मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “निवडक ‘प्रखर’ कथा” – हिन्दी कथाकार : श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ – मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर / सौ. मंजुषा मुळे   ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆

सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “निवडक ‘प्रखर’ कथा” – हिन्दी कथाकार : श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ – मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर / सौ. मंजुषा मुळे   ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆ 

पुस्तक : “निवडक ‘प्रखर’ कथा” — (अनुवादित कथांचा संग्रह)

हिन्दी कथाकार : श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर / सौ. मंजुषा मुळे   

श्री भगवान वैद्य प्रखर

“निवडक ‘प्रखर’ कथा “ हा उज्ज्वला केळकर आणि मंजुषा मुळे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या निवडक वीस हिंदी कथांचा अतिशय सुंदर असा कथासंग्रह. यातील कथा प्रसिद्ध हिंदी कथाकार श्री. भगवान वैद्य ‘प्रखर‘  यांच्या वेगवेगळ्या पुस्तकातील आहेत.

सौ. उज्ज्वला केळकर

कथा लहान असल्या तरी मराठी वाचकापुढे या कथांमधून अनेक विषय ठेवले आहेत. या कथांमध्ये  सामाजिक जाणीव, नातेसंबंध, गरिबी,  जातीचा प्रभाव असे मनाला भिडणारे विषय असल्याने अगदी वास्तवता आपल्यासमोर उभी राहते. सर्वच कथा वाचनीय आहेत. यातील काही कथांची  ओळख उदाहरणादाखल  इथे करून देत आहे.

सौ. मंजुषा सुनीत मुळे

साप – घरी गरिबी असल्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर रमलू प्रामाणिकपणे मालकाच्या घरी राबत असतो. आज ना उद्या शेठजी ऑफिसात काम देईल या आशेने ते लोक सांगतील ती कामं तो करत असतो. एक दिवस तो मुलाला चांगल्या शाळेत घालण्यासाठी मालकाच्या घरातील सर्वांना पैश्याची विनवणी करतो. पैसे तर मिळत नाहीतच पण बोलणी मात्र खावी लागतात. नाराज झालेला रमलू आता यांच्याकडे कामाला जायचं  नाही असा निश्चय करतो. पण तरीही एक दिवस तो जातो .. का ? ते कळण्यासाठी कथाच वाचायला हवी.

पारू – ही एक विधवा, संधिवाताने त्रस्त. तिला एक मुलगा व मुलगी आहे.जोपर्यंत कामं होत होती तोपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे तिने पंडितांच्या घरी पडेल ते काम केलेलं असतं.आता मात्र दुखण्याने जोर धरल्याने तिला बसता उठताही येत नसल्याने ती घरीच असते. मुलगी एक दिवस पार्लरमधे जाते आणि तिला मसाजचे ५०००₹ मिळतात. पारू विचारात पडते. दोन महिने राबलं तरी मला इतका पगार मिळत नाही  आणि हिला एका दिवसाचे इतके पैसे मिळाले. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आणि ती मुलीला  असलं काम आपल्याला नको म्हणून सांगते. तेवढ्यात पंडितांच्या घरी पारुला बोलावण्यात येतं. पंडितांचा मुलगा आणि सून दोघेही परगावी नोकरी करत असतात. त्यांना एक लहान मुलगा असतो, आणि त्याला  सांभाळायला  मुलीला पाठवण्याची विनंती ते पारूला करतात… आणि ती मुलीला पाठवण्यास साफ नकार देते. .. का ? — ते कळण्यासाठी ही कथाच वाचायला हवी.

नारायणी नमोस्तुते – एकूण चार बहिणी .. आई-वडिलांचे छत्र हरपलेले. मोठी मुलगी एका कापड दुकानात काम करत असते. एक दिवस तिच्यासोबतच नेहमी काम करणारी  मुले  तिच्यावरती बलात्कार करतात  आणि त्या चौघींना  एका रात्रीत ते शहर सोडावं लागतं. . इतर बहिणींची व स्वतःच्या सुरक्षिततेसाठी इथून पुढे ती मुलगी नारायणीची नारायण कशी होते ? .. त्या सगळ्या बहिणींचे काय होते ?

—-  ते या कथेतून समजेल.

मृत्युपत्र – दोघेही नोकरी करत असतात. दोन मुलं पराग अनुराग. मुलांची लग्न होतात सुना नातवंडे येतात. हे दोघेही सुखा समाधानाने सेवानिवृत्त होतात. मिस्टरांना देवाज्ञा होते. एक मुलगा सून दुसऱ्या शहरात राहत असतात. एक मुलगा परदेशी असतो व त्याची सून पुण्यात राहत असते. आई त्या सुनेकडे राहत असते. इथपर्यंतचा प्रवास अगदी आनंदी आनंदाचा असतो. त्यामुळे आई आपले मृत्युपत्र करते…

आणि मग पुढे काय काय घडते ते या कथेतून कळेल.. हे आहे आजचे वास्तव.

नशीब – एका हॉस्पिटलमधली ही कथा. विधी वेटिंग रूम मध्ये बसून हनुमान चालीसा वाचत असते. तिच्या शेजारीच मिसेस कपूर बसलेल्या असतात. दोघींच्याही नवऱ्यांना हृदयाचे ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये नेऊन चार पाच तास झाले आहेत. विधी वयाने लहान आहे तर मिसेस कपूर तिच्या आईच्या वयाच्या आहेत.विधी दुसऱ्या राज्यात असल्याने तिच्याजवळ नातेवाईक कुणीच नाही. त्यामुळे ती आतून घाबरली आहे. पण मिसेस कपूर तिला खूप समजावून धीर देतात आधार देतात. तेवढ्यात वॉर्ड बॉय येऊन नाव पुकारतो… उत्सुकता वाढवणारी ही कथा.

मन्नत – अनाथ बाळ शाळेच्या आवारात सोडून दिलेले… माणुसकीच्या नात्याने शिक्षक त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात… प्रश्न असतो त्या अनाथ मुलीला दत्तक कोण घेणार? एक  निपुत्रिक जोडपं ते दत्तक घेण्याची तयारी दर्शवतात पण ज्योतिषशास्त्र आडवं येतं. ज्यांना सापडलं त्यांनाही त्या मुलीला सांभाळण्याची इच्छा असते पण त्यांच्या अर्धांगिनीची नसते… पुढे काय काय घडते ? — जे अगदी अनपेक्षित असते. —

अरुंद वाट प्रेमाची – मूर्तिकारच्या हाताखाली काम करणारा मधू…  तिथेच माती तयार करण्याचे काम करणारा मंसाराम ..  याला वृद्धत्वामुळे काम झेपत नसल्याने त्याच्या जागी त्याची मुलगी मधुलिका कामावर येऊ लागते. मधू व मधुलिका दोघेही तरुण आहेत… या मध्यवर्ती सुत्रानुसार फुलत गेलेली ही एक भावनाप्रधान कथा – वाचायलच हवी अशी.

इतरही अशाच सुंदर कथा या संग्रहात आहेत.. नंदग्राम –   कुबड्या –  मी पण लहानच आहे –   चकारी –  नवी दिशा नवा मार्ग  – जिज्ञासा – . द्वारकाधीश – आणि अशाच आणखी काही कथा ज्या तुमची उत्सुकता वाढवतात … आणि सगळ्या कथा वाचण्याची आपसूक निर्माण झालेली उत्सुकता वाचकाला पुस्तक हातातून खाली ठेवू देत नाही. अतिशय सुंदर अशा सर्व कथा आहेत. ज्या ‘ कथा ‘ वाचण्याची आवड असणाऱ्यांनी  आणि नसराण्यांनीही आवर्जून वाचाव्यात अशा आहेत.

सांगायलाच हवी अशी एक विशेष बाब म्हणजे या कथा वाचत असताना त्या अनुवादित आहेत असं कुठंच वाटत नाही. मूळ मराठीतच लिहिलेल्या या कथा आहेत असंच वाटतं. हे दोन्ही अनुवादिकांच्या लेखन शैलीचे आणि अनुवाद-कौशल्याचे वैशिष्ट्य. कथा त्यांनीच स्वतः लिहिल्या आहेत असं वाटतं. सहज प्रवाही अशी त्यांची लेखनशैली आहे.

धन्यवाद उज्ज्वला व मंजुषाताई. अतिशय सुंदर असा कथासंग्रह तुम्ही वाचकासाठी दिलात.

परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “गंधर्वांचे देणे” – लेखक : श्री अजिंक्य कुलकर्णी – संपादन : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गंधर्वांचे देणे” – लेखक : श्री अजिंक्य कुलकर्णी – संपादन : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : गंधर्वांचे देणे 

लेखक : अजिंक्य कुलकर्णी

संपादन – अतुल देऊळगावकर

मूल्य – ८००₹ 

पं. कुमार गंधर्व, सत्यजीत राय आणि लाॅरी बेकर यांचा तसा एकमेकांशी काही संबंध नाही. कारण या तिघांची क्षेत्रं वेगवेगळी. तरीही या तिघांत साम्य जर काही असेल तर ते म्हणजे या तिघांनाही निसर्गबदल समजला. पं. कुमार गंधर्वांनी तो आपल्या गाण्यातून, गायकीतून मांडला. पं. कुमार गंधर्व हे केवळ शास्त्रीय गायक नव्हते तर ते एक तत्वज्ञ होते. मी कोणीतरी आहे हे विसरण्यासाठी संगीत असतं अशी त्यांची धारणा होती. आपल्या चिंतन आणि मननामुळे परंपरेतून आलेल्या रागाला ते एक वेगळा आयाम द्यायचे. रागाचं अमूर्त स्वरूप दिसण्याइतकी सिद्धी त्यांना प्राप्त होती. संगीत, राग, विविध गायकी, सांगीतिक घराणे, सुर, ताल, लय, बंदिशी, तराणे, ख्याल, लोकसंगीत या आणि अशा अनेक विषयांवर पं. कुमार गंधर्वांची मुलाखत ग्रंथाली प्रकाशनाने १९८५ साली आयोजित केली होती. त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये होते मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शरच्चंद्र चिरमुले, श्रीराम पुजारी. तर प्रश्नावली तयार केली होती पं. सत्यशील देशपांडे यांनी. हा मुलाखतीचा अमोल ठेवा काही वर्षांपूर्वी सापडला आणि आता तो ग्रंथ रुपाने सर्वांसाठी खुला आहे. अतुल देऊळगावकर यांनी या पुस्तकाचे संपादन केलं आहे तर ग्रंथालीने याचं प्रकाशन.

कुमार गंधर्व हे कुणाकडूनही, कधीही, काहीही शिकायला तयार असत. जसं एका गारुड्याचं पुंगीवादन ऐकून त्यांनी ‘अहिमोहिनी’ या रागाची निर्मिती केली तर एका भिकाऱ्याकडून ऐकलेल्या भजनातून प्रेरणा घेत कुमारजींचा निर्गुणी भजनाच्या जगात प्रवेश झाला. आपली संस्कृती उदात्त होत जावी यासाठी त्यांनी आपल्या संस्कृतीच्या आधारस्तंभांचे कसून संशोधन केले. कुमारजींचं गाणं ही सतत चाललेली साधना किंवा कशाचातरी सतत चाललेला शोध वाटतो. आपल्याला आताच्यापेक्षाही जास्त चांगलं गाता आलं पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे असं त्यांना वाटत असे. या पुस्तकात शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत यामधील फरकही कुमार फार चांगल्या प्रकारे समजावतात.

बंदिशींबद्दल कुमार म्हणतात की, “कोणतीही बंदिश त्या लयीमध्ये म्हटली तरच फार छान लागते. बंदिशीला खूप अक्षरं नको असतात. कारण तिच्यातून रागाला व्यक्त करायचं आहे. रागाकडे स्वतःला व्यक्त करण्याची खूप मोठी क्षमता असते. कोणालाही रागाचं नाव काय आहे, हे सहज कळावं यासाठी ती बंदिश असते. बंदिशीला बंधनयुक्त स्वैरपणा हवा असतो!”

शास्त्रीय संगीताबद्दल बहुतेक समाज हा उदासीन असतो कारण शास्त्रीय संगीतासाठी आमचा कानच तयार नसतो. संगीत ही जरी ऐकण्याची गोष्ट असली तरी आम्ही संगीत समजून घेण्यासाठी संगीतावरील पुस्तके वाचत नाही. उत्तम गाणारे गायक यांना ऐकणं व त्यांच्या गायकीची इतरांना ओळख करुन देणं यात कुठेतरी आपण कमी पडतो. बंदिश कशाला म्हणतात? ताल कशाला म्हणतात ? द्रुत आणि विलंबित म्हणजे काय? मुरकी, तान, ठेका, टप्पा, राग याची प्राथमिक माहिती तरी आपण गोळा करण्याचा प्रयत्न करतो का? संगीत हे व्यक्तींना, समाजाला जोडण्याचे काम करते. संगीत ही मानवी भाव-भावना व्यक्त करण्याची एक वैश्विक भाषा आहे. गरज आहे ती भाषा समजण्यासाठी कान तयार करण्याची.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्याचं असं झालं… भाग-२- लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

डॉ. संदीप श्रोत्री

? इंद्रधनुष्य ?

 ☆ त्याचं असं झालं… भाग-२ – लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

(एक आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा आगळा वेगळा परिचय)  

पुस्तक : त्या चं असं झालं

लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर   

प्रकाशक : चतुरंग प्रकाशन 

पृष्ठ : 264 

किंमत :  रु. 200

त्याचं असं झालं,.. गप्पा रंगात आल्या होत्या, आम्ही तिघेजण होतो, समोरच्या व्यक्तीला मी म्हणले, ‘अण्णा, आमच्या डॉक्टरी व्यवसायात आम्हाला देखील खुपसे रांगडे अनुभव येतात, पण फारच थोडी डॉक्टर मंडळी ते शब्दबद्ध करतात, असे का बरे?’ अण्णा म्हणाले, आता मी गप्प बसतो, तुझ्याकडे आहे अशा अनुभवांचे गाठोडे, तू सांग तुझे अनुभव! पुढील तासभर मी बोलत होतो, अण्णा ऐकत होते, शांतपणे डोळे मिटून. त्या दोघांपैकी एक होता माझा नूमवी (ओउने) शाळेतील माझा जिगरी दोस्त गजानन सरपोतदार आणि दुसरे होते गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा!

त्याचं असं झालं,.. सांगलीमधील रक्तपेढीचा कार्यक्रम होता, त्यासाठी पाहुणे गाडीने येताना प्रवासात गाडीमधील एसी चालू होता, काचा बंद होत्या, अचानक काळा धूर येऊ लागला आणि आतमधील सर्वजण गुदमरू लागले. कशीबशी गाडी येऊन सांगलीत पोहोचली, तोपर्यंत सर्वजण उलटी, चक्कर आणि डोकेदुखीने त्रस्त झाले होते. मी जातीने उपचारात लक्ष घातले, रक्तपेढीचा कार्यक्रम संध्याकाळी सुरु झाला, बोलताना पाहुणे उभे राहिले, ‘खरे म्हणजे आम्ही स्वर्गाचे दार ठोठावले होते, दार उघडले नाही म्हणून परत आलो, रक्तदान करायच्या अगोदर देहदान करायची वेळ आली होती!’ श्रोत्याना ती एक शाब्दिक कोटी वाटली, पण मला ते कारण माहिती होते. ते पाहुणे होतेअर्थातच, भाई उर्फ पु लं देशपांडे!

त्याचं असं झालं,.. सांगलीमध्ये एक क्रिकेट मॅचसाठी महान क्रिकेटपटू आलेले होते. सकाळी रत्ना इंटरनॅशनल हॉटेलमधून फोन आला, मी गेलो, खोलीमध्ये तापाने फणफणलेला एक रुग्ण, त्याला तातडीने मुंबईला हलवायला पाहिजे होते. तत्काळ थेट (तत्कालीन) मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्यांना फोन करून विचारले, कारण ते आणि त्यांचे विमान सांगलीमध्ये होते, त्याच विमानातून त्या रुग्णाची सोय मुंबईमध्ये जाण्यासाठी केली, तो रुग्ण होता साक्षात सुनील गावस्कर! 

त्याचं असं झालं,.. आम्ही दिल्लीला जाताना वाटेत भोपाळ स्टेशनवर थांबलो. स्टेशनवरील मध्यप्रदेश डेअरीच्या स्टॉलवर थंड दुधाची बाटली मिळते, ती आणायला मी उतरलो, समोर झब्बा, लेंगा उपरणे घातलेले एक गृहस्थ, मी ओळखले पटकन नमस्कार केला. नंतर त्यांनी जे सांगितले त्यामुळे मी गहिवरलो. ते म्हणाले, ’कालच रामचा फोन आला होता, तुम्ही याच रेल्वेने दिल्लीला चालला आहात, माझी गाडी दुसर्या प्लॅटफॉर्मवरून थोड्या वेळाने निघणार आहे, म्हणून तुम्हाला भेटायला आणि हा मिठाईचा पुडा घेऊन आलो आहे!’ अशी ती व्यक्ती होती पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व! 

त्याचं असं झालं,.. एकदा गाडीने मुंबईहून सांगलीला जात असताना चहा, नाष्टासाठी साताऱ्यात हॉटेल रजताद्रीमध्येन जाता शनिवार पेठेतील माझ्या मित्राच्या घरी गेलो. तो ओपीडीमध्ये होता, त्याने घरी शिरा-भजी-चहा करायला सांगितला आणि समोरच्या टेबलाखाली ठेवलेले चार-पाच एक्सरे काढले. प्रत्येक एक्सरे ठराविक दिवसांनी घेतलेला होता, मी एक्सरे तज्ञ असल्यामुळे त्याने मला दाखविले. सर्व काळजीपूर्वक बघितल्यावर मी फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान केले. तो टीबी नसून कर्करोग होता. स्वतः एम डी डॉक्टर असणारा तो मित्र म्हणाला, अगदी बरोबर, मलाही तेच वाटत आहे. तू कॅन्फर्म केलेस. चहा-नाष्टा झाल्यावर मी सहज म्हणालो, कुणाचे एक्स रे आहेत रे ते?, त्यावर तो अतिशय शांतपणे म्हणाला, ‘माझेच!’ मी सुन्न! काही दिवसांचा सोबती असणारा तो प्रथितयश फिजिशियन म्हणजे सातारा शहरातील आजच्या जीवनज्योत रुग्णालयाचे एक संस्थापक, कै डॉ बाबा श्रीखंडे ! 

त्याचं असं झालं…

त्याचं असं झालं…

त्याचं असं झालं…

त्याचं असं झालं…

…… ही यादी त्याच्या आयुष्यात न संपणारी आहे.

आपसुकच मनामध्ये प्रश्न येतो की त्याचं ‘असं’ कसं झालं? आणि…

त्याचंच कसं झालं? हे रहस्य ओळखण्यासाठी आपण हे “ त्याचं असं झालं “ पुस्तक वाचले पाहिजे.

हा लेखक आहे, सांगलीमधील प्रख्यात रेडिऑलॉजीस्ट आणि माझे शिक्षक डॉ. श्रीनिवास नाटेकर.

पुस्तकाचे नाव – त्याचं असं झालं 

लेखक – डॉ श्रीनिवास नाटेकर 

प्रकाशन – चतुरंग

किंमत – रु २००/- 

हे पुस्तक वाचताना आपण विस्मयचकित होतो, की, एखाद्याच्या कुंडलीमध्ये विधाता काय काय ‘योगायोग’ भरून ठेवतो ?

कधी ती व्यक्ती दीर्घायुषी असते तर कधी अल्पायुषी, जन्माच्या स्टेशनवर आपण मृत्यूचे तिकीट घेऊन चढलेलो असतो. आपले उतरायचे स्टेशन कुठे येणार, कधी येणार हे आपल्याला माहीत नसते, काळाची ही रेल्वेगाडी चालूच असते, एकाच गतीने जात असते. आपण त्यामध्ये नुसतं बसून राहायचं की शेजारच्या सहप्रवाशांची गप्पा मारायच्या किंवा आणि काय लेखन, कला, साहित्य, चित्र काढत बसायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं.

८५ वर्षाच्या या प्रवासामध्ये डॉ. नाटेकर सरांना वाटेत अनेक प्रवासी मित्रमैत्रिणी भेटले. काही वेळ भेटले, आपापल्या स्टेशनवर उतरून निघून गेले, पण त्यामध्ये होते ते प्रथितयश कवी, लेखक, हिंदी – मराठी सिनेसंगीतातील गायक, संगीतकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, प्रख्यात उद्योजक, लोकप्रिय राजकारणी, आणखी किती नावे सांगू? ही यादी न संपणारी !

हे केवळ नशीब आहे.. का ही केवळ नियती आहे.. की योगायोग?

लेखक म्हणतात, “ परमेश्वराची कृपा असावी. “ परंतु मला असं वाटतं की ही लेखकाची एक तपश्चर्या असावी, समोरच्या व्यक्तीला न दुखवता त्याच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्याची हातोटी असावी, लेखकाची ती एक कला असावी. आपणही अशा अनेक उत्तुंग व्यक्तीमत्वांच्या संपर्कात येत असतोच, परंतु आपल्याला ही कला नाही, म्हणून मला असे वाटते, की जर आपले चरित्र लिहायला घेतले तर त्याचे नाव द्यावे लागेल.. ‘ माझं हसं झालं ! ’

या पुस्तकात अशा अनंत आठवणी आहेत. मी स्वतः १९८२ ते १९९१ ह्या काळामध्ये मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आणि सिव्हील हॉस्पिटल सांगली इथे होतो. त्या काळात आमच्या स्पोर्ट आणि एक्सरे पुरताच नाटेकर सरांशी संबंध आला. सरांनी घेतलेली एकनाथ सोलकर यांची मुलाखत आजही आठवते. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर हे सरांचे भाऊ. ह्या नाटेकरबंधूंचे बालपण पुणे, मुंबई येथे गेले. जात्याच अभ्यास आणि खेळात हुशार. शास्त्रीय संगीत, भावगीते, सिनेसंगीत आवडीचे. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदि क्षेत्रामध्ये ह्या बंधूंचा खूप बोलबाला होता, त्यामुळे त्यांची उठबस होती ती अतिशय उच्चभ्रू वर्गात… त्या ह्या आठवणी !

या पुस्तकाचे हेच वैशिष्ट्य आहे की याला अनुक्रमणिका नसली तरी चालते. कोणतेही पान केव्हाही उघडावं आणि वाचत बसावे.. वाचव असता हसावं, चकित व्हावं. मी तर सांगितली ही नुसती झलक. हे पुस्तक सध्या छापील स्वरुपात विक्रीस उपलब्ध नाही. परंतु किंडल किंवा ई बुक उपलब्ध आहे.

डॉ नाटेकर सरांचा whats app नंबर मुद्दाम देत आहे. (8055771552) त्यांनाही आपला अभिप्राय जरूर कळवावा.

डॉ. श्रीनिवास नाटेकर यांचे हे पुस्तक – “ त्याचं असं झालं…” विकिमिडिया कॉमन्सवर सर्वांसाठी मुक्त उपलब्ध झाले आहे. ( https://w. wiki/4chA ) 

– समाप्त – 

© डॉ. संदीप गजानन श्रोत्री

(सरांचा एक विद्यार्थी )

सातारा 

मो 9822058583

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पडघवली” – लेखक : गो. नि. दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पडघवली” – लेखक : गो. नि. दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनील शिरवाडकर ☆

पुस्तक  : पडघवली 

लेखक : गो. नी. दांडेकर 

प्रकाशक : मौज प्रकाशन गृह 

पृष्ठे : २२२ 

गो. नी. दांडेकर. माझ्या आवडत्या लेखकांमध्ये अग्रक्रमावर असलेलं नाव. खुप पुस्तकं वाचली त्यांची. नुकतीच ‘पडघवली’ वाचली. कोकणातील एका गावातील कथानक. कादंबरी प्रकाशित झाली १९५५ मध्ये. म्हणजेच कादंबरीत असलेला काळ साधारण सत्तर वर्षापुर्वीचा. कोकणातील अगदी आत वसलेलं गाव. तेथील चालीरीती.. कुलधर्म.. परंपरा सगळं सगळं यात आलंय.

खरंतर हे एका नष्ट होऊ घातलेल्या खेड्याचं शब्दचित्र आहे. कादंबरीचं कथानक घडतंय एका गावात.. गावच्या खोताच्या घरात. पण ओघानेच येताना गावातील इतर माणसं. मग त्यात कुळवाडी आहेत.. कातकरी आहेत.. अगदी मुसलमान पण आहेत. (कादंबरीच्या भाषेत ‘मुसुनमान’). प्रत्येकाची बोली वेगळी. आहे ती मराठीच. पण खोताच्या घरातील ब्राम्हणी बोली वेगळी.. कातकऱ्यांची वेगळी.. कुळवाडी वेगळी आहे हैदरचाचाची तर त्याहुनही वेगळी.

आणि हेच तर आहे गोनीदांचं वैशिष्ट्य. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. प्रत्येक कादंबरीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील कथानक येते. कधी विदर्भात.. तर कधी पश्चिम महाराष्ट्रात त्यांची कथा आकार घेते. प्रत्येक कादंबरीत ते त्या त्या प्रांतातील भाषेचा गोडवा.. लहेजा अगदी तंतोतंत उतरवतात.

वास्तविक गोनीदांचं बरंचसं आयुष्य पुण्याजवळील तळेगावात गेलंय. पण कादंबरी लिहीताना ते त्या त्या भागात बरंच हिंडत असणार. तेथे वास्तव्य करत असणार. तेथील चालीरीतींचा अभ्यास करत असणार. तेथील बोलीभाषा समजावून घेण्यासाठी ती कानावर पडणे तर आवश्यक असणारच.

‘पडघवली’ मध्येदेखील ही बोलीभाषा जाणवते. त्या त्या भागातील म्हणी.. वाक्प्रचार आपल्याला समजतात. कोकणातील.. किंवा खरंतर एकुणच ग्रामीण भागातील वापरात असलेल्या औषधी वनस्पतींची पण खुप माहिती मिळत जाते. कथानकाच्या ओघात ते छोट्या मोठ्या दुखण्यांवर वापरली जाणारी औषधे.. मुळ्या.. काढे यांची माहिती सहजगत्या सांगुन जातात.

गोनीदा अनेक वेळा अनेक कारणाने भारत फिरले. त्यातही त्यांनी ग्रामीण भारत अधिक अभ्यासला. ग्रामीण अर्थव्यवस्था बारा बलुतेदारांवर आधारित होती. किंबहुना बलुतेदार हा त्या व्यवस्थेचा कणा होता. यातील एक जरी बलुतेदार बाजुला काढला तरी गावगाडा विस्कळीत होऊन जात असे. आणि हे होऊ नये हीच तर गोनीदांची इच्छा होती.

कारण हा गावगाडा विस्कळीत होऊ नये.. तो न कुरकुरता चालावा म्हणून गोनीदा ‘पडघवली’ च्या सुरुवातीलाच सांगतात..

ही कादंबरी वाचल्यानंतर कोणी तिला चांगली म्हणतील.. कोणी वाईट म्हणतील. कोणी निंदाही करतील. पण मला स्तुती अथवा निंदेपेक्षा वाचकांकडून अपेक्षा आहे ती अशी..

वाचकांचे लक्ष आपल्या त्या जिर्णशिर्ण, कोसळु पाहणाऱ्या खेड्यातील घरकुलांकडे वळावे. कदाचित अपेक्षा पुरी होईल.. कदाचित होणारही नाही.

गो. नी. दांडेकरांची ही साधी अपेक्षा पुरी झाली असं आपण आज म्हणू शकतो?

लेखक : वि.वा. शिरवाडकर 

परिचय : श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्वामी विवेकानंद समग्र चरित्र – ३ खंड” – लेखक : प्रा. एस. एन धर – अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्वामी विवेकानंद समग्र चरित्र – ३ खंड” – लेखक : प्रा. एस. एन धर – अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

(स्वामी विवेकानंद यांचे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या प्रकाशनाने प्रकाशित केलेलं समग्र चरित्र !)

पुस्तक : स्वामी विवेकानंद समग्र चरित्र (खंड एक, दोन आणि तीन)

(कॉम्प्रेशन बायोग्राफी ऑफ स्वामी विवेकानंद या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.)

लेखक : प्रा. एस. एन धर

अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली

(तिन्ही ग्रंथाची एकत्रित) पृष्ठे : २११२

मूल्य : २५००₹ 

स्वामी विवेकानंद यांच्या नावाची भुरळ आजही भारतीयांच्या मनावर आहे. आणि ती तसूभरही कमी झालेली नाही. त्यांचे विचार, त्यांचा संदेश पौर्वात्य जगतातच नव्हे, तर पश्चिमात्य विश्वातही सगळ्यांना आकर्षून घेत आहे.

स्वामी विवेकानंद एक महायोगी होते. हिमनगाचा पाण्याखालील अदृश्य भाग असतो, तसे त्यांचे जीवन आपल्या मानवी जाणिवांच्या पलीकडचे होते. स्वामीजींचे जीवन आणि कार्य सर्व जगतकल्याणासाठीच होते. इतर सत्पुरुषांसारखे त्यांचे जीवन नव्हते. शिकागोमध्ये १८९३ साली भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेपासून, जगाच्या पटलावर त्यांना एक थोर ऐतिहासिक विभूती अशी ओळख मिळाली होती. आधुनिक भारताचे ते कित्येकांच्या मते एक सर्वश्रेष्ठ निर्माते होते, ज्यांचे ध्येय जागतिक होते. जगाला भौतिक प्रगती प्रदान करण्याबरोबरच, नवीन जीवनमूल्ये किंवा जुन्या जीवनमूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी ते अखंड झिजले. दुसरे म्हणजे, त्यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी उदंड साहित्य जमा होत गेले आणि भारताबरोबरच जगातही त्यावर खूप संशोधन सुरू आहे.

 हे पुस्तक लिहिण्यामागे स्वामी विवेकानंदाच्या जीवन आणि कार्याचा एक सरळ आणि तटस्थ आढावा घेणे हा लेखकाचा हेतू आहे. उपलब्ध असलेले सर्व प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्याचा संदर्भ घेऊन केलेले हे लेखन कुठल्याही सिद्धांताचा/ तत्त्वाचा अथवा विचारपद्धतीच्या प्रसारासाठी अथवा छापील गोष्टीचा अपभ्रंश करण्यासाठी केलेले नाही. या चरित्रातील व्यक्ती आणि प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे पारखून आणि निरखून घेतलेले आहेत. ज्यायोगे वाचकांना एक समग्र चरित्र उपलब्ध होईल. या अभ्यासात पार्श्वभूमीवरचे आणि अग्रस्थानी असलेले अनेक प्रसंग, आणि त्याकाळची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच स्वामी विवेकानंदांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे श्रीरामकृष्ण यास अभ्यासात अध्याहृत आहेत.

या खंडात्रयीचा पहिला भाग १८६३ ते १८९३ हा स्वामीजींच्या आयुष्यातील पहिल्या तीस वर्षाच्या कालावधीवर आधारलेला आहे. हा टप्पा आहे त्यांचा जन्म ते भारत परिक्रमा आणि त्यानंतर अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेला त्यांनी केलेले संबोधन, या घटनाक्रमावर आधारलेला. स्वाभाविकपणेच त्यात स्वामीजींचे बालपण, शाळा – कॉलेजातील दिवस, श्रीरामकृष्णांशी झालेली भेट, गुरु म्हणून त्यांचा केलेला स्वीकार, त्यांच्याकडून घेतलेली संन्यासदीक्षा, श्रीरामकृष्णांनी घेतलेली महासमाधी, वराहनगर मठाची स्थापना आणि ध्येयमार्गाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यापूर्वी गुरू आज्ञेनुसार केलेले भारत भ्रमण, इतक्या घटनांचे विस्तृत तपशील आले आहेत. स्वामीजी जागतिक धर्म परिषदेला गेले, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना आलेल्या अडचणी, यावर त्यांनी केलेली मात, स्वामीजींच्या अचाट व्यासंगाची अनुभूती घेतल्यानंतर या परिषदेत स्वामीजींना प्रवेश मिळावा यासाठी काही अमेरिकन नागरिकांनीच केलेले प्रयत्न आणि अखेरीस त्या महापरिषदेसमोर स्वामीजींनी केलेले उदबोधन हा सगळाच रोमांचित करणारा कालखंड पहिल्या खंडात प्रा. धार यांनी उलगडला आहे. हे लेखन रोचक आहेच, परंतु अंत:करणाला भिडणारे आहे, नितांत सुंदर वाचनानंद देणारे आहे. श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतरही स्वामीजींना जे दैवी संकेत मिळत गेले, जे दृष्टांत घडले त्यांचे वर्णन वाचणे हा एक अनमोल आनंदाचा ठेवा ठरावा.

या खंड त्रयीचा दुसरा भाग आधारला आहे तो ११ सप्टेंबर १८९३ ते १६ डिसेंबर १८९६ या तशा तीनच वर्षांच्या कालावधीतील घटनांवर. या घटना बहुतांशी अमेरिका आणि इंग्लंडमधील आहेत. स्वामीजींनी या देशांच्या दौऱ्यात भारतीय संस्कृतीचा केवळ पायाच रचला नाही, तर त्याचे मजबुतीकरणही केले. या सर्वच घटना स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाला आंतरराष्ट्रीय महती प्राप्त करून देणाऱ्या असल्याने, त्याचे तपशील वाचकांना प्रेरणादायक असेच वाटतील यात शंका नाही. अमेरिका आणि इंग्लंडचा हा दौरा सुरू असताना आणि तिथल्या शिष्यांना स्वामीजी अधिक काळ रहावेत असे वाटत असताना, स्वामीजींना मात्र भारतात परतण्याची विलक्षण होऊ लागली होती.

स्वामीजी ३० डिसेंबर १८९६ ला परतीच्या प्रवासाला निघाले. कोलंबोपासून कोलकात्यापर्यंत ठीकठिकाणी स्वामीजींचे उत्स्फूर्त स्वागत झाले, त्याचे वर्णन मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

खंडत्रयीचा तिसरा भाग फेब्रुवारी १८९७ ते जुलै १९०२ असा सुमारे साडेपाच वर्षाचा आहे. हा कालखंड स्वामीजींच्या जीवनातील अनेक विविध प्रसंगांनी आणि घटनांनी भरलेला आहे. त्याचे शब्दांकन अंगावर रोमांच उभे करणारे ठरले आहे. २० जून १८९९ ते ९ डिसेंबर १९०१ या कालखंडातील स्वामीजींनी पुन्हा एकदा पश्चिमेचा दौरा केला; परंतु या दौऱ्याचा हेतूच प्रकृतीस उतार पडावा हा होता. काही प्रमाणात स्वामीजींची प्रकृती सुधारलीही, त्यामुळेच बेलूर मठासाठी निधीसंकलन करून पाश्चात्त्य जगात सुरु झालेल्या कार्याचं मजबुतीकरण करण्यासाठीही त्यांना वेळ काढता आला. तिथल्या कामाचा व्यवस्थापन मार्गी लावता आलं, हेही महत्त्वाचं.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामीजींची अत्यंत दुर्मिळ आणि पूर्वी कधीही प्रसिद्ध न झालेली छायाचित्रे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ बापू, तुम्ही ग्रेटच – लेखिका : सुश्री नीलम माणगावे — परिचय : सुश्री आशा धनाले ☆ प्र्स्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ बापू, तुम्ही ग्रेटच – लेखिका : सुश्री नीलम माणगावे — परिचय : सुश्री आशा धनाले ☆ प्र्स्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆ 

पुस्तक : “ बापू, तुम्ही ग्रेटच ! “ 

लेखिका–नीलम माणगावे

प्रकाशक : शब्दशिवार प्रकाशन

पृष्ठे ११८

किंमत–रु. १५० / – 

बापू, तुम्ही ग्रेटच ‘ ….  लेखिका नीलम माणगावे यांचं हे ७५ वं पुस्तक. याचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.

ही एक दीर्घ कविता आहे. याचे लेखन एका वेगळ्याच पद्धतीने करण्यात आलं आहे. राग, लोभ, मद, मत्सर हे मानवी स्वभावाचे कंगोरे लेखिकेने बापूंच्या चरखा, चष्मा व लाठी या जवळच्या वस्तूंना बहाल करुन त्यांचा बापूंशी संवाद घडवून आणला आहे. बापूंचे जीवनकार्य व मूल्ये या तीन वस्तूंच्या तोंडून समजतातच. 

शिवाय त्यांच्या नंतरच्या काळात जे घडले आहे, घडत आहे त्या प्रसंगी बापू कसे वागले असते हेही दृग्गोचर होते. त्यावेळी त्यांना कारस्थानाने मारले. पण खरेतर ते अजूनही मरत नाहीत, अशा बापूंची वेगळी ताकद आजही विरोधकांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या मानगुटीवर बसली आहे हे लेखिकेचे म्हणणे पटते.

बापूंच्या स्मारकाला भेट देण्याच्या प्रसंगी राजकारण्यांद्वारे चरखा उलटा फिरवला गेला यावरून देश उलट्या दिशेने म्हणजे सतराव्या शतकात मनुवादात नेऊन ठेवायचा आहे की काय? अशा संभाव्य स्थितीची इथे वाच्यता करण्यात आली आहे. थोडक्यात, गांधी जयंती दिवशीसुद्धा सत्य, अहिंसा, संयम, त्याग या  गांधीमूल्यांना अडथळे निर्माण करणारे विषाणू समजून मारुन टाकले जाते. 

…. असे असले तरी बापूंचे आचारविचार संपणार नाहीत हे प्रतिपादन करताना चरखा, चष्मा, लाठी या प्रतिकात्मक पात्रांनी बापूंच्यावरचा अन्यायही इथे जोरदारपणे व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्या क्षोभाला बापूंनी आपल्या नेहमीच्या  संयमित उत्तरांनी शांत करताना ‘ वाणीतून विवेक हरवला तर ती हिंसाच ठरते ‘ हे सांगितले आहे.

अशी ही आगळीवेगळी दीर्घ कविता म्हणजे सध्याच्या सरकारी प्रणालीला दाखविलेला एक आरसाच आहे. गांधी-प्रेमींना ‘ बापू तुम्ही ग्रेटच ‘ हे पुस्तक वाचून एक वेगळी अनुभूती मिळणार हे नक्की.

परिचय : सुश्री आशा धनाले,

मो ९८६०४५३५९९

प्रस्तुती : सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ विचारवंतांचे अंतर्मन – लेखक : श्री पुरुषोत्तम सदाफुले ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ विचारवंतांचे अंतर्मन – लेखक : श्री पुरुषोत्तम सदाफुले ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆ 

पुस्तक : विचारवंतांचे अंतर्मन 

लेखक : श्री पुरुषोत्तम सदाफुले 

प्रकाशक : संवेदना प्रकाशन 

पृष्ठे १४३

मूल्य रु १८०/- मात्र 

विचारवंतांचे अंतर्मन नाव वाचले आणि उत्सुकता वाटून पुस्तक हातात घेतले आणि खुल जा सिमसिम असे म्हणताच या पुस्तकाच्या गुहेत वेगवेगळ्या विचारवंतांच्या विचारांचा खजिना हाती लागला.

अतिशय वेगळ्या विषयाचे हे पुस्तक मला वाटते अशा प्रकारचे हे एकमेव पुस्तक असावे.

पुस्तकाच्या शेवटी लेखक पुरुषोत्तम सदाफुले यांच्यावरील तीन लेखांचा समावेश आहे त्यावरून लेखकाचा विस्तृत परिचय घडतो आणि मग लक्षात येते, लेखक असंख्य व्यक्तींना पुरस्कृत करीत असतात. अशा प्रसंगांच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे, अध्यक्ष यांच्या भाषणातून असंख्य मौलिक रत्ने लेखकाने वेचली आहेत आणि नुसती रत्ने वेचलीच नाहीत तर त्याला आपल्या शब्दांचे आपल्याही विचारांचे कोंदण देऊन ते अधिक आकर्षक केले आहे.

सर्वसाधारणपणे भाषणे कार्यक्रमात ऐकून तेथेच सोडून दिली जातात किंवा सभागृहाच्या बाहेर आल्यावर भाषणातील एकही शब्द आठवला जात नाही. परंतु लेखक हे स्वतः पण एक विचारवंत असल्याने अशा अनेक व्यक्तींच्या व्याख्यानातून या शब्दसागरावर आरूढ होऊन त्या लाटेच्या माध्यमातून विचारवंतांच्या काळजात शिरून तेथून ही मौलिक रत्ने गोळा करून या रत्नाचा सुंदर हार शारदामातेच्या गळ्यात घालताना असंख्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनेल अशा विचारांचे मंथन केले आहे.

अर्थातच मंथन म्हटले की उलट सुलट क्रिया होणार त्यातून नवनीत मिळणार किंवा रत्ने हाती लागणार हे सत्य आहे…… मग अशाच मंथनातून लेखकाला तब्बल ८० रत्ने हाती लागलेली आहेत. किंबहुना असंख्य रत्ने हाती लागलेली असताना त्यातील निवडक ८० रत्ने उजेडात आणली आहेत.

अर्थातच ८० आकड्यावरून सहस्रचंद्र दर्शन आठवले आणि खरोखर सहस्र चंद्राचे तेज एकत्र होईल एवढे प्रखर ज्ञान या मौलिक विचारांनी आपल्याला मिळते.

आपण जेवढे या पुस्तकाच्या अंतरंगात जाऊ तेवढे त्यातील वैशिष्टय त्याचे वेगळेपण आणि त्यातील मौलिकता मनाला भावते. हे पुस्तक वाचून हातावेगळे करावे असे नाही तर पुन्हा पुन्हा पारायण करून त्यातील एका एका विचारावर चिंतन करावे असे आहे. अर्थातच एका वाक्यात सांगायचे झाले तर छोटा पॅकेट बडा धमाका असे हे पुस्तक आहे.

अजून एक वेगळा विचार मनात आला, तो म्हणजे या पुस्तकाचा आकार चौकोनी आहे आणि मनात आले विचारवंतांच्या विचारांना एक चौकट प्राप्त करून द्यायचा हा प्रयत्न आहे.

खरेच आहे यातून ज्येष्ठ विचारवंतांचे विचार अधोरेखित तर होतातच पण त्याच विचाराच्या मथळ्यामधून त्याचे असामान्य असे महत्व पण उधृत होते.

गदीमांच्या विचारापासून सुरुवात होऊन उत्तम कांबळे यांच्या विचारसरणी पर्यंत ८० डब्यांची ही रेलगाडी असंख्य स्टेशने, असंख्य बौद्धिक खाऊ, असंख्य सौंदर्यस्थळें यांचे दर्शन घडवून आपला ज्ञानाचा प्रवास अतिशय आनंददायी, माहितीपूर्ण करते. कधीच संपू नये असे वाटणारा हा प्रवास मग शटल होऊन राहील अशी खात्री वाटते.

या पुस्तकाबद्दल लिहिताना दर खेपेला एक वेगळाच पैलू गवसतो. त्यामुळे नक्की कोणत्या पैलूवर व्यक्त व्हावे हा प्रश्न तसाच रहातो, म्हणून उत्तर स्वरूपात आपणच हे पुस्तक घेऊन वाचून बघावे आणि स्वतः अनुभवावे. या दिव्य रत्नाचे दर्शन स्वतः घेऊन खात्री करावी अशी आशा वाटते.

ते तुम्ही करालच ही खात्री पण वाटते.

तर मग… चला…

या विचारवंतांचे अंतर्मन जाणून घेऊ या…

परिचय : वर्षा बालगोपाल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “इये मराठीचिये नगरी” – लेखक : डॉ सदानंद मोरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इये मराठीचिये नगरी” – लेखक : डॉ सदानंद मोरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  इये मराठीचिये नगरी 

लेखक: डॉ सदानंद मोरे

पृष्ठ : २२७ 

मूल्य : रु. २९९ /-

…. (अभिजात भाषा असा दर्जा मिळालेल्या आपल्या महान मराठी भाषेचा घेतलेला हा सर्वांगीण आढावा!) 

मराठी भाषेचा उगम ते भाषाधिष्ठित महाराष्ट्र राज्याची निर्मिती अशी मराठी भाषेचा इतिहास – भूगोल उलगडणारी ही कूळकथा. भाषा म्हणजे एका विशिष्ट जनसमूहाचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास नसतो; तर तो राजकीय सत्ताकांक्षेचा आणि सामर्थ्याचाही इतिहास असतो. समृद्ध आणि प्रसरणशील भाषा असणारा समाज नवनवीन आव्हाने स्वीकारू शकतो आणि राजकीय सामर्थ्य मिळवू शकतो, हे सिद्ध करणारे पुस्तक. या पुस्तकाचे भाषिक विचारांच्या अंगाने असलेले महत्त्व विशद करणारे डॉ. रूपाली शिंदे यांचे प्रास्ताविक, तर राजकीय विचारप्रणालीच्या दृष्टिकोनातून महत्त्व विशद करणारी डॉ. प्रकाश पवार यांचे प्रस्तावनापर विश्लेषक टिपण “मराठीचिये नागरी”च्या संदर्भमूल्यात भर घालते.

मराठीच्या नगरीच्या विस्ताराचा एक वेगळाच मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. तो देश-धर्मांच्या सीमा ओलांडून विश्‍वाला गवसणी घालणारा आहे. हा मार्ग ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाच्या समारोपाच्या भागातल्या पसायदानात आढळून येतो. एका स्थानिक संप्रदायासाठी स्थानिकांच्या बोलीत असे विचार व्यक्त व्हावेत, हे एक आश्‍चर्य आहे. अर्थात त्यात त्या बोलीच्या सामर्थ्याचाही वाटा आहेच. पूर्वीच्या काळी धार्मिक ग्रंथाच्या अखेरीस त्या ग्रंथाच्या वाचनानं श्रोत्यांना काय मिळेल, याचा उल्लेख असे. त्याला त्या ग्रंथाची ‘फलश्रुती’ असं म्हणत. ज्ञानेश्‍वरीच्या अखेरीस अशी ‘फलश्रुती’ सांगण्याऐवजी ज्ञानेश्‍वरांनी ‘पसायदान’ मागणं पसंत केलं.

‘मराठीचिये नगरी’ हा ज्ञानेश्‍वरीमधला शब्दप्रयोग रूपकात्मक असून, ‘मराठी भाषा हीच एक नगरी आहे, ’ असं रूपक ज्ञानेश्‍वरांनी करून त्या नगरीतला व्यवहार म्हणजेच भाषिक व्यवहार कसा असावा, यासंबंधी श्रीगुरूला प्रार्थना केली आहे.

ज्ञानोबामाउलींची ही ‘रूपकाची कुसरी’ पुढं नेत तिची भौगोलिक, सामाजिक व प्रसंगी राजकीय व्याप्ती पाहिली तर ‘मराठीच्या नगरी’चा अर्थ ‘मराठी भाषा बोलणाऱ्यांचा देश’ असा होतो. हा देश म्हणजे अर्थातच ‘महाराष्ट्र या नावानं ओळखला जाणारा देश’ हे वेगळं सांगायला नको. याच देशात राहावं, असा उपदेश ज्ञानेश्‍वरांचे भाषिक-पूर्वसुरी चक्रधरस्वामी यांनी आपल्या अनुयायांना केल्याचं आपण जाणतो. चक्रधरांच्या मते महाराष्ट्र ही धर्मभूमी आहे. या भूमीत केलेल्या धर्मकृत्यांचं फळ लवकर मिळतं. ती सात्त्विक भूमी आहे. तिथली माणसंच काय; परंतु झाडं-झुडपं आणि पाषाणसुद्धा सात्त्विक आहेत.

चक्रधरांच्याही पूर्वी आठव्या- नवव्या शतकांच्या संधिकाळावर होऊन गेलेल्या कोऊहल या कवीनं ‘लीलावई’ हे खंडकाव्य ‘महरठ्ठदेसी भासा’मध्ये म्हणजेच महाराष्ट्री प्राकृतात लिहितो. या काव्यात सातवाहन राजा हाल आणि सिंहलद्वीपाची राजकन्या लीलावती यांच्या प्रणयाची आणि विवाहाची कथा सांगितली आहे. महाराष्ट्रभूमीचं वर्णन करताना कोऊहल म्हणतो ः ‘पृथ्वीला भूषणभूत असलेल्या या प्रदेशात धन-धान्यसमृद्धीमुळं शेतकरी संतुष्ट असतात. या महाराष्ट्रात नित्य कृतयुग असतं. ही भूमी म्हणजे धर्माचा आधार आहे. इथली सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची शाळाच आहे, ही सृष्टी पाहूनच तो आपली सृष्टिरचना करतो. हा देश सुखसमूहांचं जन्मस्थान होय. सद्गुणांचं सुक्षेत्र होय. इथलं कोवळं गवत खाऊन गोधन पुष्ट झालेलं असतं व त्याच्या हंबरण्यामुळं दिशा निनादून गेलेल्या असतात. इथं सर्वत्र जलविहार करण्याजोगी तळी आहेत. या भूमीत कळिकाळ येतच नाही. इथं पाप कुणी पाहिलेलं नाही. शत्रूचा पराक्रम इथं कुणाला दिसतच नाही. ’

कोऊहलाच्या या वर्णनाचं जणू सारच असलेल्या ‘महंत राष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र, महाराष्ट्र निर्दोष आन्‌ सगुण, धर्म सिद्धी जाये ते महाराष्ट्र’ या महानुभावीय वचनाशी हे वर्णन ताडून पाहिलं तर माझा मुद्दा सहज पटावा.

कोऊहलानं आपल्या काव्यात पैठणचं वर्णन केलं आहे. (राजशेखर तर पैठणला ‘महाराष्ट्रदेशावतंस’ म्हणतो); पण महाराष्ट्रभूमीच्या भौगोलिक व्याप्तीची माहिती हवी असेल तर महानुभावांकडंच जावं लागतं.

महाराष्ट्राला तेव्हा ‘महाराष्ट्रमंडळ’ असंही म्हणत असल्याची कल्पना ज्ञानेश्‍वरीमधून येते; पण या मंडळाचेही खंड अथवा भाग असल्याचं ‘आचारबंद’ या ग्रंथावरून समजतं. ‘देश म्हणजे खंडमंडळ। जैसे फलेठाणापासौनि दक्षिणसि मऱ्हाटी भाषा जितुला ठायी वर्ते ते एक मंडळ। तयासी उत्तरे बालाघाटाचा सेवट असे ऐसे एक खंडमंडळ। मग उभय गंगातीर (= गोदातीर) तेही एक खंडमंडळ। आन्‌ तयापासोनि मेघंकर घाट ते एक खंडमंडळ। तयापासोनि वराड ते एक खंडमंडळ। परी अवघे मिळौनि महाराष्ट्र बोलिजे। किंचित भाषेचा पालट भणौनि खंडमंडळे जाणावी।’’

हा स्पष्टपणे महाराष्ट्राचा भाषिक भूगोल आहे. एकच मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रमंडळाचे वेगवेगळे भाग कसे करायचे, तर मराठी भाषेतल्या अंतर्गत भेदांवरून; पण हे भाग व भेद गौण आहेत. त्यांच्यामुळं मराठी भाषेच्या एकजिनसीपणाला काही बाध येत नाही.

एकीकडं महाराष्ट्रातल्या वास्तव्यावर व मराठी भाषेच्या वापरावर भर देणाऱ्या चक्रधरांवर उत्तरायुष्यात आळ-किटाळांना सामोरं जावं लागून ‘उत्तरापंथे गमन’ करण्याची वेळ आली. आपला हा निश्‍चय अनुयायांना सांगताना त्यांनी आपल्या पुढच्या आयुष्यक्रमाची रूपरेषाही स्पष्ट केली; त्यानुसार ते म्लेंच्छांमध्ये वावरणार होते. म्लेंच्छांच्या बाजा-सुपत्यांवर निजणार होते. आणखी स्पष्टपणे सांगायची गरज नव्हती; पण त्याचा अर्थ असा होतो, की ते म्लेंच्छांना उपदेश करणार होते.

स्वामींच्या विरहाच्या कल्पनेनं त्यांचे अनुयायी व्याकुळ आणि अस्वस्थ होणं स्वाभाविकच होतं. आपली नाराजी ते लपवू शकले नाहीत. त्यावर स्वामींनी ‘त्यांना (म्लेंच्छांना) तारणारा देव वेगळा आहे का, ’ अशा अर्थाचा सवाल करून – त्यांना कोण तारणार – असं विचारत आपल्या प्रस्थानाचा उद्देश स्पष्ट केला. याचा अर्थ असाही घेता येईल, की यादवांच्या राजवटीत होणाऱ्या छळाचं निमित्त करून स्वामींनी उत्तरेकडं प्रस्थान ठेवलं. उत्तरेत तेव्हा मुस्लिम शासकांचं राज्य होतं, म्हणजेच म्लेंच्छांचा शिरकाव झाला होता. चक्रधरांना व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांचाही उद्धार करायचा होता. काही वर्षांनी संत नामदेवही उत्तरेकडच्या लोकांना धर्म सांगून त्यांचा उद्धार करायला असंच प्रस्थान ठेवणार होते.

दुर्दैवानं चक्रधरांच्या उत्तरेकडच्या वास्तव्याचे, म्लेंच्छांमध्ये वावरण्याचं व त्यांना उपदेश करून त्यांचा उद्धार करण्याच्या कार्याचे तपशील उपलब्ध नाहीत. या क्षेत्रात संशोधन करण्यास वाव आहे.

मात्र, प्रश्‍न असा उपस्थित होतो, की स्वामी म्लेंच्छांमध्ये वावरत त्यांचा उद्धार करण्यासाठी कोणत्या भाषेचा अवलंब करणार होते? ती भाषा मराठी असणं तर शक्‍यच नव्हतं. अर्थात मुळात गुजरातीभाषक असलेल्या ज्या स्वामींनी मराठी भाषा जशी सहजगत्या आत्मसात केली, तशी दुसरी कोणतीही भाषा आत्मसात करून तिच्यावर प्रभुत्व संपादन करणं त्यांना मुळीच अवघड नव्हतं.

ते काहीही असो…चक्रधरांनी आपला धर्म व आपलं तत्त्वज्ञान मुळात मराठी भाषेतूनच सांगितलं असल्यामुळं त्यांनी त्यानंतर सांगितलेले विचार हे मराठीच्या नगरीचाच विस्तार ठरणार होते; मग ते त्यांनी कोणत्याही भाषेत सांगितलेले असोत.

ज्ञानेश्‍वरांचा वारकरी संप्रदाय हा ऐतिहासिकदृष्ट्या चक्रधर, चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू यांच्या महानुभव पंथाच्या अगोदरपासून अस्तित्वात होता. विठ्ठल हे दैवत आणि वारी ही उपासनापद्धती या रूपात त्याचं अस्तित्व होतं. शिवाय, ‘विठ्ठल हे द्वारकेहून पंढरीत झालेलं श्रीकृष्णाचं अवतरण’ हे समीकरणही सर्वत्र रूढ होतं; त्यामुळं कृष्णानं सांगितलेली गीता हा त्याचा प्रमाणग्रंथही ठरत होताच. तथापि, तो संस्कृत भाषेत असल्यामुळं स्त्री-शूद्रांना अगम्य होता. ज्ञानेश्‍वरांनी गीतेचा अर्थ मराठीत सांगितला, तोच ‘ज्ञानेश्‍वरी. ’ मराठमोळ्या विठ्ठल या दैवताशी सुसंगत असा मराठी भाषेतला हा ग्रंथ मराठीच्या नगरीतल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या लोकांनी शिरोधार्य मानला यात काहीच आश्‍चर्य नाही. वारकरी संप्रदायासाठी तर तो प्रमाणभूत ग्रंथ ठरला. त्यामुळं या संप्रदायाला परिपूर्ण धर्माची प्रतिष्ठा प्राप्त होऊन त्याचा ऐतिहासिक काळ सुरू झाला. यापूर्वीचा त्याचा इतिहास म्हणजे त्याची Prehistory होय.

महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांमध्ये आचार आणि विचार यांच्या स्तरावर काही भेद जरूर आहेत. तथापि, दोन्ही संप्रदाय भक्तिसंप्रदायच आहेत. श्रीकृष्ण हे दैवत दोघांनाही मान्य आहे आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेचा अभिमानपूर्वक वापर करण्याविषयीही त्यांचं मतैक्‍य आहे. भेदांची चर्चा करायचं हे स्थळ नाही.

चक्रधरांप्रमाणेच काही वर्षांनी वारकरी पंथाचे अध्वर्यू नामदेव यांनीही उत्तरापंथ पत्करून म्लेंच्छांच्या देशात म्हणजे पंजाबात वास्तव्य केल्याचा उल्लेख याआधीच केला आहे. अर्थात तोपर्यंत म्लेंच्छांचं राज्यच महाराष्ट्रापर्यंत पोचलं होतं, तरीही त्याचं केंद्र दिल्लीची सुलतानशाही म्हणजे उत्तरच होतं. महाराष्ट्रात बहामनींची स्वतंत्र सत्ता स्थापन होईपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिली.

याचा सामाजिक अर्थ असाही घेता येईल, की नव्या सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीला समर्थपणे सामोरं जाता यावं, यासाठी या दोन्ही महापुरुषांनी आपापल्या उत्तरायुष्यात उत्तर हिंदुस्थानात वास्तव्य केलं. या वास्तव्यकाळात नामदेवांनी काय केलं, याचा पुरावा शीखधर्मीयांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या प्रमाणग्रंथातून, तसंच उत्तरेत नामदेवांविषयी रूढ असलेल्या आख्यायिकांमधून उपलब्ध होऊ शकतो. एकाच वाक्‍यात सांगायचं झाल्यास, संत नामदेव हे उत्तरेतल्या संतपरंपरेचे प्रवर्तक होत.

अगोदरच स्पष्ट केल्यानुसार, चक्रधरांच्या याच प्रकारच्या कार्याविषयी इतिहास मौन बाळगून आहे. त्यादृष्टीनं कुणी विचार केला नाही व त्या दिशेनं कुणी संशोधनही केलं नाही; पण तरीही हा सर्व प्रकार मराठीच्या नगरीचा धार्मिक-सांस्कृतिक विस्तार होता, असं आपण निःसंशयपणे म्हणू शकतो.

इथं आणखीही एका मुद्द्याचा उल्लेख करायला हवा. चक्रधरांनी ‘उत्तरापंथे गमन’ केल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न न करता स्वस्थ बसणं हे त्यांच्या पंथीयांसाठी शक्‍यच नव्हतं. स्वामींचा शोध घेत काही साहसी महानुभाव उत्तरेकडं गेले. माग काढत काढत ते थेट काबूलपर्यंत पोचले. तिकडं त्यांनी मठ स्थापून धर्मप्रसार केला आणि महत्त्वाची बाब म्हणजे, त्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा वापर केला. अठराव्या शतकात मराठा सैन्यानं आपले झेंडे अटकेपार नेण्याच्या काही शतकं अगोदर महानुभावांचा धर्मध्वज अटकेपार पोचला होता! हा तर मराठीचा शब्दशः विस्तार होय.

इकडं महाराष्ट्रात काय घडत होतं, याचाही विचार करायला हवा. काही कारणांमुळं महानुभावांनी मराठी भाषेतलं आपलं ग्रंथभांडार सांकेतिक लिप्यांच्या कड्याकुलपांत बंदिस्त करून ठेवल्यानं पंथाबाहेरच्या बहुसंख्य लोकांसाठी ते अज्ञातच राहिलं; त्यामुळं मराठी भाषेच्या स्वाभाविक विकासाच्या काही वाटा आपोआप बंद झाल्या. वारकऱ्यांनी आपलं साहित्य सार्वत्रिक केल्यामुळं मराठी टिकली, तिचा विकासही होत राहिला. या साहित्यातल्या सामाजिक मूल्यांच्या प्रभावातून मराठीच्या नगरीच्या लुप्त झालेल्या राजकीय सत्तेच्या अंगाची पुनःस्थापना छत्रपती शिवरायांना करता आली. या सत्तेचा विस्तार शिवरायांच्या काळात दक्षिणेत होऊ लागला. अठराव्या शतकात तो उत्तरेकडं व पूर्वेकडंही झाली. या विस्तारामुळंच अफगाणी सत्तेची शक्‍यता कायमची संपुष्टात आली आणि ब्रिटिशांची सत्ता शे-पाऊणशे वर्षं लांबणीवर पडली. या नव्या सत्तेच्या म्हणजेच पारतंत्र्याच्या काळातही मराठीच्या नगरीतली माणसं स्वस्थ बसली नव्हती. महात्मा जोतीराव फुले यांनी सामाजिक विद्रोहाची आणि लोकमान्य टिळक यांनी राजकीय असंतोषाची भाषा घडवली.

मराठी भाषा ही अशा प्रकारे प्रसरणक्षम भाषा आहे. ती बोलणारे लोकसुद्धा तसेच असण्याचा निर्वाळा राजारामशास्त्री भागवत यांनी दिला होता व त्यांच्याकडून तशी अपेक्षा बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी व्यक्त केली होती; पण प्रसरणशीलतेचा अर्थ आक्रमण किंवा राजकीय सत्ता असा घ्यायचं कारण नाही. ‘जो पंजाब जिंकणं ॲलेक्‍झांडरला शक्‍य झालं नव्हतं, तो नामदेवांनी प्रेमानं जिंकला’ असं विनोबा म्हणतात, त्याची इथं आठवण होते. ‘अठराव्या शतकात मराठ्यांनी हिंदुस्थान जिंकून घेतला होता, तसं आजच्या काळात करणं शक्‍य होणार नाही; पण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहून त्यासाठी हवे तितके क्‍लेश सहन करावेत, ’ असं टिळक यांनी म्हटलं होतं. हासुद्धा जिंकण्याचाच एक प्रकार मानता येईल.

मराठीच्या नगरीच्या विस्ताराचा एक वेगळाच मार्ग ज्ञानेश्‍वरांनी सांगितलेला आहे. तो देश-धर्मांच्या सीमा ओलांडून विश्‍वाला गवसणी घालणारा आहे. हा मार्ग ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाच्या समारोपाच्या भागातल्या पसायदानात आढळून येतो. एका स्थानिक संप्रदायासाठी स्थानिकांच्या बोलीत असे विचार व्यक्त व्हावेत, हे एक आश्‍चर्य आहे. अर्थात त्यात त्या बोलीच्या सामर्थ्याचाही वाटा आहेच.

पूर्वीच्या काळी धार्मिक ग्रंथाच्या अखेरीस त्या ग्रंथाच्या वाचनानं श्रोत्यांना काय मिळेल, याचा उल्लेख असे. त्याला त्या ग्रंथाची ‘फलश्रुती’ असं म्हणत. ज्ञानेश्‍वरीच्या अखेरीस अशी ‘फलश्रुती’ सांगण्याऐवजी ज्ञानेश्‍वरांनी ‘पसायदान’ मागणं पसंत केलं.

पसायदानाची काही चर्चा यापूर्वीच येऊन गेलेली असल्यामुळं तिची पुनरावृत्ती करायची गरज नाही. पसायदान ही एक प्रार्थना आहे; पण याचा अर्थ तिचा उच्चार हे एक प्रकारचं कर्मकांड बनावं, असा होता कामा नये. पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानेश्‍वरांनी एका आदर्श समाजाचं स्वप्नचित्र पाहिलं आहे. अशा स्वप्नचित्राला इंग्लिश भाषेत Utopia असं म्हणतात.

असं स्वप्नचित्र वास्तवात यावं यासाठी ईश्‍वरी सत्तेचं पाठबळ हवं म्हणून प्रार्थना करायला हरकत नाही. तथापि, हे सगळं ईश्‍वरावर सोपवून आपण स्वस्थ बसणंही उचित नाही. तो जबाबदारी टाळण्याचा प्रकार ठरेल. विशेषतः ज्या मराठी भाषेत हे स्वप्नचित्र रेखाटलं गेलं आहे, ती भाषा बोलणाऱ्यांची ही जबाबदारी आहे आणि त्यातही ज्ञानेश्‍वरांच्या संप्रदायाचं अनुयायित्व सांगणाऱ्यांची तर ती अधिकच आहे.

अशा प्रकारच्या परिवर्तनासाठी राजकीय सत्तेची जितकी आवश्‍यकता असते, तितकी सत्ता संपादून तसा प्रयत्न करण्यात काही विसंगती नाही. ‘‘महाराष्ट्रात स्वाभिमानी स्वत्वावर आधारित समाज चालता-बोलता झाला पाहिजे, ’’ असं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. तेव्हा त्यांच्यासमोर ज्ञानेश्‍वरांच्या पसायदानात सापडलेली नीलप्रत असणार हे उघड आहे. ‘स्वत्वाकडून सर्वत्वाकडं’ असा हा प्रवास आहे. महाराष्ट्र हा त्यातला एक टप्पा होय.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “एक नवी सकाळ”(अनुवादित कथासंग्रह) – अनुवादिका : सौ उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “एक नवी सकाळ”(अनुवादित कथासंग्रह) – अनुवादिका : सौ उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆ 

 “ एक नवी सकाळ “ (अनुवादित कथासंग्रह ) अनुवादिका : उज्ज्वला केळकर परिचय : मंजिरी येडूरकर 

पुस्तक : एक नवी सकाळ – ( अनुवादित कथासंग्रह ) 

अनुवादक : उज्ज्वला केळकर 

प्रकाशक : नवदुर्गा प्रकाशन 

पृष्ठे : 176 

किंमत : रु. 390/-

हा कथासंग्रह म्हणजे हिंदीमधील निरनिराळ्या लेखकांच्या हिंदी कथांचा मराठीत केलेला अनुवाद आहे.

कथासंग्रहाला त्यांनी पहिल्या कथेचेच नाव दिले आहे. मुखपृष्ठावरही या कथेशी निगडित चित्र आहे. एक दिवस मुलगी आपल्या सावत्र आईला ‘आई’ म्हणून स्विकारते आणि दोघींच्या आयुष्यात एक नवी सकाळी येते, अशी कल्पना रंगवली आहे. त्या दोघींचा भावनिक प्रवास दाखविण्यासाठी मुखपृष्ठावर आईचा हात धरून चाललेली मुलगी दाखवली आहे. ही पहिलीच कथा सूर पकडते, व मग पुढे आपण त्या सप्तसुरांच्या गुंत्यात कसे अडकतो आणि भैरवी कधी येते कळतच नाही.

अनुवाद कसा असावा याबाबत खूपच मतभेद आहे. काहींच्या मते अनुवाद म्हणजे शब्दशः भाषांतरअसावे. म्हणजे मूळ लेखकच कथेमध्ये दिसला पाहिजे. काहींच्या मते कथेच्या गाभ्याला हात न लावता काही शब्द बदलण्याचे स्वातंत्र्य लेखकाला असावे. कारण त्या त्या भाषातले मनाला भिडणारे शब्द वेगवेगळे असू शकतात. त्याला मग अनुवाद किंवा भावानुवाद असं म्हणतात. काहींच्या मते मूळ लेखनाच्या भाषेतील शब्द जर अनुवाद करायच्या भाषेतही रूढ किंवा प्रचलित असते तर तसेच ठेवण्यास हरकत नसते. मूळ कथेमधील पर्यावरण, कथा ज्या काळात घडते तो काळ, तिथल्या प्रथा परंपरा या जर महत्त्वाच्या असतील तर त्या जशाच्या तशा अनुवादामध्ये असाव्यात.

उज्ज्वला केळकर यांचा अनुवाद कुठेही एकटाकी झालेला नाही. कथेला साजेसा असा योग्य तो प्रकारच त्यांनी अवलंबिला आहे. जेणेकरून कथा वाचकाच्या मनाला भिडेल. कांही कथा मराठी वातावरणात आणल्यामुळे मनाला भावतात. त्या कथातून आपल्याला उज्वलाताईच दिसतात. कधी भोंवतालची परिस्थिती, संस्कृती परंपरा तशाच ठेवल्यामुळे कथा पूर्णपणे त्या समाजाची त्या लेखकाची वाटते. तर कधी त्यातील माणसांची नावे, गावांची नावे, त्यांच्या बोली भाषेतील काही वाक्ये, सगळं तसंच ठेवल्यामुळे डोळ्यासमोर तो परिसर, ती माणसे जशीच्या तशी येतात व भावना खोलवर परिणाम करतात.

‘त्या दिवशी असं झालं ‘ या कथेत अतिरेक्यांशी झुंजताना घायाळ झालेला मेजर, आता वेदनांशी दोन हात करतानाही त्याचा मिस्कील स्वभाव मात्र सोडत नाही. चकमकीत तो जेव्हा घायाळ होतो व आपल्या जिवाचा भरोसा नाही हे त्याच्या लक्षात येतं, त्यावेळी त्याने प्रथम काय केलं असावं? नाही, मी सांगणार नाही, त्यासाठी कथाच वाचायला हवी. ‘त्याचं पाहिलं उड्डाण ‘ या कथेत चिमुकला पक्षी पहिल्यांदा घरट्याबाहेर उडण्यासाठी कसा झुंजतो याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. आपल्या डोळ्यासमोर त्या पक्ष्याचं कुटुंब व त्यांचे कातर भाव जिवंत होतात. ‘शह आणि मात’ या कथेत कामगारांचे आंदोलन, ते चिरडणारे मालक, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खेळी आणि मग उजाड झालेलं कामगारांचे भविष्य!

‘असंही घडतं’ या कथेमध्ये एक वर्ष, पत्र उशिरा मिळाल्यामुळे झालेला गोंधळ, मनस्ताप तर आहेच पण मुलगा- मुलगी यांच्यात जन्मापासून केल्या जाणाऱ्या भेदभावाला वाचा फोडली आहे. ‘वाटणी’ या कथेत आपण आईचा मोठा मुलगा असल्यामुळे आपल्याला आईचे मिळालेले प्रेम, आशीर्वाद हे इतर भावांपेक्षा जास्त आहेत, मग ज्या घरात आई नाही अशा घरात वाटणी कशाला हवी? असा विचार करणारा मुलगा आणि त्याच्या भावनांचं कथन आहे. ‘सुंदर वनातली अनोखी कथा’ ही तर फार सुंदर कथा आहे आदिवासी जंगलात राहणाऱ्या लोकांचे जीवन तर सुंदर उभं केलं आहे पण ती माणसं आणि जंगलातले प्राणी यांच्यातलं नातं स्पष्ट करणारी एक हृदयद्रावक कथा आहे. या कथेत लेखिकेने परिसर, लोकांची राहणी, भाषा याला महत्त्व असल्याने तो मूळ बाज बदललेला नाही. त्यांच्या बोलण्यातला हिंदी लहेजा सुद्धा काही ठिकाणी तसाच ठेवला आहे. त्यामुळे कथा आपल्या डोळ्यासमोर घडते आहे असं वाटतं. ‘नाही कुठे ठिकाणा’ ही कथा तर मेंदू बधिर करणारी आहे. नात्यातला फोलपणा मन सुन्न करून टाकतो. ‘रिसायकल बीन मध्ये मल्लिका ‘ ही कथा मला तरी नावावरून विनोदी असणार असंच वाटलं होतं, पण तशी नाही. मुलाला त्याचं प्रेम मिळावं म्हणून हळवी होणारी आई, त्यासाठी योग्य निर्णय घेण्याचे धाडस करणारी आणि मुलालाही धाडस देणारी आई बघितल्यावर आपला ही ऊर अभिमानानं भरून येतो. आता ही मल्लिका रिसायकल बिनमध्ये कशी व कां गेली, हे कथा वाचल्याशिवाय कळणार नाही.

या सगळ्या कथा निरनिराळ्या भावना, नातेसंबंध, व्यवहार यांची जाणीव करून देतात व त्यावर विचार करायला भाग पाडतात.

उज्ज्वला ताईंनी निवडलेल्या कथात काही भयकथा किंवा रहस्य कथाही आहेत. ‘अज्ञात ग्रहाचे रहस्य’ या कथेत अंतराळयानाच्या अपघातामुळे सगळे अंतराळवीर मृत्युमुखी पडतात, काही कालावधीनंतर त्या अंतराळयानाचे काही अवशेष सापडतात का हे पाहण्यासाठी एक अंतराळयान अवकाशात पाठवले जाते. त्यावेळी त्या अंतराळ वीरांना एक आनंदाची गोष्ट कळते व एक दुःखाची! त्या मीच सांगितल्या तर वाचतानाची उत्सुकता कशी राहील बरं! ‘तो परत आला होता या कथेमध्ये एका माणसाच्या हातून भिकाऱ्याचा नकळत खून होतो. पण त्यानंतर त्या भिकाऱ्याला त्याने दिलेली वागणूक ही मात्र माणुसकीला काळीमा फासणारी आहे. चिडलेला भिकारी नंतर त्या माणसाचा कसा बदला घेतो ते कथेतच वाचण्यात गंमत आहे. ‘आरसा ‘ही एक अशीच चित्त थरारक कथा आहे या कथेत अंधारात माणूस घाबरला की त्याला भास कसे होतात व भिती कशी वाढत जाते याचं वर्णन आहे. या कथेचा शेवट मात्र अफलातून आहे. एकदा भुवया उंचावल्या आणि तोंडाचा ‘आ’ वासला की लवकर मिटतच नाही.

या संग्रहात कांही विनोदी अंगानं जाणाऱ्या ही कथा आहेत. ‘चार शिशूंची कथा’ व ‘विक्रम वेताळ या कथा वाचल्या की मन हलकं फुलकं होतं. आणि लेखकाला हे विषय सुचलेच कसे असतील याचं कौतुक वाटतं. तशीच आणखी एक हलकीफुलकी कथा म्हणजे ‘गंगेत घोडं न्हालं ‘. लग्नापूर्वी मुलगा, मुलगी एकमेकांच्या आवडी – निवडी जाणून घेण्यासाठी एकमेकांना भेटतात. त्या जर जुळल्या तर लग्नाला होकार देतात. पण एकमेकाचे दोष, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी यांचा विचारच करत नाहीत. अशी लग्ने मग अल्पायुषी ठरतात. यावर वाचकाला विचार करायला प्रवृत्त करणारी कथा आहे. या कथेचं मूळ नाव आहे ‘तुम्हारी भी जय, हमारी भी जय’. पण कथा वाचल्यावर लक्षात येईल की याचं मराठीत भाषांतर न करता उज्वला ताईंनी ‘गंगेत घोडं न्हालं’ हा किती अर्थपूर्ण वाक्प्रचार वापरला आहे. त्यामुळे ही कथा मराठी माणसाला आपल्याच घरात घडते आहे असं वाटल्यावाचून रहात नाही. ‘खंधाडिया ‘ हे आदिवासी भागातल्या एका प्रथेचं नाव आहे. याला मराठीमध्ये योग्य शब्दच नसल्यामुळे लेखिकेने हेच नाव आपल्या कथेला दिले आहे. बाहेरख्याली व भ्रष्ट अधिकारी असणाऱ्या आपल्या मुलाला जातीतून बहिष्कृत करण्याची मागणी बाप करतो. बापाची सुने बद्दलची काळजी आणि मुलाबद्दलचा राग पराकोटीचा दाखवला आहे. एका भाबड्या मुलीचं खंबीर आईत होणार रूपांतर मनाला भावून जातं. तसेच खंधाडिया ठेवण्याच्या विकृत परंपरेविरुद्ध उभे राहणारी मुलगी ही समाजात होणाऱ्या चांगल्या बदलाचं प्रतीक व उद्याचं आशास्थान होते.

उज्वलाताईंच्या सगळ्याच कथा वाचकाला वाचायला खूप आवडतील अशा आहेत. माझ्या मते या कथासंग्रहातील उल्लेखनीय गोष्टी – – 

  1. कथांची निवड फार छान केली आहे.
  2. त्यात निरनिराळ्या भावभावनांचा आविष्कार वाचायला मिळतो.
  3. कथांमध्ये खूप विविधता आहे. भयकथाही आहे. विनोदी अंगाने जाणाऱ्याही कथा आहेत.
  4. शिक्षणाचा अभाव असणाऱ्या भागात चुकीच्या प्रथा परंपरा अजूनही सांभाळल्या जातात आणि त्यात भरडली जाते ती स्त्रीच ! भोगावे लागते ते स्त्रीलाच ! आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर अशा चुकीच्या प्रथांना बळी पडते ती स्त्रीच! हा एक समाजाला पोखरून काढणारा धगधगता विषय ही त्यांनी अंतर्भूत केला आहे.

इतकं सुंदर पुस्तक तर आपल्या संग्रही हवंच !

परिचय :  सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री

मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द डायरी ऑफ अ यंग गर्ल” – लेखिका :  ॲन फ्रॅन्क – अनुवाद :  सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆

सौ.अंजोर चाफेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “द डायरी ऑफ अ यंग गर्ल” – लेखिका :  ॲन फ्रॅन्क – अनुवाद :  सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆ 

पुस्तक : द डायरी ऑफ अ यंग गर्ल

लेखिका :  ॲन फ्रॅन्क

मराठी अनुवाद : सौ. मंजुषा मुळे 

प्रकाशक :  रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर. 

पृष्ठे : ३०४ 

मूल्य : रु.३७०/_

आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान क्रूरकर्मा हिटलरने, त्याच्या एका वैयक्तिक अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून असंख्य ज्यू लोकांचा अनन्वित छळ सुरु केला होता. त्यामुळे अनेक ज्यूंना अत्यंत असुरक्षित अवस्थेत भूमिगत होऊन कित्येक महिने कसंबसं जगावं लागलं होतं. फ्रँक कुटुंब हे त्यातलेच एक दुर्दैवी कुटुंब आणि ॲन ही त्या कुटुंबातली सगळ्यात लहान मुलगी — जेमतेम १३ वर्षांची…. शाळा, मित्र-मैत्रिणी, खेळ, हिंडणेफिरणे या त्या वयातल्या सगळ्या आवश्यक गरजांना मुकावं लागलेली…. पण अशाच अवस्थेत रहावं लागलेल्या इतर समवयस्क मुलींपेक्षा खूपच वेगळी असणारी….. बोलण्याची अत्यंत आवड असणाऱ्या या मुलीने त्या अज्ञातवासात मग तिला १३व्या वर्षी वाढदिवसाला मिळालेल्या डायरीला आपली मैत्रीण.. तिच्या सुखदुःखाची साथीदार बनवले. आणि ती रोज डायरी लिहायला लागली – एखाद्या मैत्रिणीशी बोलावं अशा भाषेत…. नाझींच्या तावडीत सापडू नये म्हणून १९४२ साली गुप्त घरात लपून बसलेले फ्रॅन्क कुटुंब व आणखी चार मित्र असे आठ जण, युद्ध संपेल व पुन्हा आपले जीवन सुरळीत होईल या एकाच आशेने कसे रहात होते, याचे वर्णन त्या १३ वर्षाच्या मुलीच्या शब्दात या डायरीत वाचायला मिळते.

सौ. मंजुषा मुळे

ॲनाची डायरी तिच्या सात्विक, शुद्ध मनाची साक्ष आहे. आणि म्हणूनच तिने या डायरीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. एकाच वेळी तिच्यातली एक लहान निरागस मुलगी.. आणि परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणारी….. तरीही सगळ्या परिस्थितीकडे आणि स्वतःकडेही तटस्थपणे पाहणारी ही एक वेगळीच मुलगी …. तिने केलेल्या काही नोंदी इथे सांगायलाच हव्यात अशा आहेत….. उदा.

“ आम्ही ज्यू आहोत. ज्यू लोकांवर अनेक कडक बंधने आहेत. तरी आमची आयुष्ये पुढे सरकत होती.

डॅडी म्हणाले, आपल्याला आता लपून रहावे लागेल. असे भूमिगत होताना नेमकं काय वाटतं ते मला अजून नीटसं कळत नाही. आपण स्वतःच्या घरात राहतोय असं वाटत नाही. आपण सुट्टीत रहायला आलोय असं वाटतंय. ही इमारत एका बाजूला कललेली, कोंदट, दमट आहे. तरी लपण्यासाठी सोयीची आहे. माझी बहिण मार्गारेटला खोकला झालाय. पण तिच्या खोकल्यावर बंदी म्हणून तिला कोडेइनच्या स्ट्रांग गोळ्या चघळायला दिल्यात. “ 

“ आम्ही इथे लपलो आहोत हे कुणाला कळले तर ते आम्हाला गोळी घालून ठार मारतील या विचारानेच थरकाप होतो. खालच्या गोदामातल्या लोकांना ऐकू जाईल या भीतीने दिवसासुद्धा आम्ही दबकत 

कामे करतो. ” — इतका थरार, इतका त्रास, इतकी मानहानी अनुभवत असताना झालेली ॲनाची  ही भावनांची अभिव्यक्ती चटका लावते.

ती लिहिते, ” डॅडी कुटुंबाचा इतिहास सांगतात. ते ऐकणं हा मनोरंजक अनुभव आहे. ’ इन झाॅमर झोथेइड ‘ हे विनोदी पुस्तक आठवून मला हसायला येते. ”

“ वॅनडाॅन आन्टीची सूपची प्लेट माझ्या हातून फुटली. त्या माझ्यावर इतक्या रागावल्या. मम्मीही माझ्यावर खूप रागावली. ” 

“ मोठी माणसे क्षुल्लक कारणावरून का भांडतात ?. माझी कुठलीच गोष्ट बरोबर नाही असं त्यांना का वाटतं? मला त्यांचे कठोर बोलणे, ओरडणे शांतपणे सहन करावे लागते. माझे हे सगळे अपमान मी सहन करणार नाही. सहन करायची सवय करून घेणार नाही. मीच त्यांना शिकवायला सुरवात करणार.”

“ मम्मी अतिशय चिडखोर आहे. डॅडी आणि मम्मी मार्गारेटला कधीच ओरडत नाहीत. तिला कसला जाब विचारत नाहीत. माझ्यावर मात्र प्रत्येक गोष्टीत ओरडत असतात. “

या लिखाणातून तिची बालिश निरागसता, आणि तडफ मनाला भावते.

ती सांगते … “ इथे आल्यापासून आम्ही पावट्याच्या आणि फरसबीच्या इतक्या बिया खाल्ल्यात की आता मला त्या बिया नजरेसमोर ही नकोत असं झालंय. त्या बियांच्या नुसत्या विचारानेच मला आजारी वाटायला लागतं. संध्याकाळच्या जेवणात आम्हाला ब्रेड मिळत नाही. आता माझ्याकडे बूटांची एकही जोडी शिल्लक नाही. बर्फावर चालायचे बूट आहेत पण त्याचा घरात काय उययोग? “

“ पुढच्या महिन्यात आम्हाला आमचा रेडिओही द्यावा लागणार. ज्या घरात लोक लपून राहिलेत तिथे जाणूनबुजून अधिकाऱ्यांचे रेडिओमुळे लक्ष वेधून घेणे हे धाडस कुणी करू शकणार नाही. ”

“आणि आता रेडिओवरचा कार्यक्रम अगदी नकोसा, केविलवाणा वाटतो. एका जखमी सैनिकाचे संभाषण प्रसारित झाले. ते ऐकून त्या सैनिकाची इतकी दया वाटत होती. पण त्या सैनिकांना जखमांचा अभिमान  वाटतो. एका सैनिकाला हिटलरशी हस्तांदोलन करायला मिळाले या गोष्टीने गहिवरून आले. (म्हणजे त्याचे हात शाबूत होते) काय म्हणायचं या सगळयांना.“

“जर्मनीवर भयंकर बाॅम्बहल्ले होत आहेत. मात्र वाॅनडाॅन अंकल यांना पुरेशा सिगरेटी मिळत नाहीत म्हणून ते अस्वस्थ आहेत.” 

– – अशा छोट्या छोट्या पण मन विचलित करणाऱ्या गोष्टींच्या नोंदी तिच्या डायरीत आहेत.

कधी तिच्या स्वप्नात तिची मैत्रिण लीस येते. तिचे मोठे डोळे तिला खूप आवडायचे. पण तिला लीसचा सुकलेला चेहरा आणि तिच्या डोळयातले दुःख दिसते. ‘ या नरकातून माझी सुटका कर ना ‘ असंच जणू ती सांगते….. ॲना तिला त्या डायरीतून सांगते, ” लीस, युद्ध संपेपर्यंत तू जगशील. मी पुन्हा तुझ्याशी मैत्री करीन. देवा तू तिच्या पाठीशी उभा रहा. तिचं रक्षण कर. “….

… आणि ती मनात म्हणते, ” खरं तर मलाच काही भविष्य नाही. “

ती स्वतःचेही परीक्षण करते…… “ १९४२ साली मी काही पूर्ण आनंदी नव्हते. पण शक्य झालं तेवढा आनंद मी उपभोगीत होते. एकटं पडल्यासारखं वाटायचं पण दिवसभर काही ना काही काम करत रहायचे. मला वाटणारी निरर्थकता दूर करण्यासाठी विनोद, खोड्या करत असे…. पण माझ्या आयुष्याची गंभीर बाजूही

आता सतत माझ्याबरोबर असते. रात्री अंथरुणावर पडते तेव्हा देवाला म्हणते, ” देवा, या जगात जे जे चांगलं आहे, सुंदर आहे त्या सर्वांसाठी मी तुझी आभारी आहे.”

… “मी फक्त दुःखाचा व हाल अपेष्टांचा विचार करत बसत नाही. याउलट सौंदर्य कुठे आणि कसं टिकून आहे याचा विचार करते…. कधीतरी हे भयंकर युद्ध संपेल. आम्ही पुन्हा सर्व सामान्य लोक असू…. फक्त ज्यू नाही… कुणी लादलं हे सर्व आमच्यावर. ? कुणी ठरवलं ज्यू इतरांपेक्षा वेगळे आहेत?”

“युद्ध संपल्यावर माझी पहिली इच्छा असेल की मी परत डच व्हावं. डच लोकांवर माझे प्रेम आहे. या देशावर मी खूप प्रेम करते. ही भाषा माझी आवडती आहे. जोपर्यंत माझे ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही. ”

“ मी एक स्री आहे याची मला जाणीव आहे….. अशी स्री जिच्याकडे कणखर मन आहे, भरपूर धैर्य आहे. जर देवाने मला जिवंत ठेवले तर मी प्राधान्याने धैर्य, आनंद, समाधान मिळवायला शिकले पाहिजे. “

या पुस्तकाबद्दल काय आणि किती लिहू ? यातले प्रत्येक पान झपाटून टाकते. या इतक्या छोट्या मुलीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबरोबरच त्या काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचंही सविस्तर वर्णन तिच्या वयाला अनुसरून केलेलं आहे. एखाद्या प्रौढ माणसाच्या बाबतीतही अशक्य ठरणारे विचार ही जेमतेम १३ वर्षांची मुलगी मांडते …. अतिशय तटस्थपणे स्वतःचंच परीक्षण करते …तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अत्यंत सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेली, वयाच्या मानाने खूपच विचारी, संवेदनशील आणि त्या काळात अपेक्षित नसणारा दुर्दम्य आशावाद बाळगणारी, पण अत्यंत दुर्दैवी आणि अल्पायुषी ठरलेली ॲना या डायरीतून समोर ठाकते आणि वाचकाच्या मनाला कायमचा चटका लावते.

जगातील ३१ भाषांमधे ह्या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. कारण ही अनुभूती आहे. यात काल्पनिक काहीच नाही. जे घडत होतं ते भयंकर, थरारक असूनसुद्धा एका १३ वर्षाच्या मुलीने साक्षीभावाने ते लिहिले आहे. यात तिचा निरागस निष्पापपणा आहे. तिच्या तारुण्यसुलभ भावनाही यात व्यक्त होतात.

त्याही परिस्थितीत आनंद शोधण्याची तिची वृत्ती दिसून येते.

‘ द फ्री नेदरलॅन्डस ‘ सारख्या संस्थांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून भूमिगतांना मदत केली.. त्यांच्याबद्दलची अपार कृतज्ञता तिला वाटते. तिच्या डॅडींच्या डोळयातील उदास, दुःखी भाव ती टिपते. देशासाठी मरायचीही तिची तयारी आहे. खरंच.. त्या कोवळ्या वयातही तिचे विचार खूप प्रगल्भ होते हे प्रकर्षाने जाणवते..

तिला स्वतःत झालेला बदल जाणवतो. ती म्हणते, ” स्वर्गात राहण्याचा आनंद घेणारी मी आणि या भिंतीत कोंडून शहाणी झालेली मी खूप वेगळी आहे. मी आधीच्या त्या मजेदार पण उथळ वाटणाऱ्या मुलीकडे बघते तेव्हा आताच्या ॲनाचा तिच्याशी काहीच संबंध नाही असं वाटतं. “.

ॲना, तिची आई, आणि मोठी बहीण या तिघींनाही हिटलरच्या सैनिकांनी पकडून नेले आणि नरकासमान असणाऱ्या एका छळछावणीत कोंडले.. तिघींचाही तिथेच मृत्यू झाला.  पण वडील मात्र वाचले. युद्ध संपल्यावर त्यांची सुटका झाली. ते त्यांच्या त्या गुप्त घरी गेले … सामान आवरताना त्यांना ही डायरी सापडली….. आणि ती वाचल्यावर त्यातून दिसणारे तेव्हाचे दारुण वास्तव लोकांपर्यंत पोहोचवायलाच हवे या उद्देशाने त्यांनी ही डायरी प्रकाशित केली.

या पुस्तकाचा अनुवाद करताना, ही डायरी एका जेमतेम १३ वर्षांच्या मुलीने आपले मन मोकळे करण्यासाठी लिहिलेली आहे याचे भान मंजुषाताईंनी आवर्जून राखले आहे, आणि म्हणूनच बोजड शब्द न वापरता, कुठेही अलंकारिक, क्लिष्ट भाषा न वापरता त्यांनी हा अनुवाद केला आहे. त्यामुळे हा अनुवाद जितका सहज आणि संवेदनशील आहे, तितकाच मुक्त, तरल आहे. एखाद्या बालकलाकाराने चित्र काढताना सहज रेघोट्या ओढाव्यात तसे रोज मनात आलेले विचार या डायरीत उतरले आहेत. आणि मंजुषाताईंच्या अनुवाद करण्याच्या शैलीचे हेच वैशिष्ट्य आहे की त्यांनी त्या १३ वर्षाच्या मुलीचा निरागसपणा, चैतन्यमय, प्रकाशमय उमदेपणा, तिची सूक्ष्म निरीक्षणशक्त्ती आणि तिची संवेदनशीलता आणि वयाला न साजेशी अपवादात्मक विचारक्षमता हुबेहुब टिपली आहे.

या मुलीच्या भावना.. विचार.. आणि त्यातील परिपक्वता थेटपणे वाचकाच्या अंतर्मनाला भिडेल असाच त्यांनी हा मराठी अनुवाद केला आहे 

… जोपर्यंत जगात युद्ध चालू असणार आहेत, जुलूम, अत्याचार होत राहणार आहेत, तोपर्यंत हे पुस्तक अमर आहे.

युद्ध आणि त्याचे माणसांवर होणारे सखोल परिणाम यावर नकळतपणे केले गेलेले हे भाष्य, मराठीत सहज-सोप्या भाषेत अनुवादित करून वाचकापर्यंत पोहोचवणारे हे पुस्तक आहे.

… हे पुस्तक आपण सर्वांनी जरुर वाचावे यासाठी ही तोंडओळख.

परीक्षण  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print