सुश्री नीलांबरी शिर्के
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अश्व… शब्दांचे ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆
सुश्री निलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ अश्व… शब्दांचे ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆
मनात चळवळ करणारे
सारखी पाय आपटून
मुक्ततेसाठी धडपडणारे
शब्दांचे अश्व मोकळे सोडले तर
सारीकडे टापांचा आवाज
आणि धुरळाच धुरळा उडेल
याची खात्री आहे मनाला
सारेच घोडे अबलख
एकदा मुक्त सोडले की
पायाखाली काय येईल
काय तुडवल जाईल
किती उडवल जाईल
अंदाजच करता येत नाही
म्हणूनच मी त्यांना सोडू
की नको या संभ्रमातच
आहे
नकोच वाटत सोडायला
त्या पेक्षा आतल्या आत
त्यांच्या नाल लावलेल्या
पायांचे तडाखे सहन करत
राहीलेल आयुष्य काढलेल बर
© सुश्री निलांबरी शिर्के
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “सल…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “सल…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
लाटा आल्या परतून गेल्या
वादळ आले उलटून गेले
झाडाच्या मुळांनी माती घट्ट धरून
प्रत्येक संकटाला तोंड दिले…..
करून काळजी चिंता
समस्या कोणती संपते का
कोणीही असो करता करविता
जगणे झिडकारता येते का?
जे आहे जसे आहे
सारे काही निमित्त आहे
संपण्याच्या भीतीनेच तर
जगण्याची खरी ओढ आहे……
सुख आहे दुःख आहे
प्रेम माया जिव्हाळा आहे
राग आणि लोभासोबत द्वेष ही इथे
म्हणूनच प्रत्येकाचे वेगवेगळे जगणे…
तो तसा मी असा
जगणे प्रत्येकाचा वसा
त्याचे त्याला माझे मला
मग दोष का द्यावा कोणी कोणाला??
करणाराच भरणार आहे
देणाराच घेणार आहे
कर्म आहे ज्याचे त्याचे
भोग कुणाला आहेत का चुकायचे.. ?
उगाच लागते सल मना
दोष दूषणे बोल जना
काय देईल कोणी कोणा
प्रत्येकजण तर इथे उणा…
💞शब्दकळी विजया💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन यात्रा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ जीवन यात्रा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
सुखदुःखाचे बांधून तोरण
माणसा तुझे हे कसले जीवन ।। ध्रु ।।
*
अस्थी मांसानी शरीर सजले
निज अवयवानी सुंदर नटले
रसरक्तानी तुला पोशीले
श्वेत कृष्ण कातडीचे पांघरुण
*
मांडलास तू जीवन व्यापार
गण गोताचा माया बाजार
पाप पुण्य कर्माचा शेजार
निर्मिलेस जरी तू नन्दनवन
*
मोह मायेचा पिंजरा सजला
संसारी जीव एथेच रमला
झाली घालमेल घात जाहला
आले यमाजी चे अवताण
*
चारचौघे घेती खांदयावरी
निघाली यात्रा यमाच्या दारी
प्रत्येक जण असतो त्या वाटेवरी
गुंडाळले तुला पांढरे कफ़न
*
उठ ऊठ प्रेता तिरडी सजली
गण गोत आप्त सर्वही जमली
कमी ज्यास्त सगळी रडली
धग धगते पेटले चिता सरण
*
माणसा तुझे हे कसले जीवन
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “एल्गार…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “एल्गार…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
सप्त अधरातून सुर ते निनादले…
समुह गायनातून शब्द पेटून निघाले..
जोश गीताचा अर्थ भावनेचा पेटूनी उठलेला…
अन्यायाला वाचा फुटूनी डोळ्यात अंगार फुललेला…
भडकली माथी गात्रं झाली लालीलाल…
कवितेने फुंकले रान पेटले सारे भवताल..
जो तो करी क्रांतीचाच जयजयकार…
उठा उठा जागे व्हा हिच वेळ आहे…
क्रांतीचे शंख फुंकताच संघटीत होण्याची…
उलथवुनिया देण्या जुलमी सत्तापिसाटा़ंचीं
चेतवूया स्फुल्लिंग मना मनात…
उधळला वारू संघर्षाचा फडकवित
जरीपटका एल्गाराचा…
अटकेपार रोवायाला आता नाही सवड त्याला थांबायला..
घुसळले वारे क्रांतीचे माणसांचे जग ते हादरले…
अशी ही आहे का बंडखोरीची भावना दडलेली आपल्यात..
आज प्रथमच मनाला मनातले स्फुल्लिंग जाणवले…
सप्त अधरातून सुर ते निनादले…
समुह गायनातून शब्द पेटून निघाले..
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक २१ ते २८) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक २१ ते २८) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहु: परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।।२१।।
*
अव्यक्त जे अक्षर तेचि परमगती
तयासी प्राप्त होता ना पुनर्जन्म गती ॥२१॥
*
पुरुष: स पर: पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्त:स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ।।२२।।
*
सकल भूतांचे वास्तव्य परमात्म्याअंतरी
तयानेच लाभे समस्त विश्वासी पूर्णतापरी
प्राप्ती तयाची पार्था असावी आंस तुवा अंतरी
समर्पित भक्तीने होतसे प्राप्ती अव्यक्ताची खरी ॥२२॥
*
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिन: ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ।।२३।।
*
ज्या काळामध्ये देह त्यागता पुनर्जन्म गती
देहत्यागाचा काळ ज्यात प्राप्तीस्तव परमगती
भरतश्रेष्ठा जाणुनि घ्यावे या कालखंडांना
कथितो तुजला आज मी तुला अगाध या ज्ञाना ॥२३॥
*
अग्निर्ज्योतिरह: शुक्ल: षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना: ।।२४।।
*
ज्योतिर्मय अग्नी अह शुक्ल उत्तरायण अधिपती
यांच्या मार्गे देहत्यागुनी ब्रह्मवेत्त्यां होते ब्रह्मप्राप्ती ॥२४॥
*
धूमो रात्रिस्तथा कृष्ण: षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ।।२५।।
*
धूम्र निशा कृष्णपक्ष दक्षिणायन देवता अधिपती
यांच्या मार्गे देहत्यागता फला भोगुनी जन्माला येती ॥२५॥
*
शुक्लकृष्णे गती ह्येते जगत: शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुन: ।।२६।।
*
शुक्ल पक्षे मार्गस्थ होता प्राप्ती परम गती
कृष्ण पक्षे देह त्यागिता पुनर्जन्माची गती ॥२६॥
*
नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ।।२७।।
*
उभय मार्गांचे तत्व जाणुनी योग्या प्राप्त मोहमुक्ती
योगयुक्त होई अर्जुना निरंतर साधक मम प्राप्ती ॥२७॥
*
वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ।।२८।।
*
जाणुनिया हे तत्वगुह्य योगी कर्मफला उल्लंघितो
निःसंशय तो परम पदासी सनातन प्राप्त करितो ॥२८॥
*
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोग नाम अष्टमोऽध्याय: ।।८।।
*
ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी अक्षरब्रह्मयोग नामे निशिकान्त भावानुवादित अष्टमोध्याय संपूर्ण ॥८॥
☆
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त : जगण्याचा आदर्श ती…. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ मातृदिनामित्त : जगण्याचा आदर्श ती…. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
मी जिथं आहे तिथं
‘ती’ मला सोबत करते;
आता नाही भेटत ती ,
‘तिची’ आठवण साथ देते.
*
‘ती’ जवळ नसली तरी,
मला नेहमीच जवळ वाटते..
प्रत्येक क्षणी मला…
‘तिची’ सोबत भासते.
*
मन माझे दुःखी होते,
तेव्हा “ती” स्वप्नात येते;
हलकं करुन मन माझं,
उत्साह देऊन जाते..
*
माझ्या सुखात खूप हसते,
जखमांवर फुंकर घालते;
कुरवाळतं कुरवाळत ‘ती’,
हळूच मला मिठ्ठीत घेते…
*
‘तिचं’ माझं नातं आईचं
एवढंच वाटेल तुम्हाला…
माझी सगळी नाती ‘ती’ च होती
हे सांगायला आवडेल मला..
*
माझी शक्ती ‘ती’
माझी भक्ती ‘ती’
माझा आधार ‘ती’
खरं तर जगण्याचा आदर्श ‘ती”
*
निरोप ‘तिला’ देताना
सावरता येईना मला..
वाटलं, चितेवरुन उठून यावी,
‘ती’ जीवंत आहे हे सांगायला…
*
तिच्या ताकदीनं “तीनं”
मला खूप चांगल घडवंल…
हृदय विकाराच्या झटक्यानं
क्षणात मला पोरकं केलं..
*
भ्रमात जगणं पटत नाही
तिच्याशिवाय करमत नाही
मग काय करावे सांगा ,
इलाज काही उरत नाही
*
आपल्या मन, मेंदू , हृदयात
“आई” नेहमीच असते;
अंतानंतरही विश्वव्यापून उरते
‘ती’ आपली “आई” असते.
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त : आई… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
सौ. अलका ओमप्रकाश माळी
कवितेचा उत्सव
☆ मातृदिनानिमित्त : आई… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
आज म्हणे मदर्स डे असतो..
पण मला सांगा हो आई,
तिची माया एका दिवसापूर्ती कशी असेल?
ती तर अख्खं आयुष्य व्यापून टाकते..
जन्म तर ती देतेच पण जगणं ही शिकवते..
बोट धरून चालायला शिकवणारी..
आणि वेळ पडतातच
समाजरुपी सागरात एकट्याला सोडणारी..
तिच तर असते अवघ्या जगाची जननी..
तिच असते पहिली गुरू..
आणि तिच असते एक विद्यापीठ..
तिच्या असण्याने जगाला आधार असतो..
तिच जाणं मात्र पोरक करून जातो ..
तिच्या सावलीत ना कुठली
धग लागते ना पाऊस वारा..
तिच्या मायेच्या पंखाखाली
रोज बरसतात जणू अमृतधारा..
माय, आई, मम्मी, अम्मा, मॉम
नावानी जरी रूप बदललं..
तरी ममतेचा झरा तोच असतो..
प्रत्येक रुपात भेटलेला साक्षात ईश्वर असतो..
अख्खं जगच जिच अस्तित्व असत..
तिच्यासाठी एक दिवस कसा पुरेल..
रोजच तिचं महत्व थोड जरी
जाणल तरी आयुष्य सुखाने सरेल..
नकोत कसले डे नकोत कसले सोहळे..
नित्य तिची काळजी घेऊ हेच होईल
सार्थक आपल्या जन्माचे..
ना दिसोत वृध्दाश्रम
ना नकोत कुठल्या संधिछाया..
दिलेल्या प्रेमाला तुमच्या
जन्माला सार्थ केलत,
तरी बहोत पा लिया..
कुठलीच माता एकटी नसावी..
तिच्या आयुष्याची संध्याकाळ
सुखात जावी..
येवढं जरी जमवलं तरी खूप आहे..
वृद्धश्रमात वाट पाहणारे डोळे
मिटन्या आधी हाकेला ओ द्यारे..
नकोत कुठले डे आणि नकोत सोहळे..
आयुष्याच्या संध्याकाळी तिला
मिळो आनंदी गोकुळ सारे..
एकच मागणे मागते रे ईश्वरा..
सुखी ठेव प्रत्येक जननी, माता..
काळजी तिचं वाहते अख्ख्या जगाची सर्वथा..
© सौ. अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त : …म्हणजे आई… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ मातृदिनानिमित्त : …म्हणजे आई… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
सुखाच्या सावलीच वैश्विक
परिमाण आणि वेदनेच
वैयक्तिक अविष्करण
म्हणजे आई.
पहिल्या उच्चारा पासून अंतिम
श्वासापर्यंतची सहवेदना,
संवेदना म्हणजे आई.
ज्ञानेश्वर माउली, विठु माउली
ही उच्च पदाची पदवी,
म्हणजे आईच.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈