मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांजप्रांत… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ सांजप्रांत... ☆ श्रीशैल चौगुले ☆

उन्हे पांघरुनी मन

सावल्यासंगे रमते

त्याच स्मृती झुलवा

झुलणे कसे जमते.

*

हसता वारा बिलगे

पाने सळसळ राग

ग्रीष्मात सलगी चाले

गुलमोहर पराग.

*

भाव अंतरीत धरा

अजुनी हिरवा चुडा

शुभ्र आभाळ निवांत

झळात पर्वत-कडा.

*

क्षितीजाच्या ओठी शब्द

उतरता दिन शांत

कविता फुलते नवी

सांजेचा विश्राम प्रांत.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ज्ञानमंदिर… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – ज्ञानमंदिर – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

चित्रकाव्य : “ ज्ञानमंदिर “ 

*

शैक्षणिक वर्ष | आज सुरुवात |

मुले आनंदात | शाळेमध्ये ||१||

*

शिक्षकांच्या मनी | ओसंडला हर्ष |

स्वागत सहर्ष | विद्यार्थ्यांचे ||२||

*

दोन महिन्यांची | संपलीय सुट्टी |

जमणार गट्टी | वर्षंभर ||३||

*

शाळेतली घंटा | रोज वाजणार |

प्रार्थना होणार | शारदेची ||४||

*

सरस्वती पूजा | विद्येचा संकल्प |

नवीन प्रकल्प | अभ्यासात ||५||

*

नवीन पुस्तकं | वही व लेखणी |

रोज उजळणी | अभ्यासाची ||६||

*

किलबिल गुंजे | ज्ञान मंदिरात |

शुभ सुरवात | मांगल्याची ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोर झाला… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

मोर झाला☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

चांगला तो साव होता आज आहे चोर झाला

वाचताना बातमीही फार मोठा शोर झाला

*

संगतीला संत आले वागण्याला शिस्त आली

साधकांचा स्पर्शहोता कावळ्याच्या मोर झाला

*

फार मोठी चूक झाली वागताना तोल गेला

उधळला संसार तेव्हा बायकोचा घोर झाला

*

स्वार्थ साधायास त्याने सोडला अभिमान सरा

लाजमोडा त्या घडीला राबणारा ढोर झाला

*

जाहली साकार स्वप्ने गर्व तेव्हा फार केला

संकटानी घेरलेल्या वादळाचा जोर झाला

*

काय होतो काय झालो हे कळेना आज त्याला

चाचपाया दैव तेंव्हा तो बिचारा पोर झाला

*

वेगळा आवेग होता कल्पना घेऊन आला

एकता बांधावयाला संस्कृतीचा दोर झाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 178 ☆ नको कुणाची चाकरी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 178 ? 

☆ नको कुणाची चाकरी ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(काव्य प्रकार:- अंत्यओळ अष्टाक्षरी.)

(विषय:- मृग बरसून जावा.)

मृग बरसून जावा

धरा तृप्त शांत व्हावी

धूळ निघूनिया जावी

छटा धरेची खुलावी.!!

*

छटा धरेची खुलावी

मुक्त धरणी हसावी

छटा दिसाव्या बोलक्या

ऐसी करणी होवावी.!!

*

ऐसी करणी होवावी

बळीराजा तो हसावा

हाती घेऊनिया हल

कष्ट करण्या निघावा.!!

*

कष्ट करण्या निघावा

त्याला नं चिंता असावी

बीज रोपताना भूमी

भूमी निर्भेळ बोलावी.!!

*

भूमी निर्भेळ बोलावी

बीज ग्रहण करावे

यावे अंकुर जोमाने

सोने कष्टाचे होवावे.!!

*

सोने कष्टाचे होवावे

मिळो सर्वांना भाकरी

दिस बदलो सर्वांचे

नको कुणाची चाकरी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विरुपा…. कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆  विरुपा…. कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

माझ्या सुदैवानेच कवयित्री आश्लेषा महाजन यांची विरुपा ही कविता वाचनात आली. आणि स्पदनांनी मनातल्या जाणिवा जागृत केल्या. काही विचार मनात आले . मला या कवितेतून जे जाणवले, कळले , समजले  ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

☆ कविता  – विरुपा ☆

इथे फक्त काळोख डोहातला अन्

फणा कालियाचा विषारी निळा

इथे जीवघेणी मिठी प्राक्तनाची

तथा प्राणमोही व्यथांचा टिळा

*

इथे लौकिकाचा जगद्व्याळ गुंता

तथा संभ्रमांची न येथे क्षती

कसोटी सदाचीच कर्तव्य मूढा

तुझ्या उद्धृतांची कुठे संगती?

*

कधीची उभी अष्टवक्रा विरुपा

तुझ्या दर्शनाचीच तृष्णा खरी

कुठे गुंतला व्यापतापामध्ये तू

कळेना कशी हाय! कुब्जा तरी —

*

तुझ्या पंचप्राणातुनी फुंकलेली

हवी सानिका- सुर -संमोहिनी

किती येरझारे जरी या ललाटी

उपेक्षाच मी जन्महिना कुणी —

*

असू दे तुझी वेद -शास्त्रे- पुराणे

नको त्यातली गूढ अर्थांतरे

हवा मृण्मयी देह बुद्धीस माझ्या

तुझा सावळा मानवी स्पर्श रे!!!

कवयित्री – सुश्री आश्लेषा महाजन

रसग्रहण

आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी परिस्थितीच्या किंवा विचारांच्या वादळाला सामोरे जावे लागते. त्यावेळी सभोवती संपूर्णपणे अंधःकार दाटलेला भासतो. आजूबाजूची प्रत्येक गोष्ट न् गोष्ट त्या अंधाराशी संधान बांधून त्या अंधाराची भयावहता वाढवणारी वाटू लागते .मनाला हतबलता ,अगतिकता ,विवशता या भावनांशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. संपूर्ण परिस्थिती या अंधाराशी नाळ बांधून आली आहे असे वाटत राहते. या कवितेतील “ती” म्हणजे विरूपा! तिच्या मनातल्या अशा भावनांशी समरस होऊन तिचे मनोगत कवयित्रीच्या संवेदनशील मनातून उलगडू लागते. तिच्या जाणीवांना कवयित्रीने बोलते केले आहे.

विरुपा

इथे फक्त काळोख डोहातला अन्

फणा कालियाचा विषारी निळा

इथे जीवघेणी मिठी प्राक्तनाची

तथा प्राणमोही व्यथांचा टिळा

कवितेचे विरूपा हे शीर्षक अतिशय लक्षवेधी!! कवितेतील आशयाकडे सजगतेने, सूचकतेने बघण्याचे भान वाचकांच्या मनात जागवणारे. या विरूपेच्या अवती भोवती फक्त आणि फक्त काळोखच जाणवतो आहे .कुठेही थोडासाही आशेचा कवडसा ,बदलत्या परिस्थितीचा किरण दृष्टिक्षेपात येत नाही. हा काळोख ही असा तसा नाही तर डोहातला. परिस्थितीचे गांभीर्य जाणवून देणारा.. अगम्य , गूढ वातावरण निर्माण करणारा—-अशा या गूढ डोहात दाटलेला काळोख न हलणारा, अचल असा. त्यात काहीही बदल होणार नाही याची जणू ग्वाही देणारा ..आशावादास तिलांजली देणारा हा काळोख पुरेसा नाही म्हणूनच की काय तेथे कालिया ही  आपला विषारी निळा फणा उभारून तयार आहे. तिला डसण्याचा ,दंश करण्याचा निग्रही निर्धार/विचार त्याच्या मनात आहे. हा काळोख, कालियाचा दंश नशिबात लिहिलेलाच आहे.मनात दहशत निर्माण करणारा आहे.कारण या डोहातुन तरुन जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राक्तनाची मिठी /प्राक्तनाची साथ ही आधाराची नसून केवळ जीवघेणीच आहे.अर्थात दैवाची हवीहवीशी वाटणारी साथ मिळणार नाही याची जाणीव झाली आहे.

संपूर्ण आयुष्याला प्राणमोही /प्राणघातक व्यथांचा टिळा लाभलेला आहे.कुठून ही कुणाची ही कसली ही मदत नाही हे स्पष्टपणे दिसून आले आहे.त्यातून सुटका कशी आणि कुणी करावी?? हा प्रश्न अनुत्तरित राहणार याची खात्री होते.

इथे लौकिकाचा जगद्व्याळ गुंता

तथा संभ्रमांची न येथे क्षती

कसोटी सदाचीच कर्तव्य मूढा

तुझ्या उद्धृतांची कुठे संगती?

लौकिकार्थाने जगताना जगव्यापी गुंत्याचा सामना करावाच लागतो .असे करताना मनाला पडणाऱ्या संभ्रमांनाही इथे क्षती नाही,अंत नाही. ते क्षितिजापर्यंत पसरलेले आहेत .ते वारेमाप ,अपरंपार आहेत. समजूतींना भेद व छेद देणारे आहेत .त्या संभ्रमांना सोडून व आपलेसे करून जगण्याचे ठरवले तर कर्तव्यदक्ष व कर्तव्य मूढ मनाची कसोटी ही सदाचीच आहे. कर्तव्यदक्ष मन हे बरेचदा कर्तव्याच्या मूळ व मूढ कल्पनेशी परंपरेने व पारंपरिकतेने गुंतले जाते हे सत्य ही कवयित्रीने स्पष्ट केले आहे. या सर्वाला अपवाद विरळाच!! देवावर श्रद्धा असणाऱ्याने त्याच्या (देवाच्या) वचनांचा /बोलांचा आधार घ्यावा म्हटले तर त्याचीही संगती न लागण्या सारखी परिस्थिती दृष्टीस पडते .त्याच्या वचनांची संगती आजूबाजूच्या परिस्थितीशी मेळ साधत नाही . किंबहुना बरेचदा फारकतच दिसून येते .अशा वेळी सर्व बाजूने विवश झालेली अष्टवक्रा विरुपा मात्र कधीची ताटकळत उभी आहे त्याच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत!! तिच्या मनाला आणि मनात त्याच्या दर्शनाची आस आहे . तिला त्याच्या रुपाची ओळख व्हावी याची तहान, तृष्णा लागलेली आहे .आणि जगात इतर बाबी जरी भ्रामक असल्या तरी तिची आस ही मात्र एकमेव खरी गोष्ट आहे हे ती ठासून सांगते आहे. बाकी सारे संभ्रमाचे राज्य याची जाणीव ती करून देते. तिच्या प्रतिक्षेला अजूनही फळ आलेले नाही, त्याचे प्रत्यक्ष दर्शन तिला झालेले नाही. त्यामुळे ती म्हणते की जगाच्या व्यापा-तापामध्ये तू गुंतलेला आहेस ,गुंतून पडला आहेस .अशावेळी माझ्यासारख्या विरूपेचे/कुब्जेचे अस्तित्व ,तिचे मन तुला कसे कळणार ?अशी कुणी “एक” आहे याचे भान तरी तुला कसे असणार? हे सर्व जाणूनही ती त्याला त्याच्याकडून तिला जे काही हवे आहे ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयास करते.

तुझ्या पंचप्राणातुनी फुंकलेली

हवी सानिका- सुर -संमोहिनी

किती येरझारे जरी या ललाटी

उपेक्षाच मी जन्महिना कुणी —

तिच्या मनातल्या “त्याने” मनापासून अगदी पंचप्राण लावून फुंकलेल्या बासरीतून उमटलेल्या सुरांची संमोहिनी तिला हवी आहे ,ती तिला खुणावते आहे. तिला इतर काहीही नको. त्या सूर संमोहिनीत तिला तिचा जीव ,तिचे अस्तित्व विसरायचे आहे. तिला त्या सुरांच्या अस्तित्वात तिचे अस्तित्व मिसळून टाकायचे आहे .तिला कल्पना आहे की हे सारे अगदी सोपे, सहज नाही .यासाठी तिच्या ललाटी किती जन्म लिहिले असतील कोण जाणे !ही सुर संमोहिनी लाभण्याकरता तिला अनेक जन्म घ्यावे लागतील ही!! कदाचित नुसत्या येरझारा ही घालाव्या लागतील आणि तरीही हाताला काहीच लाभणार नाही. “जन्म हिन कुणी “असे आणि हेच वास्तव तिच्या नशिबी असेल .त्या सूर संमोहिनीचे सौभाग्य तिला लाभणारं ही नाही कदाचित..

असू दे तुझी वेद -शास्त्रे- पुराणे

नको त्यातली गूढ अर्थांतरे

हवा मृण्मयी देह बुद्धीस माझ्या

तुझा सावळा मानवी स्पर्श रे!!!

जीवनातील साऱ्या सत्याला सामोरे जाण्याची तिच्या मनाची तयारी आहे.. सर्व जाणूनही ती त्याला म्हणते वेद ,शास्त्र , पुराणे यातील तत्त्व, वचने, त्यातील ईश्वराचे अस्तित्व, जगण्याचे तत्वज्ञान, द्वैत अद्वैताची विस्तृत चर्चा, त्याचे अनुभव, गूढ गर्भित अर्थ तसेच, त्यांच्या अर्थांतरात तिला  स्वारस्य नाही.मत मतांतरे जाणून घेण्याची तिला अजिबात आस नाही .या सर्व ज्ञानाचा मोह तिला अजिबात नाही. मातीत मिसळणाऱ्या तिच्या नश्वर देह बुद्धीला मात्र आस आहे ती तिला भावलेल्या त्या सावळ्या रूपा सारखी वर्तणूक असणाऱ्या मानवी स्पर्शाची.. अर्थात वेद,शास्त्रातले तत्त्वज्ञान कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात आचरणाऱ्या, ते जगणाऱ्या मानवाची. केवळ कल्पना ,संकल्पना यात अडकून न राहता जगण्याचे प्रत्यक्ष भान असणारा मानवी स्पर्श तिला हवा आहे . कुब्जा /विरूपा हे प्रतीक आहे प्रत्येक मानवाच्या मनाचे .त्याला सूज्ञ व सम्यक विचारांनी जगणाऱ्या मानवाचीच प्रतीक्षा आहे . दुर्दैवाने ते दुर्मिळ आहे असे वाटते. माणसाने माणसातच देव शोधावा, पहावा आणि तो सुदैवाने त्याला मिळावा यासारखे सद्भाग्य ते कोणते! हा सारा मला वाटलेला अर्थ आहे. तो व्यक्त करावासा वाटला मनापासून इतकेच ..

ही कविता वाचकांना अंतर्मुख करते ,विचार करायला लावते. कुठेही ,काहीही स्पष्टपणे न सांगता किंवा त्याकडे निर्देशही न करता अपेक्षित परिणाम साधणारी ही कविता मनाला भुरळ घालते हे मात्र नक्की. त्याची वृत्तबद्धता ,समर्पक शब्दांची योजना त्या कवितेला लय ताल आणि गेयता ही प्राप्त करून देते हे विशेष.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोण रंग निसर्गाचा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

☆ कोण रंग निसर्गाचा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

   कोण रंग निसर्गाचा

   काळी माती हिरवं पान

   त्याला कधी वाटला नाही

   इंद्रधनुष्याचा अभिमान

*

   पिवळं झालं पान तरी

   झाड त्याला धरू पाहतं

   तुटून खाली पडलं तरी

   वरून सावली देत राहतं

*

   दूर पसरल्या वाळवंटी

   कुठून एक निवडुंग येतं

   कोण त्याचे आई बाप

   कोण त्याला पाणी देतं

*

   आम्ही तेवढे भांडलो

   रंगावरुनी बोललो

   अठ्ठावीस युगे उभी

   माऊली कशी विसरलो

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आशीर्वच लाभावा… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ आशीर्वच लाभावा… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(आजच्या पितृदिनानिमित्त)

आकाशीच्या चांदण्यातुनी एक किरण तरी यावा

वैभवासी  तात तुमचा आशीर्वच लाभावा ||ध्रु||

*

स्वप्नपूर्तीला तुमच्या सारे अर्पण केले जीवन

माझे मी ना मनी वासना कृतज्ञतेची जाण

पहाटस्वप्नी येउनिया मम अर्थ यशाला द्यावा

आकाशीच्या चांदण्यातुनी एक किरण तरी यावा

वैभवासी  तात तुमचा आशीर्वच लाभावा ||१||

*

यशोसुखाचे सुवर्ण राजिव गोंडस आले उमलूनी

सिंचन तुमच्या कष्टांचे हे आज येत फुलुनि

सुगंध तुमच्या तृप्तीचा हा एकवार तरी भोगावा

आकाशीच्या चांदण्यातुनी एक किरण तरी यावा

वैभवासी  तात तुमचा आशीर्वच लाभावा ||२||

*

गरुडभरारीसाठी अमुच्या पंखे रुजवलि आशा

व्योमाची भासली न व्याप्ती दिसला नाही अडोसा

स्फूर्तीने तुमच्या मम मनात जोश सदैव भरावा

आकाशीच्या चांदण्यातुनी एक किरण तरी यावा

वैभवासी  तात तुमचा आशीर्वच लाभावा ||३||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ किमयागार… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ किमयागार ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

 तो आला, सुखावून गेला,

  धरतीला , मनामनाला,

 अन् गंध मातीचा ओला,

 श्वासात भरूनी राहिला.

*

  तगमग अन् काहिली,

  क्षणात कशी ती शमली,

  अन् कात जणू टाकूनी,

  नवरूपे सृष्टी नटली.

*

  आभूषणे,जलबिंदूंची,

  पानापानांत ,प्रकटली,

  सर पहिली पावसाची,

  ही तिचीच किमया न्यारी!

*

 कप वाफाळत्या चहाचा,

 आल्याचा स्वाद अहाहा,

  कांदाभजी ही  संगतीला,

 आगळीच की हो मज्जा!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जपणूक… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ जपणूक… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

कितीसे पुढे आयुष्य उरले

असते माहीत झाडालाही 

त्याच्या रूपरंगावरूनही

असते कळत सर्वांनाही 

*

तरी झाड फांदीमार्फत

असते हिरवाई पुरवीत

जोडून आहे जीव देठी

काळजी घेणे खरी रित

*

 थकलो आता गळून पडेल

 म्हणून नाही दुर्लक्ष करीत

 मानवाच्याच जगामधे

 कळेना कुठून आली रित

*

 वृद्धाश्रम संख्या म्हणून

 दिवसेंदिवस वाढत आहे

 कित्ती म्हातारे हतबलतेने

 घराघरातून कुढत आहेत

*

 निसर्गाकडून शिकावं असं

 खुप आहे आजुबाजूला

 फक्त आपली कुवत पाहिजे

 निसर्ग भाषा कळायला

*

 कळणं तस अवघड नाही

 निसर्गाशी समरस व्हावं 

केवळ जमीन अन आभाळ

 थोडं  थोडं कवेत घ्यावं

*

 तेवढं जरी केलं तरीही

 वाळलेलं पान, थकलं मन

 जपेल इवल्या हिरव्याला 

 गिरक्या घेत पडेल नंतर

 जागा नवी पालवी फुटायला

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “भेट… —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “भेट…—” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

घन भरले आभाळ

किती आतुर गंभीर

सानुल्याची वाट पाहे

जणू पोटुशी ती नार ….

 

भार घनांचा वाढता

जणू आता साहवेना

धरित्री एक सखी

देई धीर हळव्या मना …..

 

वृक्ष-लता फुले पाने

सजे सखीचे आंगण

भारावल्या आभाळाला

जणू डोहाळे-जेवण …..

 

आतुर वसुंधरा

आता आभाळ भेटीला

त्या आभाळा घेऊन

आला पाऊस हो आला …

         आला आला पाऊस आला …

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares