मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आता तरी सावरा रे… कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ आता तरी सावरा रे… कवी – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

कधी कधी मनाची अस्वस्थता इतकी टोकदार असते की अशावेळी कुणी सोबत असण्यापेक्षा एकटेपणातच डुबून जाणं अधिक सुखाचं वाटतं  किंवा आपल्या भोवतालचं जग हे किती ढोंगी, फसवं आहे याची जाणीव झाल्यामुळे या सर्वांपासून दूर राहण्यातच मन:शांती आहे अशा तऱ्हेची एक एकाकी मानसिकता बनते.  शिवाय, “माझं मीच पाहून घेईन” माझं यश माझं अपयश याचं काय करायचं ते मी बघेन.” अशा तऱ्हेचा   कणखर  कल मनाचा  त्याच  क्षणी होतो.  माननीय सुहास पंडित  हे अशाच प्रकारचा  विचार त्यांच्या, आता तरी सावरा रे या कवितेतून मांडत आहेत. मला ही कविता फारच आवडली आणि या कवितेत दडलेले अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी याचा रसास्वाद घ्यावा असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ आता तरी सावरा रे ☆

मी किती अस्वस्थ आहे शांतविण्या येऊ नका

दाह आहे अंतरीचा  लेप वरचे लावू नका.

*

निसटले जे यश तयाला निश्चये मिळवेन मी

दूर माझा गाव गेला तरी  तो पुन्हा गाठेन मी

*

शब्द  साधे बोलतो तरी का बरे ते बोचती

फूल  वेचायास गेलो काटेच सारे टोचती

*

कष्टणारा कष्टतो अन् पाहती सारे मजा

मूर्ख  सुखी लोळतो अन् शहाणा भोगी सजा

*

थांबवा हे खेळ फसवे लाज थोडी बाळगा रे

तोल ढळत्या या भूमीला, आता तरी सावरा रे

 – सुहास  रघुनाथ  पंडित  .सांगली.

ही संपूर्ण कविता वाचल्यानंतर  कवितेतला विषाद प्रकर्षाने जाणवतो. विचारातून विषाद आणि विषादातून सत्याकडे जाण्याचा एक अदृश्य प्रवास या कवितेत अनुभवायला मिळतो आणि या विषयातलं वास्तव मनाला भिडतं. वाचकालाही ते विचार करायला लावतं.

मी किती अस्वस्थ आहे शांतविण्या येऊ नका

दाह आहे अंतरीचा लेप वरचे लावू नका…

कवी म्हणतात,” माझी अस्वस्थता का आणि किती आहे हे तुम्हाला कळणारच नाही किंबहुना ती कळून घेण्याची क्षमता तुमच्यात आहे का याबद्दलच मी साशंक आहे.  माझ्या अंतरात पेटलेली ही धग आहे आणि ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल?  तुमचे शब्द, तुमचे सांत्वन हे वरवरचे आहे आणि ते लटके आहे.  त्यात कुठल्याही खऱ्या भावनांचा अंश नाही म्हणूनच सांगतो जरी मी अत्यंत अस्वस्थ असलो तरी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका.  तुमच्या या सांत्वनपर शब्दलेपनाने माझ्या अंतःकरणातला जाळ निवणार नाही. त्यापेक्षा मला एकटेच राहू द्या. LEAVE ME ALONE.”

लेप वरचे लावू नका ही काव्यपंक्ती खूपच लक्षवेधी आहे. लोक  मुखवटे घालून आपल्या आजूबाजूला फिरत असतात. अधरी एक आणि उदरी एक अशी त्यांची दुहेरी वृत्ती असते आणि या लोकांच्या बेगडीपणामुळेही कवी कमालीचे अस्वस्थ आहेत.

निसटले जे यश तयाला निश्चये  मिळविन मी

दूर माझा गाव गेला तरी पुन्हा गाठेन मी

अपयशाने सर्वसामान्य माणूस खचतो. काही क्षणाची निराशा जीवनात येते ही. कधी ते नैराश्य जगण्या बोलण्यातून व्यक्त होते आणि भोवतालची माणसं सहानुभूतीपूर्वक काही सल्ले देतात तर काही असेही महाभाग असतात की ते नैराश्यात अधिक भर घालतात त्यापेक्षा हे काही नकोच.

“माझ्या निराश मनाला मी सावरेन. जे निसटले ते पण स्वबळाने, जिद्दीने मी मिळवेन. स्वप्नभंगाचं दुःख पचवून, देअर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम असा विचार बाळगून जे दुभंगलं ते सांधण्याचा प्रयत्न करेन.”

दूर माझा गाव गेला तरी पुन्हा गाठेन मी  ही ओळ रूपकात्मक आहे. इथे माझा गाव यात माझ्या  स्वप्नांचा गाव म्हणजेच माझी स्वप्नं असा अर्थ अभिप्रेत असावा आणि त्या दृष्टीने कवी म्हणतात की,” एक ना एक दिवस मी माझे स्वप्न पूर्ण करेनच.”

शब्द साधे बोलतो तरी का बरे ते बोचती

फूल वेचावयास गेलो काटेच सारे टोचती

कवीच्या मनात खंत आहे. ते म्हणतात,”खरं म्हणजे लोकांच्या या दुनियेत ना मी स्वतःला सिद्धच करू शकलो नाही. लोकही माझ्या विचारापर्यंत पोहोचू शकले. कुणीच मला खऱ्या अर्थाने समजून घेण्यास सफल झालेले नाहीत.  माझ्या साध्या बोलण्याचाही विपर्यास केला जातो.मला समजत नाही  त्यातून नकारात्मक अर्थ काढून ते टोचणारे का ठरावेत? वास्तविक मला फुलं वेचायची असतात पण माझ्या वाटेला मात्र काटेच येतात.. असे का? “

फुले वेचावयास गेलो काटेच सारे टोचती ही ओळ  रूपकात्मक आहे. ज्याचे  चिंतावे भले  तो म्हणे आपलेच खरे

“काहीतरी चांगलं पेरण्याचा मी प्रयत्न करतो पण ते सारं फुकाचं ठरतं. करायला जातो एक पण घडतं मात्र भलतंच.”

कष्टणारा कष्टतो अन् पाहती सारे मजा

मूर्ख सुखी लोळतो आणि शहाणा भोगी सजा…

कवीच्या मनात असे नकारात्मक विचार येण्यास कारणीभूत आहे  सद्य परिस्थिती हे निश्चितच.  आजकाल जीवनात खरोखरच कष्टांना मोल राहिलेलं नाही. कष्ट करणारी व्यक्ती समाजात हास्याचा नाहीतर उपहासाचा  विषय होतो.

“फुका कष्टतो तू लेका” असे शब्दांचे फटकारे त्याला मारले जातात.

हे कडवं वाचताना कवीच्या मनातले विचार वाचक वाचू शकतो. केल्या कष्टाची अथवा कामाची दखल घेतली जात नाही. पुरेशी दाद मिळत नाही, ॲप्रिसिएशन हे तर फारच दूर राहिलं पण कित्येक वेळा आपल्या श्रमाचे श्रेय कोणीतरी दुसराच घेऊन जातो आणि आपण मात्र त्याच खड्ड्यात राहतो.  ज्याला अक्कल नाही, उमज नाही तो राज्यपदावर सहज बसतो आणि शहाणा मात्र न केलेल्या अपराधाची  शिक्षा भोगतो.

कवी सुहास पंडितांनी केलेलं हे भाष्य म्हणजे ज्वलंत वस्तुस्थिती आहे. यात नकारात्मकता  असली  तरी त्यात एक दारुण सत्य, वास्तव, दडलेलं आहे. कुणाही जागृत,संवेदनशील मनाच्या माणसाला याची चीड येणं, विषाद वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे.

थांबवा हे खेळ  फसवे  लाज थोडी बाळगा रे

तोल ढळत्या या भूमीला आता तरी सावरा रे…

हा शेवटचा चरण म्हणजे  कवीच्या संपलेल्या सहनशक्तीचा परिपाक आहे. भोवतालचा बदललेला माणूस,  त्याची घसरलेली मूल्ये, नीती, बेरडपणा ढोंगीपणा, खोटेपणा, मतलबीपणा, आत्मकेंद्रीतपणा, मूळातच हरवलेली विश्वासार्हता, सडलेली सारी यंत्रणा आणि त्यात भरडलेली अस्सल माणूसकी पाहून कवीचं मन रक्तबंबाळ झालं आहे.  त्याच्या मूल्याधिष्ठित, तत्त्वप्रेमी मनाला या सर्वांशी जुळवून घेणे आता अशक्य झाले आहे आणि त्याचाच उद्रेक झाला आहे आणि त्यामुळेच त्याच्या मुखातून असे उद्गार बाहेर निघतात,

“अरे षंढा! हे फसवे खेळ आता तरी थांबव. थोडी तरी लाज बाळग. सद् सद् विवेकबुद्धीला विचारून पहा आणि तुला याची जाणीव आहे का तुझ्या या मायाजालात तूच गुंतत चालला आहेस. जागा हो माणसा! जागा हो! डोळे उघड.”

तोल ढळत्या या भूमीला आता तरी सावरा रे यातही एक सुंदर रूपक आहे. भूमीचा तोल ढळतोय म्हणजे साऱ्या विश्वातच नैतिकतेची पातळी ढळलेली आहे, खालावलेली आहे. एक अनाचार, अनागोंदी सर्वत्र माजलेली आहे. या दोन ओळीत मला साऱ्या जगात चाललेला मानवतेचा संहार जाणवतो. सत्तेसाठी होणारी युद्धे, बळी तो कान पिळी हा जंगलचा कायदा बोकाळलेला दिसतोय हे पाहून कवीचं मन अत्यंत उद्विग्न होतं आणि त्या क्षणी त्याला एकच जाणवतं, ज्यांच्यामुळे ही  परिस्थिती निर्माण झाली आहे ती सावरण्याचं कामही  आता त्यांचंच आहे.बूमरँग सारखी  त्यांची स्थिती झाली आहे म्हणूनच कवी त्यांना म्हणतो,” “आता तरी सावरा रे.. अजून वेळ गेलेली नाही.  या मानवी जीवनात शांती, समृद्धी, एकोपा, समता, बंधुता आणि खऱ्या भावनांची, सहानुभूतीची पेरणी व्हायला हवी.”

अशी सुंदर संदेश देणारी खोल, गंभीर अर्थ उलगडवणारी  सुरेख काव्यरचना. हे वैयक्तिक विषादातून निर्माण झालेलं काव्य असलं तरी एक जळजळीत वास्तव मांडणारं आहे.

येऊ नका— लावू नका, मिळवेन मी— गाठीन मी, बोचते— टोचते, मजा— सजा ही काफियत मनातल्या उद्रेकाच्या भावनांना चांगलीच अधोरेखित करते. ही संपूर्णपणे नियमात रचलेली गझल नसली तरी या रचनेला गझलेचा बाज जाणवतो. वाचताना वाचक कवीच्या भावनांशी तितक्याच आवेशाने जोडला जातो हे या काव्यरचनेचे संपूर्ण यश आहे असे मला वाटते.

कुठलाही कवी कविता रचतो तेव्हां त्याच्या मनातले विचार वाचकाला जसेच्या तसे उमजतीलच हे संभाव्य नाही.

इतकं सारं लिहिल्यानंतर मला क्षणभर असेही वाटले की विकासाची धुंदी चढलेल्या माणसामुळे पर्यावरणाची जी  प्रचंड हानी होत आहे त्यामुळे तर कवीचं मन या ठिकाणी अस्वस्थ झालेलं आहे का? आणि कुठल्याही प्रकारची विकासास पोषक ठरणारी समर्थनं त्याला आता ऐकायचीच नाहीत? एकाच विचाराने कवी घेरलेला आहे की आता हे

भूमीला ओरबाडणारं विकासयंत्र थांबलंच पाहिजे.  पृथ्वीचा तोल सांभाळलाच पाहिजे.

थोडक्यात ही कविता श्र्लेषात्मक आहे.

अनेकार्थी आहे. म्हणूनच interesting आहे वाचकहो!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “सुख म्हणजे…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “सुख म्हणजे…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

जीव सुखास आतुर

सारं इथे क्षणभंगुर

ठेव क्षणाची कदर

वेळ निघून जाणार…

*

सुख तर मृगजळ

येईल अलगद समोर

नाही हाती लागणार

क्षणार्धात निघून जाणार…..

*

दुःखानंतर सुख

सुखानंतर दुःख

न थांबणारं हे चक्र

का आपण थांबून रहावं….

*

नाही येणार मुठीत

नाही कळणार भेटीत

हेच वास्तव हेच सत्य

सांग तुला कधी कळणार…..

*

नको शोधू सुख जगभर

बघ एकदा तुझ्यातच

डोळे मिटून घेता

भेटेल प्रत्येक श्वासात …

*

नसे अंतर खूप

नको करू खटाटोप

सुख अनुभवता येतं

फक्त खोल हृदयात…..

*

नाही कळणार सांगून

बघ क्षणभर थांबून

घे एकांतात भेटून

येईल साद आतून…..

*

डोळे भरून येतील

मन ओसंडून वाहील

सुख दुसरं काही नसतं

तुझे तुलाच उमगेल….

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गोपीकृष्ण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ गोपीकृष्ण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

*गोपीकृष्ण

नदीच्या काठावर,

झऱ्याच्या पाण्यात ,

निळाई अंगावर,

पांघरून  संगत ….१

*

मनाला भुरळ,

घाली तो सतत!

देतोस तू जणू,

कृष्णसख्या साथ!….२

*

झाडांची सावली,

पाण्यात हिरवाई,

जळाच्या आरशात,

मोरपिसे  कृष्णाई!…३

*

गोपी येती साथीला,

दंग झाल्या लीलेत,

कृष्णाच्या संगतीत,

धुंद होऊन नाचत!….४

*

 रास रंगे गोकुळी ,

 गोकुळ होई सुखी!

 नवनीत देती गोपी,

 कृष्णाच्या गोड मुखी.!…५

*

येई सांज सकाळ,

घेऊन रंग सोनेरी,

 आनंद देई मला,

 कृष्णाची बासरी!….६

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ फॉरवर्ड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ फॉरवर्ड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

चौकटीतले चित्र  फुलांचे

फाॅरवर्ड  जिथे तिथेच नाचे

गुड मॉर्निंग सुप्रभात छापील  

तेही कष्ट न हो, लिहायचे

*

चित्रामधला आशय सहसा 

पाठवणारा  पहात नाही

फाॅरवर्ड  करणाराही देतो

त्या वृत्तीची आपसूक ग्वाही

*

कशास हा व्यापार  करावा !

आपुलकीचा शब्द  लिहावा

केले म्हणूनी नको कराया

स्नेहभारला तो दुवा असावा !

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी दोहे…. अर्थात (जीवन तत्त्वज्ञान) ☆ प्रेमकवी दयानंद ☆

प्रेमकवी दयानंद

? कवितेचा उत्सव ?

मराठी दोहे…. अर्थात (जीवन तत्त्वज्ञान) ☆ प्रेमकवी दयानंद

सागर जरी,आहे थोर

तरी, तो खारट, नाही गोड

पण,खारट मीठाशिवाय

अन्न, लागत नाही गोड….

चंद्र, किती शीतल, सुंदर, पण

त्याला पाहण्यासाठी, रात्र यावी लागते

सूर्य, चैतन्य-प्रकाश घेऊन येतो, जेव्हा, पहाट होते….

पाना-फुलांनी, बहरलेला वृक्ष

नेहमी, सुंदरच दिसतो

तेथेच असते, पाखरांची वस्ती

जो वठलेला ,सुकलेला,त्याच्या जवळ,नसते कोणी

बिचारा, एकटाच असतो….

हातावर नक्षीसाठी, मेहंदीचे पान, जेवणासाठी केळीचेच,

गुलकंदासाठी, गुलाबाच्याच पाकळ्या,

दस-याला असतो, झेंडूला मान

सावळी तुळस, पूजेत पवित्र, प्रत्येकाचे, वेगळे स्थान….

पाय कुरुप म्हणून, मोर रडत नाही,

आकाशी मेघ येता, पिसारा फुलवून नाचतो,

बेडकाला, रंग रुपाचे काय??

पाऊस येता, तोही आनंदाने खर्जात गातो……

गुन्हा करायला लावते, मानवा,

वेगवेगळी भूक

वागण्यात मानवाची, होऊ नये अशी चूक

सद्गुरु, असावा जीवनी, यासाठीच एक

सन्मार्ग दाखविणारा, तोच असतो निसर्गासम, परोपकारी नेक….

ही नदीमाता, वाहून नेते सारा,

कचरा आणि घाण

तिच्याकाठीच असते, सुपिक

जमिन छान,

ही भूमाताच सर्वांना, अन्न देऊन जगविते,

माफ करुन सर्वांना, अखेर पोटात घेते…

नदीच्या तीरी, असतात तीर्थक्षेत्र,

तेथेच जुळते, भक्तीभावाचे बंध मैत्र,

आप, उदक, जल, तीर्थ किती

पाण्याची रुपे, किती अर्थ

असावे, पाण्यासम परोपकारी,

जीवन करावे सार्थ…

स्वतःच्या सुखासाठी, प्राण्यांना राबवतो, मारतो, माणूस किती स्वार्थी, अन् लोभी आहे

पशु-पक्ष्यांचा, काही विचार नाही मनात,

त्याला वाटते, हा देश फक्त, माझाच आहे……

रंग पांढरा तो पवित्र, अन् काळा तो कसा म्हणता?? आहे

अपवित्र,

अरे, काळा दगड, मंदिराचा

तोच आहे, विठ्ठलाचा, या येथल्या मातीचा,

तोच रंग रातीचा, तोच जलभरल्या  मेघांचा, कुहूचा  कोकिळेचा….लताचा सर्वत्र…..

भजनात भाव आहे, कीर्तनी

सुंदर आख्यान,

जरी देवाचिये व्दारी तू ,आहे कोठे, तुझे ध्यान??

हातात माळ आहे, मुखाने

घेतोस हरिनाम,

पण,मन भटकते चौफेर, तेथे काय करणार,राम…???…

वृक्षमित्र पुरस्कारासाठी, पक्षी,

झाडे लावत नाहीत

निसर्ग नियमानुसार, जगतात

उगाच, तक्रार करीत नाहीत

वृक्षाजवळ नसतो,भेदभाव

सर्वांनाच,जवळ घेतात

उन, वारा, पाऊस सहन

करुन, पुन्हा नव्याने बहरतात..

© प्रेमकवी दयानंद

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सागरा ! प्राण तळमळला… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ सागरा ! प्राण तळमळला... ☆ श्रीशैल चौगुले ☆

वीरदेहाची गाथा

देशभक्तीचा माथा

काराभिंतीला चिंता

जळलाटांना कव //

 

महाधैर्याचे ध्येय

भारतपुत्रा श्रेय

हिंदवीबल जय

दुष्टशत्रुंना भय//

 

युगेअमर क्रांती

सुर्यचंद्रमा कांती

ऐतिहासीक माती

स्वातंत्र्याचा राजा //

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अक्षर अपूर्ण… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ अक्षर अपूर्ण….  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

शब्दांत मांडताना

अक्षर अपूर्ण वाटे

भावना रेखाटताना

अबोध मन उसासे

*

गगनात सामावेना

हे गुढ अमुर्त गाणे

त्याग समर्पणाला

भाषाच अपुरी वाटे

*

काय सांगावे आईचे

सुखाचे अमाप ओझे

जगताना जीवघेणे

व्याकूळ अनंत कोडे

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्‌ ।

परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्‌ ॥११॥

*

मानवदेही मी अवतार मूढ मला न जाणत

मनुष्य जाणुनिया मजला ते मज अवमानित ॥११॥

*

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।

राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥१२॥

*

चित्तभ्रष्ट हे नर आचरित आसुरी अघोर जीवन

आशा व्यर्थ कर्मे निष्फल निरर्थक त्यांचे ज्ञान ॥१२॥

*

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।

भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम्‌ ॥१३॥

*

हे पार्था मोहमुक्त दैवी महदात्मा मज येती शरण

आदिस्थान मी अव्यय जाणुनी करिती माझे स्मरण ॥१३॥

*

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढ़व्रताः ।

नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥१४॥

*

दृढव्रत होउनि योगयुक्त राहुनी नित्य

कीर्तन करुनी वंदुनिया मलाच उपासत॥१४॥

*

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजन्तो मामुपासते ।

एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥१५॥

*

कोणी भजती मजला एकत्वभावाने

कोणी जाणत मजला पृथक्भावाने

ज्ञानयज्ञे भजुनी मजला विविध भावाने

उपासना करिती माझी भक्तीभावाने ॥१५॥

*

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम्‌ ।

मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्‌ ॥१६॥

*

वैदिक कर्मकाण्डाचा मी कर्ता पितरांचे तर्पण

ओखध मी घृत मंत्र मी आहुती मी मीच हुताशन ॥१६॥

*

पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।

वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥१७॥

*

पिता मी अन् माता ही मी पितामह मीच 

पवित्र वेद्य ॐकार सर्व वेद आहे मीच ॥१७॥

*

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्‌ ।

प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्‌ ॥१८॥

*

गती साक्षी ईश्वर निवास शरण सखा मीच

अव्यय बीज उत्पत्ती स्थिती निधन  प्रलय मीच ॥१८॥

*

तपाम्यहमहं वर्षं निगृह्‌णाम्युत्सृजामि च ।

अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९॥

*

तप्त करूनीया जलासिया बाष्परूप देतो मी

पुनरपि त्यासी रूप अंबुचे पर्जन्ये वर्षवितो मी

सत्यरुपाने तत्व होउनी विश्वास व्यापितो मी

असत्य त्या सगुण स्वरूपे सर्वत्र वावरतो मी ॥१९॥

*

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापायज्ञैरिष्ट्‍वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।

ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्‌ ॥२०॥

*

त्रिवेदातील कर्म करूनी अर्चिती मज यज्ञाने

सोमप ते स्वर्गप्राप्ती कामना धरिताती मनाने

तयांस खचित होते प्राप्ती पावन इंद्रलोकाची

दिव्य भोग भोगण्या प्राप्ती तयांसी श्रेष्ठ द्युलोकाची ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निबंध…” – कवी : एडवोकेट मंजित राऊत ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “निबंध…” – कवी : एडवोकेट मंजित राऊत ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

एक निबंध लिहू का सर?

तुमच्या मेलेल्या मनावर,

पोटापुरत्या ज्ञानावर,

सोईच्या न्यायबुद्धीवर,

 

एक निबंध लिहू का सर?

शेठजींच्या रग्गड पैश्यावर,

बापाच्या आंधळ्या प्रेमावर,

पाळीव कुत्र्यांच्या शेपटांवर,

 

एक निबंध लिहू का सर?

धावत आलेल्या दलालांवर,

कोठडीतल्या पिझ्झा डिलिव्हरीवर,

बर्गरने उतरवलेल्या दारूवर,

 

एक निबंध लिहू का सर?

महागड्या गाडीच्या महत्वावर,

तुच्छ दुचाकीच्या अस्तित्वावर,

निराधारांच्या निरुपद्रवी मुडद्यांवर,

 

एक निबंध तुम्ही पण लिहा सर,

कुठल्या तरी नशेत,

तुम्ही चालवलेल्या लेखणीवर,

आणि चिरडू दिलेल्या माणुसकीवर !

(पुणे पोर्श कार अपघात, निरपराध बळी, पोलीस आणि न्यायाधीशांची भूमिका आणि तातडीचा  जामीन प्रकरणावर सुचलेली कविता ! ) 

कवी : ॲड.मंजित राऊत

9890949569

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृवंदना… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ मातृवंदना… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

(प्रथम पुरस्कार प्राप्त कविता)

आज तुझ्या त्या पावन स्मृतीला त्रिवार हे वंदन

अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन

 

जीवन सरले दुःख सोसता

कधी न आटली माया ममता

गरिबीचा तर शाप भयानक

तुझ्या ललाटी लिहीला होता

या व्यवहारी जगात नडले तुजला साधेपण

अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन

 

पंचत्वामधी विलीन होऊन

आभाळाला गेलीस भेदून

तरीही अमुच्या हृदयी उरलीस

तू प्रेमाचा सुगंध होऊन

प्रसन्न होऊन देवाने तुज स्वर्ग दिला उघडून

अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन

 

चंद्र सूर्य अन् तारे देखील

तव त्यागाची किर्ती सांगतील

अंगणातील फुलझाडेही

तुझ्याचसाठी बहरुन येतील

लोचनातून आठवणींचा पाझरतो श्रावण

अमुच्यासाठी झिजलिस निशीदिनी होऊनिया चंदन

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares