मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ खचू लागली भूई – सौ.नीलम माणगावे ☆ श्री अभिजीत पाटील

 ☆  पुस्तकांवर बोलू काही ☆ खचू लागली भूई – सौ.नीलम माणगावे ☆ श्री अभिजीत पाटील ☆ 

नीलम माणगावे यांचा नवा कविता संग्रह भेटीस आला त्या संग्रहावरील अल्पस टिपण आपल्या आस्वादासाठी सामाजिक, वास्तव, निसर्ग,  ऐक गंगे, नातेसंबध, ती, आणि परिवर्तन, अशा विविध विचार मंथनाच्या खोल चिंतनातून आलेल्या काव्य भावनात्मक सहज सरळ तितकाच वेधक, कुठे भेदक, तर कुठे निरामय, काहीशी  आत्मसंवादी, तर नेमके वास्तव व्यक्त करणारी कविता,सध्याच्या आघाडीच्या लेखीका, नीलम माणगावे यांच्या खचू लागली भुई या नव्या कविता संग्रहामध्ये एकसंघ समाविष्ट असलेला कविता संग्रह भेटीस आला आहे.

सौ.नीलम माणगावे

प्रज्ञा दया पवार यांची नेमकी प्रस्तावना लाभलेला हा संग्रह सुरवातीला आपले मुखपृष्ठ लक्ष वेधून घेतो,आतील कवितेस उठावदार करणारी मंडणी आणि त्यांची कविता ही वाचकांची होऊन जाते, कविता तुमच्या, आमच्या, त्यांच्या

तुम्ही पेटवता आम्ही पेटतो,

तुमच्या हातावर ओरखडासुध्दा नाही

आमचे देह काळेठिक्कर !

तळहातावर शिर घेऊन

बंदुकीच्या चापवर फुलपाखरू

जिंकू किंवा मरू,

तुम्ही त्रिशूल वाटता

आम्ही फुले वाटतो

पाहूया, जास्त जखम कुणापासून होते !

अशा वास्तववादी कवितेची सुरूवातीला भेट घडते आणि आपण विचार करायला लागतो सध्याचा भोवतालच्या परिस्थितीचा

दात पाडलेले असले,म्हणून काय झाले?

साप तो सापच ना?

किती हळूवार पणे व्यक्त होतात या ओळी

म्हणून त्याची तिव्रता कमी नाही होत त्यातील भेदकपणा  मनाला डंख करतो,

धर्मा बद्दल भाष्य करतांना

भयहीन जगण्यात

प्रत्येकाच्या मनात हिरवं रोप

जिवंत राहील,

जे दुसऱ्याला जगवील

यालाच धर्म म्हटलं तर…?

अशी सोपी पण विचार करायला लावणारी कविता नव्याने आपल्याला आपल्याकडे बघायला शिकवते

चिमण्यांना हुसकावून

कावळ्यांनी घर केले

कावळ्यांना हुसकावून मग

बगळ्यांनी

अख्खे झाडच काबीज केले !

आता…

कावळे सैरभेर

चिमण्या दीशाहीन

बगळे स्वामी !

चिमण्यांनी पुन्हा एकदा उठाव केला

बगळ्यांनी प्रतिहल्ला केला

चिवचिवाट…कलकलाट..

फडफडाट…

यातून बरेच काही सांगून जाणारी जाणीव कवीला मांडायची आहे ती तुमच्या माझ्या पर्यंत येऊन पोहचते हे नक्की मृत्यू की सुटका ही अशीच एक भेदक कविता मनात कल्लोळ निर्माण करते वेग किती वाढला हे जाणून घेण्यासाठी वेग ही कविता जग किती जवळ आले आहे याची नोंद घेते,

चला, बोनसायांच्या जगात

चेह-याच्या शोधात

आता घरातून बाहेर पडताना

विश्वास वाटत नाही

की हा रस्ता…घरापर्यंत पुन्हा सोबत करेल…

मी माझा…अभिमन्यू बनवील?

हे वास्तव तुमचं – आमचं

या बोनसायांच्या जगात जग जवळ आले,

तुम्ही आम्ही कुठे कशासाठी कुणासाठी धावतो आहोत,

त्याचा शेवट काय?

आपण किती ठेंगणे झालोत,

आभाळाला आपण हात लावू शकत नाही,

प्रत्येकाच स्वतंत्र आभाळ स्वतःपुरत ही खुजी माणसं मनाने कधी मोठी होणर सार्वभौम आपण का नाही होत?

आपला बोनसाय झालाय हे मान्य करायला हवेच

घुशींचे काय करायचे?

हे घर…घराच्या भिंती

संरक्षणाच्या आहेत,पण…

घरच्या चोरांचे काय करायचे

हे नाक…श्वास घेण्यासाठी

पण नाकात वेसण घालणाऱ्या हातांचे काय करायचे?

हा वारा…जगण्याची आस देणारा

पण त्यात लपलेल्या

जीवघेण्या वादळांचे काय करायचे?

ही झाडं,पानं,फुलं,

आभाळ… माती

रानभर पसरलेली नाती

ही सगळी आपलीच !

 पण सगळीकडे लागलेल्या

घुशींचे काय करायचे?

ही समर्पक कविता अधिक बोलूच देत नाही, हीच अवस्था घर दार गल्लीत नगरात,राज्यात देशात आणि कधीकधी मनातही याचं काय करायचे हा प्रश्न याची उत्तरे शोधायला हवीत… जो जे वांछिल तो ते लाहो…. या कवितेत आपण साफ उघडे पडतो, तर सत्ता या कवितेत सत्तेचे सारे चेहरे डोळ्यासमोर येतात

काळ्या दगडावरची रेघ

तुम्ही द्रोणाचार्य असलात,तरी आम्ही एकलव्य नाही

तुम्ही उध्वस्त केलीत आमची स्वप्ने,पण-

माळरनावरही फुलं फुलतात..हे लिहून ठेवा !

ही भिमगर्जनाच आहे सत्व,नीतीनिष्ठ आणि सच्च्या मातीवर विश्वास असणाऱ्या मानवतेची प्रार्थना म्हणणा-या माणसांची, निसर्ग कवितेच्या वाटेवर नीलम माणगावे तितक्याच संथपणे निसर्गाच्या होऊन जातात तिथल्या विरोधाभासाचे,तर कधीकधी तिथल्या तरंगाच्या परागाच्या गोष्टी सांगतात

खूप पेरलेले…

उगवले काहीच नाही

कधीच नव्हते पेरले,त्यांनीच केली घाई

पोळपाटाला पानं..लाटण्याला आली फुलं

हिरवी झाडं कालबाह्य…

कारखान्यात पिकूलागली फळं

आता मातीने करावे काय

कसायाला विकली गाय

कुठं कोल्ड्रिंक धरून ठेवत नाही साय…

हे समजून घ्यायची गरज आहे केवळ शब्दांवर नव्हे तर त्याच्या मागील तगमग निसर्ग -हास होत चाललेला अक्रोशच प्रगट करतो आहे

झाडं म्हणजे इतिहासाची पाळंमुळं

भविष्याचा वेध

कु-हाडीवर कधी करत नाहीत क्रोध

हाच शांतीचा शोध !

ही निसर्ग आणि मन शांती अनुभवायला हवी त्यासाठी झाडांचे पानांचे फुलांचे होऊन जायला हवे आपल्या माणसांच्या चित्रविचित्र वागण्याने म्युझियममध्ये ऊन वारा पाऊस ठेवायला हवा असे आपल्या कवितेत कवयत्री म्हणतात म्हणजे आपण कुठे आहोत याचा विचार करायला हवा,

ऐ क गं गे

या सदरात

खरंच गंगे

अंधारून आलं की वाटतं

आपल्या डायरीतलं एक पान गळून गेलं

पण उगवतीला वाटतं

अरेच्या ! आपल्याला तर एक नवं पानं फुटलं

हा आशावाद नेहमी आपल्या जवळ पाहिजे, परंतु आपल्याला जाणीव ही पाहिजे भोवतालची

गंगे

हीच तर नव्हे

नव्या युगाची कमाई?

कुठला बाप…

कुठली आई

गावागावातली

खचू लागलीय भुई !

अशी जाणीवपूर्वक जाणीव करून देणारी सर्व घटकांच्या सूक्ष्म प्रतिबिंब उतरत गेलेल कधी हळूवार,कधी भेदक,कधी रोखठोक सवाल बनून अनेक अंगानी भाष्य करणारी चिंतनशील,तर कुठे निर्देश करणारी तर कुठे नोंद घ्यायला हवी अशी कवितेची भुई अधिक समृद्ध करणारी कविता नीलम माणगावे यांची नव्या संग्रहाच्या निमित्ताने भेटीस आली आहे त्याचे स्वागत आहे हा सुंदर देखणा कविता संग्रह आपल्या संग्रही असावा असाच आहे,

या मधील अनेक कविता स्पूट स्वरूपात तर काही दिर्घ अशा आहेत, त्या आपल्या विषयाशी घट्ट नाते सांगणाऱ्या आहेत अशी जात, धर्म, कर्म, मर्मभेदी वास्तव अवास्तव वाढलेल्या माणूसपण सुटू पाहणाऱ्या गोष्टीवर भाष्य करणारी कविता आपली होऊन जाते.

नीलमताई माणगावे या संग्रहातून अधिक व्यापक पध्दतीने समोर येतात त्यांची कविता निश्चितच ठळकपणे नोंद घेण्यासारखी आहे.

 

संपर्क – सुश्री नीलम माणगावे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर, मो  9421200421

© श्री अभिजीत पाटील

सांगली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ सुबोध श्रीमद् भागवत् महापुराण ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डाॅ. व्यंकटेश जंबगी

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ सुबोध श्रीमद् भागवत् महापुराण ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

पुस्तक – सुबोध श्रीमद् भागवत् महापुराण

लेखक व परिचय – डाॅ. व्यंकटेश जंबगी.

रसिकहो नमस्कार,

आपल्या संस्कृतीत वेद, शास्त्र, पुराणे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महर्षि व्यासांनी लोकांमध्ये ईश्वर भक्तिचा उदय होण्यासाठी आणि मनाला शांती मिळण्यासाठी १८ पुराणे रचली. त्यात “श्री मद्भागवत् महापुराण”अत्यंत लोकप्रिय व श्रेष्ठ आहे. अनेक ठिकाणी श्री मद्भागवत् सप्ताह होत असतात. आमच्या घराण्यात सुमारे १०० वर्षांपासून श्री मद्भागवत् सप्ताह प्रतिवर्षी संपन्न होतो.  श्री मद्भागवत् महापुराण खूप मोठे आहे. १२स्कंध,३४१ अध्याय,१८००० श्र्लोक आहेत. सर्वानाच एवढे वाचणे शक्य होईल असे नाही. म्हणून या महापुराणावर मी ५६० पानांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध केले. त्या पुस्तकाची वैशिष्ट्ये :-

१) सर्व १२२ कथा सविस्तर आहेत.

२) प्रत्येक अध्यायाचा सारांश.

३) महत्त्वाच्या श्लोकांचे स्पष्टीकरण.

४) तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगून, त्याविषयी श्री मद्भागवत् गीता, उपनिषदे, मराठी संतसाहित्य, सुभाषिते इ. संदर्भ घेतले आहेत.

५) रंगीत चित्रे, रंजक गोष्टी

६) शेवटी अपरिचित शब्दांचा परिचय व या पुराणातील उल्लेखित व्यक्तिंचा परिचय अशी २ परिशिष्टे आहेत.

एकूण ५६० पानांच्या या पुस्तकाची किंमत ४३०/रू असून जेष्ठ नागरिकांसाठी फक्त ३७०/रू आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम सैनिक कल्याण कार्यासाठी ध्वज निधीला देण्यात येणार आहे. पुस्तकाचे नाव:-“सुबोध श्री मद्भागवत् महापुराण कथा आणि तत्वबोध”असे आहे.

पुस्तकासाठी संपर्क:- डॉ. व्यंकटेश जंबगी

फोन:-9975600887

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आजोपिझ्झा ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ आजोपिझ्झा ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

आजोपिझ्झा — आजोबा आणि नातवाच्या गोष्टी

ग्रामीण आणि निमशहरी भागात घडणाऱ्या घटना आहेत. त्यामुळे वाचताना रंगत येते. ओघवत्या शैलीमुळे रंजकता वाढते. हे पुस्तक मोठ्यांनीही वाचावे असे आहे.
अर्जुन हा तिसरीत शिकणारा मुलगा असतो. त्याची आजी नुकतीच निर्वतलेली असते. त्यामुळे आई कामावर गेल्यावर तो एकटा पडतो. शाळेतून घरी आले की घरात कोणी नसते. त्याला आजीची आठवण येते. हा प्रसंग फार उत्कट झाला आहे.

त्याचे त्याला खाणे,पिणे घ्यावे लागते. आणि लहान असल्यामुळे वाटणारी काळजी असतेच. ती अर्जुनाच्या आईला सतत पोखरत असते. मग अनेक उपाय, पर्याय शोधत.
अर्जुनला आजोळी ठेवावे असा विचार मनात येतो. म्हणून ती माहेरी जाते. पण तिथेही अर्जुनला ठेवणे जमत नाही. एकदा एक बाई येते. तिलाच घरी ठेवून घेण्याचा विचार करते. पण व्यवहारिक दृष्ट्या ते योग्य नसल्यामुळे तेही जमत नाही. अर्जुनाच्या आईची धडपड, तगमग या कादंबरीत छान व्यक्त झाली आहे. नोकरी करणाऱ्या आईचा जीव कसा मुलासाठी तळमळतो हे जाणवते. भाजीवाले आजोबा रोज भाजी घेऊन येतात त्यांनाच दत्तक घ्यायचे ठरवतात. तेव्हाचा व्यवहारिक, मानसिक संघर्ष सगळ्यांचाच! सुंदर रीतीने कादंबरीत मांडला आहे. हेच या कादंबरीचे यश आहे. ही कादंबरी सहा सात वर्षांपूर्वी लिहिलेली आहे. तेव्हा मोबाईल वगैरे फार चर्चेत नव्हते. त्यामुळे मोबाईलचा कुठलाच विषय या पुस्तकात आला नाही. तरीही हे पुस्तक हातात घेतले की वाचल्याशिवाय सोडवत नाही. सोपी भाषा, छोटी वाक्ये, ओघवती शैली यामुळे कादंबरी वाचनीय झाली आहेच.  आजोबा भाकरीचा पिझ्झा करतात त्याचे नाव अर्जुन आजोपिझ्झ ठेवतो.

घरात आजी आजोबा असणे गरजेचे आहे, मुलांसाठी आवश्यक आहे. मूल होत नाही म्हटल्यावर दत्तक घेतले जाते. मग आजी आजोबाही दत्तक घ्यायला काय हरकत. काळाची ही गरज आहे. हेच या कादंबरीत अतिशय सुरेख पद्धतीने दाखविले आहे. आतील चित्रे उत्तम आहेत. प्रत्येकाने एकदा तरी ही कादंबरी वाचायलाच हवी. एव्हढे सकस, सक्षम कथानक आहे.

ऋग्वेद प्रकाशनाने वाचन संस्कृती वाढण्यासाठी स्वस्त पुस्तक योजना राबविली आहे. नव्वद पानाचे पुस्तक फक्त पंधरा रुपयाला आहे. मुलांच्या हातात सहज कॅडबरी दिली जाते, एवढ्या सहजतेने हे पुस्तक मुलांच्या हाती ठेवावे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी हातभार लावावा.

मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडामार्फत मुलांसाठी नववर्षाची भेट

शहरी संस्कृतीची, रसरशीत ग्रामीण जीवनाशी नाळ जोडणारी, मानव्य भावनांचे  गीत गाणारी, एक बालक केंद्रित कथा

अज्जोपिझ्झा  (दुसरी आवृत्ती), लेखिका – सावित्री जगदाळे

आणि बालकाच्यात वाचन संस्कृती रुजावी म्हणून अल्पमूल्य प्रकाशन

अक्षर ग्रंथ दालन आजरा येथे मूल्य – ₹15

संपर्क –  7057928092, 9689237011

न व व र्षा तच आपल्या भेटीला

वरील पुस्तक स्वस्त आहे. दिवाळी गिफ्ट बरोबर वाटू शकता. जवळपासच्या शाळातून  सुटी संपल्यावर वाटू शकत.

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” व ”चन्दन” (बालकविता संग्रह) – प्रा. सौ. सुमती पवार ☆ प्रतिक्रिया – सौ. सारिका पाटील

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” व ”चन्दन” (बालकविता संग्रह) – प्रा. सौ. सुमती पवार ☆ प्रतिक्रिया – सौ. सारिका पाटील ☆ 

प्रा. सौ. सुमती पवार

प्रतिक्रिया – पुस्तक “चांदणं” व ”चन्दन” (बालकविता संग्रह)

वैशाली प्रकाशनने प्रकाशित केलेले वरील दोन बालगीत संग्रह नुकतेच माझ्या वाचनात आले.. या आधीची  तुमची काही पुस्तकं मी वाचली आहेत..

लहान मुलांवर चांगले संस्कार करणारे आपले लेखन असते हे तुमच्या “संस्कार” नावाच्या पुस्तकातून माझ्या मनावर बिंबल्या पासून मी तुमच्या पुस्तकांचा शोध घेत असते नि वरील दोन्ही अतिशय सुंदर बालगीत संग्रह माझ्या हाती लागल्यावर मला खूपच आनंद झाला..

आपण हाडाच्या शिक्षिका आहात हे आपल्या लेखनातून प्रकर्षाने जाणवते..तसेच विषयांची विविधताही थक्क करणारी आहे. जवळ जवळ सर्वच विषयांवर आपण लेखन केले आहे.. आपल्या कविता यमकात असल्या मुळे गेय तर आहेतच पण प्रत्येक बालगीत कोणता तरी नवा संस्कार मुलांवर करते हे विशेष आहे…

चंदन व चांदणे हे दोन्ही संग्रह अतिशय वाखाणण्या जोगे आहेत यात शंकाच नाही. देशभक्तीचे बाळकडू तर हेच पण निसर्गातले विविध विषयही शिकवण देणारेच आहेत.

“देश तुम्हाला स्मरतो,”  या कवितेत आपण म्हणता.. “प्राणपणाने करतो रक्षण इंच इंच भूमी प्रजाच सारी भारत भू ची आहे पहा नामी….” अशी किती उदाहरणे द्यावित तेवढी कमीच पडतील…

मराठी बालविश्वात आपण मोलाची भर घालत आहात यात मुळीच शंका नाही…

आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा….?

स्नेहांकित

सौ. सारिका पाटील, नाशिक

संपर्क –  प्रा. सौ. सुमती पवार ,नाशिक, मो ९७६३६०५६४२, [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” (बालकविता संग्रह) ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “चांदणं” (बालकविता संग्रह) ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

पुस्तक – चांदणं (बालकविता संग्रह)

लेखक – प्रा. सौ. सुमती पवार

बालमित्रांनो, नमस्कार..

हो, मी सुमती पवार बोलते आहे. यापूर्वी दहा बालगीतं संग्रहातून आपण भेटलो आहोत. आता तुमच्यासाठी कवितेचं चमचमतं ‘चांदणं’ मी घेऊन आले आहे.

अहो, चांदणं कुणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडते. चांदणं आवडत नाही असा माणूस दुर्मिळच, हो ना? चांदणं, चंद्र आपल्याला खूप आनंद देतात, प्रसन्नता देतात. या चांदण्यावर मराठी कवितेत अनेक गाणी लिहिली गेली आहेत. असा चांदण्यांचा म्हणजे आनंद देणार्‍या बालगीतांचा खजिना मी तुम्हाला अर्पण करते आहे. चांदण्यांचा आपण वेगवेगळ्या अंगांनी आनंद घेतो तसाच हा संग्रह तुम्हाला जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांचा परिचय करून देणार आहे. या ‘चांदणं’ संग्रहात अनेक विषयांच्या सुंदर सुंदर कविता देण्याचा मी प्रयत्न केला आहे. यात देवबाप्पापासून निसर्गापर्यंत अनेक विषय आहेत. आपल्या मायमराठीचे महात्म्य आहे. भारतमातेचा अभिमान आहे.

“तव मातीमध्ये मम राख मिळो

पावन होईल जीवन आमुचे

अश्रू न कधी डोळ्यात तुझ्या

तुज दिवस दाखवू भाग्याचे”

अशी भूमिका आपली असली पाहिजे. असे मला वाटते. मित्रांनो, निसर्ग मला फार आवडतो. निसर्ग कुणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतो. निसर्गातील झाडं, पानं,फुले, फळे, पक्षी, तारे, वारे हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. त्याशिवाय आपल्या जगण्याला अर्थ नाही. म्हणूनच निसर्गातील विविध विषयांवर तुम्हाला कविता दिसतील, आवडतील. तुम्हालाही निसर्गात रमायला, सहलीला जायला आवडते, हे मला माहीत आहे. मला तर झाडे म्हणजे ‘यक्ष’च वाटतात. आदर्श गाव कसं असावं, तेही मी तुम्हाला सांगितले आहे. झाडांनी नटलेला हिरवागार, प्राण्या-पक्ष्यांनी नटलेला गाव कुणाला आवडणार नाही? पक्षी झाडांवर सुंदर घरटी बांधतात. सुगरण झुलता बंगला बांधते, हो ना? पावसाळ्यात सर्वत्र हिरवेगार पाचूचे रान असते. त्या हिरव्यागार गवतावरून चालताना मला स्वर्गात चालल्याचा भास होतो. भोवताली सारा निसर्ग, पाने, फुले हात जोडून, झाडे तुमचे स्वागत करत असतात, स्वर्ग याहून काय वेगळा असतो? पाणी, दातृत्व, आई ,तुम्हाला पडलेले अनेक प्रश्‍न मी यात मांडलेले आहेत . तुमच्या सोबत मी ही लहान होते नि मला माझे बालपण स्मरते.

मग मी थेट भूतकाळात, बालपणात तुम्हालाही घेऊन जाते.या पुस्तकात पपई आहे तसेच पुस्तकही आहे. फळं खाल्ली पाहिलेत प्रकृतीसाठी आणि पुस्तकं वाचली पाहिजेत ज्ञानासाठी! निसर्गात नेहमी आनंद सोहळा चालू असतो. तो अनुभवायला, डोळसपणे बघायला आपण शिकलं पाहिजे. संध्याकाळी, सकाळी क्षितिजावर रोज रंग सोहळा असतो तो आपण बघितला पाहिजे, ते” कोण’ या कवितेतून मी सांगितले आहे. ‘जरा एकदा’ घाटातून फेरफटका मारायला तुम्ही जावे, असे ही मला वाटते.

इथे फुलपाखरे आहेत, नजारे आहेत. मोट आहे, आजीचं विद्यापीठही आहे. दिवाळीपासून होळीपर्यंत सर्व आनंद देणारे विषय, या पुस्तकात तुम्हाला मिळतील व खूप खूप आनंद देतील, असे मला वाटते.

तर मित्रांनो, अशा विविध विषयांनी नटलेल्या ‘चांदणं’ या संग्रहाचं तुम्ही खूप खूप स्वागत कराल, अशी मला अपेक्षा आहे.

 

© प्रा. सौ. सुमती पवार ,नाशिक

दि: १६/१२/२०२०

मो ९७६३६०५६४२

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “ चार नगरातले माझे विश्व” – डाॅ.जयंत नारळीकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “ चार नगरातले माझे विश्व ” – डाॅ.जयंत नारळीकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तक – चार नगरातले माझे विश्व–आत्मचरित्र

लेखक- डाॅ.जयंत नारळीकर

प्रकाशन – मौज प्रकाशन गृह

दिग्गज शास्त्रज्ञानं घडवलेलं रसाळ विश्वदर्शन

ही कहाणी आहे असामान्य बुद्धीमत्ता असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या वडिलांकडून आलेल्या बुद्धिमत्तेचा वारसा पुढे नेणा-या आणि आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणा-या भारतीय शास्त्रज्ञाची..

पाश्यात्य देशात व्यवसायाच्या अनेक संधी येऊनही त्या नाकारत आपल्या  मायभूमीशी असलेली नाळ कायम ठेवत भारतात परतलेल्या निगर्वी व्यक्तिमत्व असलेले डाॅ.जयंत नारळीकर…” चार नगरातले माझे विश्व ” हे त्याचं आत्मचरित्र…

प्रसिद्ध व्यक्तिभोवती एक वलय हे असतेच त्यात जर व्यक्ती डाॅ. नारळीकर यांच्यासारखी असेल तर ही उत्सुकता आपल्याला अधिक असते. अनेकदा प्रसिद्ध व्यक्तींची भाषणे लेख इ. हे सर्वांपर्यंत पोहोचलेले असते आणि माहीतही झालेले असते पण नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन डाॅ. जयंत नारळीकर यांनी त्यांच्या जीवनातले विविध पैलू या आत्मचरित्रात मांडले आहेत. आत्मचरित्र फिरतं ते बनारस, केंब्रिज मुंबई आणि पुणे या शहराभोवती…

यात केंब्रिजबद्दलची माहिती आपणास जास्त वाचावयास मिळते. त्याचे मुख्य कारण ते म्हणजे भारतीयांना केंब्रिजबद्दल असलेले  आकर्षण..  ते केंब्रिज मथ्ये असताना न चुकता (नियमितपणे) घरी आई वडीलांना पत्र लिहून आठवड्यातल्या घडामोडी कळवतं असतं. त्यांची ती सर्व पत्रे त्यांच्या आईने जपून ठेवली होती. आणि त्या पत्राचा उपयोग केंब्रिजचं दर्शन घडवताना करण्यांत आला आहे.

डाॅ. नारळीकरांनी आडनावाच्या कथेपासून सुरूवात केली आहे. ते म्हणतात नारळीकर हे नाव कशावरून आले असावे ? नारळी नामक गावातून आल्यामुळे, का नारळाच्या झाडांच्या लागवडीचे मालक असल्यामुळे ?  याची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. नारळीकरांच्या परसात आंब्याची झाडे होती. त्या झाडांना नारळाएवढे मोठे आंबे लागत म्हणून त्यांचे नाव पडले नारळीकर हे उत्तर गृहीत धरले तर एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे नारळीकरांचे मूळ आडनाव काय होते ? असो..  त्यांचे  वडिल केंब्रिज मधू उच्चविद्या विभूषित होऊन परतले ते बनारसला त्यामुळे डाॅ.नारळीकर यांचे बालपण बीएचयूच्या आवारातच गेले आणि शिक्षणही बनारसमध्ये झाले.

लहानपणीच्या आठवणी सांगताना त्यांनी १९४० ते १९५० च्या दशकातलं चित्रण रंजक पद्धतीने केले आहे. केंब्रिज मध्ये जाण्यासाठीची त्यांची धडपड आणि ट्रायपाॅस परिक्षेची तयारी यांची माहिती देताना  तिथल्या सामाजिक रूढी, परंपरा यांचं वर्णनही त्यांनी सुरेख केले आहे. हाॅएल यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या बरोबरचं संशोधन हा कालखंड वाचताना वैज्ञानिक भाषा कुठेही अवघडतेने मांडलेली नाही. संशोधनानंतर गृहस्थाश्रमातील प्रवेश मुंबईत ‘टीआयएफआर’ मध्ये केलेले काम, पुण्यात ‘आयुका’ ची उभारणी इत्यादींची माहिती त्यांनी अत्यंत सुरेख आणि सुबक पद्धतीने मांडली आहे..  जीएमआरटीचे नियंत्रण केंद्र पुण्यात सुरू करण्याची कल्पना आणि त्याही पुढे जाऊन सुरू झालेलं आंतरविद्यापिठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक केंद्राची स्थापना यांची कथा तर वाचण्यासारखी अप्रतिम अशी…

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शालेय जीवन ते आयुकातून निवृत्त होईपर्यंतच्या आपल्या प्रवासात भेटलेल्या दिग्गजांची व सहका-यांची ओळख त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत करून दिली आहे. त्यामुळे ते केवळ आत्मचरित्र न राहता त्या त्या कालखंडाची ओळख आपल्याला करून देणारा एक दस्तावेज..

या पुस्तकातून यशापयशाच्या भोव-यात सापडलेल्या आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल असे मला आवर्जून सांगावेसे वाटते…

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कविता संग्रह – “मृगजळाकाठी” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कविता संग्रह – “मृगजळाकाठी” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

पुस्तकाचे नांव : कविता संग्रह – मृगजळाकाठी

लेखिका : श्रीमती उज्ज्वला केळकर

प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन

प्रथम आवृत्ती : २७फेब्रुवारी २०१७

किंमत : रु.१००/—

श्रीमती उज्ज्वला केळकर

मृगजळाकाठी विसावण्यापूर्वी  थोडं कवियत्री सौ. ऊज्वला केळकर यांच्याविषयी..

ऊज्वलाताई या हाडाच्या शिक्षीका. मुख्याध्यापक पदावरुन आता निवृत्त असल्या तरी विद्द्यार्थांमधे असलेला प्रचंड ऊत्साह आजही त्यांच्यात टिकून आहे.

विवीध साहित्य प्रकारातील आणि अनुवादित अशी जवळ जवळ साठाच्यावर त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत.चंद्रपाखीची वाट नंतर “मृगजळाच्या काठी ” हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.  या संग्रहातील कविता सहा विभागात वाचायला मिळतात.

सर्व कविता मुक्तछंद, छंदोबद्ध, कणिका, हायकु या काव्याप्रकाराच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आहेत..

त्यांच्या सर्वच कविता भावना, बांधीलकी आणि विचारांनी समृद्ध आहेत.कqविता वाचताना, निसर्ग प्रेम, संवेदनशील मन, वैचारिक दृष्टीकोन,शब्द आणि भाषेवरील प्रभुत्व, प्रामुख्याने जाणवते. कल्पकता आणि मन:चक्षुने रेखाटलेली शब्दचित्रे कवितेतून जाणवतात. मनाला भिडतात, आनंद देतात.

“गंध गाभार्‍या तळी” या विभागातल्या निसर्ग कविता सृष्टीची विवीध रूपे उलगडतात. पानगळ, शिशीरऋतु च्या रुपाशी आपलं भावुक नातं जुळतं. “अवलिया” च्या,  रुपात

एक व्यक्ती म्हणूनच, शिशीर ऋतु ऊभा ठाकतो.

भरली झोळी फकीर गेला

धुळीमातीची विभूती लावूनी

मलीनधुक्याचे लक्तर लेऊन

सृष्टी बसली भणंग होऊनी…

अवलिया येतो, गळलेली पानेफुले झोळीत भरतो, त्याच्या येण्यानं सृष्टी धुळकट,ओकीबोकी, रूक्ष बनते. वाचता वाचताच जाणवते हा अवलिया दुसरा तिसरा कुणी नसून

साक्षात शिशीर ऋतुच.कवियत्रीच्या कल्पनेला,मन मग भरभरून दाद देतं….

“सांज सजे अलबेली रात काळोखी..”

या विभागातून रात्रीची अनेक रुपे डोळ्यासमोर येतात. रात्र.. कुणाची अशी तर कुणाची कशी..

“सांज सजे अलबेली..कुणी हिला नादावली..”

किंवा

“चंद्र नकली,चांदण्याही चांदव्याला टांगुन आले”

 नाहीतर…

“रात्र लडिवाळ.गोष्टीवेल्हाळ..”

रात्र..”मृतवत् जीवनात प्राण फुंकणारी..”

रात्र.चंद्रबनातून अलगद ऊतरणारी…”

“चंचल,मद् होश नटनारी रात्र…”

अशी, कधी व्याकुळ, वेदनादायी, प्रेममयी, कुटील कारस्थानी रात्र या काव्य पंक्तीतून आपल्याही जाणीवांना टोकरते….कविता आणि कवियत्री एकरुप झाल्यासारख्या वाटतात.

“पाऊस,रानातला..अंगणातला..मनातला..कवितेतला..”

या विभागात वाचक पावसात चिंब भिजतो.. पावसाविषयीच्या विवीध भावना…पाऊस हवा,पाऊस नको..पाऊस लडीवाळ, बालीश..ऊदास नाहीतर वादळी..

कवियत्रीचं मन पावसाशी गप्पा मारतं. रागावतं, भांडतंही. नव्हे धिक्कारही करतं!!

“घन ओंबून आले ।क्षण माथ्यावर झुकले। परि न बरसले….”

“पाऊस ऊरी जपताना।कोसळे भिंत भवताली।

मोकळ्या स्तनांवर झुकली ।घनगर्द तुझी सावली।

ऊज्वलाताईंच्या या काव्यातले हे टपटपणारे शब्द

मनातल्या बोथट बीजांना अंकुर फोडतात..

“कविता तुझ्या माझ्या..त्याच्या तिच्या…”

या विभागात नाती ऊलगडतात..” स्त्री आणि पुरुष यांच्यामधील आर्त,स्वप्नाळु,ओढाळ,सैल घट्ट भावनाविष्कार या कवितांतून जाणवतात.

“प्रवाह” ही कविता काहीशी रुपकात्मक वाटते.

वादळ आणि झाड यांच्यातील हा संवाद आहे. धडका देणारं वादळ आणि झाडांची रुजलेली मुळं.. एका परिपक्व नात्याचेच महत्व सुंदरपणे ऊलगडत जाते.

“तुझ्या प्रवाहावर झोकून देणं कसं घडेल?

त्यापेक्षा तूच आवर ना तुझा आवेग..!

या थोड्याच शब्दांत केव्हढा मोठा आशय!!!

“व्रतोत्सव “या विभागात जगण्याचं व्रत घेतलेल्या माणसांच्या कविता आहेत..

“तूही पेटव तुझ्या अंतरात

एक आशेची शलाका

जी ऊजळून टाकेल

काळजात कोंडलेले

शाश्वत नैराश्य…आणि करील तेजोमय अवघे प्राण..

सकारात्मक विचार जणु जगण्यास बळ देतात.जगणं फुलवतात…

आपल्या एकाकीपणाकडेही तटस्थपणे पाहताना, कवियत्री म्हणते,

मीच दिलेल्या शस्त्रांनी ।

माझे बंध तोडून!

मीच दिलेल्या ऊंटावर।

मीच दिलेले जवाहर लादून।

सारे गेले निघुन।

मला एकाकी टाकून…।।

तेव्हां जाणवतो जगातला पोकळपणा..धूसर खोटेपणा..

“अनुवादित कविता” हा शेवटचा विभाग. यात मान्यवर हिंदी कवींच्या अनुवादित कविता आहेत.

आपल्याला आवडलेलं रसिकांच्यात वाटावं, या समृद्ध भावनेतून केलेली ही पुरवणी. ऊत्कृष्ट विचारांचं ऊत्कृष्ट भाषांतर.

घनश्याम अग्रवाल यांची अनुवादित,”देशभक्तीची कविता..” मनाला भिडते. देशभक्तीची एक नवीनच सापडलेली व्याख्या थक्क करते.कविता दूर सरहद्दीवर असते

डबडबलेल्या डोळ्यांनी बघते

विचार करते

जितकं दु:ख वेदना इथे आहे

तितकच दु:ख वेदना तिथेही आहे..

कवितेसाठी तहान लागली असता

स्वत:ला पिणं, म्हणजे देशभक्ती

कुणा दुसर्‍यामधे

 स्वत:ला ढाळून जगणं

म्हणजे देशभक्ती….

कविता किती निस्पृह मनातून आलेली असते याचाच वस्तुपाठ हे शब्द देतात.

“मृगजळाकाठी..” या कवितासंग्रहावर लिहीताना एक सांगावसं वाटतं की मूळात हे शीर्षकच किती बोलकं आहे..अस्तित्वातच नसलेल्या भासमय गोष्टी मिळवण्यासाठी आपण अव्याहत धडपडतो…पण जे स्वप्नांत असतं ते कवितेत मात्र गवसतं..आकारतं.. आणि मग त्या मृगजळाकाठी आपली आनंददायी सैर घडते… कविता वाचतांना त्या काव्याची ,कवीच्या मनातली पार्श्वभूमी आपल्याला अवगत नसली तरीही आपल्या मनांत विवीध अर्थ उलगडतात आणि त्यातच आपण डुंबतो…तरंगतो..हे तरंगणं म्हणजेच काव्याचं यश…

ऊज्वलाताई या कवितांतून हा अनुभव देतात,म्हणूनच हा कवितासंग्रह वाचनीय आहे असे मी खात्रीपूर्वक म्हणू शकते..

माझ्या आनंदातले काही कण आपणही वेचावेत….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “अमिबा” – श्री श्रीकांत सिंधु मधुकर ☆ श्री ओंकार कुंभार

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “अमिबा” – श्री श्रीकांत सिंधु मधुकर ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

पुस्तक – काव्यसंग्रह – अमीबा

कवी – श्रीकांत सिंधु मधुकर

प्रकाशक – अंतर्नाद पब्लिकेशन

प्रथम आवृत्ती – 15 आँगस्ट 2018 (रायगड)

मूल्य –  100 रुपये

पृष्ट संख्या – 76

 

पुस्तक परिक्षण

श्री श्रीकांत सिंधु मधुकर या नवोदित कवीने एका वेगळ्याच नावाने लिहलेला हा सुंदर काव्य संग्रह आहे. काव्यसंग्रहाला अमिबा हे नाव का ठेवावस वाटले ते मलपृष्ठावर सांगितलेले कवीच्याच शब्दात सांगायचे झाले तर कवी म्हणतात, “माणसाचं आयुष्य अमिबासारखं हवं. एकपेशीय, तरीही स्वच्छंदी. हवा तसा आकार घेऊनही सार्यांच्या नजरेत बरोबर असणार्या साध्या आणि सोप्या अमिबासारखं! ज्याच्या नावात आईचा अ, माझा मी आणि बाबांचा ब आहे, तो जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणून या काव्यसंग्रहास अमिबा म्हणावसं वटतं.”

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर इंद्रधनू कडे कौतुकाने पाहणारे आई, वडील आणि मुलगा यांची छायाकृती आपणास पहावयास मिळते. मुखपृष्ठाद्वारे मुखपृष्टकार मधुरा जोशी यांनी आपणास एक छान संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे आयुष्यातील काळोखाच्या समयी इंद्रधनू च्या रंगांनी जीवन बहरुन जाते, जीवन जगण्याची प्रेरणा प्राप्त होते.

कवी श्रीकांत हे पट्टीचे गिर्यारोहक आहेत आणि एक उत्तम कवीही. अमीबा या काव्यसंग्रहात 69 कविता आहेत आणि कवितांना आशयघन करणार्या चित्रांचीही खूप सुंदर रेलचेल आहे. हा पूर्ण कवितासंग्रह मुक्तछंदात लिहला आहे.   सगळ्याच कविता या सुंदर आहेत. कवितेत कवीने वेगवेगळे विषय खूपच छान व वेगळेपणाने हाताळले आहेत व मांडणीही वेगळेपणाने केली आहे.

मित्र या कवितेत शेवटी मित्राची छान व्याख्या करताना कवी म्हणतो,

“एक मित्र असावा असा सुचणार्या कवितांप्रमाणे श्रीमंत

एक असला तरी भासावा असा शंभराहूनी मूर्तिमंत !!”

पहिला पाऊस या कवितेचा शेवटही कवीने असाच सुंदर केला आहे.

“मनात त्यांच्या भिजविणारा

मज थेंब भेटला होता

दारावरी ज्यांच्या असा तो

पाऊस दाटला होता.”

सूर्यपुत्र या पहिल्याच कवितेत कवी कर्णाची भावना आपल्या शब्दात व्यक्त करताना म्हणतो,

“नियतीने मारलं तरी

मरण मला कधी आलच नाही

जे तत्वांसाठी जगतात एकनिष्ठ

ते मरूनही कधी मरत नाहीत.

शरीरं जाळली जाऊ शकतात

आणि कपडेलत्ते संपत्तीही

जाणिवा कधी जळत नाहीत

काळ पलटून गेला तरीही.”

आपल्या रायबा कवितेही तरुण पिढीच्या डोळ्यात रसरशीत अंजन घातले आहे. त्यातील काही ओळी…

“राबाकडे बुलेट नव्हती

रायबा नव्हता नाचत डिजेवर

रायबाला नव्हती माहीत मदिरा

नव्हता झिंगला तो कधी वेशीवर

रायबाला दिसलच नव्हतं

परस्रीचं ते खणी रुपडं कधी

असायचं लक्ष ज्याचं तिच्या पैजणावर”

शेवटी किन्नरांच्या व्यथा किन्नर या कवितेतून मांडताना कवीचे सामाजिक भान किती प्रगल्भ आहे ते जाणवते. त्यामध्ये कवी मांडतो…

कवितेतील काही ओळी अश्या…

ते स्पष्ट बोलत नाहीत,

 ते एकमेकांना फसवतात!

 ते दंगली घडवून आणतात,

 ते बाईला नाचवतात!

ते मढ्यावरचही मिळून खातात!

‘ते’ म्हटलं की तुम्हाला ‘ते’ आठवत नाहीत

कारण काय तर त्यांना लिंग आहे

आम्ही शरीरानं नपुंसक असू;

पण मनानं ते खोल अपंग आहेत

उपेक्षु नकोस मला किन्नर म्हणून

विचार माझे तुझ्याहून स्वच्छ आहेत,

परिस्थितीनं डावललं जरासं तरी

या सर्वांहून मी उच्च आहे!

शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगावेसे वाटते. ते म्हणजे सर्वांनी हा कवितासंग्रह मुळातून पूर्ण वाचायला हवा. आवर्जून विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवावयास हवा.

असा हा अप्रतिम काव्यसंग्रह माझ्या वाचनात आला आणि त्याचा पुस्तक परिचय मला आवर्जून द्यावासा वाटला. कारण, या कवितासंग्रहाची शैली होय. श्रीकांत सिंधू मधुकर यांचा हा काव्यसंग्रह वाचकाला भरभरून काही तरी अलौकिक देतो म्हणूनच. कविंना व काव्यसंग्रहास खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद!

©️ श्री ओंकार कुंभार

श्रीशैल्य पार्क, हरिपूर सांगली.

मो.नं. 9921108879

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शाळा” – श्री मिलिंद बोकील ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “शाळा” – श्री मिलिंद बोकील ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

“शाळा” हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अनेकांकडून त्याची भरभरून स्तुती झाली. म्हणून मी आवर्जून तो बघितला. पण मला काही तो फारसा रुचला नाही. तोपर्यंत मी पुस्तक वाचले नव्हते. पण तेवढ्यातच माझ्या साहित्यिक मित्राने या चित्रपटावर व पुस्तकावरही खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि मी आधी जाऊन हे पुस्तक खरेदी केले.

पुस्तक वाचू लागले आणि मग मला चित्रपटातील संदर्भ उलगडत गेले. बऱ्याचदा असे घडते की एखादे पुस्तक आपण वाचलेले असते आणि आपल्या कल्पेनेतून त्या पात्रांची निर्मिती केलेली असते. त्यामुळे त्यावर तयार केलेली कलाकृती आपल्याला भावतेच असे नाही. पण ‛शाळेच्या’ बाबतीत माझा उलटा प्रवास होता. तरीही मला पुस्तकच जास्त भावले , कारण त्यातील वातावरण, व्यक्तिरेखा लेखकाने ठळकपणे मांडल्या आहेत. वेळेचे किंवा शब्दांचे बंधन नव्हते . त्यामुळे मुकुंदाचे भावविश्व सहज उलगडले गेले आहे.

खरे तर हे पुस्तक म्हणजे मुकुंद आणि त्याच्या मित्रांचा पौगंडावस्थेतील भावभावनांचा प्रवास आहे. आत्ताच्या भाषेत आणि आत्ताच्या काळाला अनुसरून  म्हणायचे झाले तर “ first crush” ही रुढ झालेली आणि कौतुकाने मिरवली जाणारी  संकल्पनाच लेखकाने यात मुकुंद, सुऱ्या, चित्रे, फावड्या यांच्या माध्यमातून मांडली आहे. त्या अर्धवट वयातील त्यांचे अपरिपक्व विचार, संकल्पना, मस्ती याचे चित्रण यात आहे. सुऱ्याने केवड्याला प्रपोज करणे आणि त्यातून घडलेले रामायण! त्या प्रसंगात मुकुंदच्या वडिलांनी दाखवलेला संयम एक आदर्श पालक   आपल्यासमोर उभा करतो.

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मांडली गेलेली ही कथा आहे. म्हणजेच साधारण ७० ते ८० च्या दशकातील! त्यामुळे त्या काळातील सामाजिक, राजकीय संदर्भ देत लेखकाने कथानकाला कुठेही धक्का न देता वातावरण निर्मिती केली आहे. शिवाय यातील प्रत्येक पात्र वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातील आहे. त्यामुळे त्यांना घरातून मिळणारे संस्कार पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणूनच मुकुंद जरा चलबीचल झाला तरी पुन्हा झटून अभ्यास करतो आणि परीक्षेत सुयश प्राप्त करतो.

वास्तविक  त्या वयात असणाऱ्या सर्व मुलामुलींच्या आयुष्यात घडणारे हे सर्व प्रसंग आहेत. फक्त स्थळ- काळात थोडा बदल असेल. कालानुरूप प्रसंग, संदर्भ थोडे बदलत असतील. पण सर्वांनीच अनुभवलेले हे भावविश्व या पुस्तकात मांडले गेले आहे. जणू काही आपलेच अनुभव वाचत असल्यासारखे वाटते. म्हणूनच सर्वांनी एकदा तरी वाचले पाहिजे असे हे पुस्तक आहे.

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “आमचा बाप आन् आम्ही” – डॉ नरेंद्र जाधव ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ पुस्तक “आमचा बाप आन् आम्ही” – डॉ नरेंद्र जाधव ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

काही व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. आपल्या आयुष्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. तर काही व्यक्ती आपल्या नकळत आपल्याला प्रभावित करत असतात. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे वडील! त्यांचे दादा ; पण खऱ्या अर्थाने बापमाणूस!

‛आमचा बाप आन् आम्ही’ या पुस्तकाच्या तब्बल १६१ आवृत्त्या निघाल्या आणि देशी- विदेशी अशा एकूण १७ भाषांमध्ये ते अनुवादित झाले. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. नरेंद्र जाधवांनी या पुस्तकात आपले वडील, आज्जी ,आई यांच्याबद्दल एक एक प्रकरण लिहिले आहे. शिवाय वडिलांनी आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत लिहिलेले आत्मचरित्र त्यात समाविष्ट केले आहे. ते  वाचताना त्या भाषेचा बाज आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. थोडासा मिश्किल, पण शिस्तप्रिय असणारा बाप मनाला मोहवून जातो. “तू तुझ्या बुद्धीला योग्य वाटल तेच होन्याचा प्रयत्न कर. माझं म्हनन एवढंच हाये का तू जे करशील तेच्यात टापला जायाला पायजे. तुला चोर व्हायाच? पण मग असा चोर व्हय, का दुनियाने सलाम केला पायजे.”  असे सांगणारा बाप ‘सर्च फॉर एक्सलंस’ हेच तत्वज्ञान सांगतो असे जाधवांना वाटते.

जाधव कुटुंबात एकूण ही सहा भावंडे, आई- वडील व आज्जी अशी एकत्र राहिली. वडील बिपीटी मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. त्यामुळे  डॉ. जाधवांचे बालपण वडाळ्याच्या वस्तीत गेले. अर्थातच तिथले आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण उच्चभ्रू समाजापेक्षा वेगळे होते. पण जाधवांच्या बापाकडे असणाऱ्या डोळसपणामुळे ही भावंडे कायम वेगळ्या वाटेने गेली आणि त्यांनी आपापल्या क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करून दाखवली.

हा सर्व विलक्षण प्रवास वाचण्यासारखाच आहे. ती एक कथा आहे एका कुटुंबाची ज्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत एक नवे क्षितीज गाठले आहे. हे एका सामान्य असणाऱ्या असामान्य माणसाने स्वतः च्या भाषेत लिहिलेले आत्मचरित्र आहे असेही म्हणता येईल. तर ही सर्वाना प्रेरणादायी ठरेल अशी सर्व भावांची यशोगाथा आहे जी त्यांनी आपल्याच शब्दात मांडली आहे.

पुस्तकाचा आकृतिबंध(form) हाही एक मराठी भाषेतील नवीन प्रयोग मानला जातो.

म्हणूनच सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. सर्व पुस्तकांचा “ बाप”!

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares