मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 221 ☆ फुलवात ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 221 ?

फुलवात ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

जेव्हा केव्हा आठवते मी

माझ्या कवितेचा उगम

तेव्हा मला आठवतो,

काॅलेज मधला प्रवेश –

कुणीतरी दिलेली

गावठी गुलाबाची फुलं,

सुगंधी असूनही

मी फेकून दिलेली!

रोझ डे वगैरे

तेव्हा नव्हता साजरा होत !

पण नव्हतं आवडलं,

कुणीही असं व्यक्त होणं!

मग त्यानं एक दिवस,

ग्रंथालयात गाठलं,

कुसुमानिल नावाचं

पुस्तक हाती दिलं!

“हे वाचलं की कळेल,

प्लॅटोनिक लव,

घेता येईल पत्रांमधून वाङमयाची चव!”

 असं काहीसं म्हणाला.

फुलासारखं पुस्तक तेव्हा

नाकारता नाही आलं,

कवितेशी तेव्हाच तिथं

मग नातं जुळलं!

‘अनिल’ वाचले ,वाचले ‘बी’

वाचले भा.रा.तांबे

बालकवी,बोरकर आणि पद्या गोळे!

चाफ्याच्या झाडाशीही

तेव्हाच झाली मैत्री,

कवितेनंच जागवल्या मग

कितीतरी रात्री!

दरवळू लागल्या,

माझ्याही मनात काही ओळी,

चारदोन बाळबोध कविता

लिहिल्या त्या काळी!

ज्यानं देऊ केली फुलं,

अथवा भेटवली कविता,

तो नव्हता माझा मित्र

किंवा नव्हता शत्रू !

कवितेच्या प्रवासातला

तो एक वाटसरू !

हळव्या हायकू सारखे होते

काॅलेजचे दिवस,

त्याच हळव्या दिवसातला

हा कवितेचा ध्यास!

जेव्हा केव्हा आठवते मला

माझ्या कवितेची सुरुवात ,

मंदपणे जळत असते

मनात एक फुलवात!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ निरोप… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

घेतलास तू निरोप आमचा,

अकालीच जाणे तुझे वाटे !

ठाव मनाचा घेता घेता ,

आठवणींचे मोहोळ मनी उठे!..१

 

बालरूप ते तुझे आगळे,

सुंदर ,कोमल रूप होते !

तारुण्य तुझे उठून दिसले,

शांत, सद्गुणी तेज होते !…२

 

आयुष्याच्या त्या वाटेवर,

होती साधी सरळ चाल ती!

वाट अवघड वळणावळणाची,

कधी सुरू झाली कळली नव्हती !.३

 

जाणीव झाली क्षणभंगुरतेची,

जेव्हा कळली आजाराची व्याप्ती!

निरोपास त्या सामोरे जाण्या ,

ईश्वराकडे मागितली शक्ती !..४

 

संचित अपुले, भोग ही अपुले,

आपले जगणे ,आपले मरणे!

निरोप घेता मनात येते,

असे कसे हे जगणे मरणे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निःस्वार्थी मरण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

निःस्वार्थी मरण ☆ श्रीशैल चौगुले ☆

मी संपताना नव्हते जवळ कुणी

जे होते कुणी पाहिले प्राण जाणूनी.

*

हेवा कधीच नव्हता केला कुणाचा

सेवा केली जितुकी आपुले मानूनी.

*

कौतुके फुलांची श्रध्दांजली तयांची

स्वीकार आत्मऋणे आशेत सगुणी.

*

मी संपताना जिव्हाळे बाकी जपले

आक्रोश खरा कि खोटा दुःख आणूनी.

*

डोळ्यात पाणी कुणाच्या, कुणा कोरडे

जन्मास या अर्पीले कर्म मृत्यू मानूनी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #228 ☆ भूमिका* अनलज्वाला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 228 ?

भूमिका* अनलज्वाला ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सर्व निजानिज झाल्यानंतर निजते बाई

सूर्य उगवण्या आधी रोजच उठते बाई

*

चारित्र्याला स्वच्छ ठेवण्या झटते कायम

कपड्यांसोबत आयुष्याला पिळते बाई

*

चूल तव्यासह भातुकलीचा खेळ मांडते

भाकर नंतर त्याच्या आधी जळते बाई

*

ज्या कामाला किंमत नाही का ते करते ?

जो तो म्हणतो रिकामीच तर असते बाई

*

सासू झाली टोक सुईचे नवरा सरपण

रक्त, जाळ अन् छळवादाने पिचते बाई

*

तिलाच कळते कसे करावे गोड कारले

कारल्यातला कडूपणाही गिळते बाई

*

पत्नी, मुलगी, बहीण, माता, सून, भावजय

एकावेळी किती भूमिका करते बाई

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अध्यात्माचे शाश्वत धन ! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– अध्यात्माचे शाश्वत धन ! – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

शेगाव ग्रामे , 

प्रकट झाले श्री गजानन !

अवलिया असा,

अध्यात्माचे शाश्वत धन ! 

*

उष्ट्या पत्रावळी ,

आनंदे अन्न सेवन !

योगियाचे झाले , 

जगा प्रथम दर्शन !

*

गजानन महाराजांनी ,

केल्या लीला अगाध  !

धावून भक्तांच्या हाकेला, 

कृपेचा दिला प्रसाद  !

*

झुणका भाकरी नैवैद्य, 

महाराजांना तो प्रिय !

चिलीम घेतली हाती,

भाव भक्ताचा वंदनीय!

*

गण गण गणात बोते,

ध्यान मंत्र मुखी सदा!

सरतील संसारी दु:खे,

टळतील सर्व आपदा!

*

शेगावी दर्शना जावे,

करावे तेथे पारायण!

एक चित्ती ध्यान करावे,

प्रसन्न होईल नारायण!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राम, राम, राम… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

राम, राम, राम☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

राम आनंदी प्रभात आहे

प्रखर प्रतापी प्रपात आहे

राम सीतावर सुकांत आहे

 गुणसागर हा प्रशांत आहे

*

राम धरेच्या कणात आहे

निसर्ग निर्मित धनात आहे

राम रंगला वनात आहे

विश्व व्यापल्या जगात आहे

*

राम वायुच्या सुरात आहे

युद्धा मधल्या विरात आहे

राम ठेवला घरात आहे

पवनसुताच्या उरात आहे

*

राम राहिला मठात आहे

संसाराच्या  घटात आहे

राम पिकाच्या मळ्यात आहे

संतांच्या पण गळ्यात आहे

*

राम राबत्या करात आहे

गरुडाच्या ही परात आहे

राम नाटकी नटात आहे

राजकारणी पटात आहे

*

राम बांधला सुतात आहे

निवडणुकीच्या मतात आहे

राम वाटला गटात  आहे

दलबदलूंच्या कटात आहे

*

राम जाहला दिगंत आहे

राम स्वरुपी अनंत आहे

राम नांदतो प्रजेत आहे

राम मंदिरी निवांत आहे

*

राम रक्षणा समर्थ आहे

पण भारत का अशांत आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆

सौ. नेहा लिंबकर

? कवितेचा उत्सव ?

तू☆ सौ. नेहा लिंबकर ☆

तू माता तू भगिनी

तू सीता तू मोहिनी

तू यामिनी तू कामिनी

तू पाणिनी तू धारिणी

तू  त्यागी तू योगिनी

तू वज्र तू मृगनयनी

 

तू अशी अन् तू तशी

घरातही अन् जगातही

तूच एक  स्वामिनी

तूच एक स्वामिनी

💐 जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 💐

© सौ.  नेहा लिंबकर

पुणे 

मो – 9422305178

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जराशी शाब्दिक गंमत …” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जराशी शाब्दिक गंमत …” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

एक वेलांटी सरकली,

पिताकडून पतीकडे आली. 

*

एक काना सरकला, 

राम ची रमा झाली. 

*

दोन काना जोडले, 

शरद ची शारदा झाली. 

*

एक मात्रा सरकली, 

खेर ची खरे झाली. 

*

एक अक्षर घटले, 

आठवले ची आठले झाली. 

*

एक अक्षर बदलले, अन्

मालू ची शालू झाली.

कर्वे ची बर्वे झाली. 

अत्रे ची छत्रे झाली. 

गानू ची भानू झाली. 

कानडे ची रानडे झाली. 

*

लग्नानंतर नांवच उलटे केले, 

निलिमाची मालिनी झाली. 

*

पदोन्नती झाली, 

प्रधान ची राजे झाली. 

राणे ची रावराणे झाली. 

देसाई ची सरदेसाई झाली. 

अष्टपुत्रे ची दशपुत्रे झाली. 

*

झुरळाला भिणारी ती, 

दैवयोगाने वाघमारे झाली. 

*

लेकराला कुरवाळीत, 

पुढे लेकुरवाळी झाली. 

*

एक पिढी सरकली,  

सुनेची सासू  झाली !!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ थोरवी स्त्रीत्वाची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ थोरवी स्त्रीत्वाची ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

माऊलीच्या ममतेची

तिच्या असीम त्यागाची

स्वाभिमानी बाण्याची

थोरवी ही स्त्रीत्वाची

*

कधी वज्रापरी कठोर

कधी कुसुम कोमला

बनते ती रणरागिणी

शुभांगी ही चित्कला

*

माता भगिनी तनया

भार्या होतसे प्रेमला

मनी मायेचा पाझर

प्रेम स्वरुप वत्सला

*

संस्कारित पिढी घडवी

कुटुंबाचा होई आधार

संसाराचा रथ चालवी

 होऊनिया ती सूत्रधार

*

 अर्थार्जन नी संसाराची

 करते  कसरत सारी

घास मायेने भरवते

अन्नपूर्णा साक्षात् खरी

*

जुनी जोखडे रुढींची

हसतची तिने तोडली

अस्मितेचे पंख लेवूनी

झेप नभांगणी घेतली

*

सारी क्षेत्रे पादाक्रांत

करी लीलया यशोयुता

देशासाठी लढणारी

हीच असे तेजान्विता

*

शक्तीरुपिणी चिद्शक्ती

अवतरते  तिच्या रुपाने

भूषवावे सदैव तिजला

सन्मानाच्या वर्तनाने

*

नित करुया आपण

जागर गं स्त्रीशक्तीचा

पूज्य भाव असो मनी

थोर स्त्रीत्व जपण्याचा

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक” – कवी : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक” – कवी : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

एक होती साधीभोळी आजी , 

पण आजोबा होते कहर !

काहीतरी वेगळं करण्याची, 

आजोबांना मध्येच आली लहर !!

 

“यावेळेस आपण करूया का गं, 

प्रेमाचा आठवडा साजरा ?”

लाजत मुरडत हो म्हणत , 

आजीने लगेच माळला गजरा !!

 

“रोझ डे” चा गुलाबी दिवस , 

केला गोडाधोडाचा भडीमार ! 

एकमेकांना भरवला गुलकंद , 

मग रोझ सरबत थंडगार !!

 

हीरो प्रमाणे गुडघ्यावर बसून , 

आजोबांनी मागणी घातली आजीला !

“प्रपोज डे” साजरा करून गेले, 

दोघं आठवडी बाजारात भाजीला !!

 

आता “चॉकलेट डे” ला काय द्यायचं ?,  

म्हणून आजीने केला आटापिटा !

शेवटी ग्लास भरून दूध घेतलं , 

त्यात घातला भरपूर बोर्नविटा !!

 

“टेडी डे” ला आजोबांनी आणली,  

छान अस्वलाच्या आकाराची उशी !

झोपेत दुखऱ्या मानेखाली ठेवताना, 

आजीने आजोबांनाच मारली ढुशी !!

 

दिवसभर लवंगा चघळण्याची, 

आजोबांना सवय होती फार !

 “प्रॉमिस डे” ला आजीने दिल्या, 

त्यांना प्रॉमिस टूथपेस्ट चार !!

 

म्हातार वयात काय हा चावटपणा ?, 

असं म्हणत आजी बसली अडून !

“कीस डे” लाच झालं भांडण अन् , 

दिवस सरला शब्दांचा कीस पाडून !!

 

वाद मिटवायला आजोबांनी आणले, 

आजीच्या आवडीचे खास बटाटेवडे !

अरेरे दुसऱ्या दिवशी पोट बिघडलं, 

पार पडला मराठीतला “हग डे” !!

 

अखेर एकदाचा गाठला त्यांनी , 

“व्हॅलेंटाईन डे” चा अवघड टप्पा !

गरमागरम चहासोबत रंगल्या ,  

राहिलेल्या बऱ्याच दिवसांच्या गप्पा !!

 

“जमायचं नाही बुवा आपल्याला, 

असलं नाटकी प्रेम करणं !”

नुसता सोहळा करायच्या नादात , 

असं उगाचच्या उगाच झुरणं !!”

 

“प्रेमाचा फक्त एकच दिवस , 

आपण म्हाताऱ्यांसाठी का असावा ? “ 

“प्रत्येक दिवस प्रत्येक श्वास , 

एकमेकांवर जीव लावून सोडावा !!”

 

सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा, 

आपलं मनातलं प्रेमच बरं !

दिसलं नाही कुणालाच तरी, 

एकमेकांवर असतं मात्र खरं !!

 

सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा, 

आपलं मनातलं प्रेमच बरं

दिसलं नाही कुणालाच तरी, 

एकमेकांवर असतं मात्र खरं !!

कवी : श्री क्षितिज दाते

ठाणे

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares