार लावून बसणे 

 १३) जीभ दाखवणे

 १४) जीभ हासडणे 

 १५) जीभेचे मूळ पोटात 

 १६) दोन जीभा असणे 

 १७) फाटकी जीभ असणे 

 १८) काळ्या जिभेचे असणे 

 १९) हाताने केले जिभेने चाखले 

 २०) जीभ चाळवणे 

 २१) जीभ नाकाला टेकवू नका! 

 २२) जीभ ल ई चुरू चुरु बोलती य ब र तुझी 

 २३) जीभेने चाटणे 

 २४) जीभ आवळणे 

 २५) जीभेवर फोड येणे 

 २६) जीभेला शेंडा नसणे 

 २७) जीभ चावणे  

 २८) जीभेला आवर घालणे 

 २९) जिभेवर काळा तीळ असणे 

 ३०) जीभ दाताखाली चावणे 

 ३१) जीभ टाळूला चिकटने 

 ३२) जीभेवर तीळ भिजत नाही 

 ३३) जीभेचा तुकडा पाडणे 

 ३४) जीभ लईच वळवळा करायला लागली 

 ३५) जिभाळी लागणे 

 ३६) जिभेवर कडवटपणा असणे 

 ३७) जीभ हुळहुळणे 

 ३८) जीभ आहे की गिरणीचा पट्टा ? 

 ३९) जीभ वेडावणे 

 ४०) जीभ जडावणे 

 ४१) जिभेला सुमार नसणे 

 ४२) जिभेचा दांडपट्टा चालवणे 

 ४३) ऐनवेळी जीभ लुळी पडणे 

 ४४) जिभेच्या सरबत्तीने गारद करणे 

 ४५) जीभ चुकचुकणे 

 ४६) जीभ चुरचुरणे 

 ४७) जिभेवर सरस्वती नर्तन करणे 

 ४८) जिभेने साखरपेरणी करणे 

 ४९) जिभेचा शेंडा मिरवणे 

 ५०) जीभेचा तुकडा पाडणे 

 ५१) जीभ घोळवत लाडिक बोलणे.

 ५२) चांगलीच जीभ सुटलीये एकेकाला आज 

 ५३) पडजीभ

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares