☆ चालचलाऊ भगवद्गीता आणि – कवी – ज. के. उपाध्ये ☆ माहिती संग्राहक व लेखक – श्री सुहास सोहोनी ☆
विसरशील खास मला दृष्टिआड होता …
कुणी काही म्हणा .. कुणी काही म्हणा …
रामचंद्र मनमोहन .. नेत्र भरून पाहीन काय …
त्यांच्याच पावलांचा .. हा नाद ओळखीचा …
अशी एकापेक्षा एक सरस भावगीते लिहिणाऱ्या कवीचं नांव तुम्हाला माहित असेलच … ज.के.उपाध्ये !
कवी – ज. के. उपाध्ये
(जन्म १८८३ आणि मृत्यु १९३७.)
काहीसं बेफिकिर, भरकटलेलं, मस्त कलंदर आयुष्य जगलेल्या या कवीच्या एका भावगीताला यशवंत देव यांच्या अतिशय आकर्षक चालीचं लेणं मिळून ते सुधा मल्होत्राच्या आवाजांत आकाशवाणीवरून प्रसारित झालं ते १९६०-६१ साली. पण खऱ्या अर्थानं ते आमरसिकांपर्यंत पोहोचलं १९७६ मध्ये आशाबाईंची ध्वनिमुद्रिका आली तेव्हा. म्हणजेच कवीच्या मृत्यूनंतर ४० वर्षांनी. या भावगीतानं साऱ्या रसिक मनाला हेलावून टाकलं. हे गाणं होतं – “विसरशील खास मला दृष्टिआड होता !!”
नंतर त्यांच्या इतर गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका येतच राहिल्या. पण स्वतः कवीला मात्र आपल्या हयातीत आपले शब्द रसिकांपर्यंत पोचल्याचं भाग्य कधीच बघायला मिळालं नाही.
आईचं छत्र लहानपणीच हरवलेलं आणि वडील अतिशय तापट-संतापी! त्यामुळे लहानपणापासूनच फारशी माया, जिव्हाळा उपाध्ये यांच्या वाट्याला आला नाही. कदाचित त्यामुळेच उपाध्ये काहीसे एककल्ली, तऱ्हेवाईकही झाले होते.
१९०५ मध्ये विरक्ती आल्यामुळे, कुणालाही न सांगता, उपाध्ये अचानकपणे हनुमान गडावर गेले. तेथे त्यांनी दासबोधासह अनेक धार्मिक ग्रंथांची पारायणं केली.
१९०८ साली ते हनुमान गडावरून परत आले. विवाह झाला. कन्यारत्न घरी आले. पण दहा वर्षांतच पत्नीच्या आणि कन्येच्या मृत्यूमुळे, त्यांचे कौटुंबिक आयुष्य संपुष्टात आले. याच काळात त्यांच्या काव्यरचना आणि अन्य गद्य साहित्य यांच्या निर्मितीला सुरुवात झाली होती. १९२४ मध्ये “लोकमान्य चरितामृत खंड १” हा त्यांचा लो. टिळकांवरचा ओवीबद्ध ग्रंथ प्रकाशित झाला. पुढे “पोपटपंची” हा कवितासंग्रह. १९३२ साली उमर खय्यामच्या रुबायांचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला. “वागीश्वरी” आणि “सावधान” या त्या काळच्या नियतकालिकांची जबाबदारी सुद्धा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
“चालचलाऊ भगवद्गीता ” हे विडंबनात्मक काव्य लिहायला त्यांनी सुरुवात केली होती. पण ते खंडकाव्य काही ओव्या लिहिल्यानंतर अपूर्णच राहिलं असावं. याच काव्यावरूनच ज्येष्ठ विद्वान राम शेवाळकर यांनी उपाध्यांचा गौरव “मराठी विडंबन काव्याचे आद्य उद्गाते“ अशा शब्दांत केला आहे.
“सावधान” हे त्यांचं नियतकालिक ऐन बहरांत असतांनाच, विषमज्वराच्या व्याधीनं १ सप्टेंबर १९३७ रोजी ज.के.उपाध्यांना मृत्यूच्या हवाली केलं.
मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली अखेरची कविता म्हणजे :
एकटाची आलो आता
एकटाची जाणार
एकटेच जीवन गेले
मला मीच आधार ||
आपलं भाग्य असं की आपल्याला हा कवी त्याच्या कर्णमधुर भावगीतांमधून अनुभवायला मिळाला !
☆ चालचलाऊ भगवद्गीता : ज.के.उपाध्ये ☆
☆
पार्थ म्हणे गा हृषीकेशी
या युद्धाची ऐशीतैशी
बेहत्तर आहे मेलो उपाशी
पण लढणार नाही -१-
☆
धोंड्यात जावो ही लढाई
आपल्या बाच्याने होणार नाही
समोर सारेच बेटे जावई
बाप, दादे, मामे, काके -२-
☆
काखे झोळी, हाती भोपळा
भीक मागूनि खाईन आपला
पण हा वाह्यातपणा कुठला
आपसात लठ्ठालठ्ठी -३-
☆
या बेट्यांना नाही उद्योग
जमले सारे सोळभोग
लेकांनो होऊनिया रोग
मरा ना कां -४-
☆
लढाई कां असते सोपी
मारे चालते कापाकापी
कित्येक लेकाचे संतापी
मुंडकीहि छाटती -५-
☆
कृष्ण म्हणे रे अर्जुना
हा कोठला बा बायलेपणा
पहिल्याने तर टणाटणा
उडत होतास -६-
☆
लढण्यासी रथावरी बैसला
शंखध्वनि काय केला
मग आताच कोठे गेला
जोर तुझा मघाचा? -७-
☆
तू बेट्या मूळचाच ढिला
पूर्वीपासून जाणतो तुला
परि आता तुझ्या बापाला
सोडणार नाही बच्चमजी -८-
☆
अहाहारे भागूबाई
आता म्हणे मी लढणार नाही
बांगड्या भरा की रडूबाई
बसा दळण दळत -९-
☆
कशास जमविले अपुले बाप
नसता बिचा-यांसी दिला ताप
घरी डाराडूर झोप
घेत पडले असते -१०-
☆
नव्हते पाहिले मैदान
तोवरी उगाच केली टुणटुण
म्हणे यँव करीन त्यँव करीन
आताच जिरली कशाने -११-
☆
अरे तू क्षत्रिय की धेड
आहे कां विकली कुळाची चाड?
लेका भीक मागावयाचे वेड
टाळक्यांत शिरले कोठुनी -१२-
☆
अर्जुन म्हणे गा हरी
आता कटकट पुरे करी
दहादा सांगितले तरी
हेका कां तुझा असला -१३-
☆
आपण काही लढणार नाही
पाप कोण शिरी घेई
ढिला म्हण की भागूबाई
दे नांव वाटेल ते -१४-
☆
ऐसे बोलोनि अर्जुन
दूर फेकूनि धनुष्य-बाण
खेटरावाणी तोंड करून
मटकन खाली बैसला -१५-
☆
इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः
कवी – ज. के. उपाध्ये
माहिती संग्राहक व लेखक : सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈